Friday, 7 May 2021

चीनमध्ये आहे बुटक्यांचे गाव


साधारणत: दर 20 हजार माणसांपैकी एक माणूस बुटका असतो. पण चीनच्या चिचुआन प्रांतातील दुर्गम अशा भागातल्या 'यांग्सी' या गावची गोष्ट थोडी वेगळीच आहे. या गावातील एकूण लोकसंख्येपेक्षा सुमारे 50 टक्के लोक बुटके आहेत. गावात राहणाऱ्या 80 पैकी 36 जणांची उंची 2 फूट 1 इंच ते 3 फूट 10 इंच आहे.  एवढ्या मोठ्या संख्येने लोक बुटके असल्याने हे गाव 'बुटक्यांचे गाव' म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, गेल्या 60 वर्षात इतक्या मोठ्या संख्येने बुटके असण्यामागचे रहस्य शास्त्रज्ञांना अजूनही सापडलेले नाही.

गावातल्या ज्येष्ठ मंडळींच्या म्हणण्यानुसार, अनेक दशकांपूर्वी गावाला एका विचित्र आजाराने ग्रासले होते.  तेव्हापासून इथले बरेच लोक  विचित्र परिस्थितीशी झुंज देत आहेत. मुख्यत: 5 ते 7 वयोगटातील मुलांना याचा त्रास होतो,कारण  या वयानंतर या मुलांची उंची वाढायची थांबते. या व्यतिरिक्त ते आणखीही काही अपंगत्वाला तोंड देत आहेत. त्यामुळे इथल्या लोकांचे सुख हिरावून घेतले गेले आहे.

1911 पासून या प्रांतात बुटके लोक पाहिल्याच्या बातम्या येत आहेत. 1947 मध्ये एका इंग्रज शास्त्रज्ञानेही या प्रांतात शेकडो बुटके पाहिल्याचं म्हटलं होतं. मात्र हा भयंकर आजार 1951 मध्ये उघडकीस आला होता. तेव्हा तिथल्या प्रशासनाला या प्रांतात असलेल्या पीडितांची उंची कमी असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. 1985 मध्ये जेव्हा जनगणना झाली होती , तेव्हा गावात अशा प्रकारच्या 119 केसेस आढळून आल्या होत्या. अजूनही अशा केसेस थांबलेल्या नाहीत. हा आजार पिढ्यान् पिढ्या पुढच्या लोकांमध्ये उतरत आहे. हा आजार आपल्या मुलांमध्ये येऊ नये, या भीतीने इथल्या अनेकांनी गाव सोडले आहे.

मात्र अचानक हे गाव बुटक्यांचे कसे झाले, याचा शोध अजूनही शास्त्रज्ञांना लागलेला नाही. गेल्या 60 वर्षांपासून शास्त्रज्ञ याचा शोध घेतला आहेत.या गावातील पाणी,माती,धान्य इत्यादींचा शास्त्रज्ञ आणि तज्ञांनी बर्‍याचदा अभ्यास केला आहे, परंतु या परिस्थितीचे कारण शोधण्यात त्यांना अपयश आले आहे. 1997 मध्ये गावातल्या जमिनीत पाऱ्याची मात्रा जास्त असल्याची चर्चा होती आणि हेच या  आजाराचे कारण असल्याचे सांगितले गेले, परंतु ते सिद्ध होऊ शकले नाही.

काही लोकं सांगतात की, अनेक दशकांपूर्वी जपानने चीनमध्ये सोडलेल्या विषारी वायूमुळे लोक बुटके जन्माला येत आहेत.  परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की चीनच्या या प्रांतात जपान कधीही पोहोचलेला नाही. असे अनेक दावे वेळोवेळी केले गेले, परंतु योग्य उत्तर अजून सापडलेले नाही. आता गावातील काही लोक याला 'वाईट शक्ती'चा परिणाम मानतात तर काही लोक खराब फेंगशुईमुळे असे घडत असल्याचे म्हणतात.  त्याचबरोबर काही लोक असेही म्हणतात की, त्यांच्या पूर्वजांना योग्य प्रकारे दफन न केल्यामुळे हे सर्व घडत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment