Friday 30 April 2021

वाद्यांची निर्मिती


भारतीय शास्त्रीय संगीतात तंतुवाद्यात मानाचे स्थान मिळवले आहे ते सतारीने आणि तंबोऱ्याने; पण वीणा एकतारी ही देखील वाद्ये याच वर्गातली आहेत. या सर्वांच संबंध येतो भोपळ्याशी. भोपळा हाच या वाद्यांचा तारणहार असतो. महाराष्ट्रात मिरज या ठिकाणी या वाद्यांची निर्मिती होते. ही निर्मिती भोपळ्यापासून होते. पंढरपूरच्या परिसरातून भोपळ्याची खरेदी मिरजचे निर्माते करतात. शेतातले भोपळे वाद्यांसाठीच पिकवतात. सहा-सात महिने जातात. पिकल्यावर शेतातच वाळवतात. सुकल्यावर देठ काढतात. गोलाकार कापतात, साफ करतात. त्वचा मऊ होण्यासाठी पाणी भरतात. दोन दिवसांनी साफ करतात. उभ्या-आडव्या लाकडी काठ्या बसवतात.आकार सारखा राहावा म्हणून. गोलाकार राहाण्यासाठी तून किंवा टून वापरतात.

त्याचा गळा तयार करतात. पुढे लाखेचा वापर करून गळ्यावर दांडी बसवतात. भोपळ्यावर लाकडी तबकडी बसवतात, बंद करतात. कलाकुसर करतात, रंग देतात मग खुंट्या बसवतात, वाधा बसवतात, तारा बसववतात. त्या योग्य प्रकारे जुळवतात आणि सतार, तंबोरा करतात. या सतार, तंबोऱ्याचा वापर शास्त्रीय संगीतात अधिक उपयोग होत आला आहे. अशा संगीतात रागाचा विस्तार केला जातो. त्यावेळी तारांचा मेळ स्वराशी अधिक जुळत जातो आणि संगीतात माधुर्य निर्माण होते. या रागपद्धतीला उंचीवर नेण्यात गायकांचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या त्या पद्धतीतूनच पुढे पुढे ग्वाल्हेर, किराणा, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार अशा घराण्यांची निर्मिती झाली. या घराण्यातील बहुतेक गायकांनी तंबोरा, सतार या वाद्यांना नुसते महत्त्व दिले नाही तर त्यांची रागदारीसाठी साथ घेऊन या वाद्यांना मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. यात अल्लादियाँ खान, मोगुबाई कुर्डीकर, मंजी खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, भास्करबुवा बखले अशांचा मोठा वाटा आहे.

प्रदूषण कमी करणारे यंत्र


लोकसंख्येबरोबरच देशभरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांचे प्रदूषण कमी  करण्याचे विविध प्रयत्न सुरु आहेत. गारगोटी  येथील  ऋतुराज ज्ञानेश्वर वेदांते या महाविद्यालयीन युवकाने चारचाकी वाहनातील प्रदूषण कमी करणारे यंत्र (सायलेन्सर)  विकसित केले आहे. या यंत्राला सोसायटी ऑफ  ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स स्पर्धेत 'गो ग्रीन'  स्पेशल कॅटेगरीत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. दरवर्षी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे  अभियांत्रिकी क्षेत्रातील देशपातळीवर 'बाजा' स्पर्धांचे आयोजन केले जाते. पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंगची टीम गेल्या आठ वर्षांपासून स्पर्धेत सहभागी होत आहे. गतवर्षी मध्यप्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत टीमचा देशपातळीवर चौथा व सस्पेन्शन अँड ट्रॅक्शनमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत 25 वा क्रमांक मिळविला होता. कोरोनामुळे यावर्षी स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. कॉलेजचे डॉ. के. आर.पाटील व एस.जी.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ऋतुराज वेदांते, प्रियदर्शी पवार यांच्यासह 25 जणांच्या 'टीम अभेद्य'ने ऑफ रोड व्हेईकल डिझाईज करुन राष्ट्रीय स्पर्धेत सादरीकरण केले. प्रदूषण कसे कमी करता येईल, अशा पद्धतीने वाहनातील यंत्र विकसित केले आहे. स्पर्धेचा निकाल असून 25 एप्रिल रोजी जाहीर झाला. यात देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे. शेती आणि व्यक्तिगत पातळीवर कामासाठी या वाहनाचा वापर केला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.


फटाक्यांचा शोध


फटाके म्हटले की आपल्याला आठवते ती दिवाळी. म्हणजे आपल्याकडे दिवाळी आणि फटाके यांचे एक समीकरणच बनले आहे. त्याच बरोबर देशात आणि जगभरात नववर्षाच्या स्वागतासारख्या अनेक प्रसंगी फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी केली जात असते. आकाशात विविध रंगांमध्ये झळाळणारी ही  आतषबाजी डोळ्यांचे पारणे फेडत असते. मात्र या फटाक्यांचा शोध चीनमध्ये लागला. तोही एका विचित्र अपघाताने. इसवी सनाच्या पूर्वी म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीच  फटाक्यांच्या विकासाला सुरुवात झाली होती. चीनमध्ये इसवी सन पूर्व २०० या काळात  फटाक्यांचा शोध लागला असे मानले जाते. एका  रात्री शेकोटी करीत असताना लाकडे संपली म्हणून कुणीतरी आगीत बांबूचा तुकडा फेकला. बांबू काळा पडत गेला व त्यामधून निखारे बाहेर पडू लागले आणि अचानक मोठा आवाज होऊन बांबूचे तुकडे झाले. असा आवाज यापूर्वी कुणी ऐकला नव्हता. सगळेच या आवाजाला घाबरले. लोकांचा असा समज झाला की जर या आवाजाने माणूस घाबरू शकतो तर दुष्ट आत्मेही घाबरू शकतात. तत्कालीन चीनमधील लोकांचा असा समज होता की निआन नावाचा दुष्ट आत्मा त्यांच्या शेतातील पीक खराब करतो. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवशी या निआनला घाबरवण्यासाठी बांबू आगीत टाकून तो फोडण्याची परंपराच तिथे सुरू झाली. त्यानंतर मग लग्न समारंभ, राज्याभिषेक, जन्मसोहळा आदी महत्त्वाच्या प्रसंगीही बांबू फोडले जाऊ लागले. त्याला 'पाओ चूक' असे म्हटले जात असे. ही परंपरा पुढील शेकडो वर्षे सुरू होती. बांबू शिवायही अशा प्रकारचा आवाज काढणारा पदार्थ शोधणारे काही चिनी लोक होते. इसवी सन 600 ते 900 या दरम्यान स्फोटक अशा गन पावडरचा शोध लागला. गंधक, पोटॅशियम नायट्रेट, मध, आर्सेनिक डायसल्फाईड आदींचे मिश्रण स्फोटक असल्याचे लोकांना समजले. या मिश्रणाला 'हुओ याओ' म्हणजेच 'स्फोटक पदार्थ' असे म्हटले गेले. हे मिश्रण बांबूमध्ये भरून आगीत टाकले की जोरदार आवाज येतो हे दिसून आले आणि यामधूनच फटाक्यांचा शोध लागला! मग यात कमालीचं संशोधन सुरू झालं आणि केवळ आवाजापर्यंत मर्यादित न राहता हे मिश्रण रोषणाई आणि उंच आकाशात कसं उडवता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. हे तंत्र शोधत असताना याचा वापर युध्दातही होऊ लागला. दरम्यान, हे तंत्र काही पर्यटकांनी युरोपात आणलं आणि फटाक्यांच्या विकासाने वेग धरला. मग आकाशात उडणाऱ्या या फटाक्यांमध्ये रंग आणण्यासाठी विविध धातूंचे अंश मिसळण्यास सुरूवात झाली. आज उपलब्ध असलेला पाऊस, भुईचक्र, रोषणाई अशा फटाक्यांचा आनंद हजारो वर्षं मानव घेत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday 29 April 2021

प्लॅस्टिकविषय अधिक जाणून घ्या


दैनंदिन जीवनामध्ये आपण प्लॅस्टिक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. प्लॅस्टिक हा कार्बन मुख्य घटक असलेला पेट्रोलियम पदार्थ आहे. हा पदार्थ खनिज तेलापासून तयार होतो. वजनाला हलके, न गंजणारे, टिकाऊ, जाडी आणि विविध आकार घेण्याची क्षमता या कारणांमुळे प्लॅस्टिकचा वापर वाढत आहे. आज निष्काळजीपणामुळे प्लॅस्टिक प्रदूषण म्हणून जागतिक समस्या तयार झाली आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न, वस्तू फेकून देतो. त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्य, पाळीव प्राणी, अन्य वन्यजीवांवर होत आहे. कारण प्लॅस्टिक वस्तू टाकाऊ झाल्यावर ते कुजत नाही, त्यामुळे नष्ट करता येत नाही.

भारतामध्ये प्लॅस्टिकचा वापर विविध क्षेत्रांमध्ये होतो. एकूण वापरापैकी ८ टक्के इमारती, २४ टक्के पॅकिंग, १६ टक्के इलेक्ट्रॉनिक्स, ४ टक्के वाहतूक, १ टक्का फर्निचर, २३ टक्के शेती, १० टक्के घरगुती आणि १४ टक्के इतर क्षेत्रामध्ये वापर होतो.
भारतामध्ये सरासरी ११ किलो प्रति माणशी, प्रति वर्षी प्लॅस्टिक वापरले जाते. परंतु अमेरिकेमध्ये दहापट म्हणजे ११० किलो प्रति माणशी, प्रति वर्षी प्लॅस्टिक वापरले जाते. सन २०१७-१८ च्या अहवालानुसार भारतामध्ये अंदाजे १६.५ दशलक्ष टन एवढे प्लॅस्टिक वापरले गेले. जगामध्ये प्लॅस्टिकबंदीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. बांगलादेशमध्ये २००२ मध्ये प्लॅस्टिक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली.
सिक्कीममध्ये १९९८ पासूनच प्लॅस्टिक बंदी आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे.
प्लॅस्टिकचे प्रदूषण
•जागतिक पातळीवर दरवर्षी ३०० दशलक्ष टन प्लॅस्टिक निर्माण होते, त्यापैकी ५० टक्के एकदाच वापरासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक वस्तू थोड्या कालावधीसाठी
वापरतो. जगामध्ये दर मिनिटाला १० लाख प्लॅस्टिक बाटल्या विविध कारणांसाठी खरेदी केल्या जातात. दर दिवशी २.७ लाख प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात.
• जगामध्ये जेवढ्या वस्तू पॅकेजिंग करतो, त्यापैकी ३७ टक्के प्लॅस्टिकचा वापर होतो. दरवर्षी चीन ६० दशलक्ष टन, अमेरिका ३८ दशलक्ष टन, जर्मनी १४.५ दशलक्ष टन, ब्राझील १२ दशलक्ष टन या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर होतो.
• जगाचा विचार केला तर प्लॅस्टिकचा वापर आणि त्यामुळे होणारे प्रदूषण आशियायी देशांमधून होते. चीन, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशात जास्त प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण झाले आहे.
• फक्त ५ टक्के प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर प्रक्रियेसाठी गोळा केला जातो. उर्वरित ९०-९५ टक्के तसेच जमिनीवर राहते किंवा पाण्यावर तरंगत असते.
• सद्यःस्थितीत जगामध्ये ३०० दशलक्ष टन प्लॅस्टिक निर्माण होते. सरासरी ९० टक्के प्लॅस्टिक वस्तू आपण एकदाच वापरून फेकून देतो.त्यापैकी वापर
झाल्यानंतर ९० टक्के जमीन आणि १० टक्के महासागरामध्ये जाते. तज्ञांच्या मते जागतिक पातळीवर १०० दशलक्ष टन एवढा प्लॅस्टिक कचरा समुद्रामध्ये आहे. त्यामध्ये दरवर्षी अंदाजे आठ दशलक्ष टन एवढा प्लॅस्टिक कचरा महासागरामध्ये जमा होतो. जलभागाचा विचार केला तर आज महासागरामध्ये सरासरी ४० टक्के क्षेत्रावर, ९० टक्के इतका प्लॅस्टिक कचरा पाण्यावर तरंगताना तसेच किनाऱ्यावर आढळतो, जो ८० टक्के जमिनीवरून महासागरामध्ये जातो. जमीन किंवा पाण्यात असले तरी प्लॅस्टिक नष्ट होत नाही. प्लॅस्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. विषारी घातक पदार्थ या प्लॅस्टिकच्या विघटनामधून बाहेर पडतात. ज्यामुळे जमीन, पाणी तसेच हवा प्रदूषित होत आहे. प्लॅस्टिक प्रदूषणाचा मानवी तसेच इतर जलचर प्राण्यांवर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. भूगर्भातील पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे. नद्या, तलाव, समुद्रामध्ये प्लॅस्टिक प्रदूषण झाले आहे. या प्रदूषण लाखांपेक्षा जास्त समूद्रजीव मृत्यूमुखी पडतात.
• महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीवसृष्टीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. समुद्रकिनारी मासे पुनरूत्पादनासाठी ज्या जागांचा उपयोग करतात अशा जागासुद्धा प्लॅस्टिकबाधित आहेत. दरवर्षी १० लाखांपेक्षा जास्त समुद्रजीव मृत्यूमुखी पडतात.
• महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव सृष्टीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. समुद्रिकिनारी मासे पुनरुत्पादनासाठी ज्या जागांचा उपयोग करतात अशा जागासुद्धा प्लॅस्टिकबाधित आहेत. (अनिकेत फिचर्स)

सर्वात उंच माणूस


माणूस कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येईल, सांगता येत नाही. यासाठी काहींना त्यांचं शरीर उपयोगाला येतं. त्यांच्या शरीरामुळे त्यांची एक ओळख निर्माण होते.  कोण सर्वाधिक सडपातळ म्हणून जगात नोंदला जातो तर कोण त्याच्या अवाढव्य वजनामुळे जगातील सर्वात वजनदार व्यक्ती म्हणून ओळखली जाते. कोण जगातला सर्वाधिक ठेंगणा तर कोण जगातला सर्वाधिक उंच म्हणून ओळखला जातो. शरीराच्या ठेवणीमुळे काहीजण गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्ये स्थान मिळवत आहेत. अशीच जगातील सर्वात उंच जिवंत व्यक्ती म्हणून तुर्कीच्या सुल्तान कोसेन या माणसाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. ही व्यक्ती तब्बल 8 फूट 2.82 इंच उंचीची आहे. 'गिगॅटिझम' आणि 'अॅक्रोमेगली' या विकारामुळे त्याची उंची इतकी भरमसाठ प्रमाणात वाढली. एका ट्यूमरने त्याच्या मस्तिष्कग्रंथीवर परिणाम केल्याने हे सगळे घडले. 

मार्दिन या शहरात एका कुर्दिश कुटुंबात 10 डिसेंबर 1982 मध्ये सुल्तानचा जन्म झाला. आता तो जगाच्या इतिहासातील सातव्या क्रमांकाचा सर्वात उंच माणूस ठरला आहे. लहानपणापासूनच त्याची उंची अतिशय जास्त असल्याने त्याला शाळेत जाणेही अवघड जात होते. त्यामुळे त्याचे शिक्षणही अर्धवटच राहिले आहे. घरातले बल्ब लावणे किंवा खिडक्यांना पडदे लावणे, उंच ठिकाणी ठेवलेली वस्तू काढून देणे अशा घरगुती कामांसाठी त्याला त्याच्या उंचीचा उपयोग होत असला तरी अनेक बाबतीत मात्र त्याला त्याची ही उंची त्रासदायकच ठरते. त्याला त्याच्या मापाचे पोशाख खास शिवून घ्यावे लागतात. त्याचे पाय 126 सेंटीमीटर लांबीचे असल्याने बऱ्याच वेळा पँट शिवून घेणे त्याच्यासाठी डोकेदुखीचे असते. त्याचप्रमाणे बूटही खास तयार करवून घ्यावे लागतात. त्याला वाहनात बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी अडचण येते. कारण त्याला नेहमीच्या वाहनात बसणं अडचणीचं ठरतं. त्यामुळे त्याला बऱ्याचदा पायीच प्रवास करावा लागतो. ऑक्टोबर 2013 मध्ये त्याने सिरियामध्ये जन्मलेल्या मर्ह डिबो हिच्याशी विवाह केला. दोघांच्या वैवाहिक जीवनात उंचीमुळे काही समस्या उद्भवली नसली तरी त्यांच्यासाठी भाषा मात्र अडचणीची ठरली आहे. तो तुर्की भाषा बोलतो तर पत्नीला केवळ अरबी भाषाच बोलता येते! असे असले तरी त्याच्या उंचीने त्याला जगात ओळख निर्माण करून दिली आहे हेही नसे थोडके!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday 28 April 2021

माऊंटेन मॅन सोहन सिंह


माणसं झपाटलेली असतात म्हणजे काय असतात, याचं उदाहरण द्यायचं झालं तर राजस्थानमधल्या सोहन सिंह या साठ वर्षीय इसमाचं देता येईल. त्याच्या गावातील जनावरांना पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी डोंगराला वळसा घालून जावं लागायचं किंवा मोठ्या चढणीचा डोंगर चढून जावं लागायचं. यासाठी बरीच पायपीट करावी लागायची. मोठा त्रास सहन करावा लागायचा. सोहन सिंह यांनी चक्क तो डोंगर पोखरून काढला आणि तिथून जनावरांना जायला रस्ता तयार केला. यासाठी सोहन सिंह यांना तब्बल दहा वर्षे लागली. पण त्यांनी हे काम झपाटल्यागत करून गावाला एक आदर्श घालून दिला. त्यांना सुरुवातीला वेड्यात काढणारे लोकच आता त्यांचे कौतुक करत आहेत.

आपल्याला डोंगर फोडून गावाला शहराशी जोडणारा जवळचा रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझी यांच्याविषयी ठावूक आहेच. आपल्या देशात अशी अनेक माणसं आहेत की, जी स्वतः मेहनत घेऊन दुसऱ्यांसाठी सुविधा निर्माण करतात. राजस्थानमधील आडीकांकर नावाच्या गावातील सोहन सिंह या व्यक्तीनं अशीच मेहनत घेतली. त्यांनी जनावरांना तळ्याकडे जाऊन पाणी पिण्यासाठी डोंगर फोडून रस्ता बनवला आहे. त्यासाठी त्यांनी दहा वर्षे सातत्याने मेहनत केली. रस्ता बनवण्यासाठी त्यांनी छन्नी-हातोडी आणि फावड्यासारख्या अवजारांचा उपयोग केला. दहा वर्षांपूर्वी त्यांनी असा रस्ता बनवण्याचा संकल्प केला होता. गावातील जनावरांसाठी डोंगरापलीकडे असणारे  तळेच मुख्य जलस्रोत होते. तिथे जाण्यासाठी डोंगरातील चढणीची, काट्याकुट्यांची आणि खडकाळ वाट पार करावी लागत असे. जनावरांचे त्यासाठी होणारे हाल पाहून सोहन सिंह यांनी हा डोंगर फोडून चांगला रस्ता तयार करण्याचे ठरवले. यासाठी गावातील लोकांची मदत होईल, या आशेनं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, मात्र  गावातील लोकांनी त्यांना कोणतेच सहकार्य केले नाही. उलट त्यांचीच टर उडवली. त्यामुळे त्यांनी स्वतःच एक दृढ संकल्प करून मेहनत घेण्यास सुरुवात केली. आता त्यांनी हा रस्ता तयार केला असून या रस्त्यावरून गावातील जनावरे सहजपणे तळ्याकडे जाऊ शकतात. माता-पित्याच्या निधनानंतर सोहन सिंह एकटेच गावात राहत आहेत. आजही वयाच्या साठाव्या वर्षी ते एका झोपडीवजा घरात एकटेच जीवन कंठत आहेत. मात्र त्यांना आपण गावाच्या उपयोगाला आल्याचे समाधान आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


'हे' माहिती आहे का?


१) संस्कृत वर्णमालेत किती अक्षरं आहेत?

२) रिगॉन थुपटेन मनोविज्ञान मठ कुठे आहे?

३) साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांच्या लेखकांना दिला जातो?

४) भारतात कोणत्या गायकाचं गाणं सर्वप्रथम रेकॉर्ड झालं?

५) ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रथम विजेता कोण?

उत्तर : १) ५४ २) ओरिसा ३) २४ ४) गौहर जान ५) जी शंकर कुरुप


• तीन गाजरं आपल्याला तीन मैल जाण्यासाठीची पुरेशी ऊर्जा देतात.

• केळामध्ये ७५ टक्के पाणी असते.

• सर्वात मोठे पेंग्विन उणे ७० अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानातही जगू शकतात. तसेच ते पाण्यात ५५० मीटर खोलपर्यंत सूर मारू शकतात. ते वीस मिनिटे आपला श्वास रोखू शकतात.

• अन्य सस्तन प्राण्यांप्रमाणे हत्तींना घाम येत नाही.

• माणसाचे डोळे एका मिनिटात सतरा वेळा, एका दिवसात १४ हजार २८० आणि एका वर्षात ५२ लाख वेळा उघडझाप करतात.

• मानवी डोळा तब्बल ५७६ मेगापिक्सेल क्षमतेचा असतो. आपल्या डोळ्यांना लक्ष केंद्रीत करण्यासाठी केवळ २ मिलीसेकंद इतका काळ लागतो.

• अमेरिकेतील जॉन ब्रोव्हर मिनाँच हे आजपर्यंतचे सर्वाधिक लठ्ठ व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांचे वजन होते ६३५ किलो!


हुंडाबंदी असलेलं गाव


आपल्या देशात अनेक प्रथा-परंपरा आहेत. काही रूढीवादी आहेत तर काही पुरोगामी. काही श्रद्धा जोपासतात तर काही अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. काही परंपरा स्त्रियांवर बंधने घालतात तर काही स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक महत्त्व देऊन त्यांची काळजी घेतात. असंच एक मुलींना सन्मान देणारं गाव आहे ते म्हणजे वायील. श्रीनगरच्या गंदरबल जिल्हयात निसर्गाच्या कुशीत विसावलं  हे गाव आहे. या गावाला 'बडा घर' असेही म्हटलं जातं. याला कारणही तसंच आहे. श्रीनगरमधीलच नव्हे तर अख्ख्या देशातलं हे असं एकमात्र गाव आहे, जिथे लग्नात सोनं-नाणं किंवा हुंडा म्हणून काहीही द्यायला आणि घ्यायला पूर्ण बंदी आहे. विशेष म्हणजे या गावात मुलीच्या कुटुंबियांना लग्नात एक पैसाही खर्च करावा लागत नाही. जर एखाद्या वरपक्षांकडून हुंडा मागितला गेलाच तर मुलाकडच्या मंडळीवर सामुहिक सामाजिक बहिष्कार टाकला जातो. कुठलाही संबंध किंवा व्यवहार या घरासोबत केला जात नाही. इतकंच नव्हे तर हुंडा मागणाऱ्या वर पक्षाच्या घरी कुणी मयत झालं तरी त्याच्या अंत्यविधीलाही कुणी जात नाही.'बड़ा घर' गावातील या कडक नियमामुळे तिथल्या लोकजीवनावर चांगला परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. मागील ३० वर्षात गावात घरगुती हिंसा किंवा हुंड्यासंबंधी एकही घटना घडलेली नाही. वधू पित्याला लग्नात काहीच खर्च येत नसल्यामुळे गावात योग्य वयात मुलींची लग्नं पार पडत आहेत. गावात बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंब आहेत. ते अकोट शाली विकून किंवा शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, तर काही जण सरकारी अणि खासगी कंपनीत नोकरीला आहेत. 'बडा घर' गावात लग्न करून आपल्या मुलींना पाठवायला लोक तयार असतात.म्हणून या गावात मुलींना ओझं समजलं जात नाही. तसंच कुणावर हुंडा देण्यासाठी दबाव येऊ नये म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक मंडळी लक्ष ठेवून असतात. मुलींचा सन्मान करणाऱ्या अशा गावांची संख्या आपल्या देशात वाढली तर मुलीच्या बापाला आत्महत्या करावी लागणार नाही. मुलीच्या लग्नात हुंडा द्यायला असमर्थ ठरलेल्या मुलीच्या बापाने आत्महत्या केल्याच्या घटना आपल्या देशात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday 24 April 2021

'स्पेस एक्स' अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी कंपनी


स्पेस एक्स ही टेस्लासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इलॉन मस्क यांची कंपनी आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आतापर्यंत पुन्हा वापरण्याजोगी म्हणजेच रियुजेबल रॉकेट लाँच सिस्टीम तयार केलेली आहे, अंतराळात कार पाठवलीय, उपग्रह त्यांच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पाठवले आहेत. आता या कंपनीने 'नासा'सोबत भागीदारी केलीय ती अंतराळवीरांना पाठवण्यासाठी. म्हणजेच अंतराळात आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये माणसं पाठवणारी ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे. अमेरिकेने त्यांच्याकडची स्पेस शटल्स वापरणं 2011 मध्ये बंद केलं. त्यानंतर अमेरिकन अंतराळवीरांना घेऊन जायचं काम स्पेसएक्स कंपनी करत आहे. कंपनीने अशा अनेक मोहिमा राबवल्या आहेत. अमेरिकेच्या 'नासा'ने बोईंग कंपनीशीदेखील अंतराळवीरांना स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यासाठी अशाच प्रकारचा करार केलेला आहे.

कंपनीने अंतराळवीरांच्या स्पेससूटचं खास डिझाइन केलं आहे. आतापर्यंतच्या अंतराळवीराच्या स्पेस सूट्पेक्षा हे सूट्स वेगळे होते. या सूटना 'स्टारमन सूट्स' म्हटलं जातंय. आतापर्यंतच्या बोजड सूट्सपेक्षा हे स्पेससूट सुटसुटीत होते. यातली हेल्मेट्स 3D प्रिंट करण्यात आली असून ग्लोव्हज टचस्क्रीन सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजेच हे ग्लोव्ह्ज घालूनही अंतराळवीर टचस्क्रीन वापरू शकतील. पण आतापर्यंतच्या स्पेस सूट्सप्रमाणेच याही सूट्सचा उद्देश तोच आहे - क्रू मेंबर्सना कमी दबावापासून वाचवणं. यामध्ये कॅपस्युलमधला हवेचा दाब कमी होतो. याशिवाय अंतराळवीरांना पुरेसा ऑक्सिजन मिळत राहील आणि त्यांच्या शरीराचं तापमान कायम राहील याचीही काळजी हे स्पेस सूट्स घेतात. या स्पेससूट्सना एका 'नाळेने' जोडलं जातं ज्यातून त्यांना संपर्कासाठीच्या लिंक्स आणि श्वसनासाठीचे वायू पुरवले जातात. आणि ही केबल वा नाळ त्यांच्या सीटला जोडलेली असते.

कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर आणि बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस यासारख्या चित्रपटांचं काम करणारे हॉलिवुडचे कॉस्च्युम डिझायनर होजे फर्नांडिस यांनी हे स्पेस सूट्स डिझाईन केले आहेत. हे सूट्स स्पेस एक्सच्या कॅप्स्यूलमध्ये - म्हणजेच क्रू ड्रॅगनमध्ये वापरता येतील. स्पेसवॉक्ससाठी म्हणजेच स्पेस स्टेशनच्या बाहेर पडून काम करण्यासाठी हे सूट्स वापरता येणार नाहीत.

क्रू ड्रॅगन काय आहे?

या अंतराळवीरांना ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे घेऊन जाणाऱ्या अंतराळयानाला (Spacecraft) क्रू ड्रॅगन म्हटलं जातंय. ISS कडे सामान घेऊन जाणाऱ्या ड्रॅगन या अंतराळयानाची ही सुधारित आवृत्ती आहे. जास्तीत जास्त 7 प्रवासी घेऊन जाण्याची या क्रू ड्रॅगनची रचना आहे. पण 'नासा' यामधून जास्तीत जास्त 4 प्रवासी नेईल आणि इतर जागा सामानासाठी वापरली जाईल. या क्रू ड्रॅगनमध्ये असलेल्या Thrusters च्या मदतीने या अंतराळयानाची दिशा ठरवता येईल आणि हे यान स्पेस स्टेशनला जोडता येईल वा तिथून काढता येतील. शिवाय आतापर्यंतच्या यानांपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे या यानामध्ये आतापर्यंतच्या बटणांच्या ऐवजी सगळे कन्ट्रोल्स टचस्क्रीनवर असणार आहेत.


चतुरस्र अभिनेता राजा परांजपे


मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत राजा परांजपे यांनी भव्य कामगिरी केली आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या  सुवर्णकाळाबद्दल बोलायचं, तर तो वासंतिक बहराचाच काळ होता. निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा तिहेरी व्यक्तित्वाने राजाभाऊ हे गदिमांच्या भाषेत 'भारलेले  झाड' होते. चित्रपटाची निर्मिती करताना त्याच्या संहितेचा गाभा  कौटुंबिक राहील, त्यात समाजभानही असेल, याची ते काळजी  घेत. त्यांच्या 'ऊन पाऊस', 'लाखाची गोष्ट' अथवा 'पेडगावचे  शहाणे' या चित्रपटांतून तुमच्या-आमच्या घरातीलच गोष्ट चालू  आहे, असंच सतत जाणवत राहतं. 'ऊन पाऊस' तसेच 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटांचे कथानक इतके जबरदस्त होते की, पुढे 'ऊन पाऊस'वरून  'बागबान' आणि 'तू तिथे मी', तसेच 'जगाच्या पाठीवर'वरून  काही अंशी 'सदमा' या चित्रपटांच्या निर्मात्यांना, राजाभाऊंच्या चित्रपटांच्या कथांची प्रेरणा घेण्याचा मोह आवरला नाही.  'पाठलाग' हा सिनेमा राज खोसला यांना इतका आवडला की  त्यांनी त्याच्या आधारे हिंदीमध्ये 'मेरा साया' हा चित्रपट बेतला.  'जगाच्या पाठीवर', 'हा माझा मार्ग एकला' सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका परिणामकारक ठरल्या. 'जगाच्या  पाठीवर'मधील सज्जन, पापभीरू आणि जगात चांगुलपणाच  आहे यावर विश्वास ठेवणाऱ्या विनायकाची भूमिका आजही रसिकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटाच्या शेवटी कोर्ट सीनमध्ये विनायक हा गुन्हेगार म्हणून उभा असतो, तो सीन  तर राजाभाऊंच्या कसदार अभिनयाची उंची गाठणारा आहे. चित्रपटाचे कथानक गंभीर असो किंवा विनोदी, राजाभाऊंच्या  अभिनयाला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. त्यांच्या चित्रपटातील गीते ही बहुतांशी वेळा गदिमांची, तर संगीत बाबूजींचे असे.  या त्रिमूनि मराठी चित्रसृष्टीला वैभवाचे, मानाचे स्थान बहाल  केले. 'जिवाचा सखा' हा चित्रपट या त्रयींचा पहिला चित्रपट होता. राजाभाऊंना संगीताचे उपजतच अंग होते. १९४८ ते  १९७० या काळात ते मराठी चित्रपटाचे अनभिषिक्त सम्राट होते. ते उत्तम पेटीवादन करीत, उत्तम कॅरम खेळत. 'लपंडाव'  या नाटकात बदलीच्या भूमिकेसाठी राजाभाऊंच्या चेहऱ्याला अचूक दिग्दर्शन जो रंग लागला, तो शेवटपर्यंत. 'सावकारी पाश'मध्ये त्यांची नायकाच्या मित्राची भूमिका खूप गाजली. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांना राजाभाऊंनी गुरू मानले होते. पुढे भालजींनी त्यांना 'थोरातांची कमळा', 'सूनबाई' अशा चित्रपटांत भूमिका दिल्या. भालजींच्या दिग्दर्शन कौशल्याने राजाभाऊ भारावून गेले व त्यांनी भालजींचा गुरुमंत्र घेतला. 'बलिदान' हा राजाभाऊंनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्याची सिनेरसिकांनी फारशी दखल घेतली नाही. मात्र दिग्दर्शक म्हणून राजाभाऊंचे नाव पुढे आले. राजाभाऊंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्यातील विद्यार्थी कायम जागा ठेवला.

चित्रपटांची उत्तम केमिस्ट्री -राजाभाऊंच्या चित्रपटांमध्ये प्रसंगोचित गाणी तसेच आशयघन शब्द, भावपूर्ण संवाद, सुरेल गीते, आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तम अभिनेत्यांची मांदियाळी असे यशस्वितेचे गमक असे. दिग्दर्शन करताना त्यातील कथेचा गाभा, हळुवारपणा जपणे हे राजाभाऊंचे खास वैशिष्ट्य. 'हा माझा मार्ग एकला' या चित्रपटाला राष्ट्रपती पदक व महाराष्ट्र शासनातर्फे नऊ पुरस्कार मिळाले. 'पाठलाग' हा रहस्यमय मराठी चित्रपट त्यांनी काढला, त्यासाठीही राजाभाऊंना राष्ट्रपती पदक मिळाले. मानवी मनाची अस्वस्थता असा अत्यंत गहन विषय 'पडछाया' चित्रपटाच्या कथानकाचा अविभाज्य भाग होता. 'लाखाची गोष्ट' या चित्रपटातील प्रियकराची अवखळ भूमिका, 'संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटातील निराश झालेल्या सरकारी नोकरीतील इंजिनिअरची भूमिका राजाभाऊंनी अत्यंत यशस्वी केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील 'बंदिनी', 'चाचा चौधरी' यांमधील भूमिकांचे राजाभाऊंनी सोने केले. कसदार निर्मिती, संवेदनशील दिग्दर्शन आणि चतुरस्र अभिनयामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचा सुवर्णकाळ दीपस्तंभासारखाच आहे.


पत्त्यावर ग्लास अधांतरी

इफेक्ट: : जादूगार पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढतो. प्रेक्षकांना दोन्ही बाजूंनी दाखवतो, नंतर पाण्याने भरलेला ग्लास किंवा सॉफ्ट ड्रिंक कॅन त्या पत्त्यांकडे वर उभा करण्याचा प्रयत्न करतो आणि काय आश्चर्य पत्त्याच्या कडेवर तो ग्लास किंवा कॅन अॅव्हिटीचे नियम मोडून न पडता तसाच राहतो.

साहित्य : यासाठी पत्त्याचा कॅट, कात्री, सेलो टेप, ग्लास किंवा सॉफ्ट ड्रिंक भरलेला कॅन इतक्याच गोष्टी आवश्यक, तबारी : प्रथम कॅटमधील कुठलेही दोन पत्ते घ्या. त्यातील एक पत्ता चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीने मधोमध उभा कापा. त्यातील अर्धा भाग घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे सेलो टेपने पूर्ण पत्त्याच्या मागील बाजूस असा चिकटवा, की दिसताना तो एकच पत्ता दिसला पाहिजे. त्यामुळे आपल्या माठाच्या खाली जसा ट्रायपॉड स्टैंड असतो, तसा या पत्त्याचा चिकटवलेला भाग उघडल्यावर ट्रायपॉड स्टैंड दिसेल हेच याचे गुपित.

कृती : आपण बनविलेला स्पेशल पत्ता कॅटच्या तळाशी ठेवावा. कॅट हातात घेऊन वरच्या वर पिसून स्पेशल पत्ता काढून दोन्ही बाजूंनी प्रेक्षकांना दाखवा. पत्त्याचा मागचा भाग उघडणार नाही याची काळजी घ्यावी. मग पत्ता उभा करून त्यावर पाण्याने भरलेला ग्लास किंवा सॉफ्ट ड्रिंकने भरलेला कॅन घेऊन पत्त्याच्या वरच्या कडेवर उभा करण्याचा प्रयत्न करतोय असा अभिनय करावा. याच वेळेस करंगळीने हळूच चिकटवलेला भाग उघडून त्यावर बरोबर ग्लास/ कॅन मध्यभागी ठेवावा व हात काढून अधांतरी झालेला दाखवावा. परत डाव्या हाताने ग्लास/ कॅन उचलताना उजव्या हाताने पत्त्याचा मागची बाजू बंद करून झटकन पत्ता उचलून घ्यावा.

टीप : हा प्रयोग सादर करताना टेबलवर लोकांना समोर बसवून करावा. मागे किंवा साईड ला लोक उभी राहिली तर जादूचे गुपित त्यांना कळेल म्हणून विशेष काळजी घ्यावी. तसेच पत्ता आणि त्याचा स्पेशल भाग झटकन उघडणे, बंद करणे आणि ग्लास कॅन बॅलन्स करणे याचा भरपूर सराव आवश्यक.


Friday 23 April 2021

आठ फूट उंचीची सायकल


माणसाला बऱ्याच भन्नाट कल्पना सुचत असतात. मात्र त्या साकार करण्यात जो यशस्वी होतो, त्याचे कौतुक होते. हेच बघा ना! एका मुलाची त्याच्या वर्गातल्या मुलांपेक्षा उंची अधिक होती. मग त्याला सायकल चालवताना अडचण येऊ लागली. त्याने सायकलची सीट उंच करून आपली सोय करून घेतली. पण त्याची पुढे आणखी उंच वाढत चालल्याने त्याची आणखी अडचण झाली. त्याने विचार केला आणि त्याच्या सायकलची उंचीही वाढवण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याने अशी सायकल बनवली की, ती देशातील सर्वात उंच सायकल ठरली. 

या मुलांचं नाव आहे,राजीव कुमार. तो चंदीगडमध्ये राहतो. देशातील सर्वात उंच फोल्डेबल सायकल म्हणून त्याच्या सायकलीची लिम्का बुकमध्येदेखील नोंद झाली आहे. साहजिकच राजीव कुमार आपल्या या अनोख्या सायकलीमुळे चंदिगडमध्ये लोकप्रिय आहेत. रस्त्यावर जेव्हा सायकल घेऊन फिरतो तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्या सायकल भोवती खिळलेल्या असतात. राजीव जेव्हा दहावीत होता, तेव्हा वर्गात त्यांची उंची सर्वाधिक होती. सायकल चालवायला सोयीस्कर व्हावे म्हणून त्याने पहिल्यांदा आपल्या सायकलची सीट थोडी उंच केली. त्यामुळे सायकल चालवताना त्यांना मजा येऊ लागली. त्यानंतर त्यांची उंची जसजशी वाढत गेली तसतशी त्याच्या सायकलची उंचीही वाढली. 2013 मध्ये त्याने मग स्वतः च त्याच्यासाठी सायकल बनवली. ही सायकल चालवण्याची विशिष्ट पद्धत असून कुणालाही ती जमत नाही. यआ सायकलची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे,त्यामुळे त्याला आणखीनच हुरूप आला असून त्याला लांबचा प्रवास करून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपले नाव कोरायचे आहे, यासाठी तो खास मेहनत घेत आहे. त्याची भविष्यात चंदिगडहून मुंबईला जाण्याची  योजना आहे. हा प्रवास पूर्ण केला तर सर्वात उंच सायकलवरून सर्वात लांब अंतराचा प्रवास करण्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावावर नोंदवला जाऊ शकतो,याची त्याला आशा आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

हे माहिती आहे का?


मानवासह अनेक जीवांचे निवासस्थान असलेल्या पृथ्वीविषयीची ही रंजक माहिती...

● पृथ्वी दहा नोनिलियन विषाणूंचे घर आहे. ही इतकी मोठी संख्या आहे की ती लिहिण्यासाठी दहानंतर ३१ वेळा शून्य लिहावे लागतात. हे विषाणू इतके आहेत की ब्रह्मांडातील प्रत्येक ताऱ्याला दहा-दहा कोटी विषाणू देता येतील!

● एक चमचाभर मातीत संपूर्ण आफ्रिका खंडात राहणाऱ्या माणसांपेक्षा अधिक म्हणजेच एक अब्जापेक्षा अधिक सूक्ष्म जीव असतात. त्यामध्ये जीवाणू, विषाणू, कवक आणि प्रोटिस्ट असतात.

● पृथ्वी म्हणजे लोखंड, ऑक्सिजन आणि सिलिकॉनचे मिश्रण आहे. पृथ्वीमध्ये लोखंडाचे ३२.१ टक्के, ऑक्सिजनचे ३०.१ टक्के आणि सिलिकॉनचे १५.१ टक्के प्रमाण असते.

● पृथ्वीचा सात टक्के भाग सदाहरित वर्षावनांनी आच्छादीत आहे. सर्वात मोठे वर्षावन आहे अॅमेझॉन. हे जंगल दरवर्षी २.२ अब्ज टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. वर्षावने जगातील वीस टक्के ऑक्सिजन निर्माण करतात.

● पृथ्वी आपल्या अक्षाभोवती अचूक चोवीस तासांमध्ये फिरत नाही. ती २३ तास,५६ मिनिटे आणि ४ सेकंद फिरते. सूर्यसुद्धा अन्य ताऱ्यांच्या तुलनेत रोज १ अंशाने सरकतो. तो जोडला तर पृथ्वीचा एक दिवस चोवीस तासांचाच दिसतो.

● पृथ्वीच्या पोटात सूर्यापेक्षा अधिक उष्णता आहे. पृथ्वीच्या आतील कोअरचे तापमान ६ हजार अंश सेल्सिअस आहे. ते सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही अधिक आहे. पृथ्वीचा हा इनर कोअर ९८ टक्के लोखंडाचा आहे.

● माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. ते समुद्रसपाटीपासून ८,८४८ मीटर उंच आहे. समुद्रतळापासून जर उंची मोजायची असेल तर हवाई बेटाचा मऊना कीया हे सर्वात उंच पर्वतशिखर ठरते. त्याची एकूण उंची सुमारे ९,३३० मीटर आहे. त्याचा ५,१५२.४ मीटरचा भाग समुद्राच्या आत आहे.

● पृथ्वीची सर्वात लांब पर्वतराजी दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वताची आहे. ती सुमारे ७ हजार किलोमीटर लांबीची आहे. मात्र, त्यापेक्षाही लांब पर्वतराजी समुद्राच्या खाली आहे. ही 'मिड ओशन रेंज'६५ हजार किलोमीटर लांबीची आहे. ती मध्य अटलांटिकपासून हिंद महासागर व प्रशांत महासागरापर्यंत जाते.

● पृथ्वीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप ९.५ तीव्रतेचा होताव तो चिलीमध्ये १९६० साली नोंदवला गेला. सैद्धांतिक रूपाने दहापेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप येण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून मोठी फाल्टलाईन असणे गरजेचे आहे जे अशक्य असते! (संकलन- अनिकेत फिचर्स)

मेडिकल ऑक्सिजन कसे बनते?


सध्याच्या कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. हा प्राणवायू किती महत्त्वाचा आहे हे आता प्रकर्षान माणसाला कळत आहे. हवा आणि हॉस्पिटलमध्ये वापरला जाणारा ऑक्सिजन यामध्ये फरक असतो. मेडिकल ऑक्सिजनमध्ये ९८ टक्के शुद्ध ऑक्सिजन असतो. त्यामध्ये आर्द्रता, धूळ किंवा अन्य वायूंची भेसळ नसते. २०१५ मध्ये देशाच्या अतिआवश्यक औषधांच्या व सामग्रीच्या सूचीत ऑक्सिजनचा समावेश करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही गरजेच्या वैद्यकीय सामग्रीत ऑक्सिजनचा समावेश केलेला आहे.

वातावरणातील हवेत केवळ २१ टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीत हवेचा वापर कुचकामी ठरतो. त्यासाठी मोठ्या प्रकल्पांमध्ये द्रवरूप शुद्ध ऑक्सिजन तयार करून तो वापरला जातो. मेडिकल ऑक्सिजन तयार करण्यासाठी आधी वातावरणातून ऑक्सिजन वेगळा केला जातो. हवेत ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन आणि एक टक्का भाग हेलियम, नियॉन, क्रिप्टॉन, झेनॉनसारख्या वायूंचा असतो. हवेला अतिशय थंड करून ऑक्सिजन वेगळा काढला जातो. हवेला थंड केल्यावर सर्ववायू एका क्रमाने द्रवरूपात येतात. त्यांना वेगवेगळे करून द्रवरूपातच जमा केले जाते.

अशा प्रकारे ९९.५ टक्क्यांपर्यंत लिक्विड ऑक्सिजन तयार केला जातो. प्रक्रियेच्या आधी हवेला थंड करून तिच्यामधील आर्द्रता आणि फिल्टरच्या माध्यमातून धूळ, तेल व अन्य अशुद्ध घटक बाजूला काढले जातात. उत्पादक असा लिक्विड ऑक्सिजन मोठ्या टँकर्समध्ये स्टोअर करतात. त्यानंतर अतिशय थंड तापमानाच्या क्रायोजेनिक टँकरमधून पुरवठादारांकडे पाठवतात. ऑक्सिजनचा दाब कमी करून त्याला वायूच्या रूपात अनेक प्रकारच्या सिलिंडरमध्ये भरतात. हे सिलिंडर हॉस्पिटलमध्ये पाठवले जातात. काही हॉस्पिटलमध्ये छोटे छोटे ऑक्सिजन जनरेशन प्लांटही असतात.


Thursday 22 April 2021

मंगळावरील हेलिकॉप्टर उड्डाणामागे डॉ. बलराम


अलिकडे भारतीय वंशाच्या मंडळींनी जगभरात मोठा डंका वाजवायला सुरुवात केली आहे. परदेशातील राजकारण असो की संशोधन सगळ्याच क्षेत्रात भारतीय वंशाचे लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे साहजिकच भारतीयांनादेखील त्याचा अभिमान वाटत आहे. आता यात आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे, ती म्हणजे डॉ.जे बॉब बलराम यांची. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने नुकतेच मंगळ ग्रहावर इंज्युनिटी हेलिकॉप्टर उडवण्यात यश मिळवले आहे. यात डॉ.बलराम यांचा सिंहाचा वाटा आहे. 

' नासा' ने सुमारे सात महिन्यांपूर्वी पर्सिवियरेंस रोव्हर मंगळावर पाठवला होता. तो 19 फेब्रुवारी 2021 रोजी यशस्वीरीत्या उतरला होता. अब्जो वर्षांपूर्वी मंगळावर असलेल्या सूक्ष्मजीवांच्या खुणांच्या शक्यतेचाही अभ्यास करणार आहे. यासाठी यानाने जवळपास अर्धे अब्ज किलोमीटर अंतर पार केले आहे. यासोबत छोटेखानी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आला होता.  

पृथ्वीशिवाय अन्य ग्रहावर उड्डाण करणारे हे पहिलेच छोटे हेलिकॉप्टर ठरले.  हे हेलिकॉप्टर आधीपेक्षा चांगल्या स्थितीत असून त्याने आपल्या सोलर पॅनेल्सवर साठलेली धूळही झटकली आहे. त्यामुळे त्याला आधीपेक्षा जास्त सौरऊर्जेचे उत्पादन करता येत आहे.   या इतिहास रचणाऱ्या हेलिकॉप्टरच्या निर्मितीमागे एका भारतीय माणसाचा मेंदू आहे. भारतातच आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या जे. बॉब बलराम या भारतीय वंशाच्या संशोधकाने या हेलिकॉप्टरचे डिझाईन बनवलेले आहे. मूळचे दक्षिण भारतातील बलराम 'नासा' च्या जेट प्रोपलशन प्रयोग शाळेत काम करतात. त्यांनीच इंजिन्यूटी हेलिकॉप्टर बनवले असून ते या मार्स हेलिकॉप्टर मोहिमेचे मुख्य अभियंताही आहेत. ते जेपीएलमध्ये 35 वर्षांपासून रोबोटिक्स टेक्नॉलॉजिस्ट आहेत. १९६० च्या दशकात दक्षिण भारतात बलराम यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अंतराळ संशोधन आणि रॉकेट्रीमध्ये रस होता. त्यांनी जे. कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या ऋषी व्हॅली शाळेत शिक्षण घेतले. नंतर  त्यांनी आयआयटीतून (मद्रास) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. न्यूयॉर्कच्या रेनसिलर पॉलिटेक्निक इंसिट्यूटमधून कॉम्प्युटर अँड सिस्टम इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली.

हेलिकॉप्टरचे उड्डाण यशस्वी झाल्यावर डॉ.बलराम म्हणाले, मंगळाच्या वायूमंडळात कोणतीही वस्तू उतरवणे आणि उडवणे फार कठीण आहे. कारण तेथील वायूमंडळ पृथ्वीवर आहे तसे जड नाही. खूपच हलके आहे. त्यामुळे नासाकडून मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर उडवणे हे राइट ब्रदर्स यांच्या विमानाच्या पहिल्या उड्डाणासारखेच आहे. राइट बंधूंनी विमान तर फक्त 12 सेकंद उडवले होते. पृथ्वीवरून नियंत्रित करण्यात आलेले हे हेलिकॉप्टर मात्र मंगळावर 30 सेकंद उडाले होते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Sunday 18 April 2021

मानवी जीवन समृद्ध करणारी नर्मदा


ऋषीचे कूळ आणि आणि नदीचे मूळ शोधू नये,असे म्हणण्याची प्रथा असली तरी प्रत्येक नदीच्या उगमाबाबत उत्सुकता असतेच. नर्मदेचे उगमस्थान सुमारे 3 हजार 500 फुटांवर, अमरकंटक पर्वतावर आहे. त्या ठिकाणी नर्मदामातेच्या मंदिराव्यतिरिक्त अनेक तीर्थस्थाने आहेत. नर्मदेच्या उत्पत्तीविषयी एक पौराणिक कथा सांगण्यात येते. अमर कंटक नावाच्या राजाने आपली कन्या नर्मदा उपवर झाल्यावर तिचा विवाह शोण नामक राजाबरोबर ठरविला. परंतु या शुभ मंगलापूर्वीच अमर कंटाकाने मृत्यूशय्या धरली. त्यावेळेस त्याने नर्मदेस वारसदार नेमले व तो निधन पावला. पितृदुःखाचा काळ ओसरल्यावर तिने शोण राजाकडे आपल्या एका रूपवान दासीमार्फत श्रमाचे प्रतीक पाठवले. शोण राजाने गैरसमजामुळे त्या दासीलाच नर्मदा समजून तिच्याशी नियोजित वधुसमान वर्तन केले.ही गोष्ट नर्मदेला समजताच ती क्रोधायमान झाली व विरक्तीचा मार्ग स्वीकारून नदीरूपात प्रवाहित झाली.

यामागील श्रद्धेचा किंवा दंतकथेचा भाग सोडला तरी अमर कंटक या स्थानी उगम पावलेली नर्मदा सुरुवातीला सौम्य स्वरूपात वाहून नंतर 'कपिलधारा' या प्रपातरूपाने मोठ्या कड्यावरून झेपावते. या ठिकाणचा निसर्ग अत्यंत समृद्ध असून इतरही अनेक देवदेवतांची मंदिरे येथे आहेत. येथून तिचा प्रवास 'रेवा' संस्थानामधून पुढे मंडला टेकड्यांच्या कडेकपारीतून रामनगरपर्यंत अखंड सुरू होतो. त्यानंतर ती जबलपूरजवळ प्रवेश करते. जबलपूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'भेडाघाट' या स्थानी येते. आतापर्यंत उगमापासूनचा प्रवास करीत आलेल्या नर्मदेचा प्रवाह भेडाघाटाहून एक किलोमीटर अंतरावर प्रचंड जलौघाच्या रूपात खालच्या डोहात झेपावतो. त्याला तसेच समर्पक नाव दिले गेले आहे- 'धुवांधार'. त्या प्रचंड प्रपातसमोर उभे राहिल्यावर निसर्गासमोर मानव किती क्षुद्र आहे, याची अनुभूती येते. धुवांधारचा घनगंभीर नाद, त्याचे फेसाळणारे पाणी आणि आपल्यावर होणारे तुषारसिंचन यांनी आपण भारावून जातो. हा रौद्ररूपी जलावतार पुढे चौसष्ट योगिनी मंदिरातील मूर्तीला जणू चरणस्पर्श करीत भेडाघाट येथे अतिशय संथ होतो. या प्रवाहाला शोभा आणतात-दोन्ही तीरांवरील संगमरवरी पाषाण. त्यांचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर त्यातून नौकाविहाराची सोय आहे.

'ताजमहाल' हे संगमरवरातून  निर्माण केलेले शुभ्र रंगाचे प्रतीक मनात ठरलेले असते,परंतु येथे तर निसर्गनिर्मित संगमरवराचे अनेक आकार, विविध रंगछटा, त्यांची प्रवाहातील मोहक प्रतिबिंबे पाहून पर्यटक त्या भावविश्वात रमून जातात. संगमरवरातून वाहणारा नर्मदेचा प्रवाह पुढे सातपुडा व विंध्य पर्वतराजींमधील सपाटी पार करीत वाटेतील होशंगाबाद जिल्ह्याला भेट देऊन अहिल्यादेवी होळकरांच्या महेश्वर येथे येतो. या ठिकाणी राजवाड्याला शोभिवंत करणारे तिच्या काठावरचे प्रशस्त घाट आपल्या प्राचीन वैभवाची , वास्तुकलेची साक्ष देत उभे असलेले आजही दिसतात. अत्यंत साध्या राहाणीची ही साध्वी परंतु अनेक देवस्थानांच्या जिर्णोद्धारांत तिने मदत केली आहे. यापुढे नर्मदा ओम्कारेश्वरी शिवाला जलाभिषेक घालून पुढे गुजरातकडे रवाना होते. नर्मदेवरील सरदार नर्मदा प्रकल्प आणि अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या पुतळ्याच्या दुप्पट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पर्यटकांना खुणावतो आहे. 'गरुडेश्वर' येथे वासुदेवानंद सरस्वतीच्या सुंदर स्थानाला चरणस्पर्श करीत 'भडोच' या श्रेत्री ती सिंधू सागराला समर्पित होते. जिथे जाईल तिथे नर्मदा मानवी जीवन समृद्ध करते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली  

Friday 16 April 2021

खेड्याचा परिपूर्ण विकास साधणारी संस्था-बीसीटी


डॉ.भागवतुला वेंकट परमेश्वरराव यांनी भागवतुला चॅरिटेबल ट्रस्ट (बिसीटी)च्या माध्यमातून आंध्र प्रदेशातील सुमारे 160 गावांमध्ये शिक्षण, कृषी,महिला सक्षमीकरण, अपंग पुनर्वसन आणि आरोग्य या पाच क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. त्यांचा हा व्याप थक्क करणारा आहे. त्यांच्या या कार्याला 'परमेश्वरी कार्य' म्हटले तरी वावगे ठरू नये. माणसाचं झपाटयानं कसं असावं,हे इथं येऊन पाहायला हवं. 

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील दिमिली हे डॉ.भागवतुला यांचे मूळ गाव. याच परिसरात ते शिकले ,लहानाचे मोठे झाले. आंध्र विद्यापीठाशी संलग्न अशा विशाखापट्टणमच्याच महाविद्यालयातून त्यांनी एम. एस्सी. ही पदवी संपादन केली. मुंबईच्या अणुशक्ती केंद्रात काही वर्षे वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून कामही केले. नोकरीच्या आवश्यकतेचा एक भाग म्हणून अमेरिकेतील पेन्सिलव्हानिया विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. अनुशास्त्रातील त्या डॉक्टरेटनंतर अणुशक्ती केंद्रातील त्यांचा संशोधनपर कार्यभार वाढणे स्वाभाविक होते. पण वयाची ठराविक वर्षे गाठल्यानंतर नोकरी सोडायची,गावी जायचे, सेवाभावी संस्था स्थापायचे आणि त्यामाध्यमातून योजलेल्या क्षेत्राचा आर्थिक,सामाजिक कायापालट घडवून आणायचा-हे डॉ.भागवतुला परमेश्वरराव यांनी फार पूर्वीच मनाशी ठरवून घेतले होते. 

1967 सालापासूनच डॉ.भागवतुला परमेश्वरराव यांचे या दिशेने प्रयत्न सुरू झाले होते. 1976 साली त्यांनी भागवतुला चॅरिटेबल ट्रस्टची रीतसर स्थापना केली आणि येल्लमचिली, अच्युतपुरम व रामबिली मंडलातील100 गावे हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून कामाला सुरुवात केली. शिक्षण, कृषी,महिला सक्षमीकरण, अपंग पुनर्वसन आणि आरोग्य या पाच क्षेत्रात काम करण्याचा निर्धार मनाशी केला.गेली 45 वर्षे हे काम ध्येयवादी वृत्तीने, त्यागी भावनेने त्यांनी चालवले. 

देशापुढची सर्वात मोठी समस्या गरिबीची, असे सर्रास मानले जाते आणि त्या गरिबीचा अर्थ ढोबळमानाने अन्न, वस्त्र, निवारा नसणे, असा घेतला जातो. मात्र परमेश्वरराव यांनी गरिबीचा विचार त्याहीपलीकडे जाऊन केला असावा असे दिसते. गरिबी एक प्रकारची नाही तर ती सात प्रकारांची आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आत्मिक गरिबी असे त्याचे प्रकार आहेत. या साऱ्यांचे निर्मलून असे लक्ष्य समोर 'बीसीटी'ने आपल्या कार्याची उभारणी केली आहे आणि खेड्यामध्येच दडलेल्या खऱ्या भारताच्या उन्नयनाचा ध्यास धरला आहे. 

'बीसीटी'च्या कामाची सुरुवात दिमिली गावात शाळा स्थापन करून झाली. गावात शाळा नाही आणि या पाच मैल परिसरात शिक्षणाची सुविधा नाही, हे लक्षात आल्या नंतर भागवतुला यांनी गावकऱ्यांना आवाहन करून जमीन मिळवली. त्यांच्याच सहकार्याने शाळा सुरू केली आणि ती शाळा जवळजवळ एक दशकभर सर्वोत्तम शाळा म्हणून गौरवली गेल्यानंतर भागवतुलांनी लक्ष केंद्रित केले ते तशा प्रकारची छोटी शिक्षण केंद्रे स्थापन करण्यावर. आजमितीस 160 खेडेगावांमध्ये 1100 अनौपचारिक शैक्षणिक केंद्रांमधून आणि नाविन्यपूर्ण तत्त्वावरील प्राथमिक शाळांमधून 'बीसीटी'चे काम सुरू आहे. या प्रकल्पाशी 32 हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत. शासनाने ठरवून दिलेले शैक्षणिक अभ्यासक्रम राबवणे तेवढ्यापुरते स्वतःला मर्यादित न करता स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याची जोड 'बीसीटी' ने दिली. अनेक गावांत निवासी शाळा चालवताना या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी स्वावलंबी बनेल, आपल्या पायावर उभा असेल याची काळजी घेतली जाते. 

परसबागा फुलवणे, लाकडी खेळणी बनवणे, चरख्यावर सूत काढून खादीचे वस्त्र बनवणे, बेकारी पदार्थांचे उत्पादन, पशुखाद्य आणि संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण  यासारख्या छोट्या छोट्या उद्योगांच्या प्रशिक्षणातून मुलांना स्वावलंबी बनवण्याला हातभार लावला जातो. याखेरीज नृत्य-गायनादी कलांबरोबरच संभाषण-संवाद-वक्तृत्व यातही कसे आपले विद्यार्थी नैपुण्य मिळवतील याकडेही लक्ष देण्यात आले आहे. भारत सरकारने जाहीर केलेले नवे शैक्षणिक धोरण इथे आधीपासूनच पाहायला मिळते.  सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या 50 एकर जमिनीवर शेती,  पशुसंवर्धन, फळबागा यासारखे प्रयोग राबवताना काजू, आंबा, नारळ, बांधकामासाठीचे लाकूड देणारे वृक्ष यांची लागवड 'बीसीटी'ने केली. इथल्या परिसराचा कायापालट करून टाकला.  पडीक जमिनीतून उत्पन्नाची जोड मिळवणे या  परिसरातील ग्रामीण लाभार्त्यांना सहज शक्य झाले. नंतर गोकिवाडीसह अनेक गावांत जमिनी घेऊन असेच यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. एका कृषी क्रांतीचा अनुभव येथील रहिवासी घेत आहेत. 

महिला हे परिवर्तनाचे मुख्य माध्यम मानले जाते. मुलांचे संगोपन आणि गृहस्थाश्रम एवढ्यापुरते मर्यादित असे तिचे जीवन राहू नये, ती आर्थिक सक्षमीकरणाची साधन बनावी यासाठी1980 साली ट्रस्टने 27 गावांमध्ये 3 हजार 700 महिलांच्या माध्यमातून महिला मंडळे सुरू केली. पापड उद्योग, विड्या वळणे, स्क्रीन प्रिंटिंग, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, खेळणीनिर्मिती यासारखे उद्योग त्यांना सुरू करून देण्यात आले. स्वयंसहायता गटातून त्यांचे बचतगट स्थापन झाले . आज दिडशेच्यावर गट कार्यरत आहेत. मानसिक व शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. त्या मुलांनी कुटुंबाचा भार ना बनता रोजगाराचा, अर्थनिर्मितीचा दुवा बनावे या हेतूने हे प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. अपंग मुलांना स्वयंरोजगारासाठी उपयुक्त अशा लघुउद्योगांचे प्रशिक्षण आणि आवश्यक भांडवल-कच्चा माल पुरवला जातो. मुलांना स्वच्छतेचे आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी1985 मध्ये 'ग्राम आरोग्यालयम ट्रस्ट' ची स्थापना 'बीसीटी'च्या माध्यमातून केली. प्रशिक्षित महिला  नियमितपणे गावोगावी भेटी देऊन आरोग्याचे महत्त्व पटवून देतात. ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालये चालवली जातात. समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य 'बीसीटी' करत आहे. डॉ. भागवतुला यांचे 10 जून 2019 मध्ये निधन झाले. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली




बोमकाई साडी


ओडिशा राज्यातल्या निसर्गात आणि  वस्त्र परंपरेत एक सुंदर वैविध्य आहे.  ओडिशाच्या- संबलपुरी, बोमकाई, टसर,  बेहमपुरी पट्टा, खन्दुआ पट्टा, कोटपाड, हबसपुरी,  पासापल्ली, डोंगरीया अशा अनेक हँडलूम साड्यांना  खास ओळख आहे. आज आपण यातील बोमकाई  साडीची ओळख करून घेऊ. ओडिशा राज्यातल्या,  गंजाम जिल्ह्यात 'बोमकाई' गावात ही साडी खूप  वर्षापासून विणली जात आली आहे. पन्नास-साठ  वर्षांपूर्वी बोमकाई गावातील 'भूलिया' समाजातील  काही विणकर सुबर्नपूर जिल्ह्यातील सोनपूर गावी येऊन  स्थायिक झाले आणि बोमकाई साडी विणू लागले.  तेव्हापासून बोमकाई साडी सोनपुरी नावानंही ओळखली  जाऊ लागली.

'बोमकाई' साडी जास्त करून सिल्कमध्ये विणली  जाते; पण त्या साड्यांवरचे सुंदर नक्षीकाम बघून कॉर्पोरेट जगताकडून कॉटन बोमकाई साड्यांची मागणी  वाढू लागली आहे. काँट्रास्ट काठ-पदर असलेल्या कॉटन  बोमकाई साड्या अतिशय सुंदर दिसतात. निसर्गातील  सुंदर रंगसंगती या साड्यांमध्ये परावर्तित झालेली दिसते. 

ओडिशातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते- विणकर रामकृष्ण  मेहेर यांनी बोमकाई साडीत आणि संबलपुरी साडीत  खूप सुंदर प्रयोग केले आहेत. त्यांनी कॉटन बोमकाई  साडीवर सिल्कच्या धाग्यानं केलेलं नक्षीकामही अप्रतिम  दिसतं. रुद्राक्ष बॉर्डर ही बोमकाई साडीची खासियत  म्हणावी लागेल. रुद्राक्ष डिझाईन म्हणजे रुद्राक्षासारखी  दिसणारी छोटी छोटी फुलं असतात. या साडीच्या  पदरावरची आणि बुद्ध्यांची नक्षी पूर्वी हातानं एक एक धागा शटलनं आडवा टाकून केली जात असे. कधी कधी  'जाला' पद्धतसुद्धा वापरली जायची. मात्र, या पद्धतीनं  काम करताना खूप वेळ जात असल्यामुळे आता 'डॉबी'  किंवा 'जकार्ड' पद्धतीनं हे नक्षीकाम केलं जातं. अगदी  छोट्या बुट्ट्यांसाठी 'डॉबी' आणि भरजरी पदारांसाठी  'जकार्ड' पद्धत वापरली जाते. 'जकार्ड'च्या प्रक्रियेत  ग्राफ पेपरवर आधी डिझाईन काढून घेतलं जातं, मग  त्या ग्राफ पेपरनुसार एका खास मशिनवर जाड कार्ड्सवर  पंचिंग मशिननं छिद्र पाडली जातात. मग तो कार्ड्स  हातमागावर अशा पद्धतीनं लावली जातात, की हव्या  असलेल्या डिझाईनच्या पॅटर्नमध्ये धागे वर-खाली होतात  आणि ग्राफ पेपरवरची नक्षी साडीवर उतरते. विणकर  खूप निगुतीनं हे काम करतात आणि बारीक कलाकुसर  साडीवर उतरवतात. नक्षीसाठी वापरण्यात येणाऱ्या आडव्या धाग्यांमध्ये कधी कधी 'जर'सुद्धा टाकली जाते, त्यामुळे 'जर' असलेली नक्षी अजून उठून दिसते. असं हे भरतकाम केल्याप्रमाणे विणलेली डिझाईन 'कॉन्ट्रास्ट' काठा-पदरावर असते. बऱ्याचदा ही साडी मध्ये प्लेन असते किंवा कधीकधी अंतरावर छोटे युट्टे असतात; पण पदर मात्र सुंदर बारीक नक्षीकामानं भरलेला असतो. बोमकाई साडीच्या नक्षीकामावर ओडिशाच्या निसर्गसौंदर्याचा, पौराणिक घटकांचा, नक्षीदार मासे, पक्षी, कासव व मोरांचा, गोपुरांचा आणि मंदिरातल्या सुंदर कोरीवकामाचा प्रभाव पडलेला दिसतो. कधी कधी या साडीत दोन कलाप्रकारांचा सुंदर मेळ असतो. बोमकाईच्या रुद्राक्ष बॉर्डरला 'इकत' पद्धतीनं टेम्पल बॉर्डरची किनार दिली जाते किंवा पदरावरही 'इकत' आणि बोमकाईची भरतकामासारखी नक्षी यांची गुंफण केलेली आढळते. या प्रकाराला 'बांधा-बोमकाई' असं म्हटलं जातं. ओडिशातील काही विणकरांनी अशा काही डिझायनर बांधा-बोमकाई' साड्या विणल्या आहेत, की ज्यात जगन्नाथ मंदिराची कलाकुसर आणि कृष्ण-जीवनावर आधारित घटनाक्रम उतरवला आहे. या साड्या म्हणजे कलाकुसरीचा उत्तम नमुना मानल्या जातात आणि अशा साड्यांना देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे.


Thursday 1 April 2021

पळस फूल


वसंत ऋतूची चाहूल लागताच शेतात, माळरानावर फुललेला दिसतो तो पळस! तो जंगलात तर वणवा लागल्यासारखा दिसतो. तसा जंगलातला वणवा विदारकच असतो,पण पळसफुलांचा दिसणारा वणवा डोळे आणि मनाला आनंद देणारा ठरतो. असंही म्हणतात की, पळस हे जंगल नष्ट होण्याचे, दुष्काळाचे चित्र आहे. मात्र त्याचा दुसरा अर्थही आहे, जिथे काहीच उगवत नाही, अशा पडीक जमिनीवर पळस हमखास फुलतो. पळस जिथे दिसतात, तिथे काही काळी जंगले होती. मानवी हस्तक्षेपामुळे ती नष्ट झाली, असे त्यातून स्पष्ट होते. 

आणखी एक- वणवा लागल्यावर टिकून राहतो तो पळस. त्यामुळे पळस ही 'फायटर' वनस्पती आहे, असे म्हटले जाते. फ्लेम ऑफ द फायर' असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले आहे त्या पळसाच्या पानाफुलांपासून नैसर्गिक रंग मिळतोच, परंतु त्याचे औषधी फायदेही आहेत. रंगपंचमी किंवा धुळवडीला पानाफुलांपासून आणि खोडापासून नैसर्गिक रंग बनवले जातात. या रंगांच्या वापरामुळे आपल्या शरीराला आणि डोळ्यांना कसल्याच प्रकारचे अपाय होत नाहीत, उलट झालाच तर फायदाच होतो. अलीकडे वापरण्यात येत असलेल्या रासायनिक रंगांमुळे डोळे अधू होण्याचे व त्वचेला अपाय होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक रंग वापरण्याची निसर्गप्रेमी शिफारस करताना दिसतात. त्वचेसाठी पळस फुल अत्यंत लाभकारी आहे. शरीराचा दाह कमी करण्यासाठी फुलांचा रस फायदेशीर आहे. पक्ष्यांसाठी पळसफुलांचा मधुरस आवडीचा असतो. साहजिक पळस फुलला की, पक्षी-किड्यांची मौज असते. हा मधुरस माणसांसाठीही चांगला असतो. या रसामुळे पोटातील विकार दूर होतात. पळसाच्या झाडावर लाखाचे किडे मोठ्या प्रमाणात येतात. त्यांची लाळ ज्वलनशील असते. हा पदार्थ दागिने बनवण्यासाठी उपयोगात येतो. पूर्वी या पानांपासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनवल्या जात. आता काळ बदलला असला आणि त्याची जागा प्लास्टिकने घेतली असली तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. 

20 ते 25 फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालिमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात. कुठेही गेले तरी 'पळसाला पाने तीन' अशी म्हण प्रचलित झाली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

स्मार्ट मुलांच्या स्मार्ट गोष्टी


'गोष्टी स्मार्ट बालचमू'च्या हा प्रथितयश लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा बालकथासंग्रह म्हणजे बाल-किशोरवयीन मुलांच्या समजुती, संवेदना, सकारात्मकता मूल्यभावासह भावविश्व गोष्टींचा नजराणा आहे. संकटकालीन परिस्थितीशी संघर्ष करीत समजूतदारपणे आपल्या कृतीतून आताच्या मुलांपुढे आदर्श घालून देणारे या कथांचे नायक-नायिका आहेत.मुलांच्या जगात आणि त्यांच्या परिसरात घडणाऱ्या प्रसंग- घटनांतून त्यांची गोष्ट पूर्ण होते. म्हणून या संग्रहातील बालचमू'स्मार्ट' आहेत आणि या गोष्टीही 'स्मार्ट' आहेत.

श्री. ऐनापुरे यांच्या बालकथा पाठ्यपुस्तकात, किशोर मासिक आणि विविध नियतकालिकांतून यापूर्वी वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर या संस्थेने प्रकाशित केलेल्या या संग्रहात एकूण 19 कथा आहेत. या कथांचा आस्वाद घेताना मुलांना आणि रसिकांना यात आपलेच भावविश्वयेणार नाही, याची काळजी घेतो.  सापडल्याचा आनंद होईल. 'झोपडीतला संजू' या पहिल्याच कथेतल्या संजूवर जीवनमूल्ये जपण्याचे संस्कार झाल्याने तो त्याला त्रास देणाऱ्या मुलांवर आपल्यामुळे बालंट येणार नाही, याची काळजी तर घेतोच याखेरीज मैत्रीतून दिलेला शब्दही खरा करून दाखवतो.

'भूक लागल्यावर' या कथेतील निकिता आपला डबा मैत्रिणींना देऊन शाळेतल्या कॅन्टीनच्या चटपटीत पदार्थांवर ताव मारत असते. पण एकदा घरीच डबा विसरल्याने आणि दुपारच्या सुट्टीत मुसळधार पावसामुळे वर्गाबाहेर जाता न आल्याने मोठी फजिती होते. ती भुकेने व्याकूळ होते. अशा परिस्थितीत शाळेचा शिपाई तिच्या आईने भर पावसात आणून दिलेला डबा तिला देतो. ती आनंदाने खाते. भुकेचे महत्त्व यातून लक्षात येते. यातल्या कथा समकालीन असल्याने त्या वाचताना त्यांना त्या आपल्याच कथा वाटतात. या कथांमध्ये आपल्याला वृद्धांना, आईवडिलांच्या त्याच्या कामात मदत करणारी, अंधश्रद्धेला दूर ठेवणारी, चुका, वाईट सवयी यातून सुधारणारी, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारी मुलं भेटतात. 'मैत्रीचा अर्थ' या कथेत समता, बंधुता आणि एकात्मतेचा पाठ अनुभवयास मिळतो. 'आम्ही जिंकू' या कथेत जिद्द आणि मेहनतीचे फळ लक्षात येते.'पेरी जेड सिग्मा 090' आणि 'जुनं पुस्तक' या विज्ञान कथांमधून जीवन सुलभ झाल्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असल्याचा साक्षात्कार होतो. कथा अनुभवकक्षातल्या असल्याने त्या मुलांना लगेच आपलंसं करतात.-लखन होनमोरे, सोन्याळ ता.जत जि. सांगली

पुस्तकाचे नाव-गोष्टी स्मार्ट चमूच्या

लेखक-मच्छिंद्र ऐनापुरे

अक्षरदीप प्रकाशन,कोल्हापूर

मूल्य-100 मात्र