Sunday, 4 October 2020
अजिंक्यतारा किल्ला
अजिंक्यतारा हा सातारा जिल्हय़ातील एक किल्ला आहे. अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारचा हा किल्ला म्हणजे मराठय़ांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसर्या भोजराजाने इ. स. ११९0 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ. स. १५८0 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. हिंदवी स्वराज्याचा विस्तार होत असताना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ. स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७00च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले.तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणार्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतर अजिंक्यतारा केले. पण, पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. १७0८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसर्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला. सातार्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय आहे. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व 'मंगळादेवी मंदिराकडे' असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साहय़ाने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेलादेखील दोन दरवाजे आहेत. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment