Wednesday, 19 May 2021

जगातील मानवनिर्मित विशाल धरणे

मुलांनो, तुम्ही धरणे पाहिली असतीलच. तुमच्या परिसरात किंवा शाळेच्या सहलीच्या माध्यमातून तुम्ही नदीवर बांधण्यात आलेली धरणे पाहायला गेला असाल. धरण म्हणजे काय तर नदीच्या अथवा कुठल्याही जलप्रवाहाच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात आलेली भिंत. म्हणजे यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा केला जातो. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी अथवा जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. प्रचंड पाणीसाठ्याचा विचार करता जगात अशी अनेक विशाल धरणे आहेत,त्यातील पहिल्या पाच धरणाची माहिती करून घेऊया.


कॅरिबा धरण : झाम्बेबीया आणि झिम्बावे देशांदरम्यान वाहणाऱ्या झाम्बेजी नदीवर कमानीच्या आकाराचे कॅरिबा नावाचे धरण बांधण्यात आले आहे. 420 फूट उंच आणि 1हजार 900 फूट लांब बांधामुळे (भिंत) मानवनिर्मित कॅरिबा धरण तयार झाले आहे.हे धरण जवळपास 5 हजार 400 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. धरणात पाण्याची क्षमता जवळपास 180 घन किलोमीटर आहे. पाण्याच्या क्षमतेनुसार हे जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण आहे. या धरणाची खोली 97 फूट आहे. कॅरिबा धरणात मासे, मगरी, पाणघोडे मोठ्या प्रमाणात आढळतात. इथे वीजनिर्मिती केली जाते.


 ब्राटस्क धरण : रशियातील सायबेरियामध्ये  ब्राटस्क धरण बांधण्यात आले आहे. पाण्याच्या साठवणुकीच्या क्षमतेनुसार हे धरण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.या धरणात सुमारे 169 घनमीटर पाण्याचे संकलन आहे, जे 5 हजार 470 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. धरणाच्या बांधावरून एक रेल्वे लाईन आणि एक हाय वे जातो. या धरणाचा 'फेमस टूरिस्ट  प्लेस'च्या यादीत समावेश आहे.


 वोल्टा धरण : पाणी साठाच्या क्षमतेनुसार घाना देशातील अकोसोबो बांधावर बांधलेले वोल्टा धरण जगातील तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. या धरणाची जवळजवळ 148 घन किलोमीटर पाणी अडवण्याची क्षमता आहे. जमिनीवरील क्षेत्रफळ जवळपास 8 हजार 502 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्राचा विचार केला तर वोल्टा धरण जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण आहे. हे धरण दक्षिणेतील अकोसोमबोपासून देशाच्या उत्तर भागापर्यंत पसरले आहे.  बोटिंग करताना  सुंदर निसर्ग देखावे पाहता येतात.


 मॅनिकॉगन धरण : कॅनडामध्ये मॅनिकॉगन नदीवर डॅनियल-जॉनसन बांध बांधण्यात आला आहे. यामुळे मानवनिर्मित विशाल मॅनिकॉगन धरणाची निर्मिती झाली आहे.  या धरणाची पाण्याची क्षमता 137 घन किलोमीटर असून पाण्याच्या क्षमतेनुसार हे धरण जगात चौथ्या क्रमांकावर येते. हे धरण जवळपास दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. धरणाची खोली 85 फूट आहे. या धरणाचे वैशिष्ट्य असे की, या पाण्यात एक विशाल बेटही आहे. अवकाशातून हे धरण आणि बेट स्पष्टपणे पाहता येते. याला क्यूबेकचे नेत्र म्हणतात. मॅनिकॉगन धरण बोटिंग आणि कॅपेनिंगसाठी प्रसिध्द आहे.


 गुरी धरण :व्हेनेझुएलाच्या कॅरोनी नदीवर गुरी नावाचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी साठवण्याची क्षमता 135 घन किलोमीटर आहे.पाण्याच्या क्षमतेनुसार या धरणाचा जगात पाचवा क्रमांक लागतो. गुरी हे काळ्या पाण्याचे धरण आहे. धरणाच्या पाण्यात ह्युमिक पदार्थांची मात्रा अधिक प्रमाणात असल्यामुळे पाणी काळे बनले आहे. गुरी धरण 4 हजार 250 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. हे धरण एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ देखील आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment