Monday, 17 May 2021

कल्पना चावलाचे नाव अंतराळ यानाला


अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला कल्पना चावला हिचे नाव एअरोस्पेस कंपनी 'नॉर्थरोप ग्रुमेन'ने सिग्नस स्पेसक्राफ्टला दिले आहे. २९ सप्टेंबर 2020 ला हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना होणार आहे. सिग्नस स्पेसक्राफ्टला विकसित केलेल्या 'नॉर्थरोप ग्रुमेन' कंपनीने ट्विटरवर म्हटले आहे की आम्ही कल्पना चावला यांचा सन्मान करतो ज्यांनी 'नासा'मध्ये भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर बनून नवा इतिहास घडवला. मानवयुक्त अंतराळ मोहिमांमध्ये त्यांच्या योगदानाचा स्थायी रूपाने प्रभाव पडला आहे. हे आहे आमचे 'सिग्नस यान, एस.एस. कल्पना चावला'! मानवयुक्त अंतराळ यानांमध्ये ज्यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिलेले असते त्यांचे नाव आम्ही प्रत्येक सिग्नसला देतो असेही कंपनीने म्हटले आहे. कल्पना चावला या १६ जानेवारी २००३ मध्ये अमेरिकेच्या 'कोलंबिया' यानातून अंतराळात गेल्या होत्या. १ फेब्रुवारी २००३ मध्ये अंतराळात सोळा दिवस राहिल्यानंतर परतीच्या प्रवासात कोलंबिया यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करीत असताना व लँडिंगच्या केवळ सोळा मिनिटे आधी दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामध्ये कल्पनासह अन्य अंतराळवीरांचे प्राण गेले. कल्पना यांचा १७ मार्च १९६२ ला हरियाणाच्या करनालमध्ये जन्म झाला होता. वयाच्या विसाव्या वर्षी त्या अमेरिकेत गेल्या होत्या.


No comments:

Post a Comment