Monday, 10 May 2021

सना रामचंद्र: पाकिस्तानात हिंदू प्रशासकीय महिला अधिकारी


आपल्या शेजारील पाकिस्तान देशात पहिल्यांदाच हिंदू महिला प्रशासकीय सेवेत (भारताच्या आयएएस प्रमाणे) निवडल्या गेल्या आहेत. सना रामचंद्र असे त्याचे नाव आहे. त्या सहाय्यक आयुक्त ( असिस्टेंट कमिश्नर) बनल्या आहेत. हे पद मिळविण्यासाठी त्या सेंट्रल सुपीरियर सर्व्हिस (सीएसएस) ही पाकिस्तानातील सर्वात मोठी प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण  झाल्या आहेत.  नुकतीच त्यांची पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (पीएएस) निवड झाली.सना पेशाने एमबीबीएस डॉक्टर आहे.

सीएसएस लेखी परीक्षेसाठी 18 हजार 553 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 221 उत्तीर्ण झाले. परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या त्यांच्या अनुभवांबद्दल सना सांगतात की, 'मी खूप आनंदी आहे, पण आश्चर्य वाटत नाही. कारण मी लहानपणापासूनच यशाची भुकेली आहे.' त्यांनी शाळेत, महाविद्यालयात आणि एमबीबीएस परीक्षेतही अव्वल स्थान मिळवले आहे.

सना सिंध प्रांतातील शिकारपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी सिंध प्रांताच्या चांदका मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. सध्या त्या सिंध इन्स्टिट्यूट ऑफ यूरोलॉजी अँड ट्रान्सपेरेंटमधून एमएस शिकत आहे. आता त्या लवकरच शल्यचिकित्सकही होतील. पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मातील लोक अल्पसंख्याक समजले जातात. तेथील बर्‍याच भागात अजूनही काबिलाई (आदिवासी) संस्कृती आहे.  पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, शीख किंवा ख्रिश्चन धर्मीय लोकांच्या  छळल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्या आहेत. अशा परिस्थितीत सना रामचंद्र यांचे यश कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.   सीएसएस परीक्षेला बसलेल्यांपैकी केवळ दोन टक्के उमेदवार प्रशासकीय सेवेसाठी  निवडले जातात. सहाय्यक आयुक्तपदाच्या नेमणुकीनंतर जिल्हा आयुक्त पदावर पदोन्नती मिळते. प्रशासकीय सेवांमध्ये पीएएस पाठोपाठ पाकिस्तान पोलिस सेवा आणि परराष्ट्र सेवा येतात.

सना सांगतात की, त्यांनी कोणाचीही मदत न घेता परीक्षेची तयारी केली. सध्या कराचीमध्ये राहणाऱ्या सना यांनी फक्त मुलाखतीसाठी कोचिंगचा आधार घेतला. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण असले तरी हिंदू समाजातही त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कारण तेथे फारच कमी हिंदू महिला आहेत, ज्यांनी पाकिस्तान प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. सोशल मीडियावरही लोक त्यांची प्रशंसा करत आहेत.

पाकिस्तानमध्ये शेवटची जनगणना  झाली ती 1998 मध्ये! 2017 मधील धर्मानुसार लोकसंख्येची आकडेवारी अद्याप जाहीर झालेले नाही.  पाकिस्तानच्या सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीनुसार 1998 मध्ये तेथील एकूण लोकसंख्या 13.23 कोटी होती. त्यापैकी हिंदूंची  1.6 टक्के म्हणजेच 21.11 लाख लोकसंख्या होती. 1998 मध्ये पाकिस्तानची 96.3 टक्के लोकसंख्या मुस्लिम व 3.7 टक्के लोकसंख्या मुस्लिमेतर होती.  2017 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार पाकिस्तानची लोकसंख्या 20.77 कोटींपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानच्या हिंदू परिषदेचे म्हणणे आहे की, येथे 80 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदूंची आहे, जी पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या चार टक्के आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जास्तीत जास्त 94 टक्के हिंदू लोक राहतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment