राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली व असंतोष निर्माण झाला होता. सर्वत्र छोट्या मोठय़ा सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. अशात कामगारांच्या एका विशाल मोर्चावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला आणि यात १0६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६0 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १0६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. याच दिवशी १९६0 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे.
संत नवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, सर्मथ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दिवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.
तेव्हा एक अनामिक भीती निर्माण झाली होती की, मराठी भाषा मृत होईल की काय? पण ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृतालाही पैजेवर जिंकू, अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल? संतांनी लोकगीतांपासून, ब्रह्मपदाचा मार्ग सांगणार्या विचारगर्भ आध्यात्मापयर्ंत या मराठी भाषेचा मुक्तसंचार सर्वत्र घडविला. ही कधी पायात सुवर्णशब्दांचे नादमधुर पैंजण बांधून लोकरंजनासाठी नाचली, तर कधी डफ-तुणतुण्यांच्या साथीने वीरांचे बाहू स्फुरण पावण्यासाठी शाहिरांच्या वीररसात न्हाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेतच आपले लोककल्याणाचे आदेश दर्याखोर्यांत आणि खेड्यापाड्यात पोहोचविले. मराठी भाषेने सप्तसुरांच्या नादात आणि नवरसांच्या रंगांत इथल्या रंगभूमीवर असे काही, वैभव संपादन करून ठेवले की, भारतातल्याच नव्हे, जगातील भाषांना मराठीचा हेवा वाटावा.
महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य टिळक या मराठी भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले-आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके काय किंवा पहिले मराठी चित्रपटातील राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे काय, मराठी मातीचेच सुपुत्र.
महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषी-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरू, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.
महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करून ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा .. अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्याखोर्यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. सर्मथ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. महाराष्ट्राने आतापयर्ंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा.
No comments:
Post a Comment