चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख यांचा जन्म ११ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कायार्साठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी प्रदान केली.
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवले. भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.
प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.
पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४0,000 कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकर्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८0 दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणार्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते. या सर्व कायार्ला धमार्चे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणार्या या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत. चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. त्यांचे निधन २७ फेब्रुवारी २०१० रोजी झाले.
No comments:
Post a Comment