Monday, 17 May 2021

कोयना धरण (सातारा जिल्हा)


कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते.16 मे 1962 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्राच्यादृष्टीने भाग्याचा आणि आनंदाचा म्हणावा लागेल. कोयना प्रकल्प हा स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा अध्याय आहे. विज्ञानाचे आणि विकासाचे मंदिर म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. आशिया खंडातील हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. महाबळेश्वरपासून 64 किलोमीटर अंतरावर पाटण तालुक्यात कोयना नदीवर हे धरण आहे. धरणातील पाणीसाठ्यावर वीजनिर्मिती करून पूर्वेकडील शेती हिरवीगार करण्याबरोबरच दुष्काळ निवारणाचे महत्त्वपूर्ण काम करण्यात येते. धरणातील पाण्याचा वापर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसाठीही होतो. धरणापासून मिळणारी वीज महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व सुरू करणारी आहे. या परिसरात जवळपास 200 इंच पाऊस पडणारे मोठे पाणलोट क्षेत्र आहे. धरणातील तब्बल 67.5 टीएमसी पाणीसाठा वीज निर्मितीला वापरला जातो. त्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान झाला आहे. तसेच महाराष्ट्रासह जवळच्या राज्यांना शेती, उद्योगाकरिता आवश्यक असणाऱ्या पाण्याची मूलभूत गरज भागविण्याचे कामही धरणाच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. कोयना धरणामुळे महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला. धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. या माध्यमातून ओलिताखाली येणारे क्षेत्र 12.23 हजार हेक्टर आहे. ओलिताखाली येणारी गावांची संख्या 100 इतकी आहे. 11 डिसेंबर 1967 ला झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने सह्याद्री हादरला. मात्र, ही भीषण आपत्ती कोयना धरणाने पेलली. या भूकंपाने जमिनी भेगाळल्या. सव्वाशे जणांचे जीव गेले, तर, बऱ्याच काळापर्यंत या भूकंपाची भीती सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रात व्यक्त होत राहिली. त्यापूर्वी आणि त्यानंतरही या परिसराने व कोयना प्रकल्पाने भूकंपाचे लक्षावधी धक्के पचविले आहेत. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली. हजारो भूकंपांचे धक्के सहन केले. तसेच अतीवृष्टीच्या काळात तुडुंब जलाशय आपल्यात सामावून घेतला. मात्र, तरीही साठ वर्षांनंतरही हे धरण भक्कम असेच आहे. 

No comments:

Post a Comment