गिधाडे हे निसर्गातील सफाई कामगार असतात. त्यांना स्वच्छतादूत म्हटलं जातं. गिधाडे ही अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. निसर्गाची जीवनसाखळी एकमेकांवर अबलंबून आहे. या साखळीत गिधाडांचेही महत्त्वाचे स्थान आहे.गिधाडांचे मुख्य खाद्य हे मृतदेहांचे मांस असते. उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावरची पिसे नसतात. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे सोपे जाते. राज्यात प्रामुख्याने पांढरे शुभ्र, लांब आणि बारीक चोच असलेल्या प्रजातीची गिधाडे आढळतात. मात्र आता त्यांची संख्या घटली आहे. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गिधाडे असून नाशिक, पेंच, चंद्रपूर, रोहा, कोल्हापूर येथेही त्यांची नोंद आढळते. १९९० ते २००९ या काळात जगभरात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाली. रॉयल सोसायटी आॅफ प्रोटेक्शन आॅफ बर्ड (इंग्लंड), पेरिग्रीन (इस्रायल), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (भारत) या संस्थांनी सर्वेक्षण केले. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था आणि इंग्लंडच्या हॉक कॉन्झर्व्हेटरी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ५ सप्टेंबर २००९ रोजी ‘आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस’ सुरू केला.
सध्या देशात साधारण १९ हजार, तर राज्यात केवळ ८०० गिधाडे आहेत. त्यामुळे रामायणात सीतेला वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या गिध कुळातील जटायूला मिळालेला सन्मान आज पुन्हा मिळवून देण्याची गरज आहे. गुरांना देण्यात येणाऱ्या डायक्लोफिनॅक औषधामुळे गिधाडांचा मृत्यू होत आहे. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे मलेरियामुळे राज्यात गिधाडांचा मृत्यू झाल्याचे एनएडब्ल्यूएआरने आपल्या एका संशोधनात मागे उघड केले होते. त्याचबरोबर अधिवासाची कमतरता, खाद्याचा अभाव तसेच प्रदूषणयुक्त अन्न पाण्यामुळेही अनेक गिधाडांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने जैवसाखळी तुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे मानवी अस्तित्वासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यासाठी ठोस पावले युद्धपातळीवर राबविण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment