Monday, 17 May 2021

39 बायका,94 मुलं असा 181 सदस्यांचा कुटुंब काफिला


सध्या आपल्या देशात एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारी नियमांमुळे म्हणा किंवा आर्थिक अडचणींचा परिणाम म्हणा अलिकडे कुटुंबे छोटी होत चालली आहेत. आपल्या देशात सरकारी कर्मचाऱयांना दोन मुलांवर कुटुंब शस्त्रक्रिया बंधनकारक आहे, नाही तर नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे 'हम दो हमारे दो' अशीच पद्धत रूढ होऊ लागली आहे. मात्र, जगात तेही भारतात असे एक कुटुंब एकत्र आहे, त्यामध्ये एकूण 181 लोक अगदी  गुण्यागोविंदाने राहत आहेत. उल्लेखनीय म्हणजे कोरोना काळातही हे कुटुंब अगदी सुरक्षित आहे. मिझोराममधील जियोना चाना या 74 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबाला तुम्ही एक 'इंडिपेंडंट कम्युनिटी' म्हणू शकता. जियोना चानाला एकूण 39 बायका आहेत. तसेच त्यांना 94 मुलं आहेत. आणि या कुटुंबात मिळून तब्बल 181 लोक राहतात. हे सगळे लोक एका मोठाल्या घरात राहतात. एकाच घरात एवढी गर्दी असूनही आतापर्यंत तरी सर्व लोक कोरोनापासून सुरक्षित आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 181 सदस्य संख्या असलेले हे जगातील सर्वात मोठे कुटुंब ठरले आहे. जियोना चाना हा कुटुंबप्रमुख. त्याला एकूण 39 पत्नी, 94 मुले, 14 सुना, 33 नातवंडे व परतवंडेही आहेत. हे सर्वजण 100 खोल्यांच्या एका मोठ्या इमारतीमध्ये राहतात. हे कुटुंब मिझोराममधील हिरव्यागार पहाडी इलाक्यातल्या वनराईने नटलेल्या बटवंग गावात राहते. या कुटुंबाला रोज जेवणासाठी 45 किलो पेक्षाही जास्त तांदूळ, 30 ते 40 कोंबडे, 25 किलो डाळ, अनेक डझन अंडी, 60 किलो भाजी लागते. याशिवाय रोज 20 किलो फळे लागतात. विशेष म्हणजे कुटुंबाला लागणारा भाजीपाला हे कुटुंब स्वतः उगवते. या कुटुंबाची स्वतःची शेती आहे. आणि कोंबड्या, अंड्यांसाठी पोल्ट्री फॉर्मही सुरू केले आहे.बटवंग परिसरात या चाना कुटुंबाचा मोठा दबदबा आहे.

No comments:

Post a Comment