Sunday, 19 April 2020

अक्षय्य तृतीया

वैशाख शुद्ध   तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी जे जे पुण्य करावे ते अक्षय्य-चिरकाल टिकणारे होते असे म्हणतात.  साडेतीन मुहूर्त आपल्याला माहीत आहेत,त्यातला हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात , तसे पाहिले तर आल्या - गेल्याला , तहानेलेल्याला पाणी द्यावे त्याचे हे प्रतीक ! अक्षव्यतृतीया वैशाखात येते . त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असते .
त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे . या दिवसापासून ( खरं म्हणजे उन्हाळा सुरू झाला की लगेच ) ठिकठिकाणी पाणपोया काढाव्यात . पांथस्थांची , गुराढोरांची तहान हरण करून त्यांची - सेवा करावी . एवढेच नाही , तर प्रखर तापाने सुकून जाणाऱ्या वृक्षवेलींनाही पाणी घालावे . त्यांनाही जीवन - दान द्यावे, जलकुंभ दान करण्याबरोबरच उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी गरजूंना पंखा , छत्री , पादत्राणेही दान करावीत असे सांगितले आहे .
अक्षय्यतृतीया हा दिवस वसंतोत्सवाचा आहे . चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय्य तृतीयेपर्यंत वसंतगौरीचा उत्सव देवीच्या देवळांतून साजरा केला जातो . मथुरा , वृंदावन , काशी , द्वारका या ठिकाणच्या देवालयांतून हे उत्सव उत्साहाने साजरे केले जातात . चैत्र शुद्ध तृतीयेला माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून  या दिवशी सासरी जाते , असा समज आहे . त्यामुळे स्त्रिया घरोघर हळदीकुंकू करतात . खेडेगावातील स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने , उत्साहाने साजरा करतात . सकाळी आंघोळी झाल्या की नंतर रस्त्यातून गाणी गात गौरी विसर्जन करतात . गौरीला नैवेद्य म्हणून गोडाचे जेवण करतात . दुपारी झाडांच्या फांद्यांना झोके बांधतात . झोके घेत गाणी गातात . त्या झोक्यांतून , त्या गीतांतून मनामनात उचंबळून आलेल्या आनंदाची कारंजी थुईथुई नाचत असतात .
अक्षय्य तृतीयेसंबंधी एक कहाणीही सांगितली जाते . फार पूर्वीची कथा . शाकल नावाचे एक नगर होते . तेथे एक वाणी होता . धर्म त्याचे नाव . नावाप्रमाणेच धार्मिक होता . एकदा काय झाले , अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य त्याच्या कानावर आले . धार्मिक मनाला ते पटले , तेव्हापासून दर वर्षी अक्षय्य तृतीयेला नदीवर आंघोळ करून पितरांना तीलतर्पण करायचा. ब्राह्मणांना धान्याने भरलेले घट दान करायचा. नियम अनेक वर्षे केला. पुढे त्याला मृत्यू आला.पण या दिवशी केलेल्या पुण्याने पुढच्या जन्मात त्याला कुशावती नगरीचे राज्यपद मिळाले. राज्यपदाचा उपभोग घेताना त्याने मोठमोठे यज्ञ केले. पुष्कळ दानधर्म केला. पण त्याला कधीच काही कमी पडले नाही. त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही. कारण त्याने अक्षय्य तृतीयेच्या व्रताचे पालन केले होते. त्या दिवशी भरपूर दानधर्म केल्याने त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही. आपणही यथाशक्ती दानधर्म केला पाहिजे. योग्य माणसाला दान दिला पाहिजे. या गोष्टीचा बोधच ही कथा देते.

No comments:

Post a Comment