Saturday, 31 October 2020

बार्बी डॉल: मानसी जोशी


मानसी जोशी सध्याची वर्ल्ड चॅम्पियन पॅराबॅडमिंटनपटू आहे. ती टाईम मासिकाच्या  ऑक्टोबर 2020 च्या मुखपृष्ठावर विराजमान झाली. तिचा जगभरातील '14 नेक्स्ट जनरेशन लीडर' म्हणजे नवीन पिढीला आपल्या कामगिरीने दिशा दाखवू शकतील अशा युवा वर्गांमध्ये  समावेश केला आहे.  मुंबईस्थीत मानसी ही या यादीतील  एकमेव पॅराअॅथलिट आहे. तसेच 'टाईम' मासिकावर झळकलेली ती आतापर्यंतची एकमेव पॅराअॅथलिट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्याच 'बार्बी डॉल' बनवणाऱ्या बाहुल्यांच्या कंपनीने मानसीला रोल मॉडेल मानून तिच्यासारखी एक बाहुलीदेखील बाजारात आणली आहे. मानसीसारखा या बाहुलीला प्रोस्थेटिक लेग म्हणजे कृत्रिम पाय आहे. अशा बाहुलीमुळे पॅराअॅथलिटच्या व्यथा आणि समाजाने त्यांना ते आहेत तसं स्वीकारण्याची गरज अधोरेखित होईल, असं ही बाहुली बनवणाऱ्या मॅटेल या अमेरिकन कंपनीने म्हटलं आहे. 

पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मानसीचा 2011 च्या डिसेंबरमध्ये चुकीच्या दिशेनं आलेल्या एका लॉरीमुळे अपघात झाला आणि त्यात तिला डावा पाय गमवावा लागला. पण तिने हार मानली नाही. मेहनत, प्रयत्न आणि कोर्टवरची कामगिरी यामुळे ती पुढे पुढे जात राहिली. तिच्याकडे आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमधली तीन पदकं आहेत. गेल्यावर्षी तिने सुवर्ण पदक पटकावलं आहे तर आशियाई स्तरावरची दोन पदकं आहेत. वयाच्या 9 व्या वर्षांपासून ती बॅडमिंटन खेळते आहे. तिचा तिच्या स्वत:वरचा आणि मेहनतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच आठ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात पाय गमावल्यावरही तिने सहा वर्षांत जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. सध्या तिने ऑलिम्पिकची तयारी सुरू ठेवली आहे. तिच्या सारख्या अँथलीटसाठी कठीण असं ब्लेड-रनिंगचं कौशल्य ती शिकली आहे. धावणं आणि सायकल चालवणं हे व्यायाम तिच्या खेळासाठी पोषक आहेत. ती पुन्हा सायकल चालवू लागली आहे. 2020 मध्ये पॅराअॅथलिटसाठी असलेले टॉयसा आणि इंडियन स्पोर्ट्स लिजंडसारखे पुरस्कार तिने पटकावले. बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ दि ईयर या पुरस्कारासाठीही अंतिम पाच नामांकनामध्ये तिचा समावेश होता. अपघाताकडे संकट म्हणून बघण्यापेक्षा त्यात संधी शोधण्याच्या मानसिकतेमुळे संकटावर मात करणं शक्य झालं असं मानसी सांगते.मानसी जोशी आता भारतातच नाही तर आशियाई स्तरावर पॅराबॅडमिंटन खेळांची रोल मॉडेल बनली आहे. हे मानसीच्या खेळाचं आणि स्वभावाचं मोठं यश आहे. मानसी पूर्वीही पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताने विश्वविजेतेपद पटकावलेलं होतं. पण, मानसीने सुस्पष्ट विचार आणि कोर्टवरची कामगिरी यामुळे पॅरा बॅडमिंटनकडे लोकांचं लक्ष वेधलं आणि त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. मानसीमुळे पॅराबॅडमिंटन आणि त्यातल्या अडचणींकडे भारतीयांचं लक्ष गेलं. पॅरास्पोर्ट्स आणि अपंगत्वाकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलावा, असं तिला वाटतं. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

No comments:

Post a Comment