जगभरातील १९५ देशांची स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. काही देश आकाराने मोठे आहेत तर काही लहान. मात्र, जगाच्या पाठीवर अतिशय चिमुकले असे अनेक देश आहेत. हे देश खरे तर छोटी बेटंच आहेत. भूमध्ये सागरात असलेल्या सात बेटांपैकी एक बेट माल्टा या नावाने ओळखले जाते. हा एक देश असून त्याचे क्षेत्रफळ अवघे ३१६ चौरस किलोमीटर आहे.
या देशाची लोकसंख्या साडेचार लाख आहे. १९६४ मध्ये स्वतंत्र झालेल्या माल्टावर वेगवेगळ्या काळात रोमन, फ्रेंच आणि ब्रिटिश लोकांची सत्ता होती. कॅरेबियन समुद्रातील असाच बेटाचा देश म्हणजे सेंट किटस् आणि नेव्हीस. ही दोन अतिशय सुंदर अशी बेटं आहेत. ख्रिस्तोफर कोलंबसने सन १४९८ मध्ये त्यांचा शोध लावला. सन १९८३ मध्ये स्वतंत्र झालेल्या या देशाचे एकूण क्षेत्रफळ २६१ चौरसकिलोमीटर आहे. सेंट किटस् हे १६८ चौरस किलोमीटरचे आणि नेव्हीस ९३ चौरस किलोमीटरचे आहे. या देशाची एकूण लोकसंख्या ५० हजार आहे. हिंदी महासागरातील मालदिवही असाच देश आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत तो आशियातील सर्वात छोटा देश आहे. २९८ चौरस किलोमीटरचा आकार असलेल्या या देशाची लोकसंख्या सुमारे साडेचार लाख आहे. १९६६ मध्ये स्वतंत्र झालेला हा देश पर्यटकांचे आकर्षण आहे.
No comments:
Post a Comment