Monday 29 March 2021

अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढली


किरकोळ गुन्ह्यांपासून अनेक गंभीर  गुन्हे अल्पवयीन मुलांच्या हातून घडत  असून दरवर्षी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची  संख्या खूपच चिंताजनक आहे. नुकताच  गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडी)  प्रसिद्ध झालेल्या गुन्ह्यांच्या अहवालातून  सन २०१९ या वर्षात मुंबईमध्ये  सर्वाधिक ५४५ गुन्हे अल्पवयीन मुलांवर  दाखल झाले आहेत. मुंबईनंतर ठाणे  पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये  दाखल गुन्ह्यांची संख्या ३५६ असून  नागपूर आयुक्तालयातील आकडा  तितकाच आहे. तर, ठाणे ग्रामीणमध्ये  ८६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. ग्रामीण  भागापेक्षा शहरी भागात गुन्हेगारी अधिक  असल्याचे दिसून येते.

राज्यात घडणाऱ्या एकूण गुन्ह्यांपैकी अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण खूपच अल्प आहे. सन २००९मध्ये हे प्रमाण २.३२ टक्के होते. तर, २०१९ मधील प्रमाण १.३९ टक्के आहे. तरीही ही खूपच गंभीर बाब असून लहान वयातच मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे यावरून स्पष्ट होते. अनेकदा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुले सहभागी असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलास गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. हा मुलगा उत्तर प्रदेशमधील घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. तर, जानेवारीमध्ये ठाणे शहरात दोधा अल्पवयीन मुलांनी लोकांवर चाकूने हल्ला करत लूटमार केली होती. या हल्ल्यात काहीजण जखमीदेखील झाले. खुनासारखा गंभीर गुन्हाही अल्पवयीन मुलांविरुद्ध दाखल होत असून मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठवले जाते. परंतु बालसुधारगृहात राहून आल्यानंतरही पुन्हा ही मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येते. राज्यात अल्पवयीन मुलांविरुद्ध दरवर्षी हजारो गुन्हे दाखल होत असून काही दिवसांपूर्वी सीआयडीचा सन २०१९ या वर्षाचा गुन्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात त्या वर्षी अल्पवयीन बालकांविरुद्ध ४ हजार ७४२ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यासह किरकोळ गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्वांत जास्त अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील गुन्ह्यांची संख्या ५४५ आहे. त्यानंतर ठाणे आणि नागपूर पोलिस आयुक्तालयाचा नंबर लागतो. या दोन्ही शहरांतील गुन्ह्यांची संख्या ३५६ असून सरासरी महिन्याला ३० गुन्हे दाखल होत असल्याचे दिसून येते. या गुन्ह्यामध्ये हत्या ९, हत्येचा प्रयत्न १२, दुखापत ८७, साधी दुखापत ६१ आदी विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील गुन्ह्यांची संख्या ७१ आहे. तर, ठाणे परिक्षेत्रामधील एकूण अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांची संख्या २२८ इतकी आहे. यामध्ये पालघरमध्ये ८८, ठाणे ग्रामीण ८६, रत्नागिरी २८, रायगड १५, सिंधुदुर्गमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत.


साऊथ कॉटन साड्या


दक्षिण भारतात खूप मोठी 'टेक्सटाईल  आणि कॉटन जगभर प्रसिद्ध आहे. झाडावरच्या कापसाच्या बोंडांमधून  कापूस वेचल्यानंतर त्यातला ओलावा जाण्यासाठी  उन्हात वाळवून त्यातील सरकी म्हणजे बिया  काढल्या जातात. बिया काढण्याच्या प्रक्रियेला 'जिनिंग' म्हणतात. मग त्या कापसाचे पिंजण  म्हणजे 'कार्डिंग' केले जाते. त्या पिंजलेल्या  कापसाचे पातळ शीट्स तयार केले जातात. मग  ते शीट्स गुडाळून लांबट नळ्या तयार केल्या  जातात, त्यांना 'पेळू' किंवा हिंदीत 'पुनी' असे  म्हणतात. मग त्यातील एक धागा पकडून त्याला  टकळी किंवा चरख्याच्या साह्याने पीळ देत ओढला  जातो. त्यातून एक लांबलचक धागा तयार होतो,  याला सूत-कताई असे म्हणतात. याच सुतापासून पुढे हातमागावर खादीचे कापड बनते आणि हीच  सगळी प्रक्रिया जर मशीनवर केली तर जे कापड बनते त्याला सुती कापड म्हटले जाते. हाताने कातलेल्या सुतापासून, हातमागावर  साड्या बनवितांना हे सुत, हातमागावर थेट लागले  जाते. पण मशिनवर काढलेले सूत खूप पातळ असते म्हणून दोन ते तीन सूतांना पीळ देऊन, दोन ते तीन  प्लायचा धागा बनविला जातो आणि मग हे धागे  हातमागावर उभे- आडवे लावले जाऊन, 'हँडलूम  सुती साड्या' खूप निगुतीने विणल्या जातात.  हँडलूम साड्या बनवताना लागणारे कसब, वेळ  आणि मेहनत बघता हँडलूम साड्या, पॉवरलूम वर  विणलेल्या साड्यांपेक्षा का महाग असतात, याचे  उत्तर मिळते.

दक्षिण भारतातल्या कर्नाटक, केरळ, आंध्रपदेश, तेलंगण आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये, अनेक गावांमधून कॉटनच्या साड्या विणल्या जातात. या राज्यातल्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक विणकारांनी या साड्यांमध्ये वैविध्य आणले आहे, आणि त्यानुसार चेट्टीनाड, कोवाई, कसाबू, धारवाड, मंगलगिरी, वेंकटगिरी, गुंटूर, सनगुडी अशी असंख्य नावे त्या साड्यांना मिळाली आहेत. गावांच्या नावावरून किंवा डिझाईनच्या प्रकारावरून दक्षिणात्य सुती साड्यांना अशी वेगवेगळी नावे जरी पडली असली तरी एकत्रितपणे या साड्यांना 'साऊथ कॉटन साड्या' असेही म्हटले जाते.

या हातमागावर विणलेल्या साऊथ कॉटन साड्या नेसायला हलक्याफुलक्या जरी असल्या तरी, टिकायला खूप दणकट असतात. कोणत्याही ऋतूत नेसता येणाऱ्या या साड्या पिढ्यानपिढ्या टिकतात, त्यामुळे या मऊसूत साड्यांच्या ऊबदार गोधड्याही अतिशय सुंदर दिसतात. विशेष म्हणजे या साड्यांच्या डिझाईनवर दाक्षिणात्य मंदिरांचा आणि तिथल्या निसर्गाचा खूप प्रभाव पडलेला दिसतो. या साड्यांच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर्सही अप्रतिम असतात. या साड्यांवरच्या डिझाईनमध्ये बऱ्याचदा गोपुरं, कोयऱ्या, रुद्राक्ष, रुई फुले, वेलबुट्टी आणि पाने वगैरे असतात. ज्या भागात साडी विणली जाते त्या भागातील संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तींचे, ती साडी प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे या साड्यांमधून दाक्षिणात्य सौंदर्याचे दर्शन घडते. (अनिकेत फिचर्स)

Thursday 25 March 2021

उन्हाळ्यातले माठ!


आपल्याकडे उन्हाळा हा कोणतीही चाहूल वगैरे न लागू देता दाणकन समोर येऊन सुरू होणारा ऋतू आहे. म्हणजे असं बघा की वळवाचा पाऊस पडून गेला की पावसाळ्याची चाहूल लागते. ऑक्टोबर हीट येऊनही संध्याकाळचं जरा गार वाटायला लागतं, तेव्हा हिवाळ्याची चाहूल लागते. हे दोन्ही तब्येतीत आपल्या आगमनाची वार्ता आधी देऊन मग निवांतपणे डुलत डुलत येणारे ऋतू. उन्हाळा असली काही कौतुक करत बसत नाही. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये अचानक एखाद्यादिवशी बाहेर भगभगित ऊन दिसतं, दिवसाचा तापमानाचा पारा ३५ डिग्रीला जाऊन पोचलेला असतो आणि उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होते. मग गेल्या वर्षांचा माठ माळ्यावरून शोधून काढून तो स्वच्छ धुवून उन्हात वाळत ठेवणे, स्वेटर्स वगैरे कपाटात आत टाकून देऊन टोप्या, शॉर्ट्स बाहेर काढून ठेवणे इत्यादी उन्हाळ्याच्या तयारीची कामं आपण करून टाकतो. शहरी उच्चमध्यमवर्गीय असू तर एसीच्या रिमोटच्या बॅटरीज चालू आहेत का वधणे आणि बदलणे हे एक आणखी काम. शहरी मध्यमवर्गीय माणसाची उन्हाळ्याची तयारी इथेच संपते आणि मग तमाम जनता हाशहुश करत 'यंदा फारच कडक उन्हाळा आहे बुवा' अशी कुरकूर पुढचे तीनेक महिने करायला तयार होते! रणरणत्या उन्हात प्रवास करावा लागत नाही किंवा उन्हातच थांबून काम करावं लागत नाही अशा शहरी माणसांनी उन्हाळ्याबद्दल तक्रार करायचं काहीच कारण नसतं खरंतर. दिवसातला बहुसंख्य वेळ हा घरी पंख्याखाली किंवा ऑफिसात एसीमध्ये घालवणाऱ्या आणि जो प्रवास करावा लागतो तोही एसी असलेल्या चारचाकीतून करणाऱ्यांनी खरोखर तक्रार करूही नये उन्हाळ्याविषयी. पण अनेक लोकांना उगाचच तक्रारी अन् कुरकूर करत जगायची सवय असते. उन्हाळा म्हणजे 'बेक्कार उकाडा', पावसाळा म्हणजे 'नुसती चिकचिक', हिवाळा म्हणजे 'हुडहुड नुसती' अशी प्रत्येक ऋतूबद्दल तक्रार आणि कुरकूर करतच ते त्यांचं स्वागत करतात! मला तर सॉलिड आवडतो उन्हाळा! द्राक्ष, कलिंगडापासून ते स्ट्रॉबेरी, आंब्यांपर्यंत भरपूर फळं भरपूर प्रमाणात मिळण्याचा काळ असतो हा. शिवाय लस्सी, ताक, मिल्कशेक्स, आईसक्रीम्सची, सरबतं इत्यादींची रेलचेल असू शकते. ह्या सगळ्याची मजा घ्यायला खूप श्रीमंतही असावं लागत नाही. थंडगार नौरा, उसाचा रस, लिंबू सरबत वगैरे या काळात 'अमृत' वाटणाऱ्या पेयांचे पेले अगदी दहा-वीस रुपयांतही मिळतात! शिवाय, या काळामध्ये बोगनवेल, बहावा, पळस इत्यादी झाडांना येणारा बहर केवळ 'आहाहा' असतो! रणरणत्या उन्हात दिमाखात उभं असलेलं पूर्ण बहरलेलं एखादं बहाव्याचं झाड बघणं हा शब्दातीत अनुभव असतो. अशा ह्या रस, रंग आणि गंधानं बहरलेल्या ऋतूबद्दल तक्रार करणाऱ्या लोकांनाच खरंतर 'माठ' म्हणलं पाहिजे! पण ते असो!


करून बघू


स्मरणशक्तीला द्या ताण

तुमची स्मरणशक्ती चांगली आहे का? असेल तर उत्तमच; पण तुम्ही तिची कधी परीक्षा घेतली आहे का? तुम्ही डोक्याला जितका जास्त ताण देत जाल, तितकी स्मरणशक्तीसुद्धा धारदार होत जाईल. आता आपण असाच एक स्मरणशक्तीचा खेळ खेळू. घरात कुणी तरी एक शब्द ठरवायचा. हा शब्द इंग्लिश असला तरी चालेल, किंवा कोणत्याही भाषेतला चालेल. तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. मग दुसऱ्या दिवशी दुसरी व्यक्ती दुसरा एखादा शब्द त्यात वाढवेल. हा दुसरा शब्दही सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. मग तिसऱ्या दिवशी तिसरा शब्द, बघा शब्दांची ही रेल्वेगाडी लक्षात ठेवणं नंतर अगदी अवघड होत जाईल. पण एकमेकांची स्मरणशक्ती टॅली करायला हा गेम अतिशय मस्त आहे. विशेषतः इंग्रजी शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर जास्त मजा येईल,

डग हेनिंग्ज हा जगप्रसिद्ध जादूगार मूळचा कॅनाडियन. त्याचा ३ मे १९४७ चा जन्म. वयाच्या सहाव्या वर्षी मुलगी हवेत अधांतरी ही जादू बघून चकित झाला. त्यानं आईला विचारलं, की हे काय आहे? आई म्हणाली- "जादू!!" तिथून सुरू झाली जादुई दुनिया. वयाच्या तेराव्या वर्षी बर्थ डे पार्टीमध्ये त्यानं प्रयोग सादर केले आणि लोकांची जबरदस्त रिअॅक्शन पाहून खूश झाला एकदम. नंतर खूप पार्टीजमध्ये त्यानं परफॉर्म केलं. मग लक्षात आलं, की दोन प्रकारचे जादूगार आहेत. एक लहान मुलांच्या पार्टीमध्ये जादू दाखवणारे, तर दुसरे नाईट क्लबमध्ये परफॉर्म करणारे. मग थक्क जादू बाजूला ठेवून शिक्षण पूर्ण करण्याच्या मागे लागला. सायन्स आणि सायकॉलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेऊनसुद्धा जादूची तळमळ काही सुटेना. त्यानं मा थिएटर ट्रेनिंग आणि जादूचं शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि कॅनडातल्या प्रतिष्ठित विद्यापीठामधून योग्य शिक्षण घेतलं. जादूचा प्रयोग स्टेजवर आणि भव्य प्रमाणात करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. हॉलिवूडमधल्या मॅजिक कॅसलला भेट देऊन अनेक नामयंत जादूगारांकडून धडे घेतले. त्याची धडपड बधून एका निर्मात्यानं त्या काळी सत्तर हजार डॉलरची गुंतवणूक केली. अनेक भव्य सेट, म्युझिक आणि मोठी इल्युजन यासह कॅनडा मध्ये १९७४ मध्ये रॉयल अलेक्झांडर थिएटरमध्ये सुरू झाला

'स्पेल् बाऊंड.' बॉक्स ऑफिसवर जादूच्या या कार्यक्रमानं साडेचार वर्ष धुमाकूळ घातला. डाची हिप्पी स्टाईल, कॉमेडी आणि मॅजिक यांचं नाटयमय सादरीकरण लोकांना खिळवून ठेवू लागलं. न्यूयॉर्कमधून बोलावणं आलं आणि ब्रॉडवे, एनबीसी चॅनेल यावर उगनी इतिहास रचला. त्याची झिगोंग लेडी ट्रिक असो, नाहीतर हुदिनीची त्यानं केलेली वॉटर टॉर्चर एस्केप असो- त्याच्या मोठ्या मोठ्या इल्युजननी स्टेज मॅजिकला निराळीच प्रतिष्ठा मिळवून दिली. 

खास टीव्हीसाठी बनविलेल्या ङग हेनिंग्ज वर्ल्ड ऑफ मजिक या शोला पाच कोटी लोकांनी बघितलं. उग सुपरस्टार झाला. अनेक वर्ष गाजवून त्यानं १९८६ मध्ये आपली इल्युजन्स डेव्हिड कॉपरफिल्ड या उदयोन्मुख जादूगारास विकली आणि मेडिटेशन सुरू केलं. असा हा हरहुन्नरी कलाकार वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी फेब्रुवारी २०००मध्ये लिव्हर कॅन्सरनं गेला. जून २०१० मध्ये त्याला कॅनडियन हॉल ऑफ पेममध्ये स्थान मिळालं. त्याची फेमस झिगसँग लेडी ही जादू आजही अमेरिकन म्युझियम ऑफ मॅजिकमध्ये त्याच्या कामाची साक्ष देत आहे.


'आवराआवरी डे'

मदर्स डेपासून थेंक्स गिव्हिंग डे पर्यंत किती तरी दिवस वर्षभर साजरे केले जातात. यात आवराआवरी डे' किंवा 'क्लीनलीनेस डे' समाविष्ट करायला काय हरकत आहे? एखादा दिवस ठरवा. शक्यतो रविवार सगळ्यांना सोयीचा.त्या दिवशी सकाळी सगळ्यांनी आपापली

आवराआवरी करायची. मुलांनी खेळणी आवरायची, शाळेच्या वस्तू आवरून व्यवस्थित ठेवायच्या, कपड्यांचं कपाट व्यवस्थित लावायचं, घरातल्या चपलांचा स्टँड नीट करायचा अशी बरीच कामं सगळ्यांनी मिळून करून टाकायची. प्रत्येकानं आपला आपला पसारा आवरणं ही गोष्ट अगदी प्राथमिक. आधी स्वतःचा पसारा आवरायचा आणि मग इतरांचा.

यातून घर छान स्वच्छ होतंच, पण सगळ्यांचा उत्साहही वाढतो. मुलांना आपल्या आई-वडिलांना आवरा आवरीत मदत करायचा खूप आवडतं. त्यामुळे आई-वडिलांचा सहभाग जास्त महत्त्वाचा.

कागदी बाहुल्या

दोस्तांनो, चेहरे कसे तयार करायचे हे तर तुम्हाला आता जमतंय. आता कागदावर मोर, वाघ, पक्षी, मधमाशी, फुलपाखरू असं काहीही काढा. छानपैकी रंग द्या. ही चित्रं छानपैकी कापून त्यांचे कटआऊट्स तयार

करा. शक्यतो ती पुत्र्यांना चिकटवून मग कटआऊट तयार केलेत तर जास्त उत्तम. आता ही चित्रं कुल्फीच्या वाया गेलेल्या काड्या, किंवा आईसक्रीमबरोबर येणारे चमचे यांना चिकटवून द्या. आता या चित्रांचा वापर करून तुम्ही नंतर छान गोष्टी तयार करू शकता आणि त्या सादरही करू शकता. मस्त आयडिया ना? कधी करता सुरुवात?


Monday 22 March 2021

मराठीतील पहिल्या पंचांगाची छपाई


मराठीतील पहिल्या पंचागाच्या छपाईला यावर्षी 180 वर्षे पूर्ण झाली. 16 मार्च 1841 या दिवशी गणपत कृष्णाजी यांनी स्वत: हाताने पंचांग लिहून काढून ते शिळाप्रेसवर छापून प्रकाशित केले होते. छापील स्वरूपातील हे पंचांग सुरुवातीला समाजाकडून स्वीकारले गेले नाही. कर्मठांचा त्याला विरोध होता, मात्र त्यानंतर हळूहळू हा विरोध मावळत गेला आणि छापील पंचांगाचा वापर करायला सुरुवात झाली. त्याचा पाया गणपत कृष्णाजी यांनी घातला हे विसरून चालणार नाही. कालगणनेसाठी सध्या घरोघरी दिनदर्शिकेचा वापर होत असला तरी भारतीय संस्कृतीत पंचांगाला महत्त्व असल्याने आजही तुलनेत कमी प्रमाणात का होईना पण पंचांगाचा वापर सुरू आहे. अर्थात हा वापर ज्योतिषी, ज्योतिष अभ्यासक आणि पंचांगकर्ते यांच्याकडूनच मोठय़ा प्रमाणात केला जातो.

गणपत कृष्णाजी रायगड जिल्ह्यातल्या(पूर्वीचा कुलाबा जिल्हा) थळ गावाचे. त्यांचा जन्म 1799 चा. घरची गरिबी म्हणून ते वडिलांसोबत मुंबईत आले. मिशनऱ्यांच्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीला लागले. 1839 च्या दरम्यान, अमेरिकन मिशनऱ्यांनी मराठीत छपाई करण्यास सुरुवात केली होती. अर्थात, ही छपाई ख्रिस्ती धर्मप्रसार साहित्याची असायची. ती पुस्तके पाहिल्यानंतर 1840 च्या सुमारास गणपत कृष्णाजी यांच्या मनातही असा छापखाना सुरू करून हिंदूू धर्मविषयक पुस्तके प्रकाशित करावी, असा विचार आला.  गणपत कृष्णाजींनी तिथे छपाईचं ज्ञान अवगत केलं. त्यांचं अक्षर वळणदार होतं. नक्षीकाम करण्यात ते पटाईत होते. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी लाकडी मशीन बनवलं. त्यानंतर शिळेवर मजकूर छापण्याचा स्वतःचा शिका प्रेस त्यांनी उभा केला. हा पराक्रम त्यांनी वयाच्या पंचविशीत केला.त्यांचा हा छापखाना बोरीबंदर येथे जुन्या जांभळी मशीदजवळ होता. तो नंतर मांडवी कोळीवाड्यात आणला.  कालांतराने त्यांच्या छापखान्यात त्या काळातील सर्व मराठी पुस्तकांची छपाई होऊ लागली. कारण मराठी छपाई करणारा, मराठी माणसाच तो तेव्हा पहिलाच, तसाच एकमेव छापखाना होता.पूर्वीच्या काळी पंचांगकर्ते किंवा ते जाणणारे लोक त्या त्या गावात किंवा पंचक्रोशीत लोकांच्या घरोघरी जाऊन पंचांगाचे वाचन करत असत. तसेच गुढीपाडव्यापासून पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची माहिती वाचून दाखवत असत. त्यामुळे मराठीतील पहिले पंचांग छापून ते प्रकाशित करणे ही पंचांगाच्या इतिहासातील मोठी व महत्त्वाची घटना आहे. या पंचांगाच्या एका प्रतीची किंमत अवघी आठ आणे इतकी होती.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत


Monday 15 March 2021

गाडीचे मायलेज वाढविण्यासाठी...


पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र, वाहन चुकीच्या पद्धतीने चालविल्यामुळेही  आपले बजेट कोलमडू शकते. त्यामुळे ड्रायव्हिंग स्टाइल कशी  ठेवावी व बजेट कसे कमी करावे यासाठी काही टिप्स... 

आक्रमक ड्रायव्हिंग स्टाइल आक्रमक ड्रायव्हिंग स्टाइलमुळे पेट्रोल सर्वाधिक खर्च  होते. वाहनाच्या स्पीडोमीटरवर एक हिरवी पट्टी असते, त्यास 'इकॉनॉमी रेट' म्हटले जाते. वाहनाचा वेग या पट्टीवर ठेवाल तितके अधिक मायलेज मिळेल. मात्र, अनेक लोक याचा  विचार न करता वेगाने वाहन चालवतात. एका संशोधनानुसार,  अतिशय वेगाने वाहन चालवल्यास पेट्रोल खर्ची होण्याचे प्रमाण जवळपास ३३ टक्क्यांनी वाढते. वाहनाचा वेग सतत  कमी जास्त केल्यानेही त्याचा थेट परिणाम मायलेजवर होतो. जास्त गर्दीत प्रवास वाहतूक कोंडीमुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब  रांगा दिसतात. वाहन बंदही करता येत नाही. बाहेर उकाडा  असल्याने एसी सुरू ठेवण्यासाठी वाहनाचे इंजिन सुरू ठेवावे लागते. यामुळे पेट्रोल खर्ची पडते. पेट्रोल आणि मानसिक त्रासापासून वाचायचे असल्यास ड्रायव्हिंगला निघण्यापूर्वी वाहतूककोंडी आहे का, याची माहिती घ्या.

गिअर शिफ्टिंग

एक्सिलरेशन आणि गिअर शिफ्टिंगमुळेही वाहनातील इंधन खर्ची पडते. अनेक लोक वाहन सुरू करताना पहिल्या गिअरमध्येच अधिक वेग मिळवण्यासाठी फुल एक्सलरेशनचा प्रयोग करतात; मात्र यासाठी अधिक इंधन खर्ची पडते. वाहनतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम ड्रायव्हिंगसाठी कमीत कमी ३० सेकंदांपर्यंत वाहनाचा वेग स्थिर असावा. त्यानंतर अधिक वेग मिळवण्यासाठी गिअर एक्सलरेशन आणि गिअर शिफ्टिंग करता येऊ शकते. एअर कंडिशनरचा वापर सध्या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे वाहनात एअर कंडिशनरचा (एसी) वापर करणे गरजेचे झाले आहे. एअर कंडिशनरचा एक बेल्ट थेट इंजिनशी जोडलेला असतो. एसी वेग जास्त असल्यास अधिक इंधन खर्ची पडते व मायलेज कमी होत राहते. त्यामुळे वाहन सुरू केल्यानंतर एक उत्तम वेग पकडल्यानंतरच एसी सुरू करा. आवश्यकता असल्याच एसीचा वापर केल्याने अधिक इंधन लागणार नाही. कारच्या काचा बंद करूनच प्रवास करा. काचा उघड्या ठेवल्यास हवा वेगाने कारमध्ये येते आणि गाडीचा वेग कमी होतो. यामुळे अधिक एक्सलरेशनचा प्रयोग करावा लागतो. यामुळे पेट्रोल अधिक खर्च होते. चाकांमधील हवा वाहन मायलेज कमी देणे याचे प्रमुख कारण वाहनांमधील हवा कमी असणे हेही आहे. वाहन चालविण्यापूर्वी चाकांमध्ये हवा योग्य प्रमाणात आहे ना, याची खात्री नक्की करून घ्या. वाहनासाठी चांगल्या दर्जाच्या टायरचा वापर करा. (संकलन-अनिकेत फिचर्स)


सामान्य ज्ञान


१. वैयक्तिक स्तरावर कार्बनचं प्रमाण जाणुन घेता येणारं कार्बन वॉच हे पहिले मोबाईल ॲप कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने लाँच केले आहे?
२. ओएलएक्स ऑटोच्या ग्लोबल सीईओपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
३. समुद्राखालील पहिलावहिला बोगदा भारतातील कोणत्या शहरात बांधला जात आहे?
४. केटोप्रोफेन या पेनकिलर औषधावर बंदी घालणारा जगातला पहिला देश कोणता?
५. जागतिक एनजीओ दिवस कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
६. १०० कसोटी सामने खेळणारा दुसरा भारतीय जलदगती गोलंदाज कोण?
७. लेव्हीसच्या जागतिक बँड अॅम्बॅसेडरपदी कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे?
८. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (वर्ष २०२१) कोणत्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट
पुरस्कार प्राप्त झाला आहे?
९. सन २०२० सालासाठी कोणता देश व्यापारात भारताचा सर्वात मोठा भागीदार बनला होता?
१०. टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून पहिल्यांदाच या राज्यात रस्ता निर्मिती करण्यात आली आहे?

उत्तरे-१-चंदीगड २-गौतम ठकार ३- मुंबई ४-बांगलादेश ५- २७ फेब्रुवारी ६-इशांत शर्मा ७- दीपिका पादुकोन  ८-  तानाजी: द अनसंग वॉरिअर ९-  चीन १०-त्रिपुरा

Saturday 13 March 2021

(महिती) फूड पॅकिंगमध्ये अ‍ॅल्युमिनियम फॉइल का वापरले जाते?


मुलांनो, तुमचे बाबा कधी कधी हॉटेलमधून पॅकिंग जेवण घेऊन येतात, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की, चपाती, रोटी किंवा भाकरी अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळलेल्या असतात तसेच घट्ट, पातळ भाज्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलच्या पिशव्यांमध्ये दिलेल्या असतात. आता धावपळीच्या या युगात पूर्वीसारखं कागदात पोळ्या किंवा इतर अन्न गुंडाळून घेऊन जाण्याचा प्रकार बंद झाला आहे. वर्तमानपत्राच्या कागदाची जागा आता चमकदार अ‍ॅल्युमिनियम फॉइलने घेतली आहे.

ऑफिसमध्ये जाताना किंवा मुंलांचा टिफिन बॉक्स भरताना बहुतांश जण अ‍ॅल्युमिनियम फॉइलचाच वापर करतात. अन्न जास्त वेळ गरम आणि ताजं राहतं म्हणून या चमकदार फॉइलमध्ये अन्न पॅक केलं जातं. शाळेत डबा खाताना मुलांना चपाती किंवा भाज्या गरम लागतात.  फूड पॅकिंगमध्ये अ‍ॅल्युमिनियम फॉइल का वापरला जाते, आणि त्यात अन्न गरम कसे राहते हे आपल्याला माहिती आहे बरं?
सर्व प्रथम, हे जाणून घ्या की फॉइल अ‍ॅल्युमिनियम धातूपासून बनलेले असते.  अ‍ॅल्युमिनियमची सर्वाधिक मात्रा आपल्या या पृथ्वीवर आढळते.  7 ते 8 टक्के पृथ्वीवरील कवच अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेले आहे.  अल्युमिनियमचा सर्वात मोठा स्त्रोत बॉक्साइट आहे (धातू मिश्रित एक प्रकारची माती).  यात सामान्यत:  40 ते 60 टक्के अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईड असते.
एका रासायनिक अभिक्रियाद्वारे त्यातून अ‍ॅल्युमिनियम धातू मिळविली जातो.  लोह, तांबे, निकेल आणि जस्त या धातूंच्या तुलनेत त्याचे वजन एक तृतीयांश असते.  याचा पृष्ठभाग उष्णतेची किरण परावर्तित करतो.  याला  गंज चढत नाही.  घरात वापरल्या गेलेल्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलमुळे ओलावा आणि हवेपासून रोखण्यास मदत होते.
अ‍ॅल्युमिनियम फॉइल तेलरोधक, गंधहीन आणि चव नसलेले आहे.  या अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न उबदार आणि सुरक्षित राहते.  कोणत्याही धातूची शीट, ज्याची जाडी 0.1270 मिमी किंवा त्यापेक्षा कमी असेल त्याला फॉइल म्हणतात.  अ‍ॅल्युमिनियम इतके मऊ असते की त्यातून 0.00508 मि.मी. जाडीचे फॉइल बनवता येते.  म्हणूनच फूड पॅकिंगमध्ये अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली


Thursday 11 March 2021

आस्ताद काळे:पुढचं पाऊल


मराठीतील कलाकारांतील एक  बहुवर्चित जोडी म्हणजे अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील 2021 मध्ये दोघे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लग्नाच्या बेडीत अडकले. आस्ताद आणि स्वप्नालीची ओळख त्यानं  ही ८ ते १० वर्षांपूर्वी 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र काम करताना तर  झाली. या दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रूपांतर साकारत  प्रेमात झालं आणि अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी संग्राम  लग्नगाठ बांधली. आस्ताद म्हणतो की, "स्वप्नाली माझी बायको आहे, तितकीच ती  माझी खूप चांगली मैत्रीणही आहे. आम्हा दोघांनाही तसा पटकन राग  येतो आणि तो लवकर निवळतोही. ही आमच्या स्वभावातली कॉमन माणसांवर  गोष्ट, पण स्वप्नाली अतिशय समजूतदार मुलगी आहे. तिची पेशन्स त्यांना  लेव्हल आणि एखाद्याला सांभाळून घेण्याची तिची क्षमता माझ्यापेक्षा संग्राम  खूप जास्त आहे. तिला माणसं हवी असतात. ती माणसांना बांधून हा  ठेवते, सगळ्यांबरोबर असलेलं नातं ती उत्तमप्रकारे जपत असते आणि  तिच्यातला हा गुण मला विशेष आवडतो आणि तो मला आत्मसात नाही करायला आवडेल. तिच्यातला आणखी एक कौतुकास्पद असा गुण म्हणजे नवीन काहीतरी करून बघण्याची, सतत नवं काहीतरी शिकण्याची तिची वृत्ती. आमच्या खाण्याच्या, एखाद्या प्रकारची कलाकृती बघण्याच्या आवडीनिवडी खूप वेगवेगळ्या आहेत. पण एक कॉमन आवड म्हणजे आम्हा दोघांनाही सस्पेन्स थ्रिलर जॉनरचे चित्रपट, नाटकं, वेब सिरीज पाहायला आवडतात." स्वप्नालीच्या आयुष्यात आस्तादच्या येण्यानं अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. ती म्हणाली, "गेली १०-११ वर्ष मी आणि आस्ताद एकमेकांना ओळखतोय, आस्तादचा स्वभाव हा कड़क आणि शिस्तबद्ध दिसत असला, तरी तो तितकाच प्रेमळ आणि केअरिंग आहे. तो अतिशय प्रामाणिक मुलगा आहे. त्याला सतत समोरच्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करायचं असतं. त्याला जाणवलं की समोरचा माणूस हा प्रामाणिकपणे काहीतरी करू पाहतोय, तर आस्ताद शक्य होईल तितकी मदत करणारच. त्याच्यातला हा गुण मला फार आवडतो. त्याला स्वतःला सतत नवं काहीतरी करून बघायचं असतं आणि या बाबतीत त्यानं मला खूप प्रोत्साहन दिलं आहे. त्यानं माझ्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. सुरुवातीला माझ्या आवडीनिवडी मोजक्याच होत्या. पण आस्तादनं मला स्वतःला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळं माझ्यातही नवीन काहीतरी प्रयोग करून बघण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला.

आस्ताद हा खवैया आहे आणि या त्याच्या खाण्याच्या आवडीमुळं मी स्वयंपाक करण्यात आता रस घेऊ लागले आहे." स्वप्नालीनं आस्तादची सगळी कामं पहिली आहेत आणि त्यापैकी त्यानं प्रपोजल' या नाटकात साकारलेली भूमिका तिला खूप आवडली, तर आस्ताद सध्या कलर्स मराठीच्या 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत साकारत असलेली संग्राम जगताप ही भूमिकाही तिला आवडते. कारण संग्राम जगताप आणि आस्ताद काळे यांच्या स्वभावात फारसा फरक नाही, असं तिनं स्पष्ट केलं. ही गोष्ट कबूल करत आस्ताद म्हणाला, “संग्राम जगतापचा स्वभाव थोडीशी गुंडगिरी, थोडासा चांगुलपणा, जबाबदारपणा याचं मिश्रण आहे. संग्रामचंही त्याच्या जवळच्या माणसांवर तितकंच प्रेम आहे जितकं माझं माझ्या कुटुंबीयांवर आणि त्यांना आनंदात बघण्यासाठी आम्ही दोघंही भरपूर मेहनत घेतो. असा हा संग्राम मी 'चंद्र आहे साक्षीला' मालिकेत साकारत आहे. माझा स्वभाव हा ८० टक्के संग्राम जगताप या व्यक्तीरेखेसारखाच आहे. त्यामुळं मला या मालिकेत अभिनय असा विशेष करावा लागत नाही."


ईश्वरदत्त आवाजाची देणगी लाभलेले किशोर कुमार


किशोर कुमार यांच्या कारकिर्दीतील हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलं गाणं म्हणजे ,आठ दिन' मधील ,' बांका सिपहिया, बांका सिपहिया..'. हे गाणं. त्यांना सचिनदा यांनीच उद्युक्त केलं होतं. वास्तविक, त्यांना पूर्ण गाणं देण्यात आलं नव्हतं.  त्यातील तीन चार ओळी गाण्यास सांगितलं होतं. किशोर कुमार यांनी त्यांच्यासाठी सर्वप्रथम पूर्ण गाणं गाणं गायलं ते 'बहार' चित्रपटासाठी. त्यातले बोल होते-' कसूर आप का, हुजूर आप का, मेरा नाम लिजीए, ना मेरे बाप का...' हे गाणं मुंबईत नाही तर मद्रासमध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आलं होतं. तेव्हा किशोर कुमार सचिनदेव बर्मन यांच्या एका छोट्या खोलीत राहत होते. सचिनदा नेहमी किशोर कुमार यांना म्हणायचे- 'एय किशोर, हे गाणं गा, अशा पध्दतीने गा, भाव ओतून गा. गाण्याला सजवण्याचा फार प्रयत्न करू नकोस.त्यामुळे फार फरक पडत नाही. अगदी सरळपणे गा आणि पहा. लोकांना ते अधिक आनंददायी वाटेल. समजलं का?'

किशोरच्या आवाजाच्या गुणवत्तेमुळे सचिनदा खूपच प्रभावित झाले होते. त्यामुळेच, 'आठ दीना' च्या निर्मात्याचा विरोध असूनही त्याचा गायक म्हणून घेण्याचा त्यांचा त्यांनी सोडला नव्हता. किशोर गायक म्हणून तेव्हा फारसे परिचित नव्हते. पण सचिनदा मनापासून वाटत होतं की, त्याच्या गाण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि म्हणून ते त्यांना सतत संधी देत. 'आठ दिन' नंतर जाणीवपूर्वक'बहार' चित्रपटातील गाण्यांसाठीही त्यांना पार्श्वगायक म्हणून घेतलं. त्यांनी अगदी मनापासून या संधीचा पूर्ण उपयोग करून घेतला. किशोर कुमार यांच्यासाठी सैगल म्हणजे आदर्श गायक होते. त्यामुळे सुरुवातीला ते  त्यांची नक्कल करू पाहायचे. सचिनदांनी त्यांना सांगितलं- ' तू तुझ्या आवाजात गा. सर्वप्रथम नक्कल करणं थांबव. त्यांना ते पटलं आणि मग ते मुक्त कंठाने गाऊ लागले. परंतु तरीही जेव्हा एखादं दुःखी वा गंभीर , अर्थपूर्ण असं गाणं म्हणायची वेळ यायची ,तेव्हा ते शैलीत गायचे. कुमान त्यांचा प्रभाव तर अशा गाण्यांमध्ये स्पष्टपणे दिसून यायचा.

'सरगमेद निखद' या आपल्या आत्मवृत्तात सचिनदेव बर्मन यांनी म्हटलं आहे की- किशोर कुमार म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांचा सर्वात धाकटा भाऊ. एक गायक म्हणून त्याचादेखील मला शोध लागला. आणि मी त्याला हिंदी चित्रपटात गाण्याची संधी दिली. तेव्हा मी 'फिल्मीस्तान स्टुडिओ'त कामाला होतो. दादामुनी अर्थात अशोक कुमार यांनी स्वतःच निर्मिलेल्या 'आठ दिन' (1946) या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. आणि त्यासाठी मी काम करत होतो. मॅट्रिक परीक्षा दिल्यावर तो फिल्म स्टुडिओत येत असे. दादामुनी यांनी मला एकदा त्याच गाणं ऐकण्याची विनंती केली. किशोरने गायनासाठी कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं आणि तो कधी फारसा रियाजही करत नसे. परंतु त्याला आवाजाची ईश्वरदत्त आवाजाची देणगी लाभली होती आणि त्या आवाजाने मला मोहित करून टाकलं होतं. 'आठ दिन' चित्रपटासाठी मी त्याला गायला सांगितलं आणि त्याचा पहिलाच 'टेक ' बिलकूल'ओके' ठरला. मग मी दादामुनींना सांगितलं की, किशोरने महाविद्यालयात जाऊन शिक्षण सुरू ठेवण्याची काहीच गरज नाही. त्याऐवजी त्याने संगीत क्षेत्रातच आपली कारकीर्द घडवावी, नंतर अल्पावधीतच  किशोरने हिंदी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक म्हणून आपलं स्थान निर्माण केलं.'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday 9 March 2021

'दो आंखे बारह हाथ' या चित्रपटाचे मूळ प्रेरणास्रोत काय?

  


उत्तर- चित्रमहर्षी शांतारामबापूंच्या चित्रपटनिर्मितीमागे ज्वलंत सामाजिक प्रश्नांची व्यापक पार्श्वभूमी असे. ते अनेक  नावीन्यपूर्ण प्रयोग करीत असत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी  महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे सामाजिक परिवर्तन होऊ घातले  होते. महाराष्ट्रातील एक आद्य उद्योगमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर  यांनी औंध संस्थानातील ओसाड माळरानावर 'किर्लोस्करवाडी  ही उद्योगनगरी उभारली. पुढे तिची जसजशी वाढ होऊ लागली  तसतशी वाडीच्या संरक्षणाची समस्या उद्भवली. औंधच्या अधिपतींकडून फक्त दोन पोलीस मिळतील, असे कळविल्यावर लक्ष्मणरावांनी एक वेगळाच प्रयोग करायचे ठरविले. त्यांनी औंधच्या तुरुंगामधील अट्टल दरोडेखोर जे कित्येक वर्षे खितपत  पडले होते ते पिऱ्या मांग, तुका रामोशी, बाळा रामोशी अशा  चार-पाच लोकांच्या सुटकेची मागणी करून किर्लोस्करवाडीच्या  संरक्षणार्थ नेमण्याची विनंती औंधच्या राजांना केली. शेवटी  राजेसाहेबांनी हा साहसी प्रयोग मान्य केला. सर्व दरोडेखोरांना  मुक्त करून किर्लोस्करवाडीला आणण्यात आले. तेथे एक मोठी जाहीर सभा घेऊन सर्वांपुढे हजर करण्यात आले. नंतर सर्वांनी 'मी यापुढे कुठलाही गुन्हा करणार नाही, दारू पिणार नाही व  कारखान्याचे कुठलेही काम इमानेइतबारे करेन' अशी शपथ  घेतली. मीठ तोंडात टाकून व बेलभंडारा उचलून बाजूस सरायचे असा गंभीरपूर्वक शपथविधी पार पाडल्यानंतर ते दरोडेखोर व  त्यांचे कुटुंबीय यांना कारखान्यामध्ये काम शिकवले, मुलांच्या  शिक्षणाची व्यवस्था केली. ते दरोडेखोर रात्री वाडीची राखणही  करीत. एक खुला तुरुंग राबविला जाऊ लागला. वाडी हे एक  आधुनिक सांस्कृतिक केंद्रही बनू लागले. तेथे विविध कार्यक्रम, नाटक ,सिनेमा होऊ लागले.तेथे आद्य चित्रपट प्रणेते दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर यांचे चित्रपट दाखवले जात असत. त्यावेळी त्यांना 'खुला तुरुंग' कसा असतो याची माहिती झाली. व तीच प्रेरणा घेऊन अतिशय कल्पकतेने त्यांनी ती कहाणी ''दो आंखे बारह हाथ' या चित्रपटात साकार केली. शंकरराव किर्लोस्कर यांच्या 'यांत्रिकांची यात्रा' या उद्योगमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जीवनचरित्रामध्ये माहिती व इतिहास आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

विनेश फोगाट


भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने मट्टे पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग आठवड्यांमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी २६ वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. विनेशने ५३ किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला ४-0 ने हरवले. गेल्या आठवड्यात विनेशने किवमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. स्पर्धेत प्रवेश करताना तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या विनेशने १४ गुणांची कमाई करत जागतिक क्रमवारीत आपले प्रथम स्थान परत मिळवले. विनेशने या स्पर्धेत एकही गुण गमावला नाही. शनिवारी सरिता मोरने ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. विनेश फोगाट ही कुस्ती खेळणार्‍या फोगट भगिनींच्यापैकी एक आहे. तिने २0१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. २0२0 मध्ये तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलर% पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही महावीर सिंग फोगट यांची पुतणी असून महावीर फोगट यांच्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी फोगट तसेच रितू फोगट या सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या कुस्तीगीर आहेत. २0१३ साली भारतातील नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विनेशने ५२ किग्रॅ गटात कांस्य पदक जिंकले. २0१३ साली जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने ५१ किग्रॅ गटात रजत पदक जिंकले. २0१४ साली ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४८ किग्रॅ गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले.२0१४ साली इंचेऑन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४८ किग्रॅ गटात विनेशने कांस्यपदक जिंकले.२0१५ साली दोहा, कतार येथे झालेल्या आशियाई अजिंक्य स्पर्धेत विनेशने रौप्य पदक जिंकले. इस्तंबूल येथे २0१६ रिओ ऑलिम्पिक स्पधेर्साठी झालेल्या पात्रता स्पर्धेत तिने अंतिम फेरी जिंकून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग निश्‍चित केला. २0१६ साली रीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र चीनच्या सन यानान बरोबर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला सामना सोडून द्यावा लागला. २0१८ साली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विनेशने ४८ किग्रॅ गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले. २0१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली.

कवी यशवंत


विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर. जन्म सातारा जिल्हयातील चाफळचा. शिक्षण सांगलीस झाले. मॅट्रिक झाल्यानंतर पुण्यास लेखनिकाची नोकरी केली.

कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) हयांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहीण्याकडे होती. पुढे रविकिरण मंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यशोधन (१९२९) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय असा कवितासंग्रह.

त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध (१९३४), यशोनिधी (१९४१), शोगिरी(१९४४), ओजस्विनी (१९४६), इ. काव्यसंग्रह प्रसिदध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदु:खाशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरण मंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता त्यांना मिळाली.

उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्‍वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या ह्लआई या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.

ह्लआई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी

ती हाक येई कानी, मज होय शोककारी

स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी

या ओळींतील आर्तता आणि करुणा अंत:करणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.

आई! तुझ्याच ठायी सार्मथ्य नंदिनीचे

माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे

ह्लदैवतें माय-तात या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दु:खाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. सर्मथांच्या पायांशी, माण्डवी व बाळपण अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणार्‍या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. लाल-फुले या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाल-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्‍वर्य अनन्त हेंच आम्हां!

यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदयार्मुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंत:करणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले आणि एक कहाणी या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. एक कहाणीमध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. चमेलीचे झेलेमध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. एका ह्य या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते.. ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुज्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्गारतो.. सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!

Monday 8 March 2021

मराठीतील गाजलेल्या पुस्तकांवर काही प्रश्न आणि उत्तरे

  


१. महानायक ही सुभाषचंद्र बोसांच्या जीवनावरची कादंबरी कोणाची?

उत्तर : विश्वास पाटील, पानिपत, संभाजी अशा  ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या विश्वास पाटलांची ही  गाजलेली कादंबरी. कादंबरीसाठी पाटलांनी भरपूर माहिती गोळा केली आणि प्रवास केला.

२. झेंडूची फुले' हा कवितासंग्रह कोणाचा आहे? 

उत्तर : केशवकुमार, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे  केशवकुमार या नावाने कविता लिहीत असत. 'झेंडूची  फुले मध्ये त्यांनी विडंबन कविता हा नवाच धमाल प्रकार रसिकांना दिला. या विडंबन कविता मूळ कवितेची  शब्दरचना अणि आशय याबरोबरच कवीचा स्वभाआणि विचार यांचेही धमाल विडंबन करीत. 

३. 'चिमणराव' हे अजरामर पात्र कोणी निर्माण केले? 

उत्तर : चिं. वि. जोशी. चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही  धमाल विनोदी जोडगोळी जोश्यांनी साहित्यात आणली.  मध्यमवर्गीय जीवनातले बारकावे त्यांनी विनोदाच्या अंगाने  सुरेख मांडले. पुढे दामुअण्णा मालवणकर, दिलीप  प्रभावळकर यांनी चिमणरावाला रूपेरी पडद्यावर साकार  केले.

४. गंगाधर गाडगीळांनी निर्माण केलेल्या 'बंडू'च्या  बायकोचे नाव काय?

उत्तर : स्नेहलता. नवकथेचे जनक मानले गेलेल्या  गाडगीळांनी 'बंडू' हे पात्र निर्माण करून काही धमाल  कथा आणि एकांकिका लिहिल्या. बंडू, त्याचा मित्र नानू  आणि बंडूची बायको स्नेहलता या तिघाभोवती या कथा फिरतात.

५. 'भिजकी वही' या कवितासंग्रहाचे कवी कोण? 

उत्तर : अरुण कोलटकर, आपल्या अनोख्या शैलीने आणि शब्दवैभवाने मराठी कवितेत एक निराळेच वळण देणाऱ्या कोलटकरांच्या 'भिजकी वही' या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता.  त्यांच्या इराणी, घोडा, जेजुरी, चरित्र वगैरे कविता विशेष  गाजल्या. त्यांच्या कवितांचे इंग्रजी अनुवादही गाजले होते. 

६. 'नातिचरामि' ही कादंबरी कोणाची आहे? 

उत्तर : मेघना पेठे. 'आंधळ्याच्या गायी' आणि 'हंस  अकेला' या अत्यंत गाजलेल्या कथासंग्रहाच्या लेखिका  मेघना पेठे यांची ही गाजलेली कादंबरी. मीरा या नायिकेच्या निमित्ताने स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व आणि लग्नसंस्था यावरचे चिंतन या कादंबरीत आहे. धाडसी अभिव्यक्ती आणि मौलिक आशय हे मेघना पेठे यांच्या लेखनाचे वैशिष्ट.

७. गोविंदाग्रज नावाने कोण कविता लिहीत? 

उत्तर : रा. ग. गडकरी. विख्यात नाटककार राम गणेश  गडकरी यांची पुण्यप्रभाव, राजसंन्यास, एकच प्याला ही  नाटके जशी अजरामर झाली तसेच 'गोविंदाग्रज' या  नावाने लिहिलेल्या कवितांचा 'वाग्वैजयंती' हा कवितासंग्रही गाजला. शब्दांवरचे अद्वितीय प्रभुत्व हे त्यांचे  वैशिष्ट्य. 'राजहंस माझा निजला' ही त्यांची एक गाजलेली कविता.

८. 'नाही कशी म्हगू तुला म्हणते रे गीत' या गीताचे गीतकार कोण?

उत्तर: आरती प्रभू. चि. त्र्यं. खानोलकर यांच्या चानी, रात्र काळी... घागर काळी वगैरे कादंबऱ्या आणि अवध्य, एक शून्य बाजीरावसारखी नाटके जशी गाजरली तसेच आरती प्रभू या नावाने लिहिलेल्या कविताही प्रसिद्ध आहेत. 'नक्षत्रांचे देणे' या त्यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

९. श्री. के. क्षीरसागर यांच्या 'वादसंवाद' या पुस्तकावर 'नीरस्तपादपे देशे' या शीर्षकाने समीक्षात्मक लेख लिहिणाऱ्या लेखकाची ही कादंबरी प्रसिद्ध आहे?

उत्तर : बीटार, टीकास्वयंवर या समीक्षात्मक लेखांच्या ग्रंथात भालचंद्र नेमाडे यांनी हा शैलीदार समीक्षा लेख लिहिला आहे. नेमाड्यांची बीढार ही कादंबरी ही चांगदेव पाटील या नायकाभोवती फिरणाऱ्या कादंबरी चतुष्टकातली पहिलीच कादंबरी.

१०. 'धुके आणि शिल्प' हा गाजलेला समीक्षात्मक लेख ज्यांच्या साहित्यकृतीवर आहे त्यांचा हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे.

उत्तर : चर्चबेल्स. त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी ग्रेस यांच्या कवितांवर 'धुके आणि शिल्प' हा गाजलेला लेख लिहिला. काहीशा दुर्बोध वाटणाऱ्या ग्रेसच्या कवितांचे अत्यंत सुरेख आणि तरल विवेचन या लेखात आहे. त्याच नावाच्या पुस्तकात तो समाविष्ट आहे. ग्रेस यांचे ललित लेखन चर्चबेल्स या पुस्तकात आहे.

११. विजय तेंडुलकरांवर 'गाजलेला पण तोकडा नाटककार' असा समीक्षात्मक लेख लिहिणाऱ्या लेखकाचे विनोदी ललित निबंध या नावाने प्रसिद्ध आहेत.

उत्तर : फिरक्या. कथा, कादंबरी, समीक्षा, विनोद, एकांकिका असे अनेक साहित्यप्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या गंगाधर गाडगीळ यांनी 'आजकालचे साहित्यिक' या पुस्तकात जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं.

खानोलकर आणि विजय तेंडुलकरांवर दीर्घ समीक्षात्मक लेख लिहिले. गाडगीळांचे ललित लेखन 'फिरक्या' या पुस्तकात आहे.

१२. 'आता नाही ऐकत मी, कोणतेही आर्त गीत'- व. पु.काळे यांची ही कविता कोणत्या कविता संग्रहात आहे?उत्तर : वाट पाहणारे दार. पार्टनर,एकटीची यांसारख्या लोकप्रिय कादंबऱ्या, तुमची वहिदा, भांडणारा जोशी वगैरे अनेक गाजलेल्या कथा लिहिणाऱ्या व. पु. काळे यांनी आपल्या पत्नीच्या आठवणीवर आधारित काही कविता लिहिल्या होत्या. त्याकविता आणि छायाचित्रे यांचे हे पुस्तक आहे.


Sunday 7 March 2021

नारायण गोविंद चापेकर

 नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर यांचा जन्म ५ ऑगस्ट, १८६९ रोजी मुंबईमध्ये झाला. ते मराठीतील ऐतिहासिक विषयावर लेखन करणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण यांसारख्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत.

चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. पुढे एक वर्ष ते पुण्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होते. तेथे त्यांना वा. गो. आपटे, आगरकर, गोखले, गोळे आणि धारप या नामवंत शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. देशाभिमान जागृत होण्यासाठी, बहुर्शुतता येण्यासाठी आणि विचारशक्तीला चालना मिळण्यासाठी हा अल्प काळ त्यांना पोषक ठरला. त्यानंतरचे हायस्कूलमधील शिक्षण त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घेतले. १८८७ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे महविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले. तेथे त्यांना स्कॉट, प्रा. गार्डनर आणि प्रा. जिनसीवाले हे नामवंत प्राध्यापक लाभले. १८९१ मध्ये ते बीए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. पंचवीस वर्षे न्यायाखात्यात काम करीत असताना तत्कालीन मुंबई इलाख्यात अनेक ठिकाणी त्यांना भ्रमंती करावी लागली. ते १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून नवृत्त झाले. त्यांनतर औंध संस्थानचे मुख्यन्यायाधीश झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी औंध संस्थानातील न्यायव्यवस्थेत अनेक सुधार घडवले. ना. गो. चापेकर यांनी कार्यकुशल आणि नि:स्पृह न्यायाधीश म्हणून ख्याती मिळवली. ते १९२५ साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले. बडोद्याला १९३४ मध्ये भरलेल्या विसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. ह्यवाड्:मय ही समाजाची नाडी आहे. कोणत्याही समाजाच्या वाड्:मयीन स्वरूपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे हे समजते. असे विचार त्यांनी अध्यक्षपदावरून मांडले. चापेकरांनी साहित्य व संस्कृती या क्षेत्रांत लक्षणीय स्वरूपाचे कार्य केले. ते कुशल संघटक होते. त्यांनी सेवानवृत्तीनंतरच्या काळात ह्यभारत इतिहास संशोधक मंडळ, ह्यमराठी ग्रंथोत्तेजक सभा, ह्यराजवाडे संशोधन मंडळ, ह्यधर्मनिर्णय मंडळ आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी ह्यमहाराष्ट्र साहित्य परिषदेला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत. ना.गो. चापेकर यांना पुणे विद्यापीठाकडून १९६६ साली डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली. 'मराठी ग्रंथरचना करण्याचा उद्देश मनात धरला म्हणजे विषयाध्यायन विशेष काळजीपूर्वक करावे लागते व फुरसतीचा काळ आळशीपणात न घालवता योग्य कामाकडे खर्च होऊन लेखकाची स्वत:ची मन:संस्कृती तयार होते. असा आपला लेखनविषयक दृष्टीकोन त्यांनी व्यक्त केलेला आहे. नवृत्तीनंतर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी लेखनास १८९५ पासून प्रारंभ केला. त्यांची वृत्ती संशोधकाची होती. अरुणोदय, ग्रंथमाला, विश्‍ववृत्त, विविधज्ञानविस्तार, लोकशिक्षण, पुरुषार्थ आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिका इ. नामांकित नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले. लोकमान्य या वृत्तपत्रातून त्यांनी गच्चीवरील गप्पा ही लेखमाला लिहिली. त्यांची एकूण चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची आमचा गाव बदलापूर, एडमंड वर्कचे चरित्र, चित्पावन, वैदिक निबंध, पेशवाईच्या सावलीत, समाज नियंत्रण, शिवाजी निबंधावली (संयुक्त न. चिं. केळकर व वागोकले सहलेखक) ही काही गाजलेली पुस्तके. त्यांनी समीक्षण केलेल्या पुस्तक परीक्षणांचे संकलन ह्यसाहित्य समीक्षण या ग्रंथात करण्यात आलेले आहे. ना. गो. चापेकर यांचे निधन ५ मार्च, १९६८ साली बदलापूर येथे झाले.

पी. पी. वैद्यनाथन

पी. पी. वैद्यनाथन यांचा जन्म कोलकाता येथे झाला असून शिक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठात झाले आहे. ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर आहेत. ते सिग्नल प्रोसेसिंग, विशेषत: डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग आणि त्यातील अनुप्रयोगांच्या क्षेत्रात संशोधन करतात. कोलकता विद्यापीठातून रेडिओभौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर विद्युत व संगणक अभियांत्रिकी विषयांत ते सांता बार्बारा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९८२ मध्ये पीएच.डी झाले. इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर अनेक क्षेत्रांत विद्युत संदेशांचा वापर केला जात असतो. विद्युत संदेशांतूनच यंत्रांकडून हवी ती कामे आपण करून घेत असतो. त्यातील अचूकता फार महत्त्वाची असते. याच क्षेत्रात काम करणारे वैद्यनाथन यांना यंदाचा युरासिप अँथनॉसिस पापॉलिस पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यनाथन यांना यापूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग या संस्थेचा पुरस्कार मिळाला असून नॉर्थरॉप ग्रूमन पुरस्कार अध्यापन क्षेत्रात यापूर्वी मिळाला आहे.१९८३ पासून ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत आहेत. विद्युत संदेशांवर प्रक्रियांच्या क्षेत्रात अतिशय दुर्मीळ प्रकारचे संशोधन करणार्‍या वैज्ञानिकालाच हा पुरस्कार मिळतो. त्यात यंदा वैद्यनाथन यांचा समावेश झाला आहे. वैद्यनाथन हे विद्युत संदेश संस्करण व मल्टीरेट फिल्टर बँक थिअरीत निष्णात मानले जातात. युराशिप ही युरोपातील विद्युत संदेश संस्करणातील नामांकित संस्था आहे. त्यांना हा पुरस्कार ऑगस्टमध्ये आर्यलडमधील डब्लिन येथे प्रदान केला जाणार आहे. वैद्यनाथन यांच्या नावावर किमान ५00 तरी शोधनिबंध आहेत. विद्युत संदेश संस्करणावर त्यांची चार पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक विद्याथीर्ही घडवले आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रातही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे संशोधन हे बहुकंप्रता संदेश संस्करणातील असून त्यांनी फिल्टर बँकस व मल्टीरेट सिस्टिम्सवर विविधांगी संशोधन केले आहे.जनरल थिअरी ऑफ फिल्टर बँक्स विथ परफेक्ट रिकन्स्ट्रक्शन व ह्यऑर्थोथर्मल फिल्टर बँक्स या विषयात त्यांनी काम केले असून डिजिटल संदेशवहन, प्रतिमा संवर्धन व सांकेतीकरण यात त्याचा उपयोग आहे. आपल्याकडे नवीन शैक्षणिक धोरणात आता कुठे आंतरविद्याशाखीय अभ्यासाला परवानगी मिळाली आहे पण इतर देशात ते आधीपासून आहे. अलीकडेच त्यांनी रामानुजन यांच्या काही गणिती समीकरणांचा वापर करून आवर्तिकतेतील नवे छुपे अल्गॉरिदम शोधून काढले आहेत.

अजूनही संघर्ष संपला नाही


आजही महिलांना विविध आघाड्यांवर मोठा संघर्ष करावा लागत आहे. पण प्रत्येकानेच आशावादी असायला पाहिजे. महिला सक्षमीकरणाने आज बराच वेग घेतला आहे. पण असे असले तरीही महिलांना असंख्य अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. दर दिवशी नवे प्रश्न उभे राहात आहेत. पण या सर्व अडचणींवर मात करून महिला मोठी प्रगती करून पुढे जात आहे. प्रत्येक समस्येला, प्रश्नाला नव्याने तोंड देत आहेत. आणि हे सगळे वर्षानुवर्षे असेच सुरू आहे. हा खरे तर न संपणारा संघर्ष आहे. स्त्रियांचा व्यवस्थेशी सुरू असणारा वाद अद्यापही संपुष्टात आलेला नाही.

या सगळ्या परिस्थितीतून जाऊन निघालेल्या महिला मात्र अजिबात मागे हटलेल्या नाहीत. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. समाजाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अनेक महिलांनी स्वत: कळ सोसून समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न केले आहेत. अशी समाजात असंख्य उदाहरणे आहेत. त्यांच्याच कष्टाची गोड फळे आपण चाखत आहोत. जिजामातांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचा मंत्र दिला. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे अशा अनेक महिलांनी स्त्रीशिक्षणाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. प्रसंगी समाजाच्या दूषणांचा स्वीकार केला. चुकीच्या प्रथा, परंपरांना विरोध केला. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनीही बर्‍याच खस्ता खाल्ल्या. राणी लक्ष्मीबाईने भारतीय स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. हिरकणी आपल्या मुलासाठी अत्यंत कठीण असा कडा उतरून गेली. अशा अनेक महिला आज प्रत्येकांसाठी सदैव प्रेरणादायी आहेत.

आज महिला शिकत आहेत. नोकरी करत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमावत आहेत. हे सगळे या थोर महिलांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. या महिलांमुळेच स्त्रियांना स्वत:च्या अस्तित्वाची जणिव झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर पुढच्या पिढय़ांना समानतेच्या वातावरणात जगता यावे यासाठी आत्तापासून प्रयत्न करायला पाहिजे. भविष्यातल्या पिढय़ांना सुरक्षित वातावरण मिळायला पाहिजे यासाठी आजच्या पिढीने पुढाकार घ्यायला पाहिजे. मागच्या पिढय़ांकडून जसे स्त्रिया प्रेरणा घेतात त्याचप्रमाणे पुढच्या पिढय़ांनी प्रेरणा घेण्यासारखे काही तरी करून जायला पाहिजे. शिकलेल्या महिला आपल्या कुटुंबाला पुढे नेतात. कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीतही महिलांनी मोठे योगदान दिले आहे. आणि आजही देत आहेत. पण समाजाच्या जडणघडणीला महिलांचा सहभाग आजही र्मयादित प्रमाणात आहे. कारण पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना पुरेशा संधी मिळत नाहीत. पण मिळाल्यानंतर महिला त्याचे सोने करतात आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवतात. पण त्यांना तितकेसे प्रोत्साहन मिळत नाही. कारण मुळात पुरुषांचे वर्चस्व असणार्‍या समाजात स्वत:च अस्तित्व टिकवून ठेवण्याचे खूप मोठे आव्हान महिलांसमोर असते. त्यानंतर आपली गुणवत्ता, कौशल्याचा वापर समाजाच्या जडणघडणीसाठी कशा प्रकारे करता येईल याचा विचार त्या करू शकतात. मात्र या पुरुषप्रधान व्यवस्थेत स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवताना त्यांची अधिकाधिक ऊर्जा संपून जाते. म्हणूनच ही परिस्थिती बदलणे ही आजची गरज आहे.

महिलांना स्वत:च्या गुणवत्तेचा वापर करण्यासाठी अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे. पण महिलांना अशी संधी अजिबात मिळत नाही. असे म्हणता येणार नाही. मुळात महिला स्वत:च संधी मिळवत आहेत. आणि पुढेही जात आहेत. म्हणूनच आज स्त्री-पुरुष समानतेची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक बाबतीत ही समानता मिळणे आवश्यक आहे. असे झाले तरच महिला खूप वेगाने प्रगती करू शकतील आणि महिला सक्षमीकरण हा शब्द उच्चारावाच लागणार नाही. पुढच्या काही वर्षांमध्ये अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

महिलावर्गाला आजही आपले प्राधान्यक्रम ठरवणे खूप अवघड जाते. महिला अजूनही कुटुंबकबिल्यात अडकल्या आहेत. आजही महिलांना घर सांभाळून नोकरी करावी लागते. घर सांभाळणे हे महिलांचे पहिले कर्तव्य आहे. या मानसिकतेतून अजूनही आपला समाज बाहेर पडलेला नाही. वर्षानुवर्षांची ही परंपरा, ही विचारसरणी मागे टाकून पुढे जाणे महिलांना जमलेले नाही. नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदार्‍या पेलताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. विविध आघाड्या पेलणार्‍या महिलांना सुपरवुमन म्हटले जाते. सुपरवुमन बनण्याच्या नादात महिला स्वत:चे अस्तित्वच हरवून बसल्या आहेत. आजही कुटुंबाची सगळी जबाबदारी स्त्रियांवर टाकली जाते. पण संसार हा दोघांचा असतो. त्यामुळे बायकोप्रमाणेच नवर्‍यानेही आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. दोघांनीही घरातली जबाबदारी वाटून घ्यायला पाहिजे. असे झाले तर महिलांना मोकळीक मिळू शकेल. आज अनेक घरामध्ये पती-पत्नी मिळून संसाराची जबाबदारी पेलताना दिसतात. काही सकारात्मक उदाहरणेही समाजात पहायला मिळतात. पण हा आवाका वाढवायला पाहिजे. यासाठी लहानपणापासूनच समानतेचे संस्कार रुजवायला पाहिजे. घराघरातला मुलगा-मुलगी हा भेद संपवायला पाहिजे. आणि हा भेद संपविणे ही प्रत्येकाची गरज आहे.


संत अक्कमहादेवी


कर्नाटकचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा शिमोगा जिल्ह्य़ातील शिराळकोण तालुक्यातील 'उडितडी' येथे चैत्र शुद्ध पौर्णिमा ११४६ रोजी निर्मलशेट्टी व सुमती या दांपत्याने पोटी अक्का महादेवीचा जन्म झाला. आईवडील दोघेही शिवभक्त गिरिजा मातेचे फळ म्हणून तिचे नाव महादेवी ठेवले. शिवभक्ताच्या घरी जन्मलेल्या महादेवीला वयाच्या अठव्या वर्षी शिवाचार्याकडून शिवदीक्षा देण्यात आली. भारतातल्या श्रीशैल-मल्लिकार्जुन हे त्यांच्या घराण्याचे कुलदैवत होय. त्यामुळे अक्कामहादेवीवर बालपणापासून श्रीशैल मल्लिाकार्जुन आराध्य दैवताचा विलक्षण प्रभाव पडला होता.

एका राजाने (पुरुषाने) दिलेले वचन न पाळल्याने अक्का त्याचा सर्मथपणे त्याग करते. स्त्री म्हणून त्याच्या अत्याचाराला बळी न पडता प्रतिकार करून धिक्कार करते. आजच्या काळातही स्त्रिया अत्याचाराला बळी पडतात. तेव्हा १२ व्या श्तकातील अक्काचे कडकडीत वैराग्य तिचे दिगंबरत्व अलौकीक ठरते. एका शिवशरणीच्या स्पर्शाने झालेला एका पुरुषाचा उद्धार म्हणजे एका महिलेकडून झालेला पुरुषोद्धारच होय.

अशा दिगंबर अवस्थेत अक्कामहादेवी मार्गक्रमण करीत कल्याणच्या अनुभवमंटपामध्ये प्रवेश करते. तेव्हा अनुभव मंडपाचे अध्यक्ष अल्लमप्रभू तिची कठोर परीक्षा घेतात. या कठोर परीक्षेतून महादेवीचे प्रखर ज्ञान दिसून येते. अल्लमप्रभू तिला प्रश्न करतात, तू कामाला जिंकले असे म्हणते मग केसांनी शरीर झाकण्याचे कारण काय तेव्हा ती आपल्या वचनातून उत्तर देते. फक्त अत पल्लव झाल्याशिवाय बाह्य़ साल निघत नाही. काममुद्रा पाहून तुम्ही कामपीडित होऊ नये या भावनेने मी अंग झाकले. तिच्यातील काम, क्रोध, मोह, मत्सर हे विकार केव्हाच गळून पडले होते. अल्लमप्रभूच्या प्रश्नांना सर्मपक उत्तर दिल्यामुळ सारा अनुभव मंडप अक्कामहादेवीचा जयजयकार करतो. अनुभवमंडपातील दिग्गजांनाही अशा तर्‍हेने ती निरूत्तर करते याचे प्रमुख कारण प्रखर वैराग्य, आत्मविश्‍वास, दृढनिश्‍चय होय.

अक्कामहादेवी या महान शिवयोगीनी होत्या. अष्टपैलू व्यक्तिमत्वाबरोबरच प्रतिभावंत, लावण्य, निर्भिडता, गोड गळा व प्रचंड आत्मविश्‍वास त्यांना लाभला होता. संतत्व आणि देवत्व प्राप्त होण्यासाठी ज्या विशेषत्वाची गरज भासते ते सर्व गुण अक्कामहादेवीमध्ये एकवटलेले होते म्हणून त्या आज समस्त स्त्रीजातीला वंदनीय आहेत. या भारतभूमीवर जणू ईश्‍वर प्राप्तीच्या सुखासाठीच तिचा जन्म झाला होता. तिला फक्त एकच ध्यास होता चन्नमल्लीकार्जुनाची प्राप्ती. यातून तिचे वेगळेपण व श्रेष्ठत्व स्पष्ट होते.

प्रतिभावंत संतकवयित्री

अक्कामहादेवी ही भारतीय साहित्यातील पहिली श्रेष्ठ कवयित्री होय. महाराष्ट्रातील जनाबाई, बहिणाबाई यांच्याही दोनशे वर्ष आधी महादेवी वचनांच्या माध्यमातून साहित्यरचना केलेली आढळते. त्याचा प्रभाव मराठी संतांवरही पडलेला दिसतो. महादेवीची वचने ही अनुभवातून फुललेली आहे. त्यांच्या वचनात अध्यात्मिक आणि काव्य, तत्व अणि ललित्य यांचा सुंदर संगम झालेला अढळतो. महादेवीबद्दल सांगताना म्हणतात 'माझ्या भक्तीची शक्ती तूच, माझ्या मुक्तीची शक्ती तूच' ज्या सत्पुरुषांनी जिला आपली शक्ती मानले ती वंदनीय असणारच.

अक्कामहादेवीच्या वचनांचे विषय आणि वैशिष्ट्ये

सत्यवचनी, ज्ञानयोगिनी, मार्गदर्शिनी, विरागिनी, शिवयोगिनी बरदायीनी अशा अनेक विशेषणातून अक्कामहादेवीचा गौरव करण्यात येतो. अक्कामहादेवीची ४३४ वचने आज उपलब्ध असून या वचनांमध्ये अनेक विषय आढळून येतात. अंतरिक मनाचे विश्लेषण मानवी मुल्यांची महती व प्रतिष्ठापना, सकल प्राणीजनांचे कल्याण, सद्भाव, सद्भक्ती, भक्तियोग, शिवयोग, सद्गुणश्रेष्ठतेचा गौरव, समता, मानवता, शालीनता, बंधुता, स्त्रीगौरव, जातीभेदाविषयी तिरस्कार समाजविकृतीचे खंडन व निर्मुलन अंधर्शद्धांवर अघात, विश्‍वकल्याण याशिवाय अध्यत्मिक तसेच सामाजिक विषयाचे उद्बोधन यांनी आपल्या वचनांतून केले आहे. अक्कामहादेवीची वचने ही सर्व जीवनस्पश्री, जीवनव्यापी व जीवनप्रभावी अशी आहेत. संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्या वचनसाहित्यात सामावली आहे.

शरणसत्ती लिंगपती या तत्वसिद्धांताचा अक्कामहादेवी यांच्या मनावर एवढा प्रभाव पडला होता की त्या प्रत्यक्ष शिवालयाच आपला पती, सर्वस्व मानू लागल्या. याच भावनेने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि उच्च उदात्त व श्रेष्ठ साहित्यीक दर्जाच्या वचनांतून जगाला जीवनतारक संदेश दिला. त्यामुळे कर्नाटकमध्ये त्यांना सर्वत्र जगन्माता, महाशिवयोगीनी अक्का म्हणजे थोरली बहीण असे गौरवाने संबोधण्यात आले.

अक्कामहादेवीच्या वचनात सहजता, सुंदरता, सरलता, भावोत्कटता, भावसौंदर्यता, जीवनसत्यता, सारगर्भित्ता, अनुभवसीलता, वास्तवता, भक्तिप्रधानता, अध्यात्मप्रधानता ही महादेवीच्या वचनसाहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये होय. अक्कामहादेवीची वचने म्हणजे आत्म्याचे उद्गार होय त्यांच्या वचनात अध्यात्म आणि काव्य तत्व आणि काव्य लालित्य यांचा सुंदर संगम झाला आहे.

अक्कामहादेवीच्या वचनात स्त्री जातीत सर्वश्रेष्ठ मानलेल्या अनेक स्त्रियांच्या साहित्याची झलक स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या वचनात ग्रीक सोफियाची कल्पकता, कोमलता आढळते. तामीळ प्रांताच्या आंडाळचे आत्मसर्मपण दिसते. अरेबियाच्या राबियाचे चिंतन दिसते. मुस्लिम थेरेसाचे वैराग्य पहावयास मिळते. राजस्थानच्या मीरेची भक्ती आढळून येते. काश्मिरच्या लल्लेश्‍वराची योगसाधना आढळते. महाराष्ट्राच्या मुक्ताबाईचे प्रौढत्व दिसते. तिच्या वचनातून प्रतिध्वनीत होणारा दिव्यसंदेश स्त्री जातीलाच नव्हे तर अखंड मानवजातीला मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे कर्नाटकात सर्वत्रजगन्माता महाशिवयोगीनी असा अक्कामहादेवीचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात येतो. शरीरालाच देव मानणार्‍या समाजाला आत्म्याच्या अंत:सार्मथ्याची खरी ओळख त्यांची वचने करून देतात. मूळ कन्नड भाषेत असलेली त्यांची वचने मराठी, इंग्रजी, हिंदी तसेच अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्ये अनुवादित जीवनकार्याचा व वचनसाहित्याचा अवर्जुन समावेश झालेला आढळतो.

'अक्का बळग' (अक्काचा परिवार) या नावाने वीरश्‍वै स्वीयांच्या हजारो संस्था, संघटना कर्नाटकच्या शहरी आणि ग्रामीण भागात आजही आढळून येतात. सामाजिक, सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांमध्ये या संस्था केंद्रस्थानी आहेत.

पंचकन्या

महिला या शब्दाबरोबर प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे.


एकविसाव्या शतकात स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. ती आपल्या अधिकारांसाठी लढणे- झगडणेही शिकली आहे. आजच्या स्त्रीने सिद्ध केले आहे, की त्या एकमेकांच्या शत्रू नाहीत तर सहकारी आहेत. स्त्री सशक्त आहे आणि तिच्या शक्तीची अभिव्यक्ती याप्रकारे पाहावयास मिळत आहे.

स्त्री-भ्रूण हत्येच्या कलंकित गोष्टी अनेकदा ऐकावयास मिळतात. त्याचवेळी समाजात मुलींना जन्म देऊन प्रसन्नपणे सांभाळणारी आईदेखील पाहावयास मिळत आहे. अशी बरीचशी कुटुंब आपल्या जवळपास सापडतील की ज्यांना फक्त एकच मुलगी आहे किंवा दोघीही मुलीच आहेत. आणि त्या आई-वडिलांच्या लाडक्या आहेत. त्या आई-वडिलांचीही काळजी घेत आहेत.

मुलींना दत्तक घेऊन त्यांचे अगदी प्रेमाने पालन-पोषण करणारीही कुटुंब आहेत. आज जवळपास सर्वच सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंबामध्ये मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कर्जदेखील घेतले जात आहे. मुली शिकून काय करणार? शेवटी त्यांना चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे अशा रूढीवादी परंपरा झुगारून देऊन लग्नाआधीच त्यांना शिक्षण देणे, आत्मनिर्भर करणे ही मानसिकता विकसित झाली आहे.

मुलीच्या घरचे पाणीही वज्र्य मानणार्‍या समाजात लोकं मुलीच्या घरी येऊन राहू लागली आहेत आणि त्यांच्याकडून भेटवस्तूदेखील प्रेमाने आणि गर्वाने स्वीकारू लागली आहेत.

मुलींना कायद्याने संपत्तीत अधिकार तर मिळालेच आहेत पण वडीलही तिला आपल्या संपत्तीचा अधिकार देऊ लागले आहेत. समजदार भाऊदेखील त्यात सहकार्य करीत आहेत.

लग्नासाठी 'वर' पसंत करताना तिच्या मतालाच प्राधान्य दिले जात आहे. उच्च शिक्षणासाठी मुली लहान-लहान शहरातून मोठय़ा शहरांमध्ये येऊन राहणे, नोकरी करणे, आपली ओळख निर्माण करणे यामुळे त्यांचा आत्मविश्यास वाढीस लागला आहे. आपल्या देशातच काय पण विदेशात जाऊ लागली आहे. आत्मविश्‍वासासोबतच आपले मत ठामपणे मांडणेही ती शिकली आहे. घराच्या संरक्षण कवचातून बाहेर येऊन तिने अभिव्यक्ती स्वातंत्र स्वत:च मिळविले आहे. आजची आधुनिक तरुणी अन्यायाचा विरोध करण्याच्या परिणामांना न जुमानता अन्यायाचा विरोध करते आहे. आजची स्त्री खर्‍या अर्थाने सखी-सहचारिणी बनली आहे. ती पतीची दु:ख वाटून घेण्यातही सक्षम झाली आहे. ती पत्नी बनून फक्त त्याने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे. शिक्षित आणि घराबाहेर जाऊन कमावू लागलेली आजची आई मुलांप्रतीही अधिक जागरूक आणि संवेदनशील बनली आहे. मुलांचे पालन-पोषण करतानाच ती त्यांना निर्णय घेण्यातही भागीदार बनली आहे. मुले ही आपल्या आईच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू लागली आहेत.

आजची स्त्री खर्‍या अर्थाने सासरसंबंधी आपले कर्तव्य पूर्ण करीत असताना माहेराप्रती असणारे कर्तव्यही पार पाडीत आहे. 'स्त्रीच स्त्रीची शत्रू असते' हा कलंक देखील तिने पुसून टाकला आहे. सासू-सून यांच्यातील युद्ध आता फक्त टी.व्ही. मालिकांमधूनच पाहावयास मिळत आहे. कारण आजच्या सासू सुना एकमेकांच्या वैरी नाही तर मैत्रिणी बनल्या आहेत.

अनेक मातांना वाढत्या वयाच्या मुलीची भलतीच चिंता वाटत असते. आपली देखणी तरुण मुलगी बाहेर जाते, हिंडते, नोकरी करते. अनेकांच्या वेगवेगळ्या नजरांचा विषय बनते. हे सारं तिला माहीत असतंच; पण त्या नजरांचा योग्य सामना करायचं आणि त्यातून सुरक्षित राहायचं बळ तिच्यात आहे की नाही याविषयी मात्र तिला नेहमीच शंका असते. शिवाय आजच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍या या मुलींना नेहमीच वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

कामाच्या अनियमित वेळा, कामानिमित्त पुरुष सहकार्‍यांबरोबर हॉटेलिंग, प्रवास, त्यांच्या बरोबरीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा यामुळे निर्माण होणारे तणाव या मुलींसाठी अडचणीचे ठरत असतात. अशावेळी आईने मुलीची जवळची मैत्रीण बनून राहणे आवश्यक ठरते. तिच्या मनात शिरणे, तिच्या प्रश्नांविषयी मोकळेपणाने चर्चा करणे, कामाचे स्वरूप नीट जाणून घेणे आणि संशयाची सुई न रोखता तिच्या सर्व पुरुष आणि स्त्री सहकार्‍यांविषयी माहिती करून घेणे हे आजच्या आईचे काम आहे. आपले स्त्री असणे इतरांच्या डोळ्यांत खुपू न देता हुशारीने जपणे तिला समजावून देणे आवश्यक ठरते. धोके न पत्करणे, फाजील आत्मविश्‍वास न बाळगणे आणि समोरच्या व्यक्तीवर आंधळा विश्‍वास न ठेवणे हे खबरदारीचे उपाय तिला सांगणे गरजेचे आहेच; पण स्वत:चे काम पूर्ण विश्‍वासाने करणे आणि चुकांची पुनरावृत्ती टाळत स्वत:ला सिद्ध करणे आवश्यक आहे हे ही तिला सांगायला हवे. आई आणि मुलीच्या नात्यात मोकळेपणा हवा. आयुष्यात निर्माण होणारे खाचखळगे नीट ओलांडता आल्यास पुढे सुंदर भविष्य वाट पाहात आहे यांची नीट जाणीव मुलींना द्यायला हवी. प्रसंगी त्यांचे विचार समजून घेऊन नव्या परिस्थितीच्या दृष्टीने ते योग्य असतील तर स्वीकारायलाही काही हरकत नसते.आजकाल तर स्त्रीसमोर असुरक्षिततेचे संकट उभे असते. स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे, मोहाला बळी न पडता योग्य मार्गावर कसे राहायचे याबद्दलही प्रेमाने, विश्‍वासाने सतत सांगत राहायला हवे. तरच आपल्या मुली सुरक्षित आणि समक्ष आयुष्य पेलू शकतात. स्त्री ही अनंत काळाची माता आहे. ती मुलगी, बहीण, मैत्रीण, पत्नी आणि आई या सर्वच भूमिका सक्षमपणे पार पाडते. एक दिवसाचा महिला दिन साजरा करून काही होणार नाही. आपल्या भारतीय संस्कृतीने स्त्री ला कायमच मोठेपण दिले आहे. भारतीय संस्कृतीत ज्यांचे नित्य स्मरण करायला सांगितले आहे त्या पंचकन्या मातृत्वासाठी किंवा पत्नित्वासाठी नाही तर त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी जनमानसात लोकप्रिय आहेत.

अहल्या द्रौपदी सीता

तारा मंदोदरी तथा।

पंचकन्या: स्मरेन्नित्यं

महापातकनाशिनी:॥

असा हा पूर्वापार चालत आलेला आहे. या पंचकन्यांचे नित्य स्मरण केले तर महापातकाचा नाश होतो हा त्याचा अर्थ. रामायण, महाभारतातल्या या स्त्री-व्यक्तिरेखा सार्‍यांच्याच आदर्श आहेत. जनसामान्यांच्या स्मरणातून, त्यांच्या र्शद्धेचा विषय बनून राहिल्यात.

अहल्या

अ+ हल म्हणजे नांगरणे. अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन. हा अर्थ अहल्या या व्यक्तिरेखेच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. त्या आधी आपण अहल्येचे रामायण वा इतर साहित्यातील चित्रण पाहू. अहल्येची उत्पत्ती-कथा रामायणाच्या उत्तरकांडात येते. ब्रह्मदेवाने सजीव सृष्टीमधील सर्वात सुंदर स्त्री निर्माण केली तिचे नाव त्याने अहल्या असे ठेवले. अहल्या याचा अजून एक अर्थ निर्दोष असा आहे. जिचे सौंदर्य वादातीत आहे, निर्दोष आहे ती अहल्या. त्याने तिला गौतम ऋषींजवळ सोपवले. ती वयात आल्यानंतर गौतम ऋषींनी तिला परत ब्रह्मदेवाकडे आणले. गौतम ऋषींनी अत्यंत मायेने, संयमी राहून तिचा सांभाळ केला हे बघून ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्यांनी गौतम ऋषींना अहल्येचा भार्या म्हणून स्वीकार करण्यास सांगितले. अशा रीतीने अहल्या गौतम-पत्नी झाली.

द्रौपदी

राजा द्रुपदाची कन्या. पुत्रकामेष्टी करत असताना यज्ञनारायणाने दिलेली कन्या. अयोनिजा, श्यामला, नीलपद्मगन्धा, बुद्धिमती, रुपगर्वीता द्रौपदी, महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचे पात्र. तिची कथा आपल्याला माहीत आहेच. सासूच्या-कुंतीच्या आ™ोने बहुपतित्व स्वीकारावी लागणारी पाची पतींना समत्वाने ममत्व देणारी, समद्गपत होणारी एक तरुण, रूपगर्वीता, आपल्या पाचही पतींचे गुणदोष जाणून असणारी द्रौपदी म्हणजे पांडवांना बांधून ठेवणारा, त्यांच्यातले पौरुषत्व जागे ठेवणारा धागा आहे. महाभारतात आपल्या मेधावी बुद्धिमत्तेने, कटू वाग्बाणांनी तीक्ष्ण प्रहार करत ईप्सित हेतू साध्य करते. पाचही पतींची भार्या असूनही तिचे स्त्री-पावित्र्य अबाधित आहे.

द्रौपदीचे अजून एक विलोभनीय रूप म्हणजे तिचे कृष्णाशी असलेले नाते. तिचे सखी रूप स्त्रीमनाला भुरळ घालते. द्रौपदी अबला नाही तर एक सशक्त, स्वतंत्र, विचारी, स्त्रीत्वाची ताकद असलेली, त्याचा पुरेपूर नि योग्य वेळी वापर करणारी एक आदिशक्ती आहे.

सीता

रामायणाची नायिका, भूमिकन्या, अयोनिजा, शालीन, बुद्धिमती, संस्कारी, स्वतंत्र, सशक्त स्त्री व्यक्तिरेखा. वेदकाळात नांगरणीच्या वेळी यज्ञ करीत असत. म्हणून नांगरताना सापडलेली कन्या म्हणून तिचे नाव जनकाने सीता ठेवले. सीतेची व्यक्तिरेखा जी आपल्याला संस्कृत साहित्यातून आणि लोकसाहित्यातून कळते ती थोडीशी परस्परविरोधी आहे. रामायणव्यतिरिक्त संस्कृत साहित्यातील सीता ही आदर्श भारतीय नारी अशा स्वरूपाची आहे तर लोकसाहित्यात सीतेचे स्त्री रूप, तिला स्त्री म्हणून भोगावे लागलेले दु:ख, तिची फरफट अधोरेखित करणारी आहे. रामायणातील सीता ही जास्त वास्तववादी आहे. ती भारतीय स्त्रीचे खरे रूप आहे. शालीन, बुद्धिमती, संस्कारी, जमिनीशी नाते सांगणारी, शिवधनुष्याशी लीलया खेळणारी, बहिणींशी मैत्रिणीचे नाते असणारी, सासरी सर्वांची मने जिंकणारी, पतीवर नितांत, अतूट र्शद्धा, प्रेम असणारी अशी आहे. सीतेचे अजून एक रूप आहे जे रामायणात दिसून येते ते म्हणजे बुद्धिमान, धर्मकार्य जाणणारी, कर्तव्यनिष्ठ, स्वतंत्र विचारांची स्त्री. वनवासकाळात अथवा लंकेच्या विजनवासात आणि नंतर उत्तरकांडात तिचे हे रूप प्रकर्षांने जाणवते.

तारा

वाल्मिकीने रामायणात तत्कालीन समाज रंगवताना सर्वच पात्रांच्या गुणदोषासहित असलेले त्यांचे स्वतंत्र अस्तित्व रंगवलेले आहे. तारा ही अशीच स्वतंत्र अस्तित्व असलेली सशक्त स्त्री व्यक्तिरेखा. ती अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टी असलेली, राