'कीबोर्ड'च्या माध्यमातून वाजवले जाणारे पियानो हे एक तंतूवाद्य आहे. याला रॉयल संगीत वाद्ययंत्र मानले जाते. बरेच महागडे आणि वजनाने अधिक असणारे हे वाद्ययंत्र जागाही अधिक खाते. भारतात 1980-90 च्या दशकात फक्त परदेशी किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या दिवाणखान्यात हे वाद्य दिसायचे. हिंदी सिनेमांमध्ये हे वाद्य बऱ्याचदा दिसले आहे. आता भारतातल्या काही मोठ्या शहरांमध्ये पियानो संगीत क्लास घेतले जातात. पुण्यात अलीकडच्या काही वर्षांपासून पियानो महोत्सव साजरा केला जात आहे.
पियानो हा शब्द पियानोफोर्ट या इटालियन शब्दापासून बनला आहे. इटालियनमध्ये पियानोचा अर्थ आहे 'कोमल' आणि फोर्टचा अर्थ आहे 'मजबूत'. कोमल आणि कठोरता यांचा संगम म्हणजेच पियानो. पियानोचा शोध 18 व्या शतकात लागला. हेमर्ड डलसीमर्सला या प्रकारातील पाहिले वाद्य मानले जाते. 17 व्या शतकापर्यंत क्लेविकोर्ड आणि हार्पिसकोर्ड ही वाद्ये बरीच लोकप्रिय होती. पण क्लेविकोर्ड अधिक उपयोगात आणताना अडचण यायची तर हार्पिसकोर्डमधून अपेक्षेपेक्षा कठोर आवाज यायचा. त्यामुळे या दोघांच्या कमतरता लक्षात घेऊन पियानोची निर्मिती करण्यात आली. आधुनिक पियानो बनवण्याचे श्रेय बर्तोलोमियो ख्रिस्तोफोरीकडे जाते.मात्र ख्रिस्तोफोरी यांनी पहिलावहिला पियानो कधी बनवला, याचे प्रमाण उपलब्ध नाही.पण बहुतांश जाणकारांच्या म्हणण्यानुसार अठराव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ असल्याचे सांगितले जाते.
आधुनिक पियानोचे मुख्य दोन प्रकार आहेत. ग्रांड पियानो अपराईट किंवा व्हर्टिकल पियानो. ग्रांड पियानो हा क्लासिकल, सोलो, किंवा आर्ट तसेच जाझ रॉक ह्या संगीतात वापरतात. तो 2.2 मीटरउंच असतो. काही पियानो शिकवणी वर्गात,लहान समारंभात वापरतात. ह्यामध्ये ओक्टेव्ह (आठ सुरांचा संच) व्यवस्थित ताणून बसविलेले असल्याने सुगम संगीत ऐकू येते आणि सुरांचा गोंगाट किंवा विसंगती होत नाही. दुसरा प्रकार म्हणजे अपराईट पियानो. हा घरगुती पियानो म्हणून पण ओळखला जातो. बऱ्याच श्रीमंत लोकांकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून हा ठेवला जातो याची उंची 107 ते 114 से.मी. असते. हा घरी, शाळांमध्ये, चर्चे किंवा सरावासाठी वापरला जातो.याशिवाय टॉय पियानो, स्निपेट पियानो, मिडीयम ग्रांड पियानो, पार्लर ग्रांड पियानो, स्टुडीओ ग्रांड पियानो, मिनी पियानो आणि कॉन्सर्ट ग्रांड पियानो. काही सायलेंट पियानो पण असतात. ते वाजवता येतात पण बाकीच्यांना डिस्टर्ब करीत नाही. जसे जसे शोध लागत गेले तसे पियानो मध्ये पण मशीन आले. काही इलेक्ट्रिकल, काही इलेक्ट्रॉनिक आणि कांही डिजिटल पियानो शोधले गेले. यात मुख्य भाग, मॅग्नेटिक पिक अप, ऍम्प्लिफायर आणि लाउड स्पीकर हे आहेत.
आपल्याला मधुर स्वर देण्यास पियानो मध्ये 'की (key)' असतात ज्याला आपण हार्मोनियममध्ये 'स्वर' म्हणतो. एका रांगेत 88 काळे आणि पांढरे स्वर म्हणजे कीज (keys) असतात. त्यापैकी 52 पांढरे मोठ्या आकाराचे आणि 36 काळे, लहान आकाराचे पांढरे कीज वर असतात.काळे सूर एबोनी लाकडाचे आणि पांढऱ्या सुरांवर हस्तिदंताचे किंवा प्लास्टिकचे आवरण असते. संगम चित्रपटात “दोस्त दोस्त ना रहा" या गाण्यात राज कपूरने पियानोचा सुंदर उपयोग करून घेतला. आणि ते गाणे अजरामर झाले. याशिवाय वक्त, गुमराह, राम और श्याम,संगम, मेरे सनम, मेरी जंग अशा अनेक सिनेमांमध्ये याच्या सुरांचा सुंदर उपयोग केला गेला आहे. आनंद मधील "मैने तेरे लिये हि सात रंग के सपने चुने हे गीत आजही लोक गुणगुणतात. पूर्वी श्रीमंत घरांचा दिवाणखाना पियानोने सजलेला असायचा. आपल्याकडे हार्मोनियमचे जे संगीतात
स्थान आहे तेच युरोपात पियानोला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment