Monday 15 June 2020

महाराष्ट्रातील पहिला विधवा पुनर्विवाह

आजचा दिवस महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या
इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील पुणे येथे गोखले बागेत १८६९ साली पहिला विधवा विवाह पार पडला. प्राचीन समाजांमध्ये (उदा., इजिप्त व जर्मनी या देशांतील) विधवेला तिच्या मृत पतीच्या थडग्यात जिवंत पुरत असत. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रे व नीतिनियम यांनुसार विधवेला पतीच्या मरणास कारणीभूत धरल्याने, ती पापी व अमंगल आहे ही समाजाची धारणा बनली. तिने कुटुंबातील मंगल प्रसंगी उपस्थित राहू नये, असा प्रघात पडला.
विधवा स्त्रीने सुतक किती दिवस पाळावे, या काळात तिने कोणते वस्त्र परिधान करावे, तिने घराबाहेर पडावे की नाही, तिने कोणाशी बोलावे, कोणते अन्न किती वेळा ग्रहण करावे, यांबद्दलही विविध समाजांत विभिन्न बंधने विधवेवर लादलेली दिसून येतात. पति निधनाचे पातक धुऊन काढण्याकरिता अगर प्रायश्चित्त म्हणून ही बंधने तिने पाळलीच पाहिजेत, असा समाजाचा दंडक असे. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला फारसे प्रोत्साहन नव्हते. तरुणपणी वैधव्य आलेल्या स्त्रीची यामुळे अतिशय कुचंबणा होत
असावी. तिच्याकडे संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन सर्वत्र आढळतो. तिच्यावर परपुरुषाची नजर जाऊ नये, म्हणून अनेक जाचक निर्बंधांबरोबर तिचे केशवपन करण्याची क्रूर चाल भारतात निर्माण झाली. प्राच्यविद्यापंडित अ. स. अळतेकर यांच्या मते बाराव्या शतकापासून या चालीची उदाहरणे आढळतात. विसाव्या शतकाच्या सुरूवातीलादेखील ही विटंबना विधवा स्त्रियांना ,सहन करावी लागली, हे दारुण सत्य आहे. मृत पतीच्या मृत्यूनंतरही आपल्या पत्नीवर हक्क असतो, ह्या भ्रामक समजुतीमुळे परलोकात तिने त्याची सेवा करावी व म्हणून देहत्याग करावा, ही भावना भारतीय समाजात रूढ झाली. त्यातून भारतामध्ये मृत पतीच्या बरोबर पत्नीने सहगमन करण्याच्या अथवा सतीच्या चालीचा प्रचार झाला आणि विधवेला सती करून व जबरदस्तीने पतीच्या चितेवर जाळण्याचे प्रकार घडू लागले. या चालीला जरी धार्मिक अधिष्ठान दिले गेले, तरी कोणत्याही धर्मग्रंथात या प्रथेचा स्पष्ट पुरस्कार नाही. महाभारतात पांडूची पत्नी माद्री सती गेली; पण ही चाल तेव्हादेखील सक्तीची नव्हती. विधवांच्या पुनर्विवाहाबाबत या काळात अनेक समाजसुधारकांनी चळवळ सुरू केली. १८५५ मध्ये
बंगालमध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाची मागणी करणारा अर्ज सरकारकडे पाठविला. तसेच त्यांनी पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ ग्रंथही लिहिला; या ग्रंथात विधवाविवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच काढून दाखवले आहेत. या ग्रंथाचे मराठी भाषांतर विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांनी विधवाविवाह या नावाने १८६५ मध्ये केले. ते स्वतः कर्ते समाजसुधारक होते व त्यांनी विधवेशी विवाह केला होता.
१८५६ मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाहाचा अधिनियम मंजूर झाला. मात्र, पुनर्विवाहाच्या समयी स्त्री अल्पवनीय विधवा असल्यास, विवाहास तिच्या पालनकर्त्यांची संमती आवश्यक मानली गेली. त्यामुळे कायद्याने पुनर्विवाहाला मिळालेली मान्यता हवी तितकी प्रभावी ठरली नाही. महाराष्ट्रात जगन्नाथ शंकर शेट, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी प्रभृतींनी या कार्यास वाहून घेतले. १८६५ साली मुंबईत 'विधवा विवाहोत्तेजक मंडळा' ची स्थापना झाली. या सभेत महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी, काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांसारखी मातब्बर मंडळी होती. गो. ग. आगरकरांनीही विषयांच्या पुनर्विवाहाचा हिरिरीने पुरस्कार केला. पुनर्विवाहाच्या कार्यातही महत्वपूर्ण योगदान धोंडो केशव कर्वे यांचे आहे. १८९३ मध्ये त्यांनी बालविधवेशी विवाह केला.

No comments:

Post a Comment