Sunday, 18 October 2020

सुप्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसन

सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी १८४७ - १८ ऑक्टोबर १९३१) म्हणजे अनेक नव्या विद्युत, प्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक. त्यांचा जन्म मिलान, ओहायओ येथे झाला. त्यांचे शिक्षण मिशिगनमधील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत केवळ तीन महिनेच झाले होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून रेल्वेत संदेशवाहकाचे व त्यानंतर पंधराव्या वर्षापासून निरनिराळ्या शहरांत तारायंत्रावर काम करून त्यांनी आपला चरितार्थ चालविला. फावल्या वेळात ते अभ्यासात व प्रयोगकार्यात निमग्न असत. मत नोंदविणार्‍या त्यांच्या विद्युत यंत्राकरिता १८६८ मध्ये त्यांना पहिले पेटंट मिळाले. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी एकाच तारेवर दोन वा अनेक संदेश एकाच वेळी वाहू शकणार्‍या व स्वंयचलित तारायांत्रिक पद्धतीचा तसेच टंकलिखाणाच्या आवृत्त्या काढण्याकरिता विद्युत लेखणीचा (याचाच पुढे 'मिमिओग्राफ' या स्वरूपात विकास झाला) शोध लावला. कार्बन प्रेषकाचा (ध्वनितरंगांचे विद्युत प्रवाहात रूपांतर करणार्‍या साधनाचा) शोध लावून (१८७७-७८) ग्रॅहॅम बेल यांचा दूरध्वनी व्यवहारोपयोगी करण्यास त्यांनी मदत केली. एडिसन यांचा सर्वपरिचित व सर्वांत मूळचा शोध फोनोग्राफचा होय (१८७७). त्यांचा मूळचा नमुना हाताने फिरवावयाच्या टीनच्या पत्र्याच्या वृत्तचितीचा (नळकांड्याच्या आकाराचा) होता. दहा वर्षानंतर त्यांनी मोटरने चालणारा व मेणाची वृत्तचितीकार तबकडी उपयोगात आणणारा फोनोग्राफ तयार केला. त्यानंतर त्यांनी, सांगितलेला मजकूर लिहून घेण्यास मदत करणारे 'एडिफोन' या कचेर्‍यांच्या कामकाजास उपयुक्त असलेल्या उपकरणाचा शोध लावला. व्यवहारोपयोगी विजेचा उद्दीप्त (तापलेल्या तंतूपासून प्रकाश देणारा) दिवा तयार करण्यासाठी त्यांनी केलेले अनेक प्रयोग निष्फळ ठरले व त्यांकरिता त्यांना ४0,000 डॉलरपेक्षाही जास्त खर्च सोसावा लागला. परंतु, अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ रोजी काचेच्या निर्वात फुग्यात ठेवलेल्या कार्बनयुक्त कापसाच्या धाग्याचा उद्दीप्त दिवा तयार करण्यात त्यांना यश आले. नंतरच्या दहा वर्षांत त्यांनी विजेद्वारे प्रकाश, उष्णता व शक्ती यांच्या निर्मितीसाठी व वितरणासाठी तीन तारांच्या पद्धतीचा शोध लावला. विद्युत जनित्र (डायनामो) व मोटर यांत सुधारणा केल्या आणि विद्युत रेल्वेच्या विकासास मदत केली. १८९१-१९00 या काळात त्यांनी प्रामुख्याने लोह खनिजांची सांद्रता (दिलेल्या घनफळात असणारे खनिजाचे प्रमाण) चुंबकीय पद्धतीने वाढविण्यासंबंधी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी शिशाच्या संचायक विद्युत् घटापेक्षा (विद्युत भार साठवून ठेवणार्‍या घटापेक्षा) बराच हलका असा एक नवीन प्रकारचा निकेल हायड्रेट , आयर्न ऑक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड उपयोगात आणणारा संचायक विद्युत घट तयार केला. १८९१ मध्ये त्यांनी प्राथमिक स्वरूपाच्या चलचित्रपट कॅमेर्‍याचे (किनेटोस्कोपिक कॅमेरा) व नंतर चलचित्रपट पडद्यावर दाखविणार्‍या प्रक्षेपकाच्या पेटंटसाठी अर्ज केला. उद्दीप्त दिव्याच्या गोलकामध्ये एक धन विद्युत भारित धातूची पट्टी बसविल्यास दिव्यातील तप्त तंतूपासून धातूच्या पत्र्याकडे विद्युत प्रवाह वाहतो असा त्यांनी १८८३ मध्ये शोध लावला. ते ऑरेंज येथे मृत्यू पावले.

No comments:

Post a Comment