Saturday, 3 October 2020

आधुनिक वाल्मिकी गदिमा


गदिमांच्या उल्लेखाशिवाय मराठी काव्याला पूर्णत्वच नाही . अलौकिक दैवी प्रतिभा लाभलेल्या गदिमांची प्रत्येक रचना त्यांचे निर्विवाद श्रेष्ठत्व अधोरेखित करून जाते . मग ते गीत रामायण असो , भावगीतं असोत अथवा चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी असोत . आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकरांची कृष्णभक्ती व्यक्त करणारी ही सुंदर भावकविता .

घननीळा , लडिवाळा , झुलवू नको हिंदोळा .

सुटली वेणी केस मोकळे

धूळ उडाली भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे

या साऱ्याचा उद्या गोकुळी , होईल अर्थ निराळा .

सांजवेळ ही आपण दोघे

अवघे संशय घेण्याजोगे

चंद्र निघे बघ झाडामागे

कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा

आटोपशीर लांबी असलेली ही आदर्श भावकविता आहे . यमक , अनुप्रास या शब्दालंकारांनी नटलेली ही कविता गदिमांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडवते . राधा कृष्णाची अलौकिक प्रेमकथा सगळ्याच कवींना भुरळ घालते . गदिमांच्या लेखणीतून ती अजरामर भावकवितेच्या रुपात आपल्या समोर येते . 

या कवितेत ' ळ ' या शब्दावर इतका सुंदर अनुप्रास अलंकार साधला आहे की , तो फक्त गदिमाच करू जाणे . खरं तर ळ हे अक्षर कवितेत फारसे वापरले जात नाही .पद्यामध्ये ळ हे अक्षर तसे दुर्मिळ आहे . पण , या कवितेत गदिमांनी ' ळ ' चा अति लडिवाळ वापर केला आहे . ग.दि.माडगूळकर , पु.भा.भावे आदि मित्रांची मैफल जमली असता , भाव्यांनी अण्णांना कोपरखळी मारली , अण्णा , तुमच्या एवढ्या कविता वाचल्या , ऐकल्या पण ' ळ ' हे अक्षर कुठेही आढळत नाही . आधुनिक वाल्मिकी क्षणकाळ ध्यानस्थ झाले . अण्णा कागद पेन घेऊन बसले , आणि जन्म झाला एका अद्भुत कवितेचा . 

" घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा .... " कागद सरकावून अण्णा म्हणाले , मोजा किती ' ळ ' आहेत यात !

राधा कृष्ण या दैवी अद्वैतावर आपण मर्त्य मानवांनी काय बोलावे . ते काम गदिमांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचेच . कृष्ण राधेच्या या मुग्ध लीलेचे वर्णन गदिमा आपल्या डोळ्यासमोर उभे करतात .

सांजवेळ आहे . गोकुळातील कालिंदीतटी , कदंब वृक्षाच्या हिंदोळ्यावर विराजमान राधा आपल्या मेघश्यामल श्रीकृष्णाला विनवते आहे , हे मनरमणा , कृष्णा आता हा हिंदोळा झुलवू नकोस . 

" घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा . "

संध्याकाळच्या या शीतल वाऱ्याने माझी वेणी सुटून केस मुक्त झाले आहेत . गोधुली उडते आहे आहे माझ्या धूळभरल्या नयनातून काजळ गालांवर ओघळते आहे . कुणी पाहिलं तर गोकुळात भलताच अर्थ निघेल . " सुटली वेणी केस मोकळे ,  धूळ उडाली भरले डोळे , काजळ गाली सहज ओघळे . या साऱ्याचा उद्या गोकुळी , होईल अर्थ निराळा . "

संधिप्रकाशाच्या या रम्य वेळी हिंदोळ्यावर आपण दोघे , हे मधुसूदना , अवघ्यांचे चित्त आपल्याकडेच आहे . कालिंदीच्या तटी अवघे गोपसूत क्रिडा करत आहेत . कदंब वृक्षा आडून तो चंद्रमा आपल्याकडे डोकावून पाहतो आहे .....

" सांजवेळ ही आपण दोघे , अवघे संशय घेण्याजोगे . चंद्र निघे बघ झाडामागे , कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा . किती तरल असू शकते कल्पनाशक्ती ! गदिमांच्या या भावमधुर गीताला बाबूजींनी तितकीच तोलामोलाची चाल दिली आहे . या सर्वावर माणिकताईंनी आपल्या मधाळ आवाजाने कळस चढवला आहे . माणिक वर्मा यांच्या सर्वश्रेष्ठ गाण्यांपैकी एक आहे हे गाणे . उमज पडेल तर या चित्रपटात शुभा खोटे यांनी हे गीत पडद्यावर साकारले आहे . खऱ्या अर्थाने एक अजरामर गीत गीत रामायणाचा अलौकिक नजराणा मराठी साहित्याला देणाऱ्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला सादर प्रणाम !

No comments:

Post a Comment