Friday, 21 May 2021

जगातील विशाल मत्स्यालये

मुलांनो,तुम्ही कुणाच्या घरात किंवा एकाद्या हॉटेलमध्ये 'फिशटॅन्क' पाहिला असाल. एका काचेच्या पाण्याच्या टाकीत छोटे-छोटे रंगीबेरंगी मासे,कासव तसेच शेवाळासारखी जलीय रोपे त्यात असतात. घराच्या सजावटीचा हा एक भाग असतो. असे 'फिशटॅन्क' आपलं लक्ष वेधून घेतात. 'फिशटॅन्क' म्हणजेच छोटी मत्स्यालये. मात्र विशाल मत्स्यालयेदेखील या जगात आहेत. त्याला एक्वेरियमदेखील म्हणतात. तिकीट काढून लोक अशी मत्स्यालये पाहायला गर्दी करतात. ती पाहताना समुद्रातून सफर करत असल्याचा अनुभव येतो. अशा जगातील सर्वात विशाल अशा तीन मत्स्यालयांची (एक्वेरियम) माहिती आपण घेणार आहोत.


चिमेलांग महासागर किंगडम, चीन:  महासागरातील जीवन जवळून पाहण्यासाठी चीनमध्ये जहुहाईच्या हेंगकिनमध्ये चिमेलांग महासागर किंगडम थीम पार्क आहे. या पार्कमध्ये एक विशाल मत्स्यालयदेखील आहे. हे जगातील सर्वात विशाल मत्स्यालय आहे. या विशाल पाण्याच्या टाकीत 48.75 दशलक्ष लिटर पाणी आहे.या मत्स्यालयाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या मत्स्यालयात आठ विभाग आहेत. इथे समुद्रातील शार्क,देवमासेसारखे विशाल मासे, कासव तसेच अन्य जलजीव, वनस्पती असून ते पारदर्शी काचेतून अगदी जवळून पाहता येतात. डॉल्फिन, पाणमांजर, समुद्री सिंह (सी लायन) असे विभाग आहेत.


दक्षिण पूर्व एशिया एक्वेरियम,  सिंगापुरः हे जगातलं दुसरं सर्वात मोठं मत्स्यालय आहे. दक्षिण सिंगापूरमधील सेंटोसा आयलँडच्या मरिन लाइफ पार्कचा हा एक भाग आहे. जवळपास 20 एकरात असलेल्या या पार्कमध्ये दक्षिण पूर्व एशिया एक्वेरियम आणि अ‍ॅडव्हेंचर वॉटर  असे स्वतंत्र पार्क आहेत. 49 विविध विभागात सुमारे एक हजारपेक्षा अधिक प्रकारचे मासे आणि विविध समुद्री जीव आहेत. 4 कोटी 50 लाख लिटर पाण्यानं भरलेल्या विशाल टाकीचं हे मस्त्यालय आहे.मत्स्यालय पाहात फिरत असताना कंटाळा आला आणि भूक लागली तर तुम्हाला खाण्यासाठी येथे  रेस्टॉरन्टही आहेत. याशिवाय इथे पाण्यात स्कूबा ड्रायव्हिंग शिकता येतं.


जॉर्जिया एक्वेरियम, अमेरिकाः जगातलं सर्वात मोठं तिसरं मस्त्यालय अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यात अटलांटा येथे आहे. इथे सात विभागात शेकडो प्रजातींची हजारो जलीय जीवजंतू आहेत.जगातल्या सर्वात मोठ्या आकाराचं हे मस्त्यालय आहे.  व्हेल शार्क, बेलुगा व्हेल, कॅलिफोर्निया सी लॉयन, बॉटलनोज डॉल्फिन,हवेत उडणारे मासे असे अनेक माशांचे प्रकार पाहायला मिळतात. इथे मुलांसाठी स्वतंत्र विभाग असून छोट्या छोट्या रंगीबेरंगी माशांना पाण्यात हात घालून स्पर्श करता येतो. शार्क माशांचा 2 कोटी 38 लाख 48 हजार लिटर पाण्याचा स्वतंत्र पारदर्शक टॅंक आहे. इथून चालताना पाण्यातून चालत असल्याचा अनुभव येतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment