Friday, 9 October 2020

प्लॅस्टिकचा पुनर्वापर


प्लॅस्टिकशिवाय आपलं भागलं असतं तर हा पदार्थ आपल्या जीवनातून कधीच गायब झाला असता, परंतु तसं झालेलं नाही. गरज ही शोधाची जननी असते. आपल्या प्लॅस्टिक गरजांमुळे आपल्या पर्यावरणावर दूरगामी परिणाम झाला आहे, होतो आहे, हे मान्य करावं लागेल. इतर पदार्थांप्रमाणे प्लॅस्टिकचे जैविक विघटन (बायोडिग्रेडेशन) होत नाही, म्हणजेच आपण वापरून फेकून दिलेल्या प्लॅस्टिकचं नैसर्गिकरीत्या पाणी, कार्बन डायऑक्साईडसारख्या सोप्या संयुगांमध्ये रूपांतर (सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून) होत नाही. मानवी शरीर बायोडिग्रेडेबल आहे. आपला देह एक ना एक दिवस निसर्गात मिसळून जाणार आहे. परंतु आपण निर्माण केलेलं प्लॅस्टिक ५०० वर्षांंहून अधिक काळ स्वत:चा अवतार सोडणार नाही. प्लॅस्टिक नुसतं जाळून टाकलं तर त्यातून निघणारे वायू विषारी तसंच पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे असतात. त्यामुळे प्लॅस्टिकचा नायनाट करण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करणे, थर्मोप्लास्टिकना वेगळी रूपं देऊन त्यांना पुन्हा मानवाच्या सेवेशी जुंपणे पसंत केलं जातं. 

आज जगभरात एका वर्षांत दरडोई ५० किलो प्लॅस्टिक निर्माण होते आहे. पुढच्या दहा वर्षांंत हे प्रमाण दुप्पट होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. प्लॅस्टिकसदृश, परंतु पूर्णत: नैसर्गिक पदार्थांचा उपयोग ख्रिस्तपूर्व १६०० सालापासून केला जात असे, परंतु मानवनिर्मित प्लॅस्टिकची पहिली निर्मिती १८५६ साली  केली गेली. पूर्णपणे कृत्रिम प्लॅस्टिक प्रथम निर्माण करण्याचं श्रेय बेल्जियन शास्त्रज्ञ लिओ बेकलँड याला जातं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्याने ‘बेकलाइट’ नावाचे प्लॅस्टिक फिनॉल आणि फॉर्माल्डिहाईड यांचा वापर करून निर्माण केलं.

१९५६ नंतरच्या दशकात प्लॅस्टिकचा वारेमाप वापर होत गेला.  एका अंदाजानुसार १९५० पासून जवळजवळ एक अब्ज टन प्लॅस्टिक कचरा आपण निर्माण केला आहे, ज्याचा पुनर्वापराचा दर फक्त ९ टक्के आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये पॅकेजिंगचं प्रमाण सुमारे ५४ टक्के इतकं आहे. म्हणूनच आपल्या सरकारने लोकोपयोगी प्लॅस्टिक पिशव्यांवर अंकुश आणला आहे. मात्र बलाढय़ औद्योगिक कंपन्या त्यांच्या उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये प्लॅस्टिकचा कितीतरी अधिक वापर करतात. या साऱ्यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञ बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकच्या निर्मितीवर संशोधन करत आहेत. परंतु आता उपलब्ध असलेल्या बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकचं विघटन करायचं असेल तर काही विशेष खर्चीक प्रक्रिया कराव्या लागतात. अशा प्लॅस्टिकचा कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये पुरला तर त्यामुळे निर्माण होणारे मिथेनसारखे वायू पर्यावरणाला अधिक घातक ठरतील, अशी उलटी परिस्थिती आहे. विज्ञान प्रवाही आहे. तंत्रज्ञान प्रगतिशील आहे. आज प्लॅस्टिक—प्रश्नावर समाधानकारक उत्तर नसलं तरी ते क्षितिजावर मात्र नक्कीच आहे. परंतु तूर्तास तरी आपल्या प्लॅस्टिक वापरावर निर्बंध ठेवणं, त्याचा पुनर्वापर करणं या उपायांकडे पाहावं लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment