Saturday, 17 October 2020

देवीची शक्तिपीठे


घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवाच्या मंगल सोहळ्यास सुरुवात झाली आहे. देवीच्या मूर्ती अथवा प्रतिमेसमोर घट मांडून धान्य पेरून नंदादीप लावून पूजन करण्यात येते.  नवरात्रीत प्रत्येकजण भक्तिभावाने मनापासून देवीची उपासना करतात. आपण ज्या देवीची पूजा करतो त्या नवदुर्गाचे महत्व आहे. नवरात्र ही आपल्याला विश्रांती आणि कायाकल्प प्रदान करते, या कालखंडात उपवास, ध्यान, प्रार्थना, आणि इतर अध्यात्मिक पद्धतींनी महत्त्व दिले जाते. नवरात्री दरम्यान केलेली प्रार्थना, जप आणि ध्यान यामुळे आपल्या मनाला शांतता लाभते. तसेच या गोष्टी आपल्यात सकारात्मक गुणधर्म आणते आणि आळस, गर्विष्ठपणा, ओझरतेपणा, क्रोध आणि अत्याचार यांसारख्या गोष्टींना नष्ट करते.

नवरात्रोत्सव आला की, राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे भाविकांचे पावले वळायला लागतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठे आहेत. या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिकाही आहेत. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. मात्र, नवरात्रोत्सवात इथे जास्त गर्दी बघायला मिळते. 

तुळजाभवानी - तुळजापूर

भारतातील शक्तीदेवताच्या पीठापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्‍वात नीती व धर्माचरण यांची पुनस्र्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.

स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंथी आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

रेणुकादेवी - माहूर

माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला संपूर्ण जगाची आई किंवा जगदंबा मानतात. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. 

यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या गावाजवळील गडावर आहे.

शिवाची पत्नी पार्वतीने कुब्ज देशाच्या रेणू नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आर्शमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आर्शमात नाही असे बघून आर्शमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूरचे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.

महालक्ष्मी - कोल्हापूर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १0८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६00 ते ७00 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. मंदिराच्या परिसरात जवळपास ३५ लहान-मोठी मंदिरे आहेत. 

कधी काळी मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४0 किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे. 

वर्षातूून मार्च व सप्टेंबर महिन्याच्या २१ तारखेस सूर्यास्तावेळी खिडकीतून सूर्यकिरणे मूर्तीच्या मुखावर पडतात. या योगास दुर्मीळ व लाभदायक मानण्यात येते. मावळतीच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या मातेच्या दर्शनासाठी या दिवशी भक्तगण मंदिरात गर्दी करतात. त्यानिमित्त येथे किरणोत्सवही साजरा केला जातो.

सप्तश्रृंगीदेवी - नाशिक

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तश्रृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८00 फूट उंचावरील सप्तश्रृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तश्रृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते. आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तश्रृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १0८ शक्तीपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तश्रृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तश्रृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तश्रृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.


No comments:

Post a Comment