भारतीय स्वातंत्र्य-आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात करमसद (खेडा जिल्हा) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लाडबाई. विद्यार्थिदशेतच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभी करून एका कठोर शिक्षकाविरुद्ध तीन दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला. प्राथमिक शिक्षण करमसद येथे घेऊन पुढील शिक्षण त्यांनी पेटलाड, बडोदा व नडियाद येथे घेतले. विद्यार्थिदशेतच जव्हेरबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). १८९७ साली नडियादहून ते मॅट्रिक झाले. घरच्या गरिबीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. त्यांचे वडीलबंधू विठ्ठलभाई बॅरिस्टर होण्यासाठी १९0५ मध्ये इंग्लंडला गेले. त्यानंतर ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. या परीक्षेत त्यांचा पहिला क्रमांक आला व ५0 पौडांचे पारितोषिक मिळाले. १९१३ साली ते परत आले व अहमदाबादला त्यांनी वकिली सुरू केली. प्रारंभी ते लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षात सामील झाले. त्यांचे प्रारंभीचे जीवन काहीसे विलासी व चैनीचे होते. क्लब, पत्ते खेळण्यात उरलेला वेळ घालवत. महात्मा गांधी अहमदाबादला येईपर्यंत त्यांची ही दिनचर्या चालू होती; पण गांधीच्या सहवासाने ते पूर्णत: बदलले (१९१७). महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष व वल्लभभाई चिटणीस झाले. त्यांनी १९१७-१८ सालच्या खेडा सत्याग्रहात हिरिरीने भाग घेतला आणि तो यशस्वी करून दाखविला. अहमदाबाद नगरपारिकेत ते याच वर्षी निवडून आले. पुढे तर १९२४-२८ दरम्यान ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ व सुंदर केले. रौलट कायद्याचे वेळी त्यांनी आक्षिप्त राष्ट्रीय साहित्य विकले व सार्वजनिक निदर्शनांत भाग घेतला. गांधींच्या असहकारितेत्या चळवळीत वल्लभभाई आघाडीवर होते. त्यांनी सुखासीन राहणीमानाचा त्याग केला व तत्काल वकिली सोडली. या सुमारास दहा लाखांचा निधी गोळा करून गुजरात विद्यापीठाची स्थापना केली (१९२0). १९२१ साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लवकरच अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष बनले.
१९२३ सालच्या नागपूर झेंडा सत्याग्रहात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला. बोरसद सत्याग्रहातही ते यशस्वी झाले. १९२७ साली ते नगरपालिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये जलप्रलय झाला. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामी त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे.
No comments:
Post a Comment