गेल्या सव्वा वर्षांपासून शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. शिक्षण सुरू आहे. बाकीचा रिकामा वेळ मुलं टीव्हीवर कार्टून्स पाहून तर काहीजण मोबाईलवर गेम खेळून घालवत आहेत. पण काही मुलं या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करताना दिसतात. काही तरी नवीन बनवलं. काही तरी वेगळं करणं. मात्र काहींनी नवनिर्मितीचा ध्यास घेऊन जगात आपलं नाव कमावलं आहे. वाचून वाटलं ना आश्चर्य! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव कोरलेल्या काही मुलांविषयी जाणून घेऊया.
अथर्व आर. भट्ट, भारत : रुबिक क्यूब (घन) पजल गेममध्ये एकाच रंगाच्या विखुरलेल्या चौकोनी पट्ट्या सलग एकाच रंगात आणायच्या असतात. हा डोक्याच्या व्यायामाचा खेळ (गेम) आहे. रुबिक क्यूब सोडवणं तसं सोपं नाही. एक रुबिक क्यूब गेम सोडवताना कित्येक तास किंवा दिवस लागतात. पण बेंगळुरूमधल्या एका आठ वर्षांच्या मुलाने काही मिनिटांत हा गेम सोडवून विक्रम प्रस्थापित केला आहे. अथर्व आर. भट्ट असे या मुलाचे नाव असून त्याने फक्त एकच गेम एका मिनिटांत सोडवला नाहीतर दोन हातात दोन आणि एक गेम पायाने असे एकूण तीन गेम त्याने एका दमात आणि तेही काही मिनिटांत सोडवले आहेत. त्याने हा चमत्कारिक कारनामा 1 मिनिटं आणि 29.97 सेकंदात करून दाखवला आहे. सर्वात वेगाने रुबिक क्यूब सोडवणारा होल्डर म्हणून अथर्व भट्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. त्याने हा विक्रम 9 डिसेंबर 2020 मध्ये केला आहे.
नादुब गिल, इंग्लंड : इंग्लंडच्या दहा वर्षाच्या नादुब गिल यानेदेखील गणिताचा सराव करून आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं आहे. नादुब गिल याचे कुटुंब मूळचे पाकिस्तानी आहे. त्याने एका मिनिटात 196 गणिताचे प्रश्न सोडवले आहेत. नादुब याने ऑनलाईन मॅथ टेबल ऍप 'टाइम्स टेबल्स रॉक स्टार्स'मध्ये ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.हे ऍप गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेसोबत काम करते. इथे एका मिनिटात सर्वात जास्त प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकचा किताब दिला जातो. नादुब गिल याने आपल्या या कामगिरीचा एक व्हिडिओ बनवला आहे. नादुबने एका सेकंदात तीन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. किती आश्चर्यकारक आहे ना हे!
एरिक क्लाबेल, अमेरिका : मुलांना आइस्क्रीम खायला हमखास आवडतं. हीच मुलं आइस्क्रीम खाऊन झाल्यावर त्याच्या लाकडी काड्या (पोप्सिक्ले स्टिक) कुठेतरी फेकून देतात किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात. पण एका 12 वर्षाच्या मुलाने या लाकडी काड्यांच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. वाचून बसला ना आश्चर्याचा धक्का! एरिक क्लाबेल असे या मुलाचे नाव असून त्याने लाकडी काड्या (पोप्सिक्ले स्टिक) जोडून जगातील सर्वात उंच टॉवर बनवला आहे. या टॉवरची उंची 6.157 मीटर म्हणजेच 20.20 फूट आहे. हा टॉवर लांबूनही आपल्याला सहज दिसतो. एरीकने हा टॉवर बनवताना याचा व्हिडीओदेखील बनवला आहे. हा टॉवर बनवताना एरिकने खूप मेहनत घेतली आहे.त्याने या काड्यांपासून आतापर्यंत लहान आकाराच्या खुर्च्या,घर, फर्निचर देखील बनवले आहे. या वस्तू दिसायला फार छान दिसतात. अन्य मुलांनीदेखील अशाप्रकारची नवनिर्मिती करायला हवी. कोण जाणे आपलेही नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment