कोआला हा सस्तन प्राणी पूर्व ऑस्ट्रेलियाच्या सीमावर्ती जंगलात आढळून येतो. हा प्राणी अस्वलासारखा किंवा पांडासारखा दिसत असला तरी हा या वर्गातील अजिबात नाही. मार्सूपियल वर्गातील या प्राण्याच्या मादीच्या शरीरात कांगारूसारखी एक पिशवी असते. यात पिल्लू कोआला मोठा म्हणजे सहा महिन्यांचा होइपर्यंत आरामात राहतो. सध्या या प्राण्यावर जंगलतोडीमुळे गंडांतर आले आहे. कोआला हा जंगलातल्या फक्त एकाच झाडावर राहतो. युकेलिप्टस हे एक ते झाड असून याची पानं खायला त्याला आवडतात. आरामप्रवृत्तीचा हा प्राणी आपला जास्तीतजास्त वेळ याच झाडावर घालवतो. आणि दिवसभरातील जवळपास 18 तास हा झाडावर झोपतो. आपले घर ओळखता यावे यासाठी तो झाडाच्या सालीवर विशिष्ट प्रकारची खूण करतो. याशिवाय नर कोआला आपल्या शरीरातून एकप्रकारचा चिकट पदार्थ बाहेर सोडतो आणि आपले शरीर झाडाच्या सालीवर घासतो. त्यामुळे त्याला आपले घर आणि ठिकाण ओळखण्यास सुलभता येते.
कोआला जिथे त्याला खायला भरपूर मिळते, अशा ठिकाणी वस्ती करतो. युकेलिप्टसची पानं तो मोठ्या चवीने खातो. खरे तर या झाडाची पानं इतर प्राण्यांसाठी विषासमान असतात, मात्र कोआलाच्या पोटात काही असे बॅक्टेरिया असतात की, त्यामुळे पानांमधील विषाचा परिणाम नष्ट होतो. जगात जवळपास 700 प्रकारच्या युकेलिप्टसच्या जाती आहेत. पण हा प्राणी फक्त 70 प्रकारच्या प्रजातीच्या झाडांची पाने खातो. वास्तविक यांचे अन्न तसे खूपच साधारण असते, मात्र हे प्राणी बाकी सर्व वेळ आराम करण्यात घालवतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जेची बचत होते.
कोआला पाण्यावाचून अनेक दिवस राहू शकतात, हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. युकेलिप्टसच्या पानांमधून ते तहान भागवतात. लहान कोआलाला 'जोई' म्हणतात. हे जन्माच्यावेळी फक्त दोन सेंटीमीटर लांबीचे असते. त्यांना ना ऐकू येत ,ना पाहता येतं. यांच्या शरीरावर केसही नसतात. मोठ्या कोआलाचे वजन साधारण 14 किलोचे असते. तर लांबी 60 ते 75 सेंटीमीटर इतकी असते. कोआलाचं आयुष्य साधारण 10 ते 15 वर्षांचं असतं.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment