Wednesday, 22 April 2020

श्री आर्यादुर्गा मंदिर

कारवार उत्तर कर्नाटकचे प्रवेशद्वार. निसर्गरम्य समुद्र किनारे, माडपोफळीच्या दाट वाड्यांतील घरे आणि अनेकविध शैलींची श्रद्धास्थाने आजही येथील वैभवशाली परंपरेचा, संस्कृतीचा वारसा जपत आपल्या स्थानाची महती व दर्शनाचा लाभ भक्तगणांना देतात. सुप्रसिद्ध'गोकर्ण महाबळेश्वर' क्षेत्राच्या अलीकडे वसलेलं 'अंकोला' येथील श्री आर्यादुर्गा देवस्थान हे एक पुण्यक्षेत्र आहे. हे देवस्थान अतिप्राचीन असून पूर्वी कारवार नजीकच्या समुद्रात आर्याद्विपावर होते. परंतु परकीय आक्रमणाच्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी भाविकांनी त्याचे स्थलांतर करून  'अंकोला' गावी वसवले.

स्कंदपुराणात या देवीच्या रुपाविषयी उल्लेख आढळतो. तो असा- 'रत्नपुरी' नामक नगरीतील 'महिषासुर' या बलाढ्य दैत्याने आपल्या घोर तपश्चर्येने ब्रम्ह देवास प्रसन्न करून घेतले आणि देव,गंधर्व वा मानवाकडून आपणास मृत्यू येऊ नये , असा वर मागितला. ब्रह्मदेवाने'तथास्तु' म्हटले खरे ,परंतु त्यामुळे महिषासुर उन्मत होऊन सर्व देवादिकांना उपद्रव देऊ लागला. एकदा त्याचा मंत्री धूमकेतू व नारदमुनी यांची भेट झाली असता ,त्यांनी आर्याद्विपावरील 'आर्यादुर्गा' नामक अतिसुंदर ललनेविषयी माहिती दिली. ही माहिती धूमकेतूद्वारा महिषासुरापर्यंत गेली तेव्हा तो खूश झाला. त्याने धूमकेतूलाच मोठा नजराणा देऊन त्या स्त्री रत्नाला आणण्याची आज्ञा केली. देवीसमोर नजराणा अर्पण करून धूमकेतूने महिषासुराचा मानस कथन करून रत्नपुरीत येण्याविषयी विनवले. 'जो माझ्याशी युद्ध करून जिंकेल त्याचा मी पती म्हणून स्वीकार करीन ' या अटीवर देवी तयार झाली. या गोष्टीचा धूमकेतूलाच इतका गर्व झाला की तोच देवीचे हरण करण्यास सरसावला. तेव्हा देवीच्या एका दासीने त्वरित त्याचा शिरच्छेद केला.
 हे वर्तमान महिषासुरास समजताच तो क्रोधीत होऊन प्रचंड सैन्यानिशी देवीवर चाल करून आला. परंतु देवीच्या अफाट शक्तीसामर्थ्यपुढे  त्याच्या प्रहारांचा प्रभाव निष्प्रभ ठरू लागला. त्याचा रथ मोडल्यावर त्याने हत्तीवरून शरसंधान सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून देवीनेही सिंहाच्या पाठीवर आरूढ होऊन आक्रमण सुरू ठेवले. आणि महिषासुराचा वध करून त्याच्या सैन्याचा नायनाट केला. या दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ देवादिकांनीही देवीचा जयघोष करून तिला विनम्र अभिवादन केले. यानंतर देवी अंतर्धान पावली. मग सर्व देव ऋषींनी देवीची प्रतिमा तयार करून ,विधिवत मंत्र जागरात आर्याद्विपावर स्थापना केली. येथील दशतीर्थांनी अभिषेक करून देवीची षोडशोपचारे पूजा केली व संकटरक्षणार्थ मनोभावे प्रार्थना केली.
आज  अंकोला येथील श्री आर्यादुर्गा देवस्थान शांत व रम्य परिसरात वसल्याने भाविकांचे मन मोहित करते. सुवर्ण छटांनी सुशोभित भव्य सभागृहातून आत गेल्यावर दोन्ही बाजूच्या प्रचंड समयांमधील मंद प्रकाशात देवीची अलंकृत मूर्ती विलोभनीय दिसते. तिच्या हातातील ढाल व तलवार ही शस्त्रे भक्तांच्या रक्षणार्थ सज्ज झालेली दिसतात. सभोवतालची चांदीची अलंकृत प्रभावळ व गाभाऱ्याच्या चौपाटीवरील नक्षीकाम तिच्या सौंदर्यात भर टाकते. देवीचे पूजाविधी येथील क्षेत्रो पाध्यामार्फत केले जातात.

No comments:

Post a Comment