Monday, 27 April 2020

ओळख देशांची-बल्गेरिया


ऑटोमन वसाहत
बल्गेरिया देशाला खूप प्राचीन इतिहास लाभला आहे. अगदी मनुष्य जेव्हा अश्मयुगाच्या उत्तरार्धात पृथ्वीवर वावरत होता, त्या काळापासून या प्रदेशात मानवी वसाहती होत्या. या प्रदेशात थ्रासीयन, रोमन व ग्रीक लोक राज्य करत होते. संपूर्ण एकत्रित असा बल्गेरिया देशाचा उदय झाला तो सातव्या शतकात . तेव्हा हे राज्य बाल्कन प्रदेशांवर स्वतःचे वर्चस्व गाजवत होते. तसेच स्लाव्ह लोकांचे हे मध्ययुगीन काळातील सांस्कृतिक केंद्र होते.
इस 1396 मध्ये म्हणजे चौदाव्या शतकाच्या अखेरीस दुसऱ्या बल्गेरियन साम्राज्याचा जेव्हा अस्त झाला, तेव्हा तेथे ऑटोमन लोकांनी आपली सत्ता स्थापन केली व ती जवळपास पाच शतकांपर्यंत तशीच अबाधित होती. 1877-78 या काळात जे रशियन व तुर्की लोकांचे युद्ध झाले. त्या युद्धामुळे तिसरे बल्गेरियन राज्य उदयास आले. बल्गेरिया इस 1396 पासून ऑटोमन लोकांच्या ताब्यात होता. 3 मार्च 1978 रोजी या देशाने आपल्या स्वतःच्या सीमा घोषित केल्या. 5 ऑक्टोबर1908 रोजी त्याने स्वतःच्या स्वातंत्र्याची जाहीरपणे घोषणा केली व ऑटोमन लोकांच्या हाती नारळ दिला.
शेजारी शेजारी
आग्नेय युरोप खंडात असलेल्या बल्गेरिया देशाच्या उत्तरेचा 'रुमानिया' हा देश शेजारी आहे. सार्बिया व मॅसेडोनिया हे दोन देश बल्गेरियाच्या पश्चिमेकडील सरहद्दी लगत आहेत. बल्गेरियाच्या दक्षिणेस ग्रीस व तुर्की हे देश असून त्याच्या पूर्वेस 'काळा समुद्र आहे.
सर्वात उंच पर्वत
फक्त बल्गेरियातीलच नाही,तर संपूर्ण बाल्कन प्रदेशातील सर्वाधिक उंच पर्वत बल्गेरियात असून त्याचे नाव आहे 'मुसला'. हा शब्द ऑटोमन तुर्कीश भाषेतील असून त्याचा अर्थ 'देवापासून जवळ' किंवा 'प्रार्थनेची जागा' असा होतो. हा पर्वत 2925 मीटर (9596 फूट) उंच असून तो आल्प्स व कॅफेशस पर्वतराजीमधील पर्वतरांगेत आहे. हे पर्वतशिखर युरोपातील 7 वे उंच पर्वतशिखर आहे. रिला राष्ट्रीय उद्यानात हा पर्वत येतो.

क्षेत्रफळ आणि लोकसंख्या
बल्गेरिया या देशाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे 110994  चौरस किलोमीटर ! एवढी विस्तृत भूमी लाभलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप खंडातील 16 वा मोठा देश आहे. तर त्या दृष्टीने त्याचा संपूर्ण जगातील क्रमांक 105 वा आहे. 2014 च्या जनगणनेनुसार या देशाची लोकसंख्या 7202198 एवढी असून जास्तीतजास्त लोक शहरी भागात राहतात. या देशाचे 28 प्रशासकीय भाग आहेत.
राष्ट्रध्वज
बल्गेरियाने स्वतःचा राष्ट्रध्वज 1881 मध्ये संमत केला. सुधारित राष्ट्रध्वज 1991 मध्ये अधिकृतपणे मान्य केला. हा राष्ट्रध्वज तिरंगी असून त्यात आडवे समान लांबी-रुंदीचे पट्टे आहेत. वरचा पट्टा पांढरा, मधला हिरवा व खालचा लाल रंगाचा आहे.
नदी
बल्गेरियातील रिला पर्वतराजीतून इस्करचे तीन प्रवाह उगम पावतात व इस्कर सरोवरात ते एकत्रित येऊन मग इस्कर नदीचा उगम होतो. चेरनी इस्कर (काळी इस्कर नदी) , बेली इस्कर (पांढरी इस्कर) व लेवि इस्कर या त्या तीन नद्या होत. ही नदी पुढे सोफियाच्या बाहेरच्या भागातून वाहात जाऊन एक खडकाळ भागातून बाल्कन पर्वतात जाते व नंतर गिजेन जवळ डेन्यूब नदीस मिळते. उगम ते मुख हा तिचा प्रवास 368 किलोमीटरचा असून ती बल्गेरियातील एकमेव लांब नदी आहे.

