Thursday, 20 May 2021

हनुमानाचा द्रोणागिरी पर्वत


भारतीय संस्कृतीमध्ये सर्व चराचरामध्ये एकच परमतत्त्व व्यापून राहिले आहे असे मानले जाते. त्यामुळे विविध वृक्ष, नद्या आणि पर्वतांनाही पूज्य मानले जाते. त्यांच्या वेगवेगळ्या अधिष्ठात्री देवताही मानल्या जातात. अर्थात सर्व नामरूपांमध्ये एकच परमतत्त्व आहे याचे विस्मरण होऊ दिले जात नाही. हिमालय, मेरू, मंदार, सह्यगिरी (सह्याद्री), गिरनार, विंध्य आणि गोवर्धनसारख्या अनेक पर्वतांना आपल्याकडे पूजनीय मानले जाते. मेघनादाच्या शस्त्राने लक्ष्मण मुर्छित झाल्यावर त्याला सावध करण्यासाठी जी संजीवनी वनस्पती हनुमंताने आणली ती द्रोणागिरी पर्वतावर होती. हनुमानांना श्रीरामांचे सर्वांत मोठे भक्त मानले जाते. हनुमानांचेही कोट्यवधी भक्त केवळ भारतातच नाही तर जगभरात आढळतात. कुठलीही समस्या, संकट सामोरे आले की, संकटमोचन हनुमानांचे स्मरण केले जाते. या हनुमानाने हिमालयाच्या पर्वतराजीतील हा एक पर्वतच उचलून लंकेला नेला व कार्यपूर्तीनंतर पुन्हा मूळ जागी आणला असे वर्णन रामायणात आहे. हा द्रोणागिरी पर्वत उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नीती खोऱ्यातील द्रोणागिरी गावात आहे असे मानले जाते. हे गाव जोशीमठपासून सुमारे ५० किलोमीटरवर आहे. या गावातील स्थानिक लोक या पर्वताला देवतास्वरूप मानतात. हनुमान या पर्वतावर संजीवनी शोधण्यासाठी आल्यावर तेथील नेमकी ती वनस्पती कुठली या गोंधळात पडले व त्यांनी या पर्वताचा एक मोठा भाग तोडून उचलून नेला. त्यामुळे या गावातील लोक हनुमंताची पूजा करीत नाहीत हे विशेष! हा पर्वत बद्रीनाथ धामापासून सुमारे ४५ किलोमीटरवर आहे. बद्रीनाथ धामाचे धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांनी सांगितले की, आजही या पर्वताचा वरचा भाग तुटल्यासारखाच दिसतो व तो भाग आपण सहजपणे पाहू शकतो. द्रोणागिरी पर्वताची उंची ७,०६६ मीटर आहे. हिवाळ्यात याठिकाणी मोठी हिमवृष्टी होते. त्या काळात गावातील लोक अन्यत्र राहण्यासाठी जातात. हिवाळा संपला की ते पुन्हा गावात येऊन राहतात. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठपासून मलारीकडे ५० किलोमीटर पुढे गेल्यावर जुमा नावाचे ठिकाण लागते.तेथून द्रोणागिरीकडील पायवाट सुरू होते. तेथील धौली गंगा नदीवरील पुलाच्या दुसऱ्या बाजूस जी पर्वतराजी दिसते ती ओलांडून गेल्यावर द्रोणागिरी पर्वत येतो. सुमारे दहा किलोमीटरचा हा मार्ग अतिशय खडतर आहे. मात्र, ट्रेकिंगची आवड असणारे अनेक लोक याठिकाणी येतात. दरवर्षी जूनमध्ये गावातील लोक द्रोणागिरी पर्वताची विशेष पूजा करतात व त्यावेळी तिथे मोठा उत्सव असतो.

No comments:

Post a Comment