जगातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मनाली आणि लेह-लडाख यांना जोडणारा हा बोगदा समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवर आहे. नऊ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याची रुंदी दहा मीटर आहे. पीर पांजालचा पहाड फोडून तयार केलेला हा बोगदा मनालीला लाहौल खोऱ्याशी जोडतो. मनाली ते लेह या मार्गाची लांबी या रस्त्यामुळे ४६ किलोमीटरने कमी झाली आहे. बोगदा तयार करण्याचे काम २८ जून २०१० रोजी सुरू झाले. तर, बोगदा तयार करण्याचा निर्णय ३ जून २००० रोजी झाला. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. या बोगद्याचे पूर्वीचे नाव 'रोहतांग टनेल' होते. वाजपेयी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त गेल्या डिसेंबरमध्ये 'अटल टनेल' असे त्याचे नामकरण केले.
२०१० मध्ये बोगद्याचा अंदाजित खर्च १५०० कोटी होता. परंतु, दहा वर्षांमध्ये तो वाढून ३५०० ते ४००० कोटी झाला. घोड्याच्या नालाच्या आकाराचा हा सिंगल ट्यूब बोगदा आहे. दुहेरी लेन असलेल्या बोगद्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी प्रथमच केल्या आहेत. रोहतांग परिसरात दुर्गम डोंगर आहेत. कडाक्याची थंडी, हिमवृष्टी, हिमस्खलन आणि पाणी यामुळे बोगद्याच्या कामात अनेक अडथळे आले. या बोगद्याच्या कामासाठी २४ तासांच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ३००० कंत्राटी आणि ६५० नियमित कर्मचारी राबले. बोगद्यातील रस्ता दोनपदरी असून, कोणतेही वाहन ताशी ८० किलोमीटर वेगाने धावू शकते. एकाच वेळी ३००० मोटारी किंवा १००० पेक्षा अधिक ट्रक चालू शकतात. हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील दुर्गम भागांना हा बोगदा देशाच्या अन्य भागांशी १२ महिने जोडून ठेवणार आहे. बोगद्यासाठी खास बीआरओचे स्वतःचे एफएम रेडिओ स्टेशन असेल आणि गाडीत वाजणाऱ्या एफएम रेडिओवरून सुरक्षिततेशी संबंधित प्रत्येक माहिती त्यावरून मिळेल. विशेष म्हणजे बोगद्यात मोबाईलला फुल नेटवर्क मिळेल. दर १५० मीटरवर टेलिफोनची सुविधा, दर ५०० मीटरवर संकटकालीन मार्ग आणि दर २.२ किलोमीटरवर वळण असेल. प्रत्येक किलोमीटरवर हवेची गुणवत्ता मोजणारा मॉनिटर, प्रत्येक ६० मीटरवर आगीपासून बचावासाठी हाइड्रेन्ट, दर २५० मीटरवर सीसीटीव्ही आहे. बोगद्याच्या आतसुद्धा सेफ्टी टनेल किंवा इमर्जन्सी टनेल आहे. एखाद्या गाडीला आग लागली किंवा अन्य कोणतीही अडचण आली तर या इमर्जन्सी टनेलचा वापर होऊ शकेल. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची गतिशीलता या बोगद्यामुळे वाढणार आहे. स्थानिक लोकांसाठी रोजगाराचे अनेक मार्ग खुले होणार आहेत. पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यामुळेच मोठी रोजगारनिर्मिती होईल. लाहौल डोंगररांगांमधील केलंग या धार्मिक स्थळी जाण्यास पर्यटकांना पूर्वीपेक्षा खूप कमी वेळ लागेल. या सर्व कारणांमुळे हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment