पोलो हा घोड्यावर बसून खेळला जाणारा एक संघीय खेळ आहे. सर्वसाधारणपणे हॉकीसारखा असणारा हा खेळ घोड्यावरून खेळला जातो. स्टिक (काठी)च्या साहाय्याने चेंडू विरोधी संघाच्या खेळाडूंच्या तावडीतून सोडवून गोलपर्यंत नेणे. या खेळाला 'राजेरजवाडेंचा खेळ' म्हटले जाते. जाणकारांच्या माहितीनुसार या खेळाची सुरुवात इराणमध्ये आठव्या शतकात झाली. परंतु इराण क्रांतीदरम्यान तिथे या खेळाची लोकप्रियता कमी झाली होती. पोलो खेळाला आधुनिक रूप देण्याचे श्रेय इंग्रजांकडे जाते. मात्र याची उत्पत्ती ब्रिटनमध्ये नाहीतर भारतात झाली. भारतात पोलो मोगलांकरवी तेराव्या शतकात येऊन पोहोचला. त्याचे लिखित स्वरूपातील नियम प्रथम अकबर बादशहाच्या कारकीर्दीत (सोळावे शतक) तयार झाले. एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्यांनी हा खेळ भारतातच आत्मसात केला. आसाममधील चहामळ्याच्या ब्रिटिश मालकवर्गात हा खेळ सुरुवातीस खेळला जात होता. त्यांनी १८५९ मध्ये सिल्चर येथे पहिला ब्रिटिश पोलो क्लब स्थापन केला. तिथून हा खेळ लवकरच भारतभर लोकप्रिय झाला. पोलो खेळात ज्या घोड्यांचा वापर केला जातो, त्यांना 'पोलो पोनीज' किंवा 'माऊंट' म्हटले जाते. या घोड्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाची सुरुवात साधारणपणे तिसऱ्या वर्षांपासून सुरू होते. हे प्रशिक्षण सहा महिने ते दोन वर्षांचे असते. पाच वर्षांपर्यंत जवळपास सर्वच घोडे शारीरिकदृष्ट्या परिपक्व झालेले असतात. 18 ते 20 वर्षांपर्यंत हे घोडे पोलो खेळ खेळू शकतात. एका खेळाडूला एका खेळात दोन घोड्यांची (माऊंट) आवश्यकता असते. एक माऊंट थकला की दुसऱ्या माऊंटचा उपयोग केला जातो. याला 'चकर'म्हणतात.
प्रत्येक संघात चार खेळाडू असतात. यात महिला किंवा पुरुष दोघेही असू शकतात. खेळाडूंना खेळातील स्थानानुसार क्रमांक दिले जातात. एक आणि दोन क्रमांकांचे खेळाडू आघाडीवर खेळतात. त्यांचे काम हल्ला करावयाचे व प्रतिस्पर्धी संघाचा हल्ला परतविण्याचे असते. तिसरा खेळाडू म्हणजे ‘हाफ-बॅक’. हा संघाच्या आसासारखा असतो. त्याचे काम हल्ल्यात पुढाकार घेण्याचे आणि चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला (जो मागे असतो) मदत करण्याचे असते. चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला बचावात्मक पवित्रा घेऊन प्रतिस्पर्ध्याच्या गोलांना प्रतिबंध करावा लागतो. तथापि या खेळाच्या प्रवाही, गतिमान स्वरूपामुळे खेळाडूंच्या जागा झपाट्याने बदलत असतात व प्रत्येक क्रमांकाच्या खेळाडूला वेगवेगळ्या स्थानांवरून खेळावे लागते.चारी खेळाडूंची मैदानावर वेगवेगळी पोजिशन असते.
या खेळात वापरला जाणारा चेंडू विलो झाडाच्या मुळांपासून बनवतात किंवा प्लास्टिकचाही वापरतात. इनडोअर पोलो खेळासाठी चामड्याच्या चेंडूचा उपयोग केला जातो. खेळावयाची काठी वेताची असते,त्याला मेलेट म्हणतात. हेल्मेट, निपेड्स, सॅडलर्स सारखे अन्य साहित्यदेखील पोलो खेळात लागते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment