आसाम हे ईशान्य भारतातील राज्यांना जोडणारे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. हा संपूर्ण प्रदेश सपाट असून ,नद्या आणि जंगलांनी समृद्ध आहे. यामुळे हा प्रदेश प्राण्यांसाठी नंदनवनच ठरतो. देशातील मोठ्या अभयारण्यांपैकी एक समजले जाणारे काझीरंगा अभयारण्य येथेच वसले आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी दोन तृतीयांश गेंडे या अभयारण्यात आढळतात.
अभयारण्याचा समावेश जागतिक वारसा स्थानात केला आहे. काझीरंगामध्ये अनेक वाघदेखील आहेत. 2006 मध्ये याला 'वाघांचे अभयारण्य' म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात हत्ती, पाणम्हशी, हरणे या प्राण्यांसोबत अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. काझीरंगा हे सुरक्षित अभयारण्य मानले जात असून ,1905 मध्ये याला संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
वनस्पती
काझीरंगा अभयारण्यात चार प्रकारच्या वनस्पती आढळतात. पाण्याने भरलेला गवताळ प्रदेश, विषुववृत्तीय पानगळीची जंगले, वृत्तीय अर्ध सदाहरित जंगले आणि सवाना जंगलांचा यामध्ये समावेश होतो. काझीरंगा हे उतारावर वसलेले जंगल असून , जंगलाचा पश्चिमेचा भाग हा पूर्व भागापेक्षा कमी उंचीवर आहे. पश्चिम भाग गवताळ प्रदेशांनी व्यापला आहे. उंच गवत उंचीवरच्या भागात आढळते,तर छोटे गवत कमी उंचीवरच्या भागावर तलावांच्या काठावर आढळते. उंच गवतांमध्ये ऊस व बांबू या वनस्पती आढळतात, तर इतर झाडांमध्ये कुंभी तसेच कापसाची झाडे आढळतात. गवताळ प्रदेशामध्ये सफरचंदाची झाडेसुद्धा आढळतात.
प्राणी
काझीरंगा उद्यानात 35 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. यामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या सर्वाधिक आहे. पाणम्हशी, बाराशिंगा, हत्ती, रानगवे, सांबर, भेकर, रानडुक्कर व हॉग हरणे हे प्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येने वावरतात. काझीरंगा हे वाघांचे एक आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते. अभयारण्याला 2006 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. वाघांखेरीज रानमांजर, बिबटे व पाणमांजरीसुद्धा येथे आढळतात. इतर छोट्या प्राण्यांमध्ये मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल आदी प्राण्यांचे येथे वास्तव्य आहे. भारतात आढळणाऱ्या माकडांच्या 14 जातींपैकी 9 जाती या उद्यानात आहेत. यामध्ये आसामी माकड, सोनेरी वानर व भारतात आढळणारे एकमेव 'एप माकड' यांचा समावेश होतो. काझीरंगाच्या नद्यांमध्ये दुर्मिळ असे डॉल्फिनही आहेत.
पक्षी
काझीरंगाला पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. अनेक प्रकारचे स्थलांतर करणारे पक्षी ,पाणपक्षी, शिकारी पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात मध्य आशियातून विविध प्रकारचे बदके, बगळे, करकोचे आदी पक्षी स्थलांतर करून येथे येतात. शिकारी पक्ष्यांमध्ये इंपिरियल घर, ठिपक्यांची घार, पांढऱ्या शेपटींची घार, पल्लास मत्स्य घार, करड्या डोक्याची घार व केस्ट्रेल घार हे पक्षी येथे आढळतात. नदीच्या काठी पक्ष्यांमध्ये खंड्या, पेलिकन, सारंग आदी पक्षी आहेत. येथे एकेकाळी सात प्रकारची गिधाडे आढळत होती. यापैकी बऱ्याच जाती आता नष्ट झाल्या आहेत. आता फक्त भारतीय गिधाड, पातळ चोचीचे गिधाड व भारतीय पांढऱ्या रंगाचे गिधाड या प्रजाती येथे आढळतात.
अभयारण्य पाहताना...
सरकारच्या जंगल खात्याचे अधिकृत वाटाडे पर्यटकांना उद्यानात फिरताना सतत सोबत करतात. या पार्कमध्ये फिरण्यासाठी निघणाऱ्या हत्तींच्या फेऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच जीप आणि मिनी बसमधूनही हिंडता येऊ शकते. माहूत असणारे हत्ती तसेच जीप व इतर चारचाकी वाहने अगोदर नोंदणी केल्यास मिळू शकतात. कोहोरा येथील उद्यानाच्या प्रशासकीय कार्यालयापासून सुरू होणारी जंगल सफारी , तीन वेगवेगळ्या मार्गांनी पूर्ण होऊ शकते. पर्यटकांना स्वतःची वाहने घेऊनसुद्धा जाता येते;फक्त अधिकृत वाटाड्या सोबत घ्यावा लागतो.
कसे जाल?
आसाम राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खासगी बस गुवाहाटी, तेजपूर व आसामच्या इतर उत्तरी भागांमधून सुटतात. त्या काझीरंगाच्या मुख्य द्वारापाशी (कोहोरा) सोडतात. फर्केटिंग हे रेल्वे स्टेशन काझीरंगाला जवळून जोडण्याचे काम करते. मुंबईच्या प्रवाशांसाठी मुंबई-गुवाहाटी एक्स्प्रेस उत्तम. खासगी बस आणि टॅक्सीचा पर्यायदेखील वापरता येतो. रौरिया येथील जोरहाट विमानतळ, सालोनबारी येथील तेजपूर विमानतळ व गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही जवळची विमानतळे आहेत. नोव्हेंबर मध्यापासून ते एप्रिलपर्यंतचा काळ येथे जाण्यासाठी उत्तम आहे.
No comments:
Post a Comment