लहान मुलांना वेगवेगळ्या कला माध्यमांची ओळख करून देणारी गेली 45 वर्षे अविरत चालणारी एक जुनी चळवळ आहे. तिचं नाव बसोली. दृककलेचं बालमनाशी नातं जोडणारी ही संस्था आहे. संस्थेचे सर्वेसर्वा चंद्रकांत चन्ने यांनी मुलांच्या मनावर गारुड केलं आहे. इथली मुलं मोठमोठाली चित्रं काढताहेत. त्यांना हवी तशी,हव्या त्या रंगात. इतकंच नव्हे तर इथे मुलं मातीच्या गोळ्याला आकार देतात. शिल्प रेखाटताहेत. वॉल पेंटिंग करतात.पथनाट्य, नाटुकली बसवताहेत, त्यांनीच बनवलेल्या बोलक्या बाहुल्या त्यांच्याच भाषेत बोलताहेत. गीत,क्राफ्ट, क्ले, अभिनय अशा कितीतरी प्रकारात मुलं रमतात.
इथं लहानग्यांच्या चित्रांचं कौतुक होतं. त्यांच्या चित्रांचं,शिल्पाचं मोठमोठ्या शहरांमध्ये प्रदर्शन भरवलं जातं. त्यांना भरभरून दाद मिळते. त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाले आहेत. मात्र या लहान मुलांना अधिक प्रिय असतो तो निर्मितीचा आनंद!यात चन्नेकाका,त्यांचे ताई-दादा हरवून जातात.चित्रनिर्मितीत वर्षभर गुंतून राहणारी ही मुलं रेषांमधून कधी निसर्ग दाखवतात तर कधी समाजाची स्पंदनं. कधी बालकवी, मर्ढेकर यांच्या कवितांचा गजर करतात. कवितेला चित्ररूप देतात. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत नागपूर आणि परिसरातील मुलं निवासी शिबिराचा आस्वाद घेतात. यआ शिबिरात मुलांना वेळेचा सदुपयोग, खेळ, स्वयंशिस्त, सहकार्य, आपुलकी, सहानुभूती, मैत्री,जिव्हाळा, भावनिकता आदी गोष्टी सहज शिकायला मिळतात. याशिवाय आजी-आजोबांचा मेळावा, नाट्यखेळ, बाहुला-बाहुलीचं लग्न, राऊंड एक्सप्रेशन्स ,इनोसंट कॅनव्हास या उपक्रमांमुळे मुलांची कृतीशीलता आणि कल्पनाशक्ती वाढते. मध्यंतरी ही लहान मुलं थेट रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये जाऊन आली. तिथं त्यांच्या चित्र प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. इतकेच नव्हे तर बसोलीच्या बालचित्रकारांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कवितांवर चित्र साकारले होते. डॉ. कलाम यांनी यातील ५० चित्रे विकत घेऊन राष्ट्रपती भवन येथे सजविली. बालचित्रकारांना दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांचा सत्कार केला, त्यांच्यासोबत जेवण केले. बसोलीच्या चिमुकल्यांची सहा शिबिरे लंडन व सहा शिबिरे पॅरिसला आयोजित करण्यात आली होती.
आपल्या मुलाचं भावविश्व समृद्ध व्हावं, ज्ञान आणि कौशल्य शिकून तो परिपूर्ण व्हावा, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. कलेच्या माध्यमातून ते साध्य करण्याचा प्रयत्न इथं होताना दिसतो. चंद्रकांत चन्ने गेल्या 45 वर्षात कितीतरी मुलांच्या सहवासात आहेत, होते. त्यांना काळासोबत उपक्रम बदलले, मुलांची कला,वृत्तीही बदलताना दिसल्या. श्री. चन्ने एके ठिकाणी म्हणतात की,अलीकडे तर हा मोठा बदल जाणवतो. सुरुवातीला समोर दहा चित्रं ठेवली तर लगेच कळायचं की, चित्र मुलाचं आहे की मुलीचं. पण आज मुलींच्या चित्रांच्या फटकाऱयांमध्येही बोल्डनेसपणा जाणवतो. त्यांची स्वतंत्र शैली, वेगळा ठसा चित्रात उमटलेला असतो.
गेल्या 45 वर्षांमध्ये हजारो-लाखो विद्यार्थ्यांमध्ये कलेच्या जाणिवा पेरणारी ही आनंदयात्रा चंद्रकांत चन्ने या अवलियाने सुरू केली आहे.हिमाचल प्रदेशमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेले व भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे गाव म्हणजे बसोली. याच गावावरून चन्ने यांनी कलाजग निर्माण केले. आज यासाठी त्यांची तिसरी पिढी योगदान देत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment