भीमाशंकर हे सह्याद्री पर्वतरांगांतल्या 'उत्तुंग शिखरावर पसरलेले घनदाट अभयारण्य. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग येथे आहे. त्यामुळे येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. खारीच्या कुळातील दिसणारी मोठी खार म्हणजे शेकरू ही या जंगलाची ओळख आहे. शेकरूच्या रक्षणासाठीच खास या अभयारण्याची स्थापना झाली आहे. भीमा नदीचा
उगमही इथून झाला आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील एकमेव अभयारण्य आहे. पुणे, अलिबाग, ठाणे येथील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो. येथे सदाहरित जंगल आहे. पुणे जिल्ह्यात खेड व आंबेगाव तालुक्यांच्या हद्दीवर हा परिसर आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती शैलीची असून, सुंदर कोरीव मूर्ती येथे पाहावयास मिळतात. भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते. निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. जंगलात प्राणी, पशू, पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे आढळतात. या जंगलात अनेक औषधी वनस्पती आहेत. पावसाळ्यात सतत धुक्याने हा परिसर व्यापलेला असतो. येथील अभयारण्य १३०.७८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. येथील जंगल सदाहरित गर्दहिरव्या झाडांनी पसरलेले आहे. भीमाशंकर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फूट उंचावर आहे. त्यामुळे पावसाळी प्रदेश, थंड हवेचे ठिकाण व कड्यावरून नजरेच्या टप्प्यात येणारा सभोवतालचा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.
भीमाशंकर मंदिर व जंगल परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे आहेत. यामध्ये मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनी मंदिर, मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर, पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेले कमलजादेवी मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत. तसेच, भीमाशंकर अभयारण्यात हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे. जंगलात गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून, येथे साक्षी विनायकाचे मंदिर आहे. भोरगड हे ठिकाण भीमाशंकर जंगलात असून, येथे जुन्या काळातील लेण्या आहेत. भोरगडाच्या पायथ्याला कोटेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिरही प्राचीन काळातील असून, येथे अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भीमाशंकर परिसरात कुठेच किल्ले नाहीत व लेण्या आढळत नाहीत. मात्र, भोरगड हा एकमेव किल्ला व या किल्ल्यावर लेण्या आहेत.
या ठिकाणांबरोबरच कोकणकडा, वनस्पती पॉइंट, नागफणी, भाकादेवी, भट्टीचेरान, कोथरने, मंदोशी, पोखरी, कोंढवळ परिसरातील धबधबे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्यात देवदर्शन व पर्यटन, असे दोन्ही उद्देश सफल होत असल्याने लाखोंच्या संख्येने पर्यटक भीमाशंकरकडे येत असतात. येथे आल्यानंतर पावसाचा मनमुराद आनंद घेतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment