लोखंडी 'गोल्डन' पूल!
भारतातील मोठ्या नद्यांमध्ये नर्मदा नदीची नोंद होते.या नदीला धार्मिक महत्त्वही आहे. याच नदीवर गुजरातमधील अंकलेश्वर ते भरूच या दरम्यान असलेल्या पुलाची देशातील जुना पूल म्हणून गणना केली जाते. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केल्यानंतर गुजरातमधून मुंबईला येण्यासाठी सोईस्कर व्हावे,यासाठी या पुलाची उभारणी करण्यात आली.
या पुलाच्या बांधकामाला 7 डिसेंबर1877 मध्ये सुरुवात करण्यात आली. प्रत्यक्षात तो 16 मे 1881 रोजी वाहतुकीसाठी खुला झाला.
या पुलाच्या बांधकामात लोखंडाचा पूर्णपणे वापर करण्यात आला असून पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती झेलत 149 वर्षांनंतरही हा पूल नागरिकांच्या सेवेसाठी ठामपणे उभा आहे. सुमारे 1412 मीटर लांबी असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी 45 लाख 65 हजार रुपये खर्च आला होता. लोखंडाच्या पट्टयांच्या वापरामुळे या पुलाला 'गोल्डन' पूल म्हणूनही ओळखले जाते. पूल लोखंडी बॉक्ससारखा असून त्यावरून जाताना एखाद्या चौकोनी लोखंडी डब्यातून प्रवास केल्याचा भास होतो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा पूल राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनला. मात्र, वाढती वाहतूक आणि पुलाचे वय लक्षात घेता या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाशेजारी समांतर पूल बांधला असला तरी जुना पूल अजून खंबीरपणे उभा आहे.
No comments:
Post a Comment