चलन
'लेव' हे बल्गेरियाचे राष्ट्रीय चलन आहे. एक लेव हा स्टोर्टिका मध्ये विभागलेला असतो. बल्गेरियन भाषेतील लेव या शब्दाचा अर्थ आहे 'लायन' म्हणजे सिंह. या चलनाचा वापर 1881 पासून सुरू झाला. 'बल्गेरियन नॅशनल बँक' ही देशाची मध्यवर्ती बँक असून ती हे चलन अधिकृतपणे वितरित करते.
राष्ट्रभाषा
या देशाची अधिकृत राष्ट्रभाषा ही बल्गेरियन आहे. ही भाषा इंडो-युरोपियन असून ती स्लाव्हिक भाषा कुटुंबाची दक्षिण शाखा आहे. ही भाषा फक्त बल्गेरियातच नाही तर तुर्की, सर्बिया, ग्रीस, युक्रेन, माल्डोवा, रुमानिया, अल्बानिया, कोसोवो तसेच मॅसेडोनिया या राष्ट्रांमध्येही प्रचलित आहे.
सरोवर
बल्गेरियातील सर्वात मोठे कृत्रिम तळे किंवा कृत्रिम जलाशय म्हणजे इस्कर! इस्कर नदीचे पाणी अडवल्याने हा जलाशय तयार झालेला असून त्याच्यातील 2/3 पाणी सोफिया शहरास पुरवले जाते. जलविद्युत साठीही हे पाणी वापरले जाते. याचे धरण 204 मीटर लांब असून 76 मीटर उंच आहे. इस्कर जलाशयाची लांबी 10.9 किमी असून रुंदी 3.38 किमी आहे. तर त्याची जास्तीतजास्त खोली 75 मीटर आहे. याचे काम 6 सप्टेंबर1954 रोजी पूर्ण  झाले.
खेळ
या देशामध्ये कुस्ती, वजन उचलणे, मूहतीयुद्ध, मर्दानी कसरती या खेळात प्राविण्य मिळवलेले अनेक खेळाडू आहेत. टेनिस हा लोकप्रिय क्रीडा प्रकार असून यातही बल्गेरियन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत. व्हॉलीबॉल, फुटबॉल हे दोन सांघिक खेळ या देशात प्रचंड लोकप्रिय आहेत.
राजधानी सोफिया
या देशाची राजधानी सोफिया हे शहर असून तेच या देशातील सर्वात मोठे शहर आहे. बल्गेरियाच्या पश्चिमभागात असलेल्या 'वितोशा' पर्वत पायथ्याशी हे शहर वसले असून ते सर्बियांच्या सीमेपासून फक्त 50 किमी अंतरावर आहे. बाल्कन द्वीपकल्पाच्या केंद्रस्थानी असल्याने सोफिया हे शहर काळा समुद्र व ऍड्रियाटिक समुद्र यांच्यामधील मध्यद्वार आहे. असे असले तरी इजियन समुद्र याला जास्त जवळ आहे. इस पूर्वी 7000 वर्षे मागे या शहर प्रदेशात लोकवस्ती होती. या शहरात सध्या खूप मोठी व महत्त्वपूर्ण विद्यापीठे आहेत. आयटी क्षेत्रात नवा उद्योग सुरू करणाऱ्यासाठी  सोफिया हे शहर अत्युत्कृष्ट शहर आहे. हे शहर युरोपमधील सर्वांना परवडणारे आहे. या शहराचे क्षेत्रफळ 492 चौ.किमी आहे. हे शहर पूर्णतः डोंगरांनी वेढलेले आहे. अनेक लहान नद्या वाहतात. हे शहर त्याच्या परिसरातील 49 खनिज झरे व उष्ण झरे यासाठी प्रसिद्ध आहे. या शहरात दमट हवामान असते व उन्हाळ्यात मोठी वादळे होतात. युरोपातील सर्वाधिक प्रदूषित हवा असलेले शहर म्हणूनही ओळखले जाते. या शहराचा विकास 18 व्या शतकानंतर खूप वेगाने झाला. पण दुसऱ्या महायुद्धात झालेल्या बॉम्ब वर्षावात या शहराची अपरिमित हानी झाली. तरीही या शहरातील काही मध्ययुगातील इमारती आजही सुस्थितीत आहेत. येथे गॉथिक शैलीच्या तसेच बराकी पद्धतीच्या अनेक भव्य वास्तू आहेत. येथील प्रदूषण रोखण्यासाठी येथे अनेक मोठमोठे उद्याने उभारली आहेत. बाल्कन प्रदेशातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणजे वितोशा राष्ट्रीय उद्यान हेही या शहरातच आहे.
संरक्षक देव
सेंट जॉन ऑफ रिला यांना बल्गेरियाचे संरक्षक देव मानले गेले आहे. इस 876 ते 946 हा यांचा कालखंड होता. ते अत्यंत विरक्त होते. ते जिवंत असतानाच लोकांनी त्यांना संत बनवले. असे सांगितले जाते की, वन्य प्राणी त्यांच्या आसपास मुक्तपणे वावरत व पक्षी त्यांच्या हातांवर येऊन बसत. त्यांना सन्मानित करण्यासाठी अथवा त्यांचा बहुमान करण्याच्या उद्देशाने बल्गेरियात अनेक ठिकाणी चर्चची स्थापना केली गेली. रिला ख्रिस्ती मठ हा त्यापैकीच एक होय.
मठ
सोफियाच्या दक्षिणेस117 किमी अंतरावर असणाऱ्या रिला पर्वताच्या नैऋत्य भागात रिलस्का नदीच्या खोऱ्यात 1147 मी. (3763 फूट) उंचीवर हा रिला मठ आहे. इस 927 मध्ये संत इव्हान ऑफ रिला यांनी या ख्रिस्ती मठाची स्थापना केली. बल्गेरियातील तसेच पूर्ण दक्षिण युरोपातील लोकांसाठी हे स्थळ म्हणजे पर्यटकांचे आकर्षण आहे. 1983 मध्ये युनोस्कोने या स्थळांची जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड केली आहे.

धर्म
बल्गेरियन सरकारच्या घटनेनुसार बल्गेरिया हे निधर्मी राष्ट्र आहे. व घटनेने धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाहीसुद्धा दिली आहे. परंतु सनातनी ख्रिस्ती धर्माला पारंपरिक धर्म म्हणून त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. बल्गेरियन सनातनी चर्च ला इस 927 मध्ये स्वयंप्रसाराचा परवाना मिळाला होता. आजमितीस या चर्चचे 2000 च्या वर पाद्री आहेत. बल्गेरियन लोकांपैकी 75 टक्के लोक हे पूर्व सनातनी चर्चचे नियमित सदस्य आहेत. बल्गेरियात सनातनी ख्रिस्ती धर्मियांच्या खालोखाल सुन्नी मुस्लिम धर्मियांची संख्या आहे.

No comments:

Post a Comment