‘ब्ल्यू मॉरमॉन’ या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरूचा दर्जा देण्यात आला आहे. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे. राज्य शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुल जारूल घोषित केले आहे, तसेच ‘राज्याचे फुलपाखरू’ म्हणून 'ब्ल्यू मॉरमॉन' ला घोषित केले गेले आहे. देशात आतापर्यंत कोणत्याही राज्याने ‘राज्य फुलपाखरू’ घोषित केले नसून एकंदरीत या सुंदर उडत्या जिवांकडे दुर्लक्षच झाले आहे. खरे तर निसर्गप्रेमींसाठी पक्ष्यांप्रमाणेच फुलपाखरेही आवडीचा व आकर्षणाचा विषय आहे. फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक व वनस्पतीसमवेत परस्परसंबंध असलेले महत्त्वपूर्ण कीटक आहे. राज्यात सुमारे २२५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झालेली असून देशाच्या एकूण संख्येच्या १५ टक्के फुलपाखरे राज्यात आढळतात.'ब्ल्यू मॉरमॉन' हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे व त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. विशेष म्हणजे, हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील केवळ महाराष्ट्र (पश्चिम घाट), दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या या फुलपाखराचे आढळ विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत नोंदवले गेले आहे. फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी 2015 मध्ये राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार 'ब्ल्यू मॉरमॉन' ला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला आहे.मराठीत या फुलपाखराला 'राणी पाखोळी'असे नामकरण करण्यात आले आहे.
हे फुलपाखरू स्वालोटेल्स या जातीत येते. या प्रकारची फुलपाखरे आकाराने मोठी, अतिशय आकर्षक रंगाची आणि पंखाच्या शेवटी शेपटीसारखे टोक असणारी असतात. आज जगात त्यांच्या जवळपास ७०० उपजाती आढळतात. "बर्डवींग" हे जगातील आकाराने सर्वात मोठे फुलपाखरु याच जातीतले, तसेच "अपोलो" हे हिमालयासारख्या अती ऊंचावर आढळणारे फुलपाखरूसुद्धा याच जातीतील आहे. जवळपास १२ ते १५ सें.मी. एवढा पंखांचा विस्तार यांचा आहे. जंगलांमध्ये, कधी कधी शहरांमध्ये, बागांमध्येसुद्धा हे फुलपाखरू आपल्याला सहज दिसून येतात. त्याचा मोठा आकार आणि उडण्याची विशीष्ट सवय यामुळे ते लगेच लक्षात येते.
जगलामधे फुलांवर किंवा त्याहीपेक्षा एखाद्या ओलसर मातीच्या भागावर ते सहज आकर्षीत होते. एकदा का मातीवर बसून ते क्षार शोषायला लागले की, ते सहसा विचलीत होत नाही. मग आपण त्यांच्या अगदी जवळ गेलो तरी त्यांना काही फरक पडत नाही. यांचा जीवनक्रम हा लिंबाच्या जातीच्या झाडांवर आणि इतर काही झाडांवर होतो. यांच्या अळ्या या सुरवातीला पानाच्या वर बसतात. पण त्यांचा आकार आणि रंग हा एखाद्या पक्ष्याच्या विष्ठेसारखा असल्यामुळे त्यांच्याकडे सरडे आणि पक्षी दुर्लक्ष करतात. नंतर मात्र अळी थोडी मोठी झाल्यावर ती जर्द हिरव्या रंगाची होते आणि पानाच्या खाली लपून बसते. नंतर थोडयाच दिवसात कोष झाडावर उलटा एका धाग्याच्या सहाय्याने लटकवला जातो आणि मग काही काळानंतर त्यातून झळाळणारे ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू बाहेर पडते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment