Tuesday 5 April 2022

तायक्वांदोमध्ये भारताकडून आव्हान देणारा शिवांश त्यागी


तायक्वांदोमध्ये भारतातून प्रथम क्रमांकावर असलेला शिवांश त्यागी जागतिक स्तरावर एक नवीन आव्हान घेऊन आला आहे.  जागतिक स्तरावर त्याचे रँकिंग 53 आहे.  तो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता ठरला आहे.  आता सध्या तो कोरियात जूनमध्ये होणार्‍या आशियाई चॅम्पियनशिप आणि सप्टेंबरमध्ये चीनमधील हँगझोऊ येथे होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी घाम गाळत आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी तो पात्र ठरला आहे. शिवांश हा शेतकरी कुटुंबातून आला आहे.  सहा फूट चार इंच उंच असलेला शिवांश 74 किलो गटात खेळतो आहे. अगदी लहानपणापासूनच शिवांशचा कल तायक्वांदोकडे होता.  प्राथमिक शाळेत शिकत असताना त्याने सीबीएसईच्या विविध स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके पटकावली आहेत. आग्रा, हैदराबाद, कानपूर, पुणे, वाराणसी आदी देशभरातील अनेक ठिकाणांसह  कॅनडा, व्हिएतनाम, इराण, रशिया, संयुक्त अरब अमिराती अशा अनेक देशांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवून दिली आहे.

शेतकरी असलेले वडील हरी किशन त्यागी आणि गृहिणी आई मोनिका त्यागी यांनी शिवांशला प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.  आजोबांना जीवनात आदर्श मानणाऱ्या शिवांशचा क्रीडा क्षेत्रातील आदर्श व्यक्ती म्हणजे विश्वविजेता मोहम्मद बघेरी.  शिवांशला तायक्वांदोव्यतिरिक्त स्केटिंग, बास्केटबॉल आणि टेबल टेनिसमध्येही रस आहे आणि त्याने या खेळांमध्येही अनेक पुरस्कार पटकावले आहेत.  शिवांश लहानपणापासूनच शुद्ध शाकाहारी आहे. तो गेल्या 11 वर्षांपासून तायक्वांदो खेळत आहे.  इराणमधील राष्ट्रपती चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर त्याला जागतिक स्तरावर 53 वे मानांकन मिळाले आहे.  मॉन्ट्रियल येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले.  त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.  त्याने जॉर्डनमध्येही कांस्यपदक जिंकले आहे.  व्हिएतनाम, तेहरान, मॉस्को येथे झालेल्या अनेक जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये त्याचे खूप कौतुक झाले.

शिवांशच्या म्हणण्यानुसार, त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर तायक्वांदोमधील ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे.  यासाठी तो त्याच्या गुडगाव येथील प्रशिक्षण केंद्रात जोरदार तयारी करत आहेत.  शिवांशने काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या फौजीरात ओपन स्पर्धेत जागतिक स्तरावर पाचवे स्थान पटकावले आहे.  त्याचप्रमाणे तेहरानच्या फजर ओपन आणि तिसऱ्या आशियाई ओपन चॅम्पियनशिपमध्येही स्थान मिळवले आहे.  राष्ट्रीय स्तरावर त्याने सलग लढतींतून गुण जिंकून भारतातील पहिले मानांकन मिळवले. सध्या तो आगामी स्पर्धांसाठी कसून सराव करत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली