Saturday, 17 October 2020
शोभा नायडू
ज्येष्ठ कुचिपुडी नृत्यांगणा शोभा नायडू यांचे गेल्या बुधवारी पहाटे येथे निधन झाले. त्या कुचिपुडी नृत्यप्रकारात निपुण होत्या. नृत्यनाटिकांमधील सत्यभामा आणि पद्मावतीच्या भूमिका ही त्यांची ओळख बनली होती. शोभा नायडू जन्म विशाखापट्टणमधील अनकापल्ली येथे १९५६मध्ये झाला होता. चेन्नईत त्यांनी गुरू वेमपती चिन्न सत्यम यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले होते. चित्रपटांत काम करण्याची संधी त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्वनाथ यांनी देऊ केली होती, पण नृत्याच्या प्रेमाखातर त्यांनी ती नाकारली. नृत्यदिग्दर्शनासह त्यांच्या विप्रनारायण कल्याण श्रीनिवासम या व अशा अनेक नृत्यनाटिका गाजल्या. यात त्यांनी सत्यभामा, देवदेवकी, पद्मावती, मोहिना आणि देवी पार्वती यांच्या भूमिका साकारल्या. नायडू यांच्या नृत्याला भारतासह विदेशात लोकप्रियता मिळाली होती. देशोदेशी त्यांचे विद्यार्थी आहेत. भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता. आंध्र प्रदेश सरकार व अन्य प्रतिष्ठीत संस्थांनीही त्यांच्या कलेचा गौरव केला होता. विजयनगर साम्राज्यापासूनची परंपरा सांगणार्या कुचिपुडी नृत्यशैलीत केवळ प्रावीण्य न मिळवता त्यांनी हा वारसा पुढल्या पिढीतील नर्तकांनाही दिला आणि सुमारे दीड हजार शिष्य घडविले. आधुनिक व्यक्तिवादी काळात अभिजात कला टिकवण्याची जबाबदारी अंतिमत: कलावंतावरच असते, ती त्यांनी निभावली. मात्र, गेल्या काही वर्षांपासूनच्या आजाराने त्यांना गाठले होते. कुचिपुडी हा भरतनाट्यमच्या जवळचा, परंतु मुद्रांपेक्षा भावदर्शनाशी, यक्षगान लोकविधेच्या कथनाशी, ओडिसीच्या लालित्याशी आणि मणिपुरी नृत्यशैलीतील मधुराभक्तीशी नाते सांगणारा नृत्यप्रकार. साधारण वयाच्या सहाव्या वर्षांपासून गुरू वेम्पटि चिन्न सत्यम् यांच्याकडे शोभा शिकू लागल्या आणि १९६९ मध्ये- वयाच्या तेराव्या वर्षी पहिले सादरीकरण त्यांनी केले. तेव्हापासून अनेकदा चित्रपट क्षेत्रातूनही संधी चालून आल्या, पण अगदी कमी वेळा, तेही गुरूंनी सांगितले म्हणूनच त्यांनी चित्रपटांसाठी नृत्य केले. सनदी अधिकारी अर्जुन राव यांच्याशी विवाहानंतरही कलेला अंतर न देता, त्यांनी देशविदेशांत दौरे केले. हाच काळ देशोदेशींच्या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा होता. अमेरिका तसेच व्हेनेझुएला, क्युबा, मेक्सिको या दक्षिण अमेरिकी देशांत, ब्रिटन, तुर्कस्तान, हाँगकाँग, दुबईत त्यांचे कार्यक्रम झाले. शास्त्रोक्त शिक्षणाला सादरीकरणाच्या भानाची जोड देणार्या शोभा नायडू, बोलका चेहरा व डोळे यांमुळे नृत्य पाहण्याची सवय नसलेल्या प्रेक्षकांपयर्ंत नृत्यातील भाव नेमका पोहोचवत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment