Monday 28 September 2020

नारळाच्या पानांपासून नैसर्गिक स्ट्रॉ


साजी वर्गीज बंगळुरूमध्ये राहतात.त्यांचं बालपण नारळाच्या झावळ्यांच्या सावलीखाली गेलं आहे. उच्च शिक्षण घेतल्यावर ते बंगळुरूमधील क्राइस्ट विद्यापीठात इंग्रजीचे अध्यापन करू लागले. शेतजमिनीशीनिगडित असलेल्या नवसंशोधनाला त्यांचं प्रोत्साहन असे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरावरून त्यांना काळजी होती.त्यामुळे प्लॅस्टिकला पर्याय मिळेल आणि त्यातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशा गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं.एक दिवस ते विद्यापीठ आवारात फिरत असताना त्यांना नारळाची वाळलेली पानं पडलेली दिसली. त्यांनी ती पानं उचलली आणि चुरघळली. त्यांचा बारीक भुगा झाला. ग्रामीण भागात ही पानं उपयोगाची नाहीत,म्हणून कुठेही फेकून दिली जातात. त्यांनी त्याचा पर्यावरण उपयोग उत्पादन करण्याचे ठरवले. सरबत,ज्यूस किंवा अन्य शीत पेये पिण्यासाठी प्लास्टिकचे स्ट्रॉ वापरले जातात. त्यांनी या नारळाच्या वाळलेल्या पानांपासून स्ट्रॉ (पाईप) बनवण्याचा निर्णय घेतला. ती पूर्ण सुकलेली पानं गोळा करून घरी आणली आणि पाण्यात भिजू घातली. नंतर त्याला उष्णता देऊन उकळवले. पानांना चमक आल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की,नारळाच्या पानांमध्ये नैसर्गिक मेण असतं.यावर आणखी प्रयोग केल्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहचले की, यात जे मेण आहे, ते पानांना अँटी-फॅंगल आणि हायड्रोफोबिक बनवते. याच्या उपयोगातून त्यांनी स्ट्रॉ  बनवले.

सुरुवातीला स्थानिक भागांत साजी ही स्ट्रॉ 3 ते 10 रुपयांत विकत होते. काही दिवसांनी साजी यांनी बाजारात हे प्रोडक्ट लॉन्च केलं, त्यानंतर तब्बल 10 देशांमधून 20 लाखांपेक्षा जास्त स्ट्रॉ ची मागणी साजी यांना मिळाली. 2018 साली साजी यांनी आपल्या उत्पादनासाठी पेटंट मिळवलं आणि त्यांचं हे उत्पादन बाजारात सनबर्ड स्ट्रॉ म्हणून प्रसिद्ध झालं. 2017 साली त्यांनी सर्वात प्रथम एक पदर असलेली स्ट्रॉ तयार केली. पण त्यानंतर त्यांचे काही विद्यार्थी आणि इतर सहकाऱ्यांच्या साथीने स्ट्रॉचं उत्पादन बनवण्यासाठी घरातचं मशिनरी तयार केली. 

 प्लास्टिकला पर्याय म्हणून नारळाच्या झाडाच्या पानांपासून सुरक्षित आणि इकोफ्रेंडली स्ट्रॉचे उत्पादन सुरू केले,पण वर्गीस यांच्या या स्ट्रॉला देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठी मागणी येत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून वर्गीस यांचे इकोफ्रेंडली स्ट्रॉ जगभरात लोकप्रिय झाले. त्यांच्या या स्ट्रॉला सध्या अमेरिका, मलेशिया, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स यांसारख्या देशांमधून मागणी आहे. या स्ट्रॉ सहा महिने टिकू शकतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday 26 September 2020

पांढरी-पिवळी शेवंती


भारतीय सण-उत्सवांमध्ये शेवंती फुलाला मानाचं स्थान लाभलेलं आहे. पण ही शेवंती एतद्देशीय नाही. ती मूळची चीनमधील आहे. तिथून पुढे ती जपानमध्ये रुजली आणि मग हळूहळू पाश्चिमात्य देशांत फोफावली. तशी भारतातही आली. चीनमधून जपानमध्ये गेलेल्या शेवंतीला तिथल्या राजमुद्रेवर स्थान मिळालं. 'फेस्टिव्हल ऑफ हॅपिनेस' चा भाग म्हणून जपानमध्ये 'नॅशनल क्रिसनथेमस डे'साजरा केला जातो. जागतिक पातळीवर या शेवंतीच्या अनेकरंगी जाती विकसित झाल्या आहेत. विविध देशांत या फुलांविषयी शुभ-अशुभ कल्पनाही भरल्या आहेत. युरोपमधील काही देशांत आणि खुद्द चीन-जपानमध्ये पांढरी शेवंती ही मृत्यूशी निगडित म्हणजे शोककारक मानली जाते. जर्मनीमध्ये ख्रिसमसला बाळ येशूचं स्वागत करण्यासाठी घर पांढऱ्या शेवंतीनं सजवलं जातं. अमेरिकेत सकारात्मक प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून शेवंतीकडं पाहिलं जातं. शेवंती घरात आनंद आणि सुख आणते अशी धारणा फेंगशुईमध्ये आहे. भारतात मात्र शेवंतीशी उत्सवाची प्रसन्नता निगडित आहे.'शेवंती' या नावातच एक नटखट प्रतिमा दडली आहे. हार-वेण्या ते कट-फ्लॉवर्स अशा विविध पातळ्यांवर शेवंती वावरताना दिसते.  बहुरंगी बहुढंगी अशी ही शेवंती हारांत समर्पित, वेणीत सुशोभित होऊन जाते. तीच जर उच्चभ्रू वस्तीतल्या 'फ्लॉरिस्ट शॉप'मध्ये गेली की लगेच 'क्रिसनथेमस' होते. 

नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर शेवंतीचं तुरळक आगमन होतं. श्रावणात तर पिवळ्या फुलांची बहारच असते. तिथून विविध पिवळ्या फुलांची पखरण सुरूच असते. नवरात्रात शेवंती आणि झेंडूची फुलं यांना मोठा मान असतो. अश्विनात आलेली शेवंती निसर्गात अगदी मार्गशीर्षपर्यंत आपलं अधिराज्य गाजवते. हार, तोरणं यात शेवंती असतेच,पण तिचं महत्त्वाचं स्थान असते वेणीमध्ये! पांढरी-पिवळी रंगांच्या फुलांची वेणी खास विकली जाते. शेवंतीची लागवड प्रामुख्याने बिहार,गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. आता पांढऱ्या-पिवळ्या शेवंतीशिवाय लाल, किरमिजी, गुलाबी,जांभळट,ब्राँझ अशा कितीतरी रंगछटांमधून शेवंती आपले रंग उधळताना दिसते. शेवंतीला उर्दूत गुलदाऊदी म्हणतात.दक्षिणेकडे सामंडी, असामीत चंद्रमुखी तर बंगालीत चंद्रमल्लिका म्हणतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कुकेन हॉफ


 'कुकेन हॉफ' हे जगातलं सर्वात मोठं गार्डन असून ते नेदरलँडचे सर्वाधिक आकर्षण मानले जाते. 1949 मध्ये लिसेच्या दहाव्या मेयरला पुष्पप्रदर्शन भरवण्याची कल्पना सुचली त्या कल्पनेतून ट्युलिप गार्डनची स्थापना झाली. 32 हेक्टरमध्ये हे उद्यान तयार केलेले आहे. 80 लाखापेक्षा जास्त फुलांची झाडे येथे पहायला मिळतात. फुलांचे उदयान होण्यापूर्वी येथे शिकारीसाठी मोठे सुप्रसिध्द ग्राऊंड होते. राजे व त्यांची मुलं फिरण्यासाठी व शिकारीसाठी येथे येत. गार्डनच्या डाव्या बाजूला एक आकर्षक सुंदर राजवाडा आहे. तेथे Countess हा राजा राहात होता. 'कुकेन हॉफ' या बागेतून राणीच्या किचनमध्ये लागणारा ताजा भाजी पाला, फळं जात असत. Keuken म्हणजे किचन आणि hof म्हणजे बाग म्हणून या बागेला Keukenhof हे नाव दिलं गेलं. हा सगळा प्रदेश नेदरलँड या देशात येतो. येथे राहणारा राजा मेल्यानंतर तेथील गव्हर्नर Rdriaen Maertensz Block हा त्या राजवाड्यात राहात होता. 17 व्या शतकात तो रीटायर झाल्यानंतर राजवाड्याचे परत बांधकाम केले. त्या इंजिनियरचे नाव होते होते जॉन डेव्हीड. संपूर्ण युरोपमध्ये जी फुलं होती, त्या फुलांच्या जाती त्यांनी नेदरलँडमध्ये एकत्र केल्या. त्यावर प्रक्रिया करुन त्याला वेगवेगळे आकार दिले, त्यांनी अनेक नवीन फुलांच्या जाती डेव्हलप केल्या. खासकरून ट्युलिपची अनेक रंगाची फुलं मोठ्या प्रमाणात Export केली जातात. संपूर्ण जगभरात फुलं Export होणारं स्वित्झर्लंड हे सर्वात मोठं मार्केट आहे. ट्युलिपचा सिझन हा एप्रिल ते मे महिन्यापर्यंत असतो. म्हणून ही फुलांची बाग पहाण्यासाठी 15 एप्रिल ते 25 मेपर्यंत गार्डन पर्यटकांसाठी खुले केले जाते. संपूर्ण जगभरातून पर्यटक ट्युलिपची फुलं पाहण्यासाठी येतात. हजारो जातीची विविध रंगाच्या आकाराची फुलं या बागेत आहेत. खास फुलांचे डिझाईन्स बनवण्यासाठी व त्याची सुंदर रचना करण्यासाठी अनेक देशातून डिझाईनर्स येथे बोलावले जातात. श्रीमंत व्यापारी वा राजे महाराज्यांच्या लग्नामध्ये तसेच सण, उत्सव व छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये डेकोरेशन करण्यासाठी या बागेतील फुलांना वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असते. 'सिलसिला' चित्रपटातील अमिताभ आणि रेखाच्या गाण्याचं शुटींग याच बागेत झालं होतं; म्हणून या बागेला सिलसिला गार्डनही म्हणतात.


Sunday 20 September 2020

कवी वा.रा.कांत


आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणार्‍या कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वत:च्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा रुद्रवीणा हा काव्यसंग्रह त्यावेळेस मराठवाड्यातच नाही तर उभ्या महाराष्ट्रात लक्षवेधक ठरला. रुद्रवीणा या कवितासंग्रहात कांतांच्या कवितेतील राष्ट्रीय ओजस्वीपणा व प्रणयगीतातील सोज्वळ हळुवारपणा अन् भावमधुर शब्दशैली वाचकांचं लक्ष वेधून गेली. त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपयर्ंत कवी कविवर्य कांतांनी मराठी सारस्वताची सेवा केली. मात्र मराठी सारस्वताने त्यांची काहीशी उपेक्षाच केली.

वा. रा. कांत हे मात्र महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसिद्धी परांगमुखच राहिले. साठ संवत्सरांच्या आपल्या काव्यप्रवासात कांतांनी एकूण १४ काव्यसंग्रह लिहिले. त्याशिवाय १0 अनुवाद्ति ग्रंथ, ११ नाट्यकाव्यं, २ नाटकं. कांतांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. त्यांनी आपल्याच कवितेवर प्रयोग करून दोनुली हा कवितासंग्रह एका वेगळ्याच काव्यबंधात रसिकांसमोर ठेवला. पण या काव्यप्रकाराची काव्यसमीक्षकांनी हवी तशी दखल घेतली नाही. कदाचित या काव्यप्रकारामुळे मराठी साहित्यात काही मूल्यात्मक भर पडली नसेल, पण या कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतात मौलिक अधिष्ठान दिले आहे हे विसरता कामा नये. मराठी काव्यसमीक्षकांनी माझ्या कवितेची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत कांतांनी अखेरच्या दिवसात बोलून दाखवली होती. वार्धक्याने हताश झालेल्या कांतांची या आजारपणातही काव्यलेखनाची उमेद शाबूत होती. तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो! ज्या राजकीय, सामाजिक वातावरणात कांत आपला जीवनप्रवास करीत होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सतत प्रकर्षाने परावर्तीत होत होते. फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय घटनांचे भान हा कांतांच्या कवितेचा, प्रतिभेचा खास पैलू होता. स्व. जयप्रकाश नारायण यांनी तेव्हा चालविलेल्या चळवळीवर लिहलेली कविता- पांढरे शुभ्र वादळ, महात्मा गांधींवरील राजघाट ही कविता वा चीनमध्ये झालेल्या सामाजिक लढय़ाच्या संदर्भात चीनच्या भिंतीवर तैयानमेन चौकात झालेल्या रक्तरंजनावर लिहिलेली भिंतीला फुटले पंख ही कविता एकंदरीत या सगळ्याच कविता तत्कालीन सामाजिक व्यथांचा उद्घोष करणार्‍या आहेत. व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला आहे. क्रांतिदश्री, प्रकाशपूजन, देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल, संवेदनशील व हळुवारही होती. जीवनातील सौंदर्य, सुखदु:ख, प्रीतीचावियोग, मृत्यू आदी जीवनानुभवांना सजीवपणे प्रकट करीत कांतांची कविता वाचकांना खचीतपणे अंत:र्मुख करणारी आहे. अन् ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाची प्रमाण होते. शब्द माझा धर्म / शब्द माझे कर्म / शब्द हेच वर्म / ईश्‍वराचे असं म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कवितासंग्रहात मावळते शब्दमध्ये लिहितात .

मराठी वायाच्या उत्तुंग क्षितिजावर कांतांनी शब्दांचं नवीन आकाश उभं करण्याबरोबरच मराठी कवितेस समृद्ध केले. वा.रा कांत यांचे ८ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

प्रा.सदानंद रेगे


दक्षिण कोकणातील देवगडच्या लाल मातीने मराठी साहित्याला अनेक हिरे-माणके बहाल करून आपली साहित्यसंपदा समृद्ध करण्यास हातभार लावला. त्या पैकीचे एक म्हणजे आधुनिक युगातील कवी, कथाकार, अनुवादक प्रतिभावंत चित्रकार प्रा. सदानंद शांताराम रेगे! सुप्रसिद्ध कादंबरीकार कै. श्रीपाद काळे यांच्या वाडा-पडेल या गावा लगतचे पुरळ हे रेगेंचे मूळ गाव.

रेगेंचा जन्म २१ जून १९२३ रोजी त्यांच्या आजोळी राजापूर येथे झाला. परंतु पुढील आयुष्य मात्र मुंबईत गेले. त्यांच्या वयाच्या १२व्या वर्षीच म्हणजे १९३५ मध्ये डिसेंबर महिन्यात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे बालपण दादर-माटुंगा परिसरात गेल्याने शिक्षण तेथेच झाले. त्यांना चित्रकला चांगली अवगत होती. १९४0 साली छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण सुरू होते. दोन भाऊ, दोन बहिणी व आई असे पाच जणांचे कुटुंब सांभाळताना शिक्षण सोडून नोकरी पत्करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कृश शरीरयष्टी लाभलेले रेगे १९४२ साली गिरणीत डिझायनरचे काम करून आपले शिक्षणही घेत होते.

१९५८ मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन बी. ए. ची पदवी तर १९६१ मध्ये कीर्ती महाविद्यालयातून इंग्रजी विषयातील एम ए. उत्तीर्ण झाले. पुढे प. रेल्वेत बराच काळ नोकरी केल्यावर १९६२ पासून १९८२ सालापयर्ंत सुमारे २0 वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुईया महाविद्यालयात कवी विंदांसोबत नोकरी केली. दोघांचेही वास्तव्य वांद्रे येथील साहित्य सहवासमध्येच होते. वयाच्या १0व्या वर्षी ४थीत असताना भक्त ध्रुव ही १0 मिनिटांची नाटिका लिहून त्यांनी आपल्या लेखनाला प्रारंभ केला. तर गांधी वधानंतर प्रतिकात्मक कविता लिहून काव्य लेखनाचा श्रीगणेश केला. प्रतिभेची वेगळी सनद लाभलेल्या या अवलियाने नंतर मागे वळून पाहिजेच नाही.

एक प्रथितयश कथा व ललित लेखक, कवी, अनुवादक तसेच आदर्श वाचक म्हणून त्यांची ख्याती होती. जाहिरातींचे भाषांतर करणे, नाटयपरीक्षण व आकाशवाणीसाठी त्यांनी खूप लेखन केले. पोपटांना बोलते करण्याची कलाही त्यांना अवगत होती. त्यांचा स्वभाव काहीसा एकलकोंडा, विक्षिप्त, हसतमुख असा होता. चित्रकलेच्या प्रांतात त्यांना आचरेकर, बेंद्रे, आंबेरकर, सोलेगावकर, कुलकर्णी व दलाल या मातब्बर चित्रकारांचे मार्गदर्शन लाभल्याने ते चित्रकार बनले. शालेय जीवनात प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. रवींद्र रामदास व मराठीतील अ. वि. काळे हे गुरुजन तसेच प्रभाकर पाध्ये भेटल्याने त्यांच्या लेखनास एक दिशा मिळाली. १९५१ साली धनुधर्ाी या मासिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाल्यावर सत्यकथा, झंकार, चित्रा, अभिरुची, यशवंत व हंस या नियतकालिकांमधून त्यांनी चौफेर लेखन केले. पुढे साहित्यिक जीवनातील कोंडमार्‍यावर मात करीत प्रभाकर पाध्येंच्या पुढाकाराने त्यांनी युरोपचा दौराही केला. नॉर्वेजियन भाषा अवगत करतानाच रशियाचाही दौरा केला. मोहन पालेकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतलेल्या रेगे यांनी नवनाटयशास्त्र सहज शिकून त्यात पारंगत झाले. मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरील रविंद्र पिंगे व नीलम प्रभू यांचा परिचय झाल्याने आकाशवाणीशी त्यांचे ऋणानुबंध होते.

प्रा. रेगेंची साहित्य संपदेत प्रामुख्याने अक्षरवेल (१९५७), गंधर्व (१९६0), देवापुढचा दिवा (१९६५), वेडया कविता व ब्रांकुशीचा पक्षी (१९८0), पँट घातलेला ढग (१९८१) व तृणपर्णे (१९८२) हे काव्यसंग्रह तर जीवनाची वस्त्रे (१९५२), काळोखांची पिसे (१९५४), चांदणे (१९५९), चंद्र सावली कोरतो (१९६३), मासा आणि इतर विलक्षण कथा (१९६५) हे काव्यसंग्रह यांचा अंतर्भाव होतो. विदेशी अनुवादित नाटकांमध्ये जयकेतू (१९५९), ब्रांद (१९६३), ज्याचे होते प्राक्तन शापित (१९६५), बादशहा (१९६५), गोची (१९७४) व राजा इडिपस आदी तर अप्रकाशित नाटकांमध्ये पाच दिवस थेर्मा व प्रेषित यांचा अंतर्भाव होता.

Saturday 19 September 2020

नाटककार अनंत विष्णू गोखले

 मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १९ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेले एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक करायला गेलो एक त्यांचे गाजलेले नाटक करायला गेलो एक म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!

नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात करायला गेलो एक हा एक मास्टरपीसच. अन् झालं भलतच, रात्र थोडी सोंग फार, नाटक झाले जन्माचे, पतंगावरी जीवन माझे, पाप कुणाचे शाप कुणाला, ते तसे तर मी अशी, झालं गेलं गंगेला मिळाल, खुनाला वाचा फुटली, संसार पाहावा मोडून, थांबा-थांबा घोळ आहे, पुत्रवती भव, पेल्यातील वादळ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच नाट्यमय ठरलेली. आता करायला गेलो एक हे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या श्रीस्टारतर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली.

पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हिरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. नटसम्राट नाटकातील विठोबा, भावबंधनमध्ये महेश्‍वपरी, लग्नाची बेडीतला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या.

फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा वारा फोफावला हा कवितासंग्रह, करायला गेलो एक, संसार पाहावा मोडून, अन् झालं भलतंच, नवरा म्हणून नये आपला, रात्र थोडी सोंगे फार इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत. बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.

कर्मवीर भाऊराव पाटील


समाज सुधारक आणि शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला.   यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करून मोठे काम केले. जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढय़ातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्हय़ातील कुंभोज या गावी जैन कुटुंबात झाला. सांगली जिल्हय़ातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे पूर्वज कोल्हापूरजवळील जैन नादणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांसोबत खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील विटा आणि इतरही काही गावात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात 'दुधगाव शिक्षण मंडळ' स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किलरेस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्हय़ातील काले येथे केली. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यानी 'रयत'ला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. सातार्‍यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वत:चे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे नामाभिधान करण्यात आले. महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी १९५९मध्ये डी. लिट. ही पदवी दिली होती. ह.रा. महाजनी यांनी 'महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन' या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. ९ मे १९५९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

जितेंद्र अभिषेकी


जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म  २१ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.   एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथार्शमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमके तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. 

संस्कृतपासून ते उदरु शेरोशायरी पयर्ंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचे र्मम होते. अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचे संगीत अभिषेकींचे होते. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिले. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारे होते. अभिषेकींनी जसे स्वत: संगीत दिले तसे दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले. 

अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिले. १९९५ सालच्या नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती . नाट्यदर्पण (१९७८), पद्मश्री (१९८८), संगीत नाटक अकादमी (१९८९), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९0) आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा मृत्यू ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी


दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्‍चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेले हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केले आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्‍वर, कृष्णेचे विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.

पहाटे तीनपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. जरी हे हिंदूंचे पवित्र स्थान असले तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.  श्रीक्षेत्र नृसिंहवाडी कोल्हापूर जिल्हय़ात शिरोळ तालुक्यातील मिरजेपासून जवळ, कृष्णा - पंचगंगा संगम स्थळी आहे.

Thursday 17 September 2020

प्रबोधनकार ठाकरे


पत्रकारिता, ग्रंथ लेखन, वक्तृत्व, इतिहास संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन साधणारे श्रेष्ठ प्रबोधनकार! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे लोकहितवादी, आगरकर व महात्मा फुले यांच्या समाजसुधारणांना पुढे नेणारे द्रष्टे समाजसुधारक होत. त्यांचे जीवन म्हणजे अन्यायांविरुद्धचा जणू एक संग्रामच होता.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी सार्‍यांची दाणादाण उडवून दिली.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजार्‍यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक अमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी त्या सर्वांना दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्त्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना  नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खर्‍या ब्राह्मणांची भूमिका मांडली.

त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वत: सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.

प्रबोधनकार हे एक झपाटलेले लेखक होते. ते सचोटीचे पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांचे सर्व लेखन हे विशिष्ट ध्येयाच्या प्रचारासाठीच होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणात्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप,वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापुजी,पंडिता रमाबाई व माझी जीवनगाथा(आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राम्हण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्ह्मणांनी न्यायालयाकडे केली असता न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त आचार्य अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते. शिवसेना या संघटनेच्या स्थापनेचे बीज हे प्रबोधनकारांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये आहे असे मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते. आजच्या शिवसेना या संघटनेचं नाव देखील त्यांनीच सुचवलं होतं. त्यांचा विचार त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी आजपर्यंत जपला आहे.

हैदराबाद मुक्तीसंग्राम


17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो  'मराठवाडा मुक्तिसंग्राम' ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता 200 वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. 

निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. 1724 ला मोगलांचा  सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम  मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. 1767 नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्‍या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो.
15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास 565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडले तरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण 16 जिल्ह्याचा समावेश होता. 
22 हजार 360 खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38 हजार, 534 एवढी होती.  त्यात 85 % हिंदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528 होती. एकूण क्षेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती.
अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी 15 कोटीचे उत्पन्न मिळत होते. हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, 1883 पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे 21 विभाग काढून त्याद्वारे
गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे 1910 पर्यंत निजामाकडे  जमा होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते.
1910 पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्‍याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील 565 संस्थानात 21 तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता.
1800 साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबादजवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिंकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात निजामाने 28000 रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली.
1911 ते 1948 ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय 1921 सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात नापास झाला तर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”
राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निःपक्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्‍या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवट मात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सरकारही व्यवस्थित चालू होतं.
मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एका अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असली तरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे 1947 – 48 चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे शिकले त्यांचा इतिहास पुस्तकात आला परंतु अनेक  अशी मंडळी आहे त्यांना अजूनही इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची 15 - 20 माणसं रझाकारांनी कापून काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही.

Wednesday 16 September 2020

प्रबोधनकार ठाकरे


केशव सीताराम ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ - २0 नोव्हेंबर १९७३). 'प्रबोधनकार ठाकरे' या नावाने महाराष्ट्राला परिचित असलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार. जन्म कुलाबा जिल्हय़ातील पनवेलचा. शिक्षण पनवेल व देवास येथे मॅट्रीकपर्यंत झाले. तथापि ज्ञानेच्छू वृत्तीने इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व संपादन करून त्यातील उत्ताेमोत्तम ग्रंथांचे स्वतंत्रपणे अध्ययन त्यांनी केले होते. पनवेल येथे असताना केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये यांचा प्रेरक सहवास त्यांना लाभला. आठल्यांना ते आपले लेखनगुरू मानत होते. ठाकर्‍यांचा स्वभाव महत्त्वाकांशी आणि हरहुन्नरी होता. त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली. टंकलेखन, छायाचित्रकार, तैलचित्रकार, जाहिरातपटू, विमा कंपनीचे प्रचारक, नाटक कंपनीचे चालक असे अनेक उद्योगही केले. तथापि समाजसुधारणेची तळमळ होती. 

केशव सीताराम ठाकरे यांनी तळमळीतून केलेली झुंजार पत्रकारीता, तसेच प्रभावी वक्तृत्व व इतिहास संशोधन ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्ये होत. महात्मा फुले, लोकहितवादी आणि आगरकर ही त्यांची स्फूर्तिस्थाने होती. राजर्षी शाहू महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर होता. शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीत ते हिरिरीने पडले; अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध, यासारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी राबविली; ग. भा. वैद्यांच्या 'हिंदू मिशनरी सोसायटी'च्या कार्याला हातभार लावला. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन या त्यांनी चालविलेल्या नियतकालिकांची नावेही बोलकी आहेत. त्यांपैकी खर्‍या राष्ट्रोद्धारार्थ 'सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीचा नायनाट' करण्यासाठी काढलेल्या प्रबोधनाशी त्यांचे नाव कायमचे निगडित राहिले. बहुजन समाजोद्धाराच्या आंदोलनांप्रमाणेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातही त्यांनी भाग घेतला; त्यासाठी तुरुंगवास भोगला; अभिनिवेशयुक्त पण अत्यंत सडेतोड, ठाशीव आणि प्रखर विदारक भाषा हे त्यांच्या वाणीलेखणीचे वैशिष्ट्य होते. कुमारिकांचे शाप ( १९१९), भिक्षुकशाहीचे बंड (१९२१) हे त्यांची सामाजसुधारणाविषयक उल्लेखनीय पुस्तके. खरा ब्राह्मण (१९३३), विधिनिषेध (१९३४) आणि टाकलेले पोर (१९३९) या त्यांच्या नाटकांतूनही त्यांच्यातील समाजसुधारक प्रकर्षाने व्यक्त झालेला आहे. 

मराठय़ांच्या इतिहासाचा त्यांना फार मोठा अभिमान होता. सातार्‍याच्या प्रतापसिंह महाराजांच्या पदच्युतीचा, इंग्रजांनी त्यांच्या केलेल्या अवहेलनेचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट लंडनपर्यंत गेलेला त्यांचा निष्ठावंत सेवक रंगो बापूजी यांच्या त्यागाचा साद्यंत इतिहास प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापुजी (१९४८) हा ग्रंथ लिहून महाराष्ट्रापुढे प्रथम त्यांनी मांडला. ग्रामण्याचा साद्यंत इतिहास ( १९१९), हिंदवी स्वराज्याचा खून (१९२२), कोदंडाचा टणत्कार ( दुसरी आवृत्ती १९२५) आणि रायगड (१९५१) ही त्यांची इतिहासविषयक अन्य पुस्तके. हय़ाखेरीज संत रामदास, संत गाडगे महाराज व पंडिता रमाबाई यांची चरित्रे त्यांनी लिहिली ( अनु. १९१८, १९५२, १९५0). संत रामदासांचे चरित्र इंग्रजीत लिहिलेले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. 

शिवसेना या राजकीय-सामाजिक संघटनेचे नेते, महाराष्ट्रातील विख्यात व्यंगचित्रकार आणि मार्मिक या साप्ताहिकाचे संपादक बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकारांचे पुत्र होत. मार्मिकमधून माझी जीवनगाथा (१९७३) हे आपले आत्मचरित्र प्रबोधनकारांनी लिहिले. जुन्या आठवणी (१९४८) या त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध संस्मरणिका होत.

जयवंत दळवी


 प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. काही वर्षे प्रभात व लोकमान्य वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच मी लेखक आहे अशी ऐट घरात ठेवली नाही. ते स्वत: पत्नी-मुलांमध्ये आपल्या साहित्याविषयी बोलत नसत, परंतु कोणी त्याबद्दल बोलले तर निमूट ऐकून घेत. त्यांचा स्वभाव याला कारणीभूत असेल. अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठया साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे.

जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या उभा जन्म उन्हात या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय लेखनाला सुरुवात केली. सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खचरून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि दळवी, हे बंद करा! नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. सभ्य गृहस्थ हो! हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळया टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. त्यांच्या बर्‍याच कथा, कादंबर्‍या, नाटकांतून वेडसर- वेडगळ स्तरावरची माणसे दिसतात. त्यावरही खूप पत्रे, प्रतिक्रिया. सतीश दुभाषी या प्रख्यात नटवर्याने एकदा गंभीरपणे सांगितलंही, दळवी, मी सांगतो म्हणून राग मानू नका! पण एके दिवशी तुम्हाला वेड लागेल! तुम्ही सावध राहा! तुम्हाला या वेडया माणसांचे इतके वेड आहे की, ती माणसे एकदा तुम्हाला वेड लावतील. तुम्ही तो नाद सोडा! या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली! मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले. जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे.

कोकणी मेवा


सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडच्या उतरणीच्या डोंगररांगा आणि अरबी समुद्राचा किनारा यांच्यामधील चिंचोळा महाराष्ट्राचा भूप्रदेश म्हणजे कोकण.  कोकणात उसाचे किंवा द्राक्षांचे मळे फुलत नाहीत, पण कोकणचा मेवा इथे पुष्कळ प्रमाणात मिळतो. आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे असा कितीतरी फळांचा मेवा इथे उपलब्ध आहे. कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते. नारळ आणि सुपारी हे कोकणातलं बारमाही पीक. हापूस आंबा हे कोकणचं अमृत फळ.  आता या फळानं जागतिक बाजारपेठेत काबीज केली आहे. झाडावर पिकलेला लालपिवळा भडक आंबा पिकून खाली पडल्यावर तो  मनसोक्त चुपून, अंगाखांद्यावर रस  सांडून खावेत, असे आता दिवस नसले तरी पूर्वी असा प्रकार खूप चालायचा.  खरे तर आता हापूसच्या कलमावरचा तयार झालेला आंबा ऐटीत पेटीत बसून ट्रकमधून मुंबईला जातो. तिथून जागतिक बाजारपेठेत पोहोचतो. हा हाफूस इथल्या बागायतदाराला उदंड पैसे मिळवून देतो. पावसाळ्यात खंडीने येणारे तांदळाचे पीक आता कमी झाले आहे. भातलावणीचा खेळ जगभर प्रसिद्ध आहे. रातांबा आणि चिंच ही फळे कोकणाच्या आंबट चवीची ओळख देतात. रातांब्याची सोलं आणि चिंचेचे गोळे सर्वदूर लोकप्रिय आहेत. काजू हा तर कोकणचा खास मेवा. काजूच्या झाडातून चमकणारी पिवळीशार किंवा लालभडक रंगाची काजूबोंड लक्ष वेधतात. त्याच्या खालच्या बाजूस काजू बी असल्याने आकारही आकर्षक असतो. बाजारात ओले काजूगरची उसळ चविष्ट असते. काही ठिकाणी काजूबोंडापासून बनविलेल्या सरबताची चवही चाखता येते.काजूगराबरोबरच काजूची पिकलेली लाल-पिवळी बोंड खाणं, ही अवीट गोडीची तहान ही तर कोकणची खासियत आणि कच्च्या काजूगरांची चव हे तर मे महिन्याच्या सुट्टीत पोरांचं कोकणातलं आकर्षण,  मार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात. रस्त्याच्या कडेला बसलेल्या माम्यांकडे मिळणारी बोरआवळेही कोकणात विशेषत्वाने आढळतात. हिवाळ्यात येणारी लालचुटुक कणेरी आणि हिरवी आंबट-गोड अळूची फळेदेखील बाजारात मिळतात.  डोंगर उतारावरच्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची फळझाडे चांगल्या प्रकारे उभी राहतात. भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतांना कोकणी माणसाने फळबागा उभ्या केल्यात. सोबत डोंगर उतारावर मोठ्याप्रमाणात निसर्गत: येणाऱ्या करवंद आणि जांभूळाच्या झाडांमुळे विपूल प्रमाणात फळे उन्हाळ्यात बाजारात येतात. कोकणातील गणपतीपुळे, कुणकेश्वर, सिंधुदुर्ग किल्ला ही कोकणातील महत्त्वाची पर्यटनस्थळं आहेत. मालवणी बोली आणि त्यातला गोडवा अवीट आहे. मालवणी भाषा बोलता येत नसली, तरी त्या बोलीवरचं आणि कोकणी मातीवरचं प्रेम सर्वदूर उदंड आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday 15 September 2020

जीडीपी म्हणजे नक्की काय?


भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमधून समोर आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट झाल्याचे चित्र दिसत असून सध्या सुरु असणाऱ्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीतही ही घट कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या वास्तविक (रियल) जीडीपीमध्ये २६.९ लाख कोटींची घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २३.९ टक्के इतकी आहे. नाममात्र (नॉमिनल) जीडीपी ३८.०८ लाखांनी घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २२.६ टक्के इतकी आहे. २२.८ टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची सरासरी घसरण झाली आहे. पण जीडीपी म्हणजे नक्की काय?, तो कसा मोजतात?, का मोजतात?, त्याचे फायदे काय? असे अनेक प्रश्न सामान्यांना पडतात. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणारा हा लेख…

‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपी हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत होय. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करायची असते तेव्हा जीडीपीचा वापर केला जातो. तसेच देशांतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन किती वाढले, हे मोजण्यासाठीही जीडीपीच्या दराचा वापर होतो.

एखाद्या राष्ट्राचा जीडीपी हा त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पादन (Production), राष्ट्रीय उत्पन्न (Income) किंवा राष्ट्रीय खर्च (Expenditure) यावरून ठरवता येतो.

राष्ट्रीय उत्पादनांवरून जीडीपी मोजताना फक्त शेवटचे/ अंतिम व्यवहारच ग्राह्य़ धरले जातात. इतर मधले (Intermediate) व्यवहार वगळून जी वस्तू आणि सेवांच्या उत्पादनांची किंमत राहते, तोच जीडीपी. उदा. कापसापासून बनवलेले कापड, कापडापासून बनवलेले कपडे आणि कपडय़ांची विक्री यांत अंतिम व्यवहार हा कपडय़ांच्या विक्रीचा असतो; म्हणून तोच फक्त जीडीपीमध्ये पकडला जातो. तसे न केल्यास, किंमत दोनदा जीडीपीमध्ये मोजली जाण्याचा धोका असतो.

राष्ट्रीय उत्पन्नावरून जीडीपी मोजताना राष्ट्रातल्या सर्व लोकांचे त्या वर्षांचे उत्पन्न मोजले जाते. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे पगार, जमिनीचे व उपकरणांचे भाडे, दिलेल्या कर्जावर मिळणारे व्याज आणि उद्योगातून होणारा नफा.. अशा सर्व उत्पन्नांना मिळून जीडीपी मोजला जातो.

राष्ट्रीय खर्चाच्या दृष्टीने जेव्हा जीडीपी मोजला जातो तेव्हा त्यात ग्राहकांचा खर्च (Consumption), उद्योगांनी केलेली गुंतवणूक (Investment) आणि सरकारी खर्च (Government Spending) यांचा विचार केला जातो. तसेच आयातीमुळे राष्ट्राचा खर्च वाढतो (त्याचा फायदा राष्ट्रातील कोणालाच उत्पन्नाच्या स्वरूपात मिळत नाही) आणि निर्यातीमुळे राष्ट्राचे उत्पन्न वाढते (राष्ट्रातील कोणाचाच खर्च न वाढता); त्यामुळे हा आयात-निर्यातीतील फरक (निर्यात-आयात) जीडीपीमध्ये धरावा लागतो. राष्ट्रीय खर्च विचारात घेऊन जीडीपी मोजण्यासाठी :

C (Consumption ) + I (Investment) + G (Government Spending) + (X (Export) – M (Import )) असे समीकरण वापरण्यात येते. सोप्या शब्दांत सांगायचे, तर या पद्धतीत अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांवर झालेला खर्च मोजण्यात येतो.

आता ही गणिती समीकरणे आणि मोजमापातील गुंतागुंत बघून थोडं घाबरायला होत असेल, तर साहजिकच हे सर्व मोजतं कोण, असा प्रश्न पडतो. भारतात ‘केंद्रीय सांख्यिकी संस्था’ (Central Statistics Office – CSO) या सरकारी संस्थेची ही जबाबदारी आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणांवरून आणि निर्देशाकांवरून (Indexes) माहिती गोळा केली जाते आणि त्यावरून वार्षिक व तिमाही जीडीपी घोषित केला जातो. वर सांगितलेल्या पद्धतीवरून काढण्यात आलेल्या जीडीपीला ‘नॉमिनल जीडीपी’ असे म्हणतात. एखाद्या वर्षी महागाईमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या, तर या वाढलेल्या किमतीमुळे जीडीपीही वाढलेला दिसतो- जरी इतर कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्था वाढली नाही तरीही! अशा वेळेस महागाईचा परिणाम जीडीपीमध्ये मोजला जाऊन ‘खरा’ जीडीपी काढला जातो- ज्याला ‘रिअल जीडीपी’ असे म्हणतात.

आज सर्वसामान्यपणे जीडीपी हे एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक प्रगतिपुस्तकासारखं वापरलं जातं. अर्थव्यवस्थेची ताकत आणि वाढ त्यावरून ठरवली जाते. पण जीडीपीच्या वापरावरही काही मर्यादा आहेत. जीडीपी फक्त विक्री झालेल्या वस्तूच मोजते. काळा बाजार किंवा वस्तू विनिमय (बार्टर) यातील व्यवहार जीडीपीच्या कक्षेबाहेरच राहतात आणि त्याची कल्पना जीडीपी पाहून येत नाही. उद्योगांचा पर्यावरणावरचा परिणाम आणि वाढलेलं प्रदूषण हे जीडीपीमध्ये मोजलं जात नाही. नफेखोरीसाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालं तर अशी प्रगती फार काळ टिकवून ठेवता येत नाही आणि त्याचा विचार जीडीपीमध्ये होत नाही. तसेच जीडीपीचा आधार हा आर्थिक व्यवहार हाच असल्याने, वस्तू व सेवांची वाढलेली गुणवत्ता आणि त्या अनुषंगाने झालेल्या प्रगतीचे मोजमाप जीडीपी करू शकत नाही. उदाहरणार्थ, दहा वर्षांपूर्वी आपण वापरत असलेले मोबाइल फोन आजच्या स्मार्ट फोनपेक्षा गुणवत्तेने

कमी असूनसुद्धा किमतीने जास्त होते. थोडक्यात, दहा वर्षांपूर्वीच्या फोनचा जीडीपीमध्ये आजच्यापेक्षा मोठा वाटा होता. एखाद्या राष्ट्राचा जीडीपी खूप जास्त असला म्हणजे त्या राष्ट्राची सर्वागीण प्रगती होते आहे असे मानणेही चुकीचे आहे. जर संपत्ती फक्त काही लोकांकडेच जमा होत असेल, तर त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता वाढते. एकंदरीत जीडीपी केवळ आर्थिक व्यवहाराचेच मोजमाप करते. निश्चितच ते एक महत्त्वाचे साधन आहे.


Saturday 12 September 2020

गायिका प्रभा अत्रे


प्रभा अत्रे यांचा जन्म सप्टेंबर १३, इ.स. १९३२ झाला. या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत.

प्रभाताईंचा जन्म पुण्यात आबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांचे पोटी झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारतातील विविध भागांत होणार्‍या कार्यक्रमांत साथ करत असत. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली.

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वत: रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील ह्यजागू मैं सारी रैना, कलावती रागातील ह्यतन मन धन, किरवाणी रागातील ह्यनंद नंदन, ह्या र्शोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला.

तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.

डॉ. प्रभा अत्रे यांनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक ह्यस्वरमयी असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या ह्यसुस्वराली (१९९२) या दुसर्‍या पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी ( इ.स. १९९४) व स्वररंजनी (इ.स. २00६) या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५00 शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. (त्यांसोबत ध्वनिमुद्रिका संचाचा समावेश असतो.) त्यांचे पाचवे पुस्तक, अंत:स्वर हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.

प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील एनलायटनिंग द लिसनर (इ.स. २000) व अलॉंग द पाथ ऑफ म्युझिक (इ.स. २00६) ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस उपलब्ध असलेली पुस्तके वैश्‍विक र्शोतृवृंदाला भारतीय संगीत जाणण्यासाठी मदत करतात. याखेरीज प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीताधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत. आकाशवाणीच्या संगीत विभागात सहाय्यक निर्मात्या म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. नेदरलँड्स, स्वित्झरलंड येथील शैक्षणिक संस्थांमध्ये; तसेच कॅलिफोर्निया व कॅलगरी (कॅनडा) येथील विद्यापीठांमध्ये संगीताच्या मानद प्राध्यापिका.महाराष्ट्र सरकारतर्फे संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रभाताईंची ह्यविशेष कार्यकारी न्यायाधीशपदी नियुक्ती. मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात प्राध्यापिका व संगीत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. पुणे येथील ह्यगानवर्धन ह्या प्रसिद्ध संगीत संस्थेच्या २२हून अधिक वर्षे अध्यक्षा होत्या. 

Friday 11 September 2020

'मंगळा'वरच्या मानवाच्या मोहिमा


माणूस मंगळावर जाण्याची आणि तिथे राहण्याची  महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. मंगळावर पूर्वी कधीतरी वाहतं पाणी तसंच वातावरण आणि कदाचित जीवसृष्टी तग धरू शकेल अशी परिस्थिती होती, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.1960 पासून ते आतापर्यंत मंगळावर तब्बल 45 अभियान करण्यात आले. ज्यापैकी एक तृतियांश अयशस्वी झालेत. भारताने अंतरिक्ष यान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत पोचवले. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन यांनाच हे यश मिळाले आहे. आशियातील कोणत्याही राष्ट्राला मिळाले नव्हते, 2012 साली चीनने आपली पहिली मंगळ मोहीम यिंगह्यो-एफ या नावाने राबविली होती; पण ती असफल ठरली होती.  आता गेल्या 19 जुलै 2020 रोजी  अरब जगतातील पहिलंच' अमाल' (आशा) हे यान मंगळाच्या दिशेनं झेपावलं आहे. तसेच नासा'चे पर्सिव्हरन्स 30 जुलै 2020 रोजी अंतराळात गेलं आहे. ते पुढच्या वर्षी 18 फेब्रुवारीला मंगळावर उतरेल.  ‘नासा’ने 23 वर्षांपूर्वी, म्हणजे 1997 मध्ये  ‘पाथफाइंडर मिशन’मधून ‘सोजर्नर’ रोव्हर मंगळाच्या मातीवर उतरवलं. नंतर नासाने पुन्हा  2003 मध्ये मंगळावर ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’ असे दोन जुळे रोव्हर पाठवले. त्यानंतर 2012 मध्ये ‘क्युरिओसिटी’ हा रोव्हर पाठवला.  आता ‘नासा’ने ‘पर्सिव्हरन्स’ हा रोव्हर मंगळावर पाठवला आहे. ‘नासा’ने मंगळावर ‘सोजर्नर’ हा रोव्हर तांत्रिक प्रात्यक्षिकं घेण्यासाठी पाठवलेला होता. त्याने मंगळावर तब्बल 83 दिवस काम केलं. तर ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’ हे दोन रोव्हर्स तिथे अनुक्रमे सहा आणि 15 वर्षे कार्यरत होते. 2012 मध्ये मंगळावर उतरलेलं ‘क्युरिऑसिटी’ आजही कार्यरत आहे. मंगळावर पाठवण्यात आलेल्या रोव्हर्सच्या प्रत्येक पिढीगणिक (जनरेशन) शास्त्रीय उपकरणांची संख्या आणि गुंतागुंत वाढत गेली आहे. ‘सोजर्नर’ हा रोव्हर लहान मुलांच्या एखाद्या खेळण्यासारखा अगदी छोटासा होता. त्याच्या तुलनेत ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपाच्र्युनिटी’ एखाद्या गोल्फ कोर्टाच्या आकाराचे होते. तर ‘क्युरिऑसिटी’ आणि ‘पर्सिव्हरन्स’ आकाराने एखाद्या लहानशा मोटारगाडीएवढे आहेत.  मंगळाभोवती फिरणाऱ्या यानातून मंगळावरच्या एखाद्या ठिकाणाची जी छायाचित्रं आणि त्यातून जी माहिती मिळते, त्यापेक्षा रोव्हर त्या ठिकाणाची किती तरी अधिक पट हाय रिझोल्यूशनची छायाचित्रं पाठवतात. रोव्हरमध्ये ड्रिलपासून ते स्पेक्ट्रोमीटर आणि मायक्रोस्कोपिक इमेजर्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतात. या उपकरणांच्या माध्यमातून मंगळाचा प्रत्यक्ष स्थानिक भौगोलिक परिसर समजून घ्यायला मदत होते.  

आता अलीकडेच पाठवण्यात आलेल्या ‘पर्सिव्हरन्स’ने मंगळावर ‘मॉक्सी’  हे एकदम आगळंवेगळं उपकरण नेलं आहे.  मंगळावरच्या वातावरणात भरपूर प्रमाणात असलेला कार्बन डाय ऑक्साइड वापरून या उपकरणाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मंगळावर ऑक्सिजन तयार केले जाणार आहेत. ही संकल्पना यशस्वी झाली तर पुढच्या मंगळ मोहिमा कमी खर्चात होतील.  दुसरं म्हणजे ‘पर्सिव्हरन्स’ने स्वत:बरोबर ‘इनजेन्यूटी’ हे हेलिकॉप्टर मंगळावर नेलं आहे. हे  हेलिकॉप्टर मंगळावरच्या विरळ वातावरणात उडून अशक्य ठिकाणची माहिती मिळवणार आहे. तिसरं म्हणजे या मंगळ मोहिमेच्या नियोजनानुसार ‘पर्सिव्हरन्स’ मंगळावरच्या दगडांचे नमुने घेऊन परत येणार आहे. त्या दगडांचं पृथ्वीवरच्या प्रयोगशाळांमध्ये विश्लेषण केलं जाणार आहे. आजवरच्या मंगळ मोहिमांमध्ये तिथले नमुने पृथ्वीवर आणण्याचा हा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. मंगळावर जीवसृष्टी आहे का किंवा यापूर्वी होती का याचा त्यातून शोध घेणं हा त्यामागचा हेतू आहे.  मानवजातीसाठी मंगळ हा अतिशय आकर्षक ग्रह आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो तुलनेत सगळ्यात जवळ आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

अनेक रोगांवर इलाज म्हणजे 'ड्रॅगन फ्रुट'


'ड्रॅगन फ्रुट' या फळामध्ये ‘प्रोटिन’चे प्रमाण अधिक असते, त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते.  पांढऱ्या पेशी कमी झाल्यास डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला देतात. या फळाच्या सेवनाने शरीरातील ‘कोलेस्ट्रॉल’ नियंत्रित ठेवण्यास आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याबरोबरच पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. मूळ मेक्सिको देशातील ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया देशात केली जाते. कंबोडीया, तवान, मलेशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया याचबरोबर उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस याठिकाणीही याची लागवड होते. आता भारतातही याची लागवड वेगाने वाढते आहे. याशिवाय 'ड्रॅगन फ्रूट’ हे थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल व श्रीलंका या देशात लोकप्रिय आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ ही निवडुंग प्रकारातील वेल आहे. वरून लाल रंग व आतील गर पांढरा तसेच वरून लाल रंग व आतील गर लाल तसेच वरून पिवळा रंग व आतील रंग पांढरा अशा तीन प्रकारात हे फळ येते. हे फळ पित्तनाशक असल्याने आशियाई देशात याला ‘पिताया’ या नावानेही संबोधले जाते. या फळामध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण अधिक आहे. कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि ‘व्हिटॅमिन बी’ याचे प्रमाण या फळात मोठय़ा प्रमाणावर आहे. सौंदर्यप्रसाधनातही या फळाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. फेसमास्क, केसमास्क यात याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. हे फळ आंबट असले तरी यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. कर्करोगाला अटकाव करणारेही हे फळ आहे.अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून या फळाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. बाजारपेठेत या फळाची हमखास मागणी लक्षात घेता या फळाची शेतीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या फळपिकाला फार पाणी लागत नसल्याने दुष्काळी भागात याची लागवड वाढत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday 10 September 2020

16 सप्टेंबर: ओझोन दिन


संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाच्यावतीने 1995 पासून दरवर्षी 16 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला जातो. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1987 साली कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.  ओझोनच्या थरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा हा करार होता. आता ओझोन काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर पृथ्वीभोवती हा ओझोन वायूचा नैसर्गिक थर आहे. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचा  बचाव होतो. ओझोनचा थर हा आपल्या अवकाशात एका नाजूक पातळ थरासारखा असतो. ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो. ओझोनला एक तीव्र वास येतो. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे  रासायनिक सूत्र 03 असे लिहितात. क्रिस्टियन  फ्रेड्रिक स्कोएनवेल या जर्मन-स्वीस वैज्ञानिकाने  1840 साली ओझोनचा शोध लावला. पृथ्वीच्या  वातावरणात रोज 300 मिलियन टन ओझोन तयार  होतो.  पृथ्वीपासून 16 ते 50 किमीच्या पट्ट्यात ओझोनचा थर आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते.मात्र, क्लोरोफ्लोरो कार्बन, क्लोरीन आणि ब्रोमीनसारख्या गॅसचा परिणाम ओझोनच्या थरावर होतो. अंटार्क्टिकजवळ ओझोनच्या थराला छिद्र आहे. याचा आकार हा रशिया आणि कॅनडा या देशांचे क्षेत्रफळ एकत्र केल्यानंतर जेवढे क्षेत्रफळ होईल, त्याहीपेक्षा अधिक म्हणजे  290 लाख चौकिमी इतकं मोठं आहे. नासाच्या वैज्ञानिकांच्या मते वातावरणातील ओझोन वायू नष्ट करणाऱ्या पदार्थांचा पृथ्वीवर इतका प्रयोग बनत चाललेला आहे की, काही दशकातच वातावरणातील ओझोन वायूचा थर 40 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. मागील दोन दशकात ओझोनचा थर 2 ते 3 टक्क्यांनी कमी झालेला आहे. ओझोन थराचे संरक्षण करायचे असेल तर प्रदूषणाला आळा घालण्यासह जंगलाखालची भूमी सध्याच्या 3 ते 5 पट वाढविणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करणे, सी.एफ.सी.सारख्या हानिकारक वायूचे नियमन करणे, वाहनातून निघणाऱ्या धुराचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, यासारख्या उपाययोजना करणे जरुरी आहे. मित्रांनो, ओझोनच्या थराचा बचाव करण्यासाठी आपण सर्वांनीही हातभार लावायला हवा. शक्य तेवढा वाहनांचा प्रवास टाळावा. त्याशिवाय रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. हा दिवस आपल्याला पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचविण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीव करून देतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कवी अनिल


आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवँ अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १0 चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

कवी अनिलांचा जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९0१ रोजी मुर्तिजापूर ह्या गावी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्गसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर आणि ऑक्टोबर ६, १९२९ ला विवाहात परिणती झाली.

पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण केले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी घेतली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ही पदे त्यांनी भुषविली. असा मार्गक्रम करत असताना मराठी वायात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कवी अनिलांना इ.स. १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. ८ मे १९८२ रोजी त्यांचे नागपूर येथे निधन झाले.

फुलवात १९३२,भग्नमूर्ती (दीर्घकाव्य) १९३५, निर्वासित चिनी मुलास (दीर्घकाव्य) १९४३, पेर्ते व्हा १९४७ सांगाती १९६१, दशपदी १९७६ आदी साहित्य प्रसिध्द आहे. आत्माराम रावजी देशपांडे यांनी १९५८ साली मालवण येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.

Wednesday 9 September 2020

भारताची सारक्षरता 77.7 टक्के


नुकताच जागतिक साक्षरता दिन साजरा करतात आला.  व्यक्तीबरोबरच, समाजामध्येही साक्षरतेचे महत्त्व रुजवण्यासाठी युनोस्कोकडून दरवर्षी 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो. युनोस्कोच्या 14 व्या अधिवेशनात26 ऑक्टोबर1966 रोजी या दिनाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 8 सप्टेंबर 1967 ला पहिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा झाला.आपल्या देशाची साक्षरता 77.7 टक्के इतकी आहे. मात्र ही साक्षरता शहरी भागात जास्त म्हणजे 87.7 टक्के तर ग्रामीण भागात73.5 टक्के इतकी आहे. साक्षरतेमध्ये केरळने देशातील सर्वाधिक साक्षर राज्याचा लौकिक कायम ठेवला आहे. राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षणाच्या अहवालातून ही आकडेवारी जाहीर झाली. जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत केरळ  96.2 टक्के साक्षर असल्याचं अहवाल सांगतो. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून येथील साक्षरता 88.7 टक्के इतकी आहे. उत्तराखंड राज्यातील साक्षरता 87.6, हिमाचल प्रदेश 86.6, आणि आसाम 85.9 टक्के इतकी आहे. सगळ्यात कमी साक्षरता असलेल्या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश (66.4 टक्के), राजस्थान (69.7), बिहार (70.9), तेलंगणा (72.8), उत्तर प्रदेश(73) आणि मध्य प्रदेश (73.7) या राज्यांचा समावेश आहे.  यामध्ये महाराष्ट्राची साक्षरता 82.9 टक्के इतकी आहे. या कालावधीत संगणक असलेल्या घरांच्याही नोंदी घेण्यात आल्या होत्या. यात फक्त 27 टक्के घरांमध्ये संगणक असल्याचे आढळून आले आहे. यातही 23 टक्के शहरी भागात तर 4 टक्के ग्रामीण भागात संगणक असल्याचे अहवालावरून दिसून येते. संगणक साक्षर होण्यासाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण आता फक्त साक्षर होऊन चालणार नाही तर संगणक, स्मार्टफोन साक्षरही होणं गरजेचं झालं आहे. सध्याच्या घडीला आपल्या देशात जवळपास 50 कोटी स्मार्टफोनधारक आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या टाळेबंदीने शाळा-कॉलेज बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र सगळीच मुले-मुली काही या मार्गाने शिक्षण घेत नसले तरी संगणक आणि स्मार्टफोन यांची गरज लक्षात आली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday 8 September 2020

लिओ टॉलस्टॉय


सुप्रसिद्ध रशियन लेखक, तत्त्वज्ञ, प्रचारक आणि सुधारक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी तूला प्रांतातील यास्नया पल्याना या जहागिरीच्या ठिकाणी एका श्रीमंत सरदार घराण्यात झाला. कझ्ॉन विद्यापीठात १८४४ ते १८४७ पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी कॉकेशसमध्ये सैन्यात नोकरी केली. क्रिमियन युद्धात सिव्हॅस्तपोलच्या लढाईत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर मुख्यत: मॉस्को व पीटर्झबर्ग येथील आपल्या घराण्याच्या जहागिरीच्या ठिकाणीच राहिले. १८६२ मध्ये त्यांचा सोन्या (सोफ्या)या मध्यमवर्गीय मुलीशी विवाह झाला होता. विवाहोत्तर पहिली १५ वर्षे सुखाची गेली. या काळात त्यांना १३ अपत्येही झाली. तथापि त्याने स्वीकारलेल्या विशिष्ट धार्मिक-नैतिक जीवननिष्ठेमुळे त्याच्या कौटुंबिक जीवनात ताण निर्माण झाले. १८५२ मध्ये प्रकाशित झालेली टॉलस्टॉयची पहिली लेखनकृती द्येत्स्त्व ही त्याच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथत्रयीचा पहिला भाग होती; या कृतीतून तरुण टॉलस्टॉयच्या बुद्धीची व विचारांची प्रगल्भता लगेच नजरेस येते.

आत्मचरित्राचे दुसरे दोन भाग, ओत्रोचिस्त्व आणि यूनत्स, अनुक्रमे १८५४ व १८५६ मध्ये प्रसिद्ध झाले. या त्रयीत, त्याचप्रमाणे उत्रो पमेश्शिका आदी आपल्या आधीच्या लेखनकृतींतून टॉलस्टॉयने सामान्य माणसाचे जीवन आणि सरदार-जमीनदार आदींशी त्याचा संघर्ष यांचे चित्रण करण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. क्रिमियन युद्धात प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे आपल्या सिवास्तोदील्स्कीये रस्काझी (सिव्हॅस्तपोल स्टोरीज)मध्ये सदर युद्धाचे यथार्थ चित्र रेखाटण्यास त्यास मदत झाली. युद्धासंबंधीचा लेखी पुरावा या दृष्टीने या कथांचे महत्त्व आहेच; पण त्याशिवाय या कथांतून सदर युद्धातील वीरांच्या मनोव्यापारांचे ठळक विेषणही केलेले दिसते. हाच प्रकार १८६३ साली तरुण टॉलस्टॉयने लिहिलेल्या कझाकी (कोसॅक्स) या महत्त्वाच्या कादंबरिकेबाबतही प्रत्ययास येतो. शिक्षण आणि शिक्षणशास्त्र यांवर तरुण टॉलस्टॉयची निश्‍चित मते होती. आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी यास्नया पल्याना येथे १८४९ मध्ये त्याने शेतकर्‍यांच्या मुलांसाठी एक शाळा सुरू केली आणि यास्नया पल्याना याच नावाच्या नियतकालिकात त्यांनी १८६२-६३ या काळात अनेक लेख लिहिले. १८६३ ते १८६९ या काळात टॉलस्टॉयने आपली राष्ट्रीय महत्त्वाची प्रदीर्घ कादंबरी वॉर अँड पीस ही लिहिली. टॉलस्टॉयचा असा विश्‍वास होता, की असल्या गोष्टींत व्यक्तींना काही महत्त्व नसते; त्या अगदी नेपोलियन आणि कुतूझपसारख्या सेनानींइतक्या महत्त्वाच्या व शक्तिमान असल्या तरीही. इतिहासाकडून टॉलस्टॉय अँना करेनिना (१८७५-७७) या आपल्या पुढील कादंबरीत समकालीन समाजाकडे वळलेला दिसतो. या कादंबरीत सरदार घराण्यात जन्मलेल्या. परंतु, महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक अहंभावाने पछाडलेल्या उच्चभ्रू समाजाच्या ढोंगी नीतिमत्तेविरुद्ध लढा देणार्‍या एक रशियन स्त्रीची करुण कहाणी आहे. सामाजिक अंतर्विरोधांवर अचूक बोट ठेवून टॉलस्टॉयने हे दाखवून दिले आहे, की अँनासारख्या संवेदनशील, उत्साही व चैतन्यशील जीवाचा तत्कालीन रशियन समाजातील परिस्थिती व भेदक वास्तवता कसा कोंडमारा करून टाकते. तिचे आत्यंतिक दु:ख आणि करुण शेवट यांमागचे प्रमुख कारण हेच होते.

Monday 7 September 2020

सौंदर्य आणि गोरेपणा


सौंदर्य हे बघणार्‍याच्या दृष्टीत आणि स्वभावात असले पाहिजे. रंगावरून माणसे ओळखणार्‍यांच्या यादीत तरुणाईने आपले नाव का जोडावे, हेच कळत नाही. आज बॉलिवुड मध्ये काजोल, कोंकना सेन, दीपिका पदुकोन, प्रियांका चोप्रा, ईशा गुप्ता, मुग्धा गोडसे, लारा दत्ता, मलायका, बिपाशा, सुश्मिता सेन, रेखा, चित्रांगदा सेन, नंदिता दास, मराठीत सई ताम्हणकर, मेघा घाडगे, पल्लवी सुभाष, अमृता सुभाष, उषा जाधव अभिनयाच्या क्षेत्रात गाजलेली अशी कित्येक नावे घेता येतील. शिवाय शीतल मल्हार, मधू सप्रे, मेहर यातर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आघाडीच्या मॉडेल्स म्हणून यशस्वी राहिल्या. त्यांचा वर्ण गोरा नाही म्हणून त्यांचे कुठे काही अडले नाही की बिघडले नाही तर, आपले घोडे कसे काय अडेल?

यातलेच एक सकारात्मक उदाहरण द्यायचे झाले तर ते चित्रांगदा सेन या अभिनेत्रीचे देता येईल. तिने लाखो रुपयांची एका फेअरनेस क्रीमची जाहिरातही एकदा नाकारली होती. त्या वेळचे तिचे वक्तव्य होते, मला माझा हा सावळा रंग खूप प्रिय आहे. हीच माझी ओळख आहे. त्वचेच्या रंगावरून माणसे ओळखणार्‍या लोकांच्या यादीत मला माझे नाव नको आहे.

जगभरात सर्वात जास्त फेअरनेस क्रीम घेणारा भारत हा एकमेव देश असून हे मार्केट प्रचंड मोठे असल्याचे एका सर्वेक्षणातून अलीकडेच समोर आले. मुळात इथे सौंदर्याची गोरेपणाशी जोडली गेलेली व्याख्या नि मानसिकता बदलण्याची गरज आहे. याला विज्ञानाचा आधार देऊन सांगायचे झाले तर, आपण भारतीय वंशाचे लोक गोर्‍या रंगाचे होऊ शकत नाही. कारण आपल्या गुणसूत्रातच हा गव्हाळ किंवा सावळा रंग आहे. दुसरे म्हणजे आपल्या देशात सूर्यप्रकाशही खूप असतो. त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग असाच असणे ही नैसर्गिक गरज आहे. विशेष म्हणजे गव्हाळ किंवा सावळ्या रंगाची त्वचा ही वैद्यकीयदृष्टय.ाही सर्वात निरोगी त्वचा मानली जाते. कारण यात मॅलनीन या रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून आपले संरक्षणही होते. याउलट गोरी त्वचा ही मूळची रोगी समजली जाते. कारण यात मॅलनीन या रंगद्रव्याचा अभाव असतो.आपला गोरेपणाचा हव्यास कमी करण्याला आपल्या करिअरमध्ये ज्यांनी यशाची उच्चतम पायरी गाठली अशी वरील उदाहरणे नक्कीच कारणीभूत ठरतील, हा आशावाद. आपली ओळख ही आपली कला, गुण, स्वभाव, आपले वागणे-बोलणे, विचार आणि ते मांडण्यासाठीचा आत्मविश्‍वास यातून समोर येत असते. आणि समोरच्यांच्या कायमची लक्षातही राहत असते. यशस्वी होण्यासाठी रूपाची नव्हे टॅलेण्टची आवश्यकता असते. 

जेम्स अँडरसन 600 बळी


नुकत्याच संपलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत जेम्स अँडरसनने 600 बळींचा टप्पा गाठत नवा विक्रम नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी मिळवणारा तो पहिलाच जलदगती गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅग्रा 563 बळींपर्यंत पोहोचला. त्याआधी वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्शने 500 बळींचा टप्पा ओलांडला होता. अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे 514 बळी आहेत. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने 439 बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक 800 बळी मिळवले . दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे आहेत. म्हणजेच सर्वाधिक बळी मिळवणारे पहिले तीन फिरकी गोलंदाज आहेत. मात्र जलदगती गोलंदाजांमध्ये 600 बळींचा टप्पा गाठणारा अँडरसन पहिला गोलंदाज आहे.

क्रिकेटपटू होणं हे  स्वप्न असलेल्या अँडरसन मे 2003 मध्ये झिंबाव्वेविरुद्ध पहिली कसोटी खेळला. 156 कसोटी सामने खेळणार्‍या अँडरसनने 33,745 चेंडू टाकले आहेत. आजवर कोणत्याही जलदगती गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये एवढे चेंडू टाकलेले नाहीत. कर्टनी वॉल्श 30,019 चेंडूंसह दुसर्‍या स्थानी आहे. 30 जुलै 1982 रोजी जन्मलेल्या अँडरसनने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे 2002 मध्ये एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यात तो कसोटी खेळू लागला. पदार्पणानंतर काही काळातच अँडरसन इंग्लंडमध्ये बराच लोकप्रिय झाला. एकदिवसाच्या क्रिकेटपणे पदार्पण करण्याआधी अँडरसन फक्त पाच प्रथम श्रेणी सामने खेळला होता. त्याने काउंंटी खेळायलाही सुरूवात केली नव्हती. इंग्लंडच्या एकदिवसीय संघातलाही तो प्रमुख खेळाडू होता. मात्र 2015 च्या विश्वचषकानंतर तो 50 षटकांचे सामने खेळलेला नाही. अँडरसन इंग्लंडचं कसोटी क्रिकेटमधलं अस्त्र बनला.

अँडरसनची सुरूवात झोकात झाली नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं पदार्पण म्हणावं तितकं गाजलं नव्हतं. इंग्लंडच्या संघात स्वत:चं स्थान पक्कं करण्यासाठी तब्बल पाच वर्षं लागली.  उमेदीच्या काळात अँडरसन खूप वेगात गोलंदाजी करायचा. बरेचदा त्याच्या चेंडूची गती 140 किलोमीटर प्रति तास या पेक्षाही अधिक असायची. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वेगाच्या बळावर बळी मिळवता येत नाहीत. वेगासोबतच चेंडूची दिशा आणि टप्प्याला खूप महत्त्व आहे. कालांतराने अँडरसनचा वेग कमी झाला. मग त्याने अधिकाधिक बळी मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं. फलंदाजांना गोंधळात टाकणार्‍या आणि अडचणीत आणणार्‍या चेंडूवर त्याने प्रभुत्व मिळवलं. या सगळ्याचं फळ अँडरसनला बळींच्या रुपात मिळत गेलं. तो यशाची एक, एक पायरी चढत गेला. बळींचं शतक, द्विशतक, त्रिशतक गाठत तो आता 600 बळींपर्यंत पोहोचला आहे. सचिन तेंडुलकरसारख्या जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाला अँडरसनने कसोटीत नऊ वेळा बाद केलं असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. म्हणूनच ग्लेन मॅग्राने त्याला गोलंदाजीतला सचिन तेंडुलकर म्हटलं असावं!


भाऊ दाजी लाड


भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते होते. लाडांचा जन्म १८२२ साली तत्कालीन पोतुर्गीज गोव्यात मांद्रे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांपश्‍चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाडदेखील शिकून पुढे डॉक्टर बनले. शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ.य अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्‍चितीबद्दल, तसेच गुप्तकालीन इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. १८५0 साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणार्‍या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते. १८५१ साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले. त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, र्जमनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह व स्त्रीशिक्षण यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले. ३१ मे, १८७४ रोजी लाडांचे निधन झाले.

Sunday 6 September 2020

दिमाखदार शिंगांचा सांबर


भारतातील सर्वात मोठे हरीण म्हणून सांबराचा क्रमांक लागतो. दिमाखदार शिंगांचा पसारा मिरवत रानातून ऐटीत चालणारा नर सांबर बघणे म्हणजे नेत्रसुख असते.जगात सांबरांचा आढळ भारतीय उपखंड, दक्षिण चीन व आग्नेय आशियातील देशांत आहे. साधारण भेकराचा व याचा आढळ एकाच प्रदेशात आहे. जगात सांबराच्या एकूण सात उपप्रजाती अस्तित्वात आहेत. भारतातील उपप्रजाती सर्वात मोठी असून त्यांचा आढळ पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेश व हिमालयातील अतिउंच भाग सोडले तर देशात सर्वत्र आहे. रुसा युनिकलर असे शास्त्रीय नाव असलेल्या सांबाराला अन्य भाषांत सांबर (हिंदी),कुडू मार्न (तमिळ), कुलाय मार्न (मल्याळम), कुडावे (कन्नड), सुत (बर्मिज) अशी नावे आहेत. महाराष्ट्रात सांबरांचा आढळ मुख्यत्वे सह्याद्रीच्या रांगा, कोकण, सातपुडा व विदर्भाच्या बहुतांश भागात आहे. सांबराचे वास्तव्य उष्णकटिबंधीय सदाहरित व पानगळी तसेच उप-उष्णकटिबंधीय जंगलात असते. विशेषतः डोंगर,दऱ्या व टेकड्या असलेल्या भागात त्याचे वास्तव्य असते.

भारतीय नर सांबाराची खांद्यापाशी उंची 5 फुटापर्यंत व वजन 225 ते 320 किलोपर्यंत असते. शिंगांची लांबी 36 ते 38 इंच इतकी असते. सांबाराची शिंगे मजबूत असतात. सांबर चार वर्षांचे होईपर्यंत पूर्ण लांबीची शिंगे येतात. दरवर्षी आधीची शिंगे गळून नवीन शिंगे येतात. एखाद्या दरीतील रानावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी दोन नर सांबरांमध्ये लढाई होऊ शकते. विणीचा काळ वगळता नर सांबर एकटेच राहतात. माद्या व पिल्लेसुद्धा साधारणतः5-6 पेक्षा जास्त संख्येने एकत्र दिसत नाहीत. सांबर अतिशय मजबूत असते. प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकते. त्वचेवरील केस खरखरीत ,लांब, दाट व थोडे विस्कटलेले दिसतात. उष्ण हवामान असल्यास केस कमी दाट असतात. प्रौढ नरांमध्ये मानेभोवतीचे केस अधिक लांब असतात. व लहानशा आयाळीसारखे भासतात. पोटाकडचा भाग थोडा फिका असतो. नरांचा रंग वयानुसार गडद व काळपट तपकिरी होत जातो.

सांबराचे अन्न म्हणजे गवत,पाने व विविध प्रकारची फळे. संध्याकाळपासून पहाटेपर्यंत मुख्यतः रात्रीच्या वेळी सांबर चरतात. जंगलातील वनस्पतींच्या वाढीवर पुरेसे नियंत्रण ठेवण्याचे व विष्टेतून बीजप्रसार करण्याचे  काम सांबर करतात. वाघ,सिंह,  बिबट्या, रानकुत्रा व मगर यांसारख्या प्राण्यांचे ते भक्ष्य आहे. दाट जंगलात राहत असल्याने सांबाराला शत्रूपासून बचाव करण्यासाठी तीव्र श्रवणेंद्रिये व घ्राणेंद्रियांचा उत्तम उपयोग होतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

सातारा: जैवविविधतेनं नटलेला परिसर


साताऱ्याला ऐतिहासिक वारसा असला तरी खऱ्या अर्थाने सातारा जगाच्या दृष्टीने प्रकाशमय झालं कोयना प्रकल्प आणि कास पठारानं. कासचं पठार जैवविविधतेनं नटलेलं समृद्ध ठिकाण. उत्तराखंडातील जगप्रसिद्ध 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'प्रमाणे कास पुष्पपठाराची कीर्ती सर्वत्र दरवळत आहे. साताऱ्यापासून अवघ्या 25 कि.मी. अंतरावर असणाऱ्या या पठारावर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत निरनिराळ्या पुष्पांची लयलूट सुरू असते. काही वर्षापूर्वी तर कशाला कुसळं बघायला निघालाय का, अशी हेटाळणी होत होती, पण आता इथलं चित्र बदललं आहे. साताऱ्यातील दुसरे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे Power House of Maharashtra म्हणजे कोयनानगर, तेथील धरणाचे स्थान अन् विशाल शिवाजी सागराचा जलाशय बघितला, तर डोळे दिपून जातात. माणूस नतमस्तक होतो. पूर्वी प्रकल्पाचा टप्पा, येथील तंत्रप्रणाली, Operative System पाहण्याची परवानगी मिळत असे, परंतु दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता हा भाग अतिसंवेदनशील म्हणून गणला गेला आहे. तेथील भव्य नेहरू स्मारक उद्यान, तेथील हिरवळ डोळ्यात साठवत मनुष्य निसर्गाच्या प्रचंड वेगापुढे नतमस्तक होतो. तेथे आता या प्रकल्पाची Documentary दाखवली जाते अन् हा प्रकल्प महाराष्ट्रास कसा प्रगतीपथावर नेत आहे. हे दाखवले जाते. 13 मार्च 1999 रोजी प्रथम लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयत्न कण्यात आला. त्यामुळे जलाशयाच्या खालून 4 किमी.दा बोगदा तयार करून पाण्याचा प्रवाह नेऊन वीजनिर्मिती करण्यात आली. त्यानंतर 2012 मध्येही लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच चाळकेवाडी येथे पवनऊर्जा केंद्र उभारण्यात आले. तिथे आत जाऊन पवनचकीतील सर्व ऊर्जा पद्धतीबद्दल माहिती घेऊ शकतो. ठोसेघर हे सजनगड-चाळकेवाडी मार्गावरील धबधब्याचे एक रम्य ठिकाण.  येथील अपघातांची संख्या लक्षात घेता येथे चारही बाजूंनी संरक्षक कठडा उभारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाची कास धरणारा हा जिल्हा आध्यात्मिक क्षेत्रातही मानाचा आहे. औंध येथे डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे. तेथील राजवाडा, वस्तुसंग्रहालय, आर्ट गॅलरी, पाली, तारळी नदीकाठी वसलेले खंडोबाचे जागृत देवस्थान, माहुली, श्रीमंत शाहू महाराजांची समाधी व इतर राजघराण्यातील समाधी, यवतेश्वर, मंगळागौरी, राधाशंकर, बिल्वेश्वर, रामेश्वर मंदिर, सज्जनगड, यवतेश्वर, वाई, सीतामाई डोंगर, वाल्मिकी, शिखर शिंगणापूर, कुरणेश्वर या पर्यटनस्थळांची यादी संपता संपत नाही, पण सातारा हा पाचगणी अन् महाबळेश्वर या HII Stations (थंड हवेचे ठिकाण) शिवाय अपूर्ण आहे. येथील सर्व पॉईट, जॅमचे कारखाने, घोडेस्वारी, टेबल लँड, स्ट्रॉबेरीची शेती, थंडगार धुके, दवाची रजई अन् धबधब्याच्या तुषारांनी पुलकित झालेले मन सहज म्हणून जाते, 'महाराष्ट्राचा स्वर्ग कुठे आहे, तर साताऱ्यातील पाचगणी-महाबळेश्वरला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


विशाखापट्टणम: एक पोर्ट सिटी


पूर्वेला बंगालच्या खाडीवर पसरलेले सोनेरी वाळूचे लांबच लांब किनारे, हिरव्यागार-डोंगर-दऱ्यांचा तिहेरी वेढा आणि एका बाजूला स्वच्छ चमकणारा निळाशार समुद्र. यांच्यामध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक लेणं घेऊन उभं राहिलं आहे एक सुंदर शहर! आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम! 'पूर्व किनारपट्टीवरील गोवा' म्हणून ही याची ओळख आहे. विशाखापट्टणमचं निक नेम किंवा स्थानिक नाव आहे वायजॅग. निसर्गतःच लाभलेलं मोठं बंदर यामुळे त्याला 'पोर्ट सिटी' असंदेखील म्हणतात. जहाज बांधणीच्या पूर्वापार चालत आलेल्या कारखान्यांमुळे त्याला 'जहाज बांधणीचे माहेरघर' असेही आवर्जून म्हटले जाते.  'विशाखा' या युद्धदेवतेच्या विशाखापट्टणम नाव पडले, असे स्थानिक सांगतात. तर काही ठिकाणी राजा विशाख वर्मा यांच्या नावावरून हे नाव रूढ झाल्याचे म्हटले जाते. विशाखापट्टणम हे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरानंतरचे (Twin cities) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे  तर चेन्नई व कोलकाता शहरांनंतर पूर्वेकडील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तेलगू इथली मातृभाषा आहे. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विशाखापट्टणम हे देशातील मोठे बंदर म्हणून ओळखले जाते. सर्वात मोठी गोदी इथे आहे. आजदेखील या बंदरातून मोठ्या प्रमाणात व्यापार व दळणवळण होते. भारताच्या नकाशावर सुरक्षेच्या दृष्टीने या शहराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ब्रिटिश काळात दुसऱ्या महायुद्धात जपानने तर 1972 मध्ये भारत-पाक युद्धात पाकने विशाखापट्टणमला लक्ष्य केले होते. आजच्या घडीला मात्र भारतीय संरक्षण दलाचे ते हृदय आहे. कारण हे शहर पूर्व किनाऱ्यावरील भारतीय नौदलाचे पूर्वेकडील मुख्यालय आहे. त्याचबरोबर नौदल विज्ञान विभाग आहे. 

भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतची उभारणी इथे झाली. पोलाद कारखाने व इतर सार्वजनिक क्षेत्रातील अनेक सरकारी प्रकल्प येथे आहेत. औद्योगिक विकासात विविध खनिज उत्पादनदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडते. समुद्र किनारे,काली टेंपल (मंदिर), विशाखा म्युझियम पाहण्यासारखे आहे. येथील आणखी एक आयएनएस कुरुसुरा हे सबमरीन म्युझियम पाहण्यासारखे आहे. हे आशियातील अशा प्रकारचे पहिलेच म्युझियम आहे. सोव्हिएत बांधणीची आयएनएस कुरुसुरा ही 1969 मध्ये नौदलात रुजू झाली व 2001 मध्ये 31 वर्षानंतर भारताची अखंड सेवा केल्यानंतर तिचे रूपांतर म्युझियममध्ये करण्यात आले. म्युझिकल फाऊंटन असलेला वुडा पार्क, कृत्रिम बर्फावरील स्केटिंग, विनायक मंदिर,इंदिरा गांधी झूलॉजीकल पार्क पाहण्यासारखे आहेत. तेराव्या शतकातील 130 मीटर उंचीवरील कैलासगिरी येथील भव्य शंकर-पार्वती यांची शुभ्र मूर्ती विलोभनीय आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली