Saturday 27 February 2021

आता सुगंधी द्राक्षे


नाशिक जिल्ह्यानंतर द्राक्षे उत्पादनात सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागतो. अशा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार द्राक्ष उत्पादनाची नस सापडली आहे. आता त्यातही या शेतकऱ्यांनी थक्क करणारे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. वाढत्या स्पर्धेचा दरावर परिणाम होतो, त्यामुळे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पकता शेतकरी दाखवत आहेत. यातूनच चक्क सुगंधी द्राक्षांचे वाण विकसित झाले आहे. ही द्राक्षे खाल्ल्यानंतर जिभेवर गुलकंद आणि करवंदाचा स्वाद पसरतो. ही ‘गुलकंद्राक्षे’ चर्चेची आणि कुतूहलाची ठरली आहेत.

 सांगली जिल्ह्यात द्राक्षातून शेतकरी चांगले उत्पन्न घेत आहेत. अगदी जिल्ह्याच्या जतसारख्या दुष्काळी तालुक्यातही द्राक्षे पीक जोमाने घेतले जात आहे. परदेशात निर्यातक्षम द्राक्षे जिल्ह्यात पिकवली जात आहेत.  हमखास उत्पादनाचे इंगित सापडल्यानंतर काही द्राक्षगुरूंनी वेलींवर कलमे करत वेगवेगळ्या जातींची पैदास सुरू केली. त्यातूनच खास सांगलीच्या अशा काही जाती देशभरात नावारूपाला आल्या. त्यातही शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्पर्धा चालते. हटके काही तरी करण्याच्या महत्त्वाकांक्षेतूनच मणेराजुरी (ता. तासगाव) येथे सुगंधी द्राक्षांची बाग फुलवली. सुरुवातीला यासाठीच्या द्राक्षकाड्या केरळमधून आणल्या. उर्वरित सर्व लागवड, खत-पाणी, औषधे मात्र स्थानिकच आहेत. ही द्राक्षे काळ्या रंगाची आहेत. शेतकऱ्याने स्वत:च्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून त्यांचे नामकरण केले आहे. ती खाताक्षणी जिभेवर संमिश्र स्वाद पसरतो. काही क्षणातच लक्षात येते, अरे हा तर गुलकंद! अर्थात, त्यामध्ये काहीसा डोंगरी करवंदांचा स्वादही मिसळला आहे. 

पुणे जिल्ह्यात यापूर्वी सुगंधी द्राक्षांचा प्रयोग झाला होता, पण ती चेरीच्या आकाराची होती. सांगलीतील द्राक्षे मात्र मोठ्या आकाराची व रसाळ आहेत. द्राक्षप्रेमींची पसंती बिनबियांच्या द्राक्षांना असली तरी, सुगंधी द्राक्षे मात्र बियांची आहेत. या बिया औषधी गुणधर्माच्या असल्याचा दावा केला जातो. द्राक्षांना चारपट जास्त दरही मिळाला. द्राक्षे पाहता-पाहता विकली गेली. जानेवारीमध्ये बाग संपलीदेखील!व्यावसायिक स्पर्धा टाळण्यासाठी या शेतकऱ्याने वाणाचा फारसा गाजावाजा केला नाही, पण स्वत:च्या नावाने बाजारात आणली. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्याने या वाणाची माहिती दिली. सुरुवातीची काही वर्षे यातून मजबूत उत्पन्न मिळवायचे, यासाठी त्याची माहिती इतरांना न देण्याचे व्यावसायिक गुपित त्याने राखले आहे. इतर बागायतदार कलमे मागण्यासाठी गर्दी करतील, यासाठी स्वत:चे नाव प्रसिद्ध न करण्याची काळजी घेतली आहे.

सर्वात कमी लोकसंख्येचे देश

सर्वात  जास्त लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर आपल्याच देशाचा क्रमांक लागतो. त्यामुळे लोकसंख्यावाढ हा आपल्या देशासमोरील काही गंभीर प्रश्नांपैकी एक आहे. मात्र, जगात काही असेही देश आहेत ज्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. अर्थातच या देशांचा आकारही लहान आहे. अशा देशांमध्ये अव्वल स्थानावर आहे व्हॅटिकन सिटी. तेथील लोकसंख्या अवघी ४५१ आहे! संयुक्त राष्ट्रसंघाने 'देश' म्हणून मान्यता दिलेला व्हॅटिकन सिटी हा सर्वात छोटा देश आहे. अवघ्या ४५१ लोकसंख्येचा हा चिमुकला देश असला तरी तो पोपचे निवासस्थान असल्याने जगभरातील ख्रिश्चन लोकांसाठी महत्त्वाचा आहे.1,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व्हॅटिकन सिटीची या देशाची नोंद जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश अशी आहे. व्हॅटिकन सिटी या देशाचे क्षेत्रफल 0.17 चौरस मैल ईतकेच आहे. ईटलीतील रोमच्या शहरात वसलेला व्हॅटिकन हा देश पोपने निर्माण केला आहे. देशामध्ये राहणारे नागरिक एकतर पाळक, राज्य अधिकारी किंवा स्विस गार्डचे सदस्य आहेत.  तेथील सेंट पीटर्स स्क्वेअर, सिस्टीन चॅपेल आणि अनेक वस्तुसंग्रहालये पाहण्यासाठीही रोज जगभरातील पर्यटक तिथे येत असतात. सर्वात कमी लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणजे ऊ आहे. सन २००० मध्ये हा देश संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य बनला. तिसऱ्या स्थानावर आहे पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरातीलच नौरू हा देश. हा देशही एक बेटच असून त्याची लोकसंख्या ११,३४७ आहे. जगातील सर्वात दुर्गम देशांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याच्या सर्वात जवळ असलेले बनाबा हे बेटही तीनशे किलोमीटर अंतरावर आहे!


Friday 26 February 2021

महिला माहेरच्या व्यक्तीला आपली संपत्ती देऊ शकते

एक विधावा महिला आपल्या माहेरच्या व्यक्तीला वारस म्हणून आपल्या मालकीची संपत्ती देऊ शकते असे संपत्ती संदर्भातील एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देताना म्हटले आहे.

न्यायालयाने हिंदू सक्सेशन अँक्टअंतर्गत कायदेशीर भाषेत हिंदू विधवा महिलेच्या माहेरच्या लोकांना अनोळखी म्हणता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच या व्यक्तींना महिला तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या मालकीची संपत्ती सोपवू शकते, असेही म्हटले आहे. गुरुग्राममधील एका कौटुंबिक प्रकरणासंदर्भातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

या खटल्यामध्ये हिंदू महिलेने पतीकडील संपत्तीच्या वारसांमध्ये माहेरच्या व्यक्तींचा वारस म्हणून समावेश केला होता. महिलेच्या या निर्णयाविरोधात तिच्या दिराने आणि त्याच्या मुलांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही महिलेच्या माहेरच्या व्यक्तींना तिच्या कुटुंबाचा भागच समजण्यात यावे. कलम १५ (१)(ड) चा उल्लेख करत न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यामूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

महिलेने आपल्या कौटुंबिक वादामध्ये आपल्या भावाच्या मुलांना वारस म्हणून जाहीर केले होते. या निर्णयाला या महिलेच्या दिराने विरोध केला होता. दिराच्यावतीने त्यांच्या मुलांनी याचिका दाखल करुन वारस म्हणून भावाच्या मुलांचा सहभाग केला जाऊ नये अशी मागणी केली होती. गुरुग्राममधील बाजिदपूर तहसीलमधील गढीगावातील हे प्रकरण आहे.

या गावातील ग्रामस्थ असणार्‍या बदलू यांना राम आणि शेर सिंह ही दोन मुले आहेत. १९५३ साली शेर सिंह यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी जगनो यांनी आपल्या वाट्याची जमीन भावाच्या मुलांच्या नावे केली.

Thursday 25 February 2021

भारतातले तुरुंग ओव्हरफुल्ल


एका अहवालासाठीच्या पाहणीत आपल्या देशातील तुरुंगांची सरासरी ‘निवासव्यवस्था’ ११७ टक्के इतकी आढळली. म्हणजे तुरुंगाची क्षमता १०० कैद्यांची असेल तर प्रत्यक्षात त्यात सर्रास ११७ इतके कैदी डांबलेले आढळले. यातही उत्तर प्रदेश हे राज्य तर खासच. कारण या राज्यातील तुरुंगात एकूण क्षमतेपेक्षा त्यात डांबण्यात आलेल्यांचे प्रमाण तब्बल १७६.५ टक्के होते. ‘द इंडियन जस्टिस रिपोर्ट २०२०’ने दाखवून दिल्यानुसार यातील धक्कादायक बाब म्हणजे या इतक्या कैद्यांतील ७० टक्के वा अधिक हे ‘कच्चे कैदी’ आहेत. म्हणजे ते आरोपी आहेत. पण गुन्हा सिद्ध झालेला नाही. गेल्या पाच वर्षांत या अशा कच्च्या कैद्यांची संख्येत सतत वाढ होत असल्याचे २३ राज्यांतील तुरुंगवासींच्या तपशिलातून दिसते. उत्तराखंडातील तुरुंगात क्षमतेच्या १५९ टक्के कैदी आहेत आणि त्यातील ६० टक्के कच्चे आहेत, मध्य प्रदेशात हेच प्रमाण १५५ टक्के आणि ५४ टक्के असे आहे तर महाराष्ट्रात १५३ टक्के आणि ७५ टक्के इतके आहे. गुजरातेत तुरुंगातील कैद्यांचे प्रमाण तुलनेने कमी (११० टक्के) म्हणायचे पण त्या राज्यात कच्चे कैदी मात्र ६५ टक्के इतके आहेत. कमीअधिक प्रमाणात जवळपास सर्वच राज्यांत अशीच परिस्थिती असल्याचे या अहवालात आढळले. अगदी ईशान्येकडील अरुणाचल वा मेघालय ही राज्येही यास अपवाद नाहीत. मेघालयासारख्या तुलनेने शांत म्हणता येईल अशा राज्यातील तुरुंग १५७ टक्के इतके भरलेले आहेत. पण काळजीचा मुद्दा असा की त्यातील ८४ टक्के प्रचंड फक्त कच्चे कैदी आहेत. 

उपकर आणि सरचार्ज यातील फरक


कराच्या वर लावलेल्या करांना उपकर असे म्हणतात.  हे विशेषतः विशिष्ट कारणांसाठी लावले जाते.  एकदा त्याचा हेतू पूर्ण झाला की तो मागे घेतला जातो.  उपकरांमधून मिळालेली रक्कम इतर राज्य सरकारांबरोबर केंद्र सरकार सामायिक करत नाही आणि त्यातून मिळालेल्या करातील सर्व रक्कम आपल्याजवळ ठेवते.  2021-22 च्या बजेटमध्ये केंद्र सरकारने कृषी उपकर लावला आहे.

उपकर लादण्याचा उद्देश फक्त एक विशिष्ट हेतू, सेवा किंवा क्षेत्र विकसित करणे आहे.  म्हणजेच कोणत्याही जनकल्याणकारी कामांसाठी अर्थ व्यवस्थेचा हा उपकर लादण्याचा उद्देश आहे.  शेतीच्या विकासासाठी कृषी कल्याण उपकर आणि प्राथमिक शिक्षण उपकर हे देशातील प्राथमिक शिक्षणाच्या विकासासाठी आहेत.  उपकरांमधून मिळालेली रक्कम प्रथम भारतीय समेकित कोषात ठेवली जाते, त्यानंतर त्यासाठी संबंधित निधी योजना बनविली जाते आणि ती रक्कम त्या फंडाकडे पाठविली जाते.
नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार;  केंद्र सरकारला सन 2017-18 मध्ये उपकरांच्या माध्यमातून 2,14,050 आणि आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये उपकर म्हणून 2,35,307 कोटी रुपये मिळाले होते.  नियमानुसार उपकरांची रक्कम ज्या विशिष्ट हेतूने आकारली गेली आहे त्यासाठी खर्च केला पाहिजे, परंतु ही रक्कम इतर कोणत्याही कामात खर्च झाल्याचे दिसून आले आहे.
एका संसदीय समितीने म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2017-18 च्या अखेरीस उपकरातून 86,440 कोटी रुपये जमा झाले होते, त्यापैकी केवळ 29,645 कोटी रुपये भारतीय एकत्रित निधीमध्ये हस्तांतरित करण्यात आले होते.  याचा अर्थ असा की उपकर फंडाचा उपयोग इतर कारणांसाठी केला गेला आहे.
अधिभार (सरचार्ज) म्हणजे कोणत्याही करावर आकारला जाणारा अतिरिक्त कर, जो आधीपासून भरलेल्या करांवर आकारला जातो.  म्हणून त्याला अधिभार देखील म्हणतात.  हे अधिभार प्रामुख्याने वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट आयकर वर आकारला जातो.  भारतातील अधिभार मुख्यत: व्यापाऱ्यांवर आकारले जात होते, परंतु सन 2013 पासून ते उच्च उत्पन्न मिळवणार्‍यांवर केले जाऊ लागले.

ज्ञानाचे अनमोल कण


१. व्हॅक्सीन जगभरात वितरण करण्यासाठी कोणत्या भारतीय कंपनीने युनिसेफबरोबर भागीदारी केली आहे.

२. जगातील सर्वात भव्य पवन ऊर्जा प्लांट कोणता देश उभारणार आहे.

३. कोणत्या राज्यात वाघांसाठी तेथील पाचवे संरक्षित राखीव क्षेत्र स्थापण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे.

४. आपल्या १०० व्या क्रिकेट कसोटीत वैयक्तिक स्तरावर नुकतेच द्विशतक झळकावून इतिहास रचणारा खेळाडू कोण.

५. विमान वाहतुकीतील एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंतचे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणत्या शहरातले आहे.

६. युरेनियमचा साठा २० टक्क्यापर्यंत करण्याची योजना नुकतीच कोणत्या देशाने आखली आहे.

७. दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेल्या देशाचे नाव काय.

८. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यंदा कोणाला जाहीर करण्यात आला आहे.

९. मुंबई क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकपदी नुकतीच कोणत्या माजी गोलंदाजाची निवड करण्यात आली. आहे.

१०.अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे ओबामा प्रशासनात कोणत्या पदावर कार्यरत होते.

उत्तरे-1) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 2).दक्षिण कोरिया 3) तामिळनाडू4) जो रूट 5) नवी दिल्ली 6) इराण 7) रशिया 8) रंगनाथ पठारे 9) रमेश पोवार10) उपराष्ट्राध्यक्षपदी

ज्वाला गुट्टाची कामगिरी


भारतीय महिला बॅडमिंटनला ज्या काही मोजक्या बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गती दिली, प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यामध्ये ज्वाला गुट्टाचा समावेश होतो. अर्थात ज्वालाला एकेरीमध्ये सायना नेहवाल अथवा पी.व्ही.सिंधूएवढी बाजी मारता आली नसली तरी तिने दुहेरीमध्ये मात्र भरीव कामगिरी केली. अशा या ज्वालाला भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये वारंवार वर्णद्वषाला सामोरे जावे लागते, ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. अलीकडेच ज्वालाच्या आजीचे चीनमध्ये निधन झाले. ज्वालाने सोशल मीडियावर ही दु:खद बातमी देऊन शोक व्यक्त केला. त्यानंतर आपल्याला वर्णद्वेषी टोमणे खावे लागत आहेत अशी उद्विग्नता ज्वालाने व्यक्त केली आहे. अनेकांनी तिला 'कोरोना व्हायरसला तू ‘कोव्हिड' ऐवजी 'चायनीज व्हायरस' का म्हणत नाहीस?, असे असंबंधित आणि खोचक शेरे मारले. या वर्णद्वषी टोमण्यांनी हैराण झालेल्या ज्वालाने, या देशात सहानूभूती, सांत्वन नावाचा प्रकार आहे की नाही? असा अगतिक सवाल करून जे लोक टोमण्यांचे समर्थन करतात त्यांना लाज वाटायला हवी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या एकूण घटनेची आपण पार्श्वभूमी समजून घेऊ. ज्वालाचा जन्म वर्धा (महाराष्ट्र) येथे ७ सप्टेंबर १९८३ रोजी झाला. विशेष म्हणजे तिची आई चिनी वंशाची आणि वडील खेळीयाड तेलगू भारतीय आहेत. ज्वालाचे वडील क्रांती गुट्टा हे मूळचे आंध्र प्रदेशमधील गुंटूरचे. स्वातंत्र्यचळवळीत त्यांचे घराणे अग्रेसर होते आणि ते डाव्या विचारणीचे आहेत. ज्वालाची आई येलन यांचा जन्म चीनमध्ये झाला. येलन या चिनी गांधीवादी विचारवंत झेंग यांची नात. १९७७ मध्ये प्रथमच येलन आपल्या आजोबांबरोबर वर्धा येथील सेवाग्राम गांधी आश्रमाला भेट। देण्याच्या निमित्ताने भारतात आल्या आणि इथेच रमल्या. येलन यांनी महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचे आणि इतर लेखनाचे चिनीमध्ये भाषांतर केले. तेथेच त्यांची ओळख क्रांती गुट्टा यांच्याशी झाली आणि हे दोघे विवाहबध्द झाले. या जोडप्याला ज्वाला आणि इंसी अशा दोन मुली. दरवर्षी येलन आपल्या मुलींना घेऊन चीनमधील आपल्या गावाला जायच्या आणि आपल्या आई-वडिलांना भेटायच्या. मात्र कोरोना काळात २०२० मध्ये त्यांना चीनमध्ये जाता आले नाही. आणि त्यातच त्यांच्या आईचे चीनमध्ये निधन झाले. चीनमध्ये टेबल टेनिसनंतर बॅडमिंटनचे खूप प्रस्थ. त्यामुळे येलन कधीकाळी बॅडमिंटन खेळल्या असाव्यात. ज्वाला प्रारंभी टेनिस खेळायची. पण येलन यांनी तिला बॅडमिंटन खेळण्यास प्रवृत्त केले. बॅडमिंटन प्रशिक्षक एस.एम.अरिफ यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे धडे गिरवलेल्या ज्वालाने अल्पावधीतच राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. ज्वालाने २००२ ते २००८ या कालावधीत श्रुती कुरियनच्या साथीने सलग सात वर्षे महिला दुहेरीचे अजिंक्यपद आपल्याकडे राखले होते. ज्वालाने ऑलिंपिक वगळता इतर सर्व बॅडमिंटन स्पर्धामध्ये दुहेरीत अजिंक्यपदे किंवा पदके मिळवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना ज्वालाने दुहेरी आणि मिश्च दुहेरीमध्ये ३१५ सामने जिंकले. हा एक विक्रम आहे. जागतिक क्रमवारीत तिने सहाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. बॅडमिंटनमधील चमकदार कामगिरीमुळे ज्वालाला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी तिचा विवाह झाला आणि नंतर घटस्फोटही. त्यानंतर तिचे नाव माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरूदीनशी जोडले गेले. आता एका तेलगू अभिनेत्याशी तिचा साखरपुडा झाला आहे. चीन हा भारताचा 'शत्रू नंबर वन' हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याचा राग ज्वालावर काढणे योग्य नाही. डोकलाम, गलवानच्या चकमकीनंतर ज्वाला गुट्टावर सातत्याने आक्षेपार्ह टोमण्यांची खैरात होत आहे. चीन कितीही हलकट असला आणि ज्वालाची आई चिनी असली तरी यात तिचा काय गुन्हा? ज्वाला तर भारतीय वंशाची आहे, भारतीय आहे. ही गोष्ट टोमणे मारणाऱ्यांनी लक्षात घेऊन ज्वालाला मानसिक त्रास देण्याचे प्रकार त्वरित थांबवले पाहिजेत.


Sunday 21 February 2021

थंड हवेचे ठिकाण:चिखलदरा

 


महाराष्ट्रातील विदर्भाला नैसर्गिक साधनसंपत्तीचे विपुल वरदान लाभलेले आहे. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुड्याच्या एकूण सात पर्वतरांगा आहेत. त्यापैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आहे. अमरावतीपासून चिखलदरा 94 किलोमीटर अंतरावर आहे.विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण अशी चिखलदराची ओळख आहे. येथील दऱ्या हजारो फूट खोल आहेत. एका दरीच्या वरील भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केल्याने त्याला भीमकुंड' असे नाव पडले, असे म्हणतात. येथे मोर, अस्वले, रानकोंबड्या, हरिण हे

प्राणीही मुक्तपणे बागडत असतात. चिखलदऱ्याचा परिसर शुष्क पानझडी वनाच्या प्रकारात येतो. त्यामुळे, उन्हाळ्यात येथे पानझड सुरू होते. येथील शक्कर तलाव, मछली तलाव, देवी तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पंचबोल पॉइंट (युको पॉइंट) ही चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यानंतर पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा पॉइंटही प्रसिद्ध आहे. चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर अंतरावर डोंगरावर विराट देवीचे मंदिर आहे. चिखलदऱ्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर बहामनी किल्ला आहे. आपण हा किल्लाही पाहू शकतो. तो पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. या किल्ल्यात जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा आहेत. किल्ल्याची दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. उन्हाळ्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून तर चिखलदरा लोकप्रिय आहेच. याशिवाय, पावसाळ्यातील सुंदर धबधबे, ढगांमध्ये गेलेल्या पर्वतरांगांमुळे चिखलदरा अतिशय विलोभनीय दिसते.मेळघाटचा परिसर व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. चिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Friday 19 February 2021

सनई वाद्य


सार्वजनिक समारंभ, मिरवणुका, विवाहादी शुभप्रसंगी वाजविले जाणारे सनई हे तोंडाने फुंकून वाजविण्याचे  एक मंगलवादय आहे. पूर्वी महराष्ट्रात राजे-महाराजांचे प्रासाद व देवळांतून सनई-चौघडा वाजविण्याची प्रथा होती. त्याकरिता राजप्रासाद व मंदिरांसमोर नगारखाना ही वास्तू बांधलेली अनेक मोठया मंदिरांतून आढळते,

मोठ्या मोठ्या मंदिरातून सनईवादकांकडून पहाटेच्या वेळी सनईवर संगीत वाजवून घेत. 'मंगलध्वनी' च्या निर्मितीवरून एक प्रकारचं भक्तिमय वातावरण तयार होत असे. आता ही प्रथा काहीशी कालबाह्य झाली आहे. मात्र सनईवादकाचं स्थान लग्न-मुंजीच्या समारंभात आजही टिकून आहे. सनईचे थेट वादन शक्य नसले तरी ध्वनिमुद्रित सनई मात्र मंगल प्रसंगात अपरिहार्य झाली आहे. सनईसदृश वादयेही भारतात अनेक ठिकाणी प्रचलित आहेत. उत्तर भारतात ‘शहनाई ’ म्हणून हे वादय ओळखले जाते. दाक्षिणात्य संगीतातील ‘ नादस्वरम् ’ हे वादय सनईसारखेच असते. सनई भारतात मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांतून विशेषत: इराणमधून आली. इराणी ‘ सुर्ना ’ हे वादय भारतात येऊन त्याचे रूपांतर सनईत झाले, असे म्हटले जाते. कालांतराने शहनाई व सनई ही दोन्ही नावे महाराष्ट्रात प्रचलित झाली. मराठी भाषेत सनई व हिंदीत शहनाई असं या वाद्याचं नाव आहे. ओठ व जीभ यांच्या सुयोग्य वापराने, तसेच बोटांच्या कौशल्यपूर्ण उपयोगाने या वादयातून स्वरविलासाच्या अनेक नादमधुर छटा निर्माण करता येतात. त्यामुळे सनईवादन अत्यंत श्रवणीय होते. लग्न समारंभात तर ही सनई असतेच. सनईवादकाला तालाची साथ करायला चौघडा  असतो. आणखी एक वाद्य कुणाला फारसं माहीत नसलेलं पण अगदी समान दिसणारं म्हणजे सुंदरी किंवा सुंद्री. सोलापूरला सिद्रामप्पा जाधव नावाचे सुंदरीवादक खूप लोकप्रिय होते. भारतरत्न बिस्मिल्ला खांसाहेबांनी सनई  या वाद्याला देशात आणि परदेशात मोठी लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.  त्यांचं वादन म्हणजे आनंदोत्सवच असे. त्यांची सनई कमालीची सुरेल आणि ललित मधुर असे. रागविस्तार खूपच कलात्मक आणि परमोच्च आनंद देणारा असे. चौघडा वादकाबरोबर ( किंवा तबला) ते फार डौलदार रीतीने तालक्रीडा करत. पं. व्ही. जी. जोग (व्हायोलिन) यांच्यासोबत त्याचप्रमाणे उस्ताद विलायत खां (सतार) यांच्याबरोबर जुगलबंदीचे अत्यंत श्रवणीय अफलातून कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. सनईबरोबर तालासाठी दोन लहान नगारे, चौघडा वा खारदक हे वादय घेतात. ते दोन्ही हातांत घेतलेल्या छडयांनी वाजवितात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली