Thursday, 13 May 2021

'या' खाद्यपदार्थांनी वाढते स्मरणशक्ती


बऱ्याच लोकांना रोजच्या जीवनातील साध्या साध्या गोष्टींचेही विस्मरण होत असते. अशा स्थितीत आहारातील काही बदलांचाही अनुकूल परिणाम दिसू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या खाद्यपदार्थांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळू शकते अशा काही पदार्थांची ही माहिती...

•भोपळ्याच्या बिया : यामध्ये मॅग्नेशियम, लोह आणि झिंक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यामधील शक्तिशाली अँटिऑक्सिडंटस् आपले शरीर व मेंदू यांना फ्री रॅडिकल डॅमेजपासून वाचवतात. तसेच मॅग्नेशियम स्मरणशक्ती तसेच नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढवते.

•कॉफी : कॉफीमध्ये कॅफिन आणि अँटिऑक्सिडंटस् असतात. मेंदूची कार्यपद्धत चांगली राहण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. एकाग्रता वाढते तसेच सतर्कता अधिक तीक्ष्ण होते. नियमितपणे योग्य प्रमाणात कॉफीच्या सेवनाने न्यूरोलॉजिकल डिसीजचा म्हणजेच चेतासंस्थेशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

•पालक : या भाजीत मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतात. त्यांचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी होतो. पालकमध्ये 'बी ६', 'ई' जीवनसत्त्व आणि फोलेट असते. फोलेट हेअल्झायमर्स आणि विस्मरणाशी संबंधित विकारांपासन वाचवते.

•मासे : माशात 'ओमेगा-३' हे फॅटी अॅसिड असते. ते मेंदू आणि डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी असते. आठवड्यातून किमान एकदा मत्स्याहार लाभदायक ठरू शकतो. फॅटी फिशमध्ये 'ओमेगा-३' चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य उत्तम राहते.

•डार्क चॉकलेट: मूड खराब झाला की चॉकलेट खावे असे म्हणतात ते खरेच आहे. डार्क चॉकलेट हे ब्रेन बुस्टरचे काम करते. तज्ज्ञांच्या मते, चॉकलेट ज्यापासून बनते त्या कोकोमध्ये फ्लॅवोनॉईडस् नावाचे अँटिऑक्सिडंट असते. ते मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच आपली मानसिक स्थितीही चांगली राहते.

•भाज्या : भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस् चांगल्या प्रमाणात असतात. त्यामध्ये कॅरोटेनॉईडस् नावाचा घटक असतो. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी तसेच मानसिक आरोग्यासाठी ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी व अन्य भाज्या उपयुक्त ठरतात.

•दूध : दुधाचा उपयोग केवळ हाडांसाठीच होतो असे नाही. स्मरणशक्तीसाठीही दूध उपयुक्त आहे. त्यामध्ये बी ६, बी १२ ही जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतात. त्यांचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो.

•ब्लॅकबेरी : एका संशोधनानुसार ब्लॅकबेरीचे सेवनही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगले ठरते. विशेषतः 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' या समस्येतही ब्लॅकबेरीचे सेवन लाभदायक ठरू शकते. यामध्ये अँटिऑक्सिडंटस्मो ठ्या प्रमाणात असतात. ते मेंदूच्या पेशींचे रक्षण करतात आणि अशा पेशींच्या विकासासाठीही मदत करतात.

•सुका मेवा : यामध्येही 'ओमेगा-३'फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंटस् असतात. ते मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. अँटिऑक्सिडंट 'ई' जीवनसत्त्वामुळे फ्री रॅडिकल्सनी निर्माण केलेल्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून मेंदूचे रक्षण होते. विशेषतः उतारवयात त्याचा चांगला लाभ होत असतो.

No comments:

Post a Comment