Monday 24 February 2020

सजीव म्हणजे काय?

सजीवाची व्याख्या फार सोपी आहे. ज्याची वाढ होते, ज्यापासून पुनरुत्पादन होऊ शकते, जो प्रतिक्रिया व्यक्त करतो, तो सजीव. या व्याख्येत प्रत्येक सजीव बसलाच पाहिजे. एखाद्या बाबतीत शंका असली, तरी तिचे निराकरण करणे हे महत्त्वाचे. हे निकष लावताना सुरुवातीला फसगत होऊ शकते. ज्याची वाढ होते, असा एखादा क्रिस्टलही असू शकतो. साधा मिठाचा खडाही आकाराने वाढू शकतो. पण उरलेले दोन निकष तेथे उपयोगी पडत नाहीत.

 पुनरुत्पादनाबद्दलचा निकषही विषाणूंच्या बाबतीत चुकतो. विषाणू एखाद्या अन्य पेशीमध्येच वाढतात. मग त्यांना जिवंत वा सजीव समजायचे की नाही ? स्वतंत्र अस्तित्व नसेल, तरी त्यांचे अस्तित्व मान्य करून त्यांना सजीव गणले जाते. क्लोरोफिल असलेल्या पेशी या वनस्पतीत असतात. अनेक वर्षांपर्यंत अशी पेशी असलेली वनस्पती प्राणी गिळंकृत करताना पाहून तिला काय म्हणायचे, प्राणी का वनस्पती, हा प्रश्न होता. असाच काहीसा वेगळा प्रश्न कोरल व स्पंज या समुद्री प्राण्यांबाबत होता. त्यांची हालचाल नाही. सजीव आहेत, पण त्यांच्यात क्लोरोफिल नाही. मग हे प्राणी का वनस्पती ? बर्‍याच निरीक्षणानंतर पाणी शोषून त्यातील सूक्ष्म वनस्पती व प्राणी हे खातात, हे लक्षात आले. बॅक्टेरिया, यिस्ट व फंगस या प्रकारचे काय, हा प्रश्न पुन्हा सतावत होताच. पण ते सजीव आहेत वा नाहीत, हा प्रश्न मात्र नव्हता.
आता मात्र असंख्य ज्ञात सजीवांची पूर्ण वर्गवारी लावण्यात मानवाला यश मिळाले आहे. एकंदरीत पाच प्रमुख प्रकारात सर्व सजीव विभागता येतात. या प्रत्येक प्रकाराला सृष्टी म्हणतात. त्यानंतर मग त्यांचे अधिक वर्गीकरण केले जाते. जीवाणू (मोनेरा) ही पहिली सृष्टी. एकपेशीय सजीवांची दुसरी. कवक म्हणजे फंगाय ही तिसरी, तर वनस्पती ही चौथी. उरलेले सर्व प्राणी.
हा एवढा अट्टाहास कशासाठी ? समप्रकारचे प्राणी, सामानगुणाचे प्राणी, वनस्पतींची नेमकी माहिती, वाढीची पद्धत व उपयुक्तता या सर्वांचा अभ्यास यामुळे सुलभ होत जातो. एखादा प्रकार त्याचे नाव घेताच डोळ्यांनी पाहिला नसला, तरी डोळ्यांसमोर येऊ शकतो म्हणून सजीवांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मांडला तो *'डार्विन'* यांनी. *'जगाच्या उत्पत्तीपासून आजवर फक्त सशक्त असे सजीव पृथ्वीवर वावरू शकले आहेत'* यालाच त्यांनी *'Servival of the Fittest'* असे नाव दिले आहे. त्याचप्रमाणे सजीवांच्या आकारात, अवयवात गरजेनुसार, आवश्यकतेनुसार होत गेलेले बदलही समजून घेता येतात.  पाण्यातील सजीव जमिनीवर आल्यावर, झाडांवरील प्राणी जमिनीवर वाढू लागल्यावर होणारे वा झालेले बदल त्यामुळे समजतात.
कोण जाणे, पण पृथ्वीवरील सजीवांचे ऐकून संतुलन राखायला हीच प्रक्रिया कदाचित आधारभूत ठरली असावी !('सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment