Monday, 3 May 2021

आशियाई हत्ती


आशियामध्ये हत्तींची जी प्रजाती आढळते, ती आता नामशेष होत चालली आहे. कुरणे आणि जंगलांचा हास, हस्तिदंतासाठी होत असणारी शिकार, आटत चाललेले जलस्रोत, अशी अनेक कारणे यामागे आहेत.आपले आशियाई हत्तीला अभ्यासक एलिफास मॅक्सिमस (Elephas Maximus) म्हणून ओळखतात. त्यांच्या तीन उपजाती म्हणजे भारतीय हत्ती, श्रीलंकन हत्ती आणि बोरनिओ (Borneo) हत्ती. बोरनिओ हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं बेट आहे. हत्ती हा कळपाने राहणारा आणि जमिनीवरचा सगळ्यात मोठा सस्तन प्राणी. मातृसत्ताक पद्धतीतले हत्तींच्या कळपाची प्रमुख ही वयाने सगळ्यात मोठी असलेली हत्तीण असते.  जंगलात हत्ती दहा वेगवेगळ्या आवाजात संवाद साधतात. त्यात ऱ्हमलिंगचा वापर जास्त असतो. एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी सात किलोमीटर एवढ्या अंतरात संवाद साधू शकतो.  आपल्या संवेदनशील तळव्यामुळे हत्तीला अतिशय बारीक आवाजाची कंपनंदेखील समजतात.  आई आपल्या पिलाच्या अंगावर चिखल, माती टाकत असते. कारण सुरुवातीच्या काळात पिलाची त्वचा नाजूक असते आणि पिलाला माश्यांपासून होणारा त्रासही चिखलामुळे टाळला जातो. जगातलं सर्वात मोठं गरोदरपण हत्तीणीचं असतं. बावीस महिने हत्तीण गरोदर असते. ज्याप्रमाणे वाघाचं जंगलात असणं म्हणजे सगळे प्राणी सशक्त असणं त्याचप्रमाणे हत्तीचं जंगलात असणं म्हणजे निसर्ग समतोलास मदत होणं. हत्तीच्या विष्ठेवर हजारो कीडे जगतात. विष्ठेमुळे चांगला गवताळ प्रदेश तयार होतो. जंगलातल्या हत्तीच्या कळपांचा पक्षी पाठलाग करतात. कारण त्यांच्या चालण्याने जमीन हादरून कीडे वर येतात व ते कीडे पक्षी खातात. हत्ती नदीवर जातात काठावरच्या चिखलात त्यांचा पाऊल उमटतं. त्या पावलात पाणी साठत ते मधमाशा, फुलपाखरू यांच्यासाठी तळं असत. जंगलातलं हत्तीचं महत्त्व सांगणारी ही अतिशय थोडी उदाहरणं आहेत. गेल्या महिन्यात आसाममध्ये झालेल्या रेल्वे अपघातात चार हत्ती मेले. अभ्यासकांच्या मते वयोमान, अपघात आणि हस्तिदंतासाठी शिकार ह्यामुळे दर काही मिनिटांनी हत्ती मरतो आहे. दिवसेंदिवस त्यांचं घर- खाणं हरवत आहे. जगातलं सगळ्यात मोठा मेंदू आणि मोठं हृदय हत्तीमध्ये असतं. (अनिकेत फिचर्स)

No comments:

Post a Comment