Sunday, 26 April 2020

गायक अरजित सिंह

अरजित सिंह याचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अरजितला सुरुवातीला करिअर म्हणून संगीताची निवड करणे कठीण होते. त्याची आजी आणि आई चांगल्या गायिका आहेत. तर वडील एका खासगी जीवन विमा कंपनीचे एजंट आहेत. त्याचे शालेय शिक्षण मुर्शीदाबादमधील खासगी शाळेत झाले व त्यानंतर महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना संगीताची ही साधना सुरू झाली. महाविद्यालयात तो गाण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत असे.
2005 मध्ये सोनी वाहिनीवर झालेल्या 'फेम गुरुकुल'या रिऍलिटी शो' च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या अरजितने 2014 साल अक्षरशः गाजवले. या शोनंतर संगीतकार प्रीतमने त्याला संधी दिली. त्यानेही एकामागोमाग मधुर गाण्यांनी रसिकांना वेड लावले. या रिऍलिटी शोनंतर 'टिप्स' म्युझिकासाठी , शंकर-एहसान-लॉय यांच्यासाठी अल्बम रेकॉर्ड केले. रिऍलिटी शो, स्टेज शो मधून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर 2006 मध्ये तो कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाला.
तेलगू, हिंदी, बंगाली या भाषामध्ये पार्श्वगायन केल्यानंतर अरजितला 'मर्डर-2' या चित्रपटात 'फिर मोहब्बत करने चला...' या गाण्याने नाव मिळवून दिले.  दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील 'मधुबाला', 'एक ईश्क ,एक जुनून' या मालिकांसाठी त्याने पार्श्वगायन केले. 2012 मध्ये 'बर्फी','शांघाय'या चित्रपटातील गाण्यांसाठी 'मिरची म्युझिक अवार्ड:अपकमिंग मेल व्होकलिस्ट ऑफ द इअर' हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर प्रीतम, साजिद-वाजीद, शंकर-एहसान-लॉय, जीत गांगुली,ए. आर.रेहमान, विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेली विविध ढंगातील गाणी तो गायला. 2013 मध्ये 'आशिकी-2' या प्रेमकथेतील 'तुम ही हो' या गाण्यासाठी 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळाला. सर्वच वयोगटातील श्रोत्यांना आपल्या मधुर आवाजाने भुरळ घालली.
त्याला आतापर्यंत उत्कृष्ट गायनाचा फिल्मफेअर पुरस्कार (गाणे:तुम ही हो चित्रपट- आशिकी 2), झी सिने अवार्ड, स्टार गाईड अवार्ड, बिग स्टार मोस्ट एंटरटेनर, आयफा अवार्ड बेस्ट प्लेबॅक सिंगर पुरस्कार मिळाले आहेत.
त्याची काही गाजलेली गाणी- मिलने मुझसे हे आयी, मेरी आशिकी, हम पर.. ( आशिकी 2), मनवा लागे ( हॅपी न्यू इअर), मस्त मगन ..(टू स्टेटस), सुनो ना संगे...(यंगिस्तान), शायराना ,ब्लेम द नाईट (हॉलिडे), फिर मोहब्बत करने चला..(मर्डर), जिया (गुंडे), समझावन (हमटी शर्मा की दुलहनियां)

No comments:

Post a Comment