80 एकरांवर पसरलेला लोधी गार्डन्स म्हणजे इतिहास आणि निसर्गसौंदर्य यांचा उत्तम मिलाफ आहे. दिल्लीतले हे लोधी गार्डन्स सर्वात आधी लेडी वेलिंगडन पार्क म्हणून ओळखला जायचा. या लेडी वेलिंगडन म्हणजे भारताचे गव्हर्नर जनरल वेलिंगडन यांच्या पत्नी. या बाईच्या पुढाकारानं ही गार्डन्स फुलवली गेली. स्वातंत्र्य मिळाल्यावर या गार्डन्सचं नामकरण लोधी गार्डन्स असं करण्यात आलं. इतिहास आणि वास्तुकलाशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही गार्डन्स महत्वाची आहेत. १५व्या आणि १६व्या शतकात बांधलेल्या इथल्या वास्तू अजून बऱ्यापैकी तग धरून आहेत. सय्यद घराण्याचा शेवटचा राजा महम्मद शाह आणि लोधी घराण्याचा राजा सिकंदर लोधी यांच्या कबरी इथे आहेत. सय्यद आणि लोधी या दोन्ही घराण्यांच्या फारशा वास्तू दिल्ली परिसरात नाहीत. त्यामुळे या दोन कबरीना इतिहाससंशोधकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. दोन कबरीबरोबरच इथे शिश गुम्बज आणि बडा गुम्बज आहेत. या दोन्ही वास्तू लोधी घराण्यानं १५व्या शतकात बांधलेल्या आहेत. लोधी रोडवरून जाताना मोहम्मद शाहची कबर दिसते. ही अष्टकोनी कबर आहे आणि रात्रीच्या वेळीसुद्धा ही वास्तू अतिशय सुंदर दिसते. याच गार्डन्समध्ये एक अतिशय टुमदार पूलही आहे. आठ खांबांवर उभारलेला हा पूल आठपुला म्हणून ओळखला जातो. हा पूल पूर्वी 'खैरपूर का पूल' म्हणून ओळखला जायचा.खैरपूर हे गाव होतं. या गावातल्या मंडळींना दुसऱ्या ठिकाणी हलवून इथे ही गार्डन्स विकसित केली गेली. त्या गावाची आठवण म्हणून तो खैरपूर का पूल! लोधी गार्डन्समधली झाडांची, फुलझाडांची विविधता जबरदस्त आहे. ८० एकर परिसरात हे गार्डन आहे आणि अर्जुन, चाफा, नीम, बकुळ, बाहावा, गुलमोहोर, शिशम, अशोक, कुसुम, जांभूळ अशी पाच हजारांहून जास्त वेगवेगळी झाडं इथे आहेत. बहुतेक झाडांवर नावाच्या प्लेट लावलेल्या आहेत. या गार्डन्समध्ये एक बांबूचं बन आहे. पाम झाडांचाही एक मोठा विभाग आहे. एका रेषेत डुलणारी पामची झाडं पाहायला मजा येते. इथे फुलझाडंही खूप प्रकारची आहेत. झाडं-फुलं आहेत म्हटल्यावर भरपूर पक्षीही आहेत इथे. सकाळच्या वेळेत तर पक्ष्यांच्या किलबिलाटानं सगळा परिसर गजबजून गेलेला असतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment