हौसेला मोल नाही म्हणतात ते खरेच आहे. मग हौस करायला किती पैसा गेला याची काळजी कोणी करत नाही. इथे फक्त हौस मिटण्याला महत्त्व आहे. या लोकांच्या हौसेखातर व्हिएतनामची राजधानी हनोई येथे सोन्याचे एक भव्य हॉटेल सुरू करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण हे हॉटेल सोन्याने मढवलेले आहे. त्याच्या भिंती, फाटक, फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू तसेच बाथटब आणि कमोडही सोन्याने मढवलेले आहे. या हॉटेलला 'डोल्से हनोई गोल्डन लेक' असे नाव देण्यात आले आहे. हे जगातील पहिले असे लक्झरी हॉटेल आहे जे पूर्णपणे सोन्याने मढवलेले आहे. या शाही हॉटेलमध्ये सर्व वस्तू शाही आहेत. 25 मजल्यांच्या या हॉटेलमध्ये एकूण 400 खोल्या आहेत. हॉटेलच्या बाहेरील भिंतीवर सुमारे 54 हजार चौरस फुटांची गोल्ड प्लेटेड टाईल्स लावलेली आहे.
लॉबीमध्ये फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूही सोन्याची कलाकुसर असलेल्या आहेत. वॉशरूममध्ये बाथटब, सिंक व शॉवरपासून सर्व काही सोन्याने मढवलेले आहे. बेडरूममध्येही फर्निचर व सजावटीच्या वस्तू सोन्याची झळाळी मिरवणाऱ्या आहेत. खोल्यांचे छतही सोन्याने मढवले आहे. छतावर इन्फिनिटी पूल बनवण्यात आलेला आहे, जेथून हनोई शहराचे विहंगम दृश्य पाहता येते. या हॉटेलच्या उभारणीचे काम 2009 मध्ये सुरू करण्यात आले होते. होआ बिन ग्रुप अँड विनधम ग्रुपने ते बनवले आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये या हॉटेलचे उद्घाटन झाले. तेथील प्रेसिडेन्शियल सुईटमध्ये एक रात्र मुक्काम करायचा असेल तर 4.85 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच डबल बेडरूम सुईटमधील एका रात्रीच्या मुक्कामाचे शुल्क सुमारे 75 हजार रुपये आहे. तसेच अन्य खोल्यांचे सुरुवातीचे शुल्क वीस हजार रुपये आहे.
No comments:
Post a Comment