Monday, 31 May 2021

अहो आश्चर्यम्,फुलांचे आकार बाहुली,पक्षी, बदाम आणि माकडाच्या चेहऱ्यांसारखे!

मुलांनो,तुम्ही तुमच्या घरी-दारी,बागेत, शाळेत,कुठे माळरानावर विविध प्रकारची फुलं पाहिली असतील. काही फुलं अगदीच छोटी  किंवा मोठ्या आकाराची असतात. पण तुम्ही कधी एखाद्या बाहुलीसारखी दिसणारी,एखाद्या पक्ष्यासारखी अथवा माकडाच्या चेहऱ्यासारखी किंवा बदामाच्या आकाराची फुलं पाहिली आहेत का? नाहीच ना! पण अशा आकाराचीही फुलं या निसर्गसृष्टीत आहेत. चला, जाणून घेऊन या अशा फुलांविषयी!


डांसिंग गर्ल : इंपेटिएंस बेकुएरटी नावाच्या फुलझाडावर पांढऱ्या रंगाची फुलं फुलतात.ती दिसायला अगदी दोन्ही बाहू पसरून नाचणाऱ्या एखाद्या सुंदर बाहुलीसारखी दिसतात. त्यामुळे या फुलझाडाला डांसिंग गर्ल म्हणून ओळखले जाते. ही फुलझाडं पूर्व आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये आढळून येतात. ही फुलं पांढऱ्या रंगाबरोबरच हलक्या गुलाबी रंगाचीही असतात. फुलांच्या मधोमध बटनासारखी दोन पिवळ्या रंगाची संरचना असते. ही फुलं दिसायला खूप गोड दिसतात.


ग्रीन बर्ड फ्लावर : मुलांनो,तुम्ही टीव्हीवर किंवा चित्रात हमिंग बर्ड हा छोटासा पक्षी फुलांवर बसून मध शोषताना पाहिला असेल. मात्र जगात अशाप्रकारचं एक फुल आहे, जे अगदी फुलातून रस शोषणाऱ्या पक्ष्यासारखं दिसतं. हे हिरव्या-पिवळ्या रंगाचं फूल पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. हिरव्या-पिवळ्या रंगाचा पक्षी फुलातून मध शोषत आहे, असं दिसतं. याला ग्रीन बर्ड फ्लावर किंवा रियल बर्ड फ्लावर असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव क्रोटेलेरिया कनिंघमी असे आहे. याचा शोध एलन कनिंघम यांनी 1810 मध्ये लावला होता.हे फुलझाड उत्तर ऑस्ट्रेलियात सापडते.


ड्रॅकुला सिमिया: या फुललेल्या फुलाला पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला वाटेल हा माकडाचा चेहरा आहे. पण नीट पाहिल्यावर तुम्हाला ते एक फूल असल्याचं कळेल.ड्रॅकुला सिमिया प्रजातीचं हे रोप असून याला लिटिल ड्रॅगन मंकी किंवा मंकी ऑर्किड या नावानं ओळखलं जातं. हे रोप दक्षिण-पूर्व इक्वाडरच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात उंचावरील जंगलात आढळून येतं. या रोपाच्या फुलांच्या पाखळ्या लांब असतात. फुलाच्या मधे माकडासारखा चेहरा पाहायला मिळतो. ड्रॅकुला सिमियाची 110 पेक्षा अधिक प्रजाती आढळून येतात. एक फुल एका वेगळ्या रंगात आणि आकारात फुललेलं दिसतं. पण प्रत्येकात माकडाच्या चेहऱ्याचा आकार पाहायला मिळतो.


ब्लीडिंग हर्ट : ब्लीडिंग हार्ट ही पॉपी कुटुंबातील एक प्रजाति आहे. हे रोप लँडप्रोकॅप्नोस स्पेक्टेबेलिस, फ़ॅलोपियन बड्स किंवा एशियन ब्लीडिंग-हार्ट अशा नावांनी ओळखलं जातं. हे रोप सायबेरिया,उत्तर चीन,कोरिया आणि जपानमध्ये आढळून येतं. या रोपाचं फुल वसंत ऋतूमध्ये पत्त्याच्या पानातील बदाम चिन्हाच्या आकारात गुलाबी, लाल आणि पांढऱ्या रंगात फुलतं. बदामासारख्या दिसणाऱ्या या फुलामधून एक बट निघते. ही वेगळ्या रंगाची असते. लाल फुलाची बट लाल-पांढऱ्या रंगाची असते. गुलाबी फुलाची बट गुलाबी-पांढरी आणि पांढऱ्या फुलाची बट पांढऱ्याच रंगाची असते. या रोपाच्या एका फांदीवर ओळीने जवळपास वीस फुल फुलतात. ही फुलं पाहिल्यावर वाटतं की कुणीतरी कागदापासून बनवलेल्या बदामाच्या आकाराचे पताके झाडाच्या फांदीवर अडकवले आहेत. ही फुलं खूपच आकर्षक दिसतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment