वन्य जीव आणि जंगल फोटोग्राफीसाठी जगातील श्रेष्ठ फोटोग्राफर म्हणून भारताच्या ऐश्वर्या श्रीधर हिला घोषित करण्यात आलं आहे. 23 वर्ष वयाच्या ऐश्वर्याला 2020 मधला ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर अवॉर्ड’ मिळाला आहे. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय मुलगी आहे. वयाच्या 11 व्या वर्षांपासून फोटोग्राफीला सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्याला 'सेंक्चुरी एशिया यंग नेचुरलिस्ट अवॉर्ड’ आणि ‘इंटरनेशनल कॅमेरा फेयर अवॉर्ड’सुद्धा मिळाला आहे.नवी मुंबईत राहणारी ऐश्वर्या वन्य जीवांवर आधारित असलेल्या माहितीपटाची निर्मातादेखील आहे. 2020 मधील ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर अवॉर्ड’ साठी ‘लाइट्स ऑफ पॅशन’ शीर्षक असलेल्या तिच्या फोटोला 80 पेक्षा अधिक देशांतील 50 हजारहून अधिक सहभाग घेतलेल्या लोकांमधून तिची पहिल्या क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. ऐश्वर्याने ‘बिहेवियर इनवर्टीब्रेट्स श्रेणी’ मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे.
ऐश्वर्या सांगते की, तिला लहानपणापासूनच वन्य जीव फोटोग्राफीचा छंद होता.तिचे वडील ‘बॉम्बे नॅचुरल हिस्ट्री सोसायटी’ चे सदस्य आहेत. त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी जायची संधी मिळाली. तिच्या वडिलांनी तिला फोटोग्राफीसाठी प्रेरित केलं.पदवी शिक्षण मिळवल्यावर ती वन्य जीव फोटोग्राफर बनली. तिला जंगलात फोटोग्राफी करताना अजिबात भीती वाटत नाही. ज्या छायाचित्रासाठी तिला पुरस्कार मिळाला, तो तिने मागच्या वर्षी जूनमध्ये काढला होता. ती सांगते, मी एक असे झाड बघितले, जे पुष्कळ अशा काजव्यांनी भरलेले होते.ते पाहिल्यावर मला असं वाटलं की, आकाशातल्या चांदण्या धरतीवर उतरल्या आहेत. तेव्हा तिने ते छायाचित्र काढले.
वयाच्या 11 व्या वर्षी तिने फोटोग्राफीला सुरुवात केली. आई-वडिलांची तिला साथ होती. खरं तर वन्य जीव फोटोग्राफरचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे या क्षेत्रात यायला मुली किंवा महिला तयार होत नाहीत. कचरतात. त्यांच्यासाठी ऐश्वर्या संदेश देते की, एक महिला म्हणून आपली स्वप्नं आणि पॅशन पूर्ण करण्यापासून मागे हटू नका.आपली मेहनत शिकण्यात घालवा. जर तुम्ही योग्य प्रकारे शिकलात तर फोटोग्राफीमध्येही परिपूर्णता दिसून येईल.आपला आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत ढळू देऊ नका.ज्यावेळेला तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यातील अडथळे दूर करता, त्यावेळेला प्रत्येक काम सोपं होऊन जातं. ऐश्वर्या म्हणते की, खरं तर जंगलातल्या नैसर्गिक वातावरणात राहायला मला खूप आवडतं. पण इथूनच मी जीवनाचे काही धडे घेतले आहेत. एकदा मी जंगलात पक्ष्यांचे फोटो काढत होते. मी त्यात इतकी गढून गेले होते की, मला कळलंच नाही की मी जिथे उभी आहे, ती दलदल आहे. फोटो काढल्यावर मला एक पाय देखील उचलता येत नव्हता. त्यावेळेला एक धडा घेतला की, फोटोग्राफीबरोबरच आजूबाजूच्या परिस्थितीकडेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे आपण सुरक्षित राहू शकू. आयुष्यात संयम राखणंदेखील महत्त्वाचं आहे. ऐश्वर्या आपल्या आदर्शांबाबत सांगताना म्हणाली की, अशा काही 'वाइल्ड लाइफ फोटोग्राफर' आहेत, ज्यांना मी आपला रोल मॉडेल मानते, यात राधिका रामासामी, लतिका नाथ, अश्विका कपूर आणि कल्याण वर्मा यांचा समावेश आहे.यांच्या फोटोग्राफी मला प्रेरित करतात.सध्या ती माकडांवर एक डॉक्यूमेंट्रीबनवत आहे. तिला भविष्यात वाइल्ड लाइफ टीव्ही प्रजेंटेटर बनायचं आहे. त्याचबरोबर ती 'डिस्कवरी’ और ‘एनिमल प्लेनेट’ सारख्या माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण जगातील वन्य जीव क्षेत्रांची सहल करण्याची मनीषा बाळगून आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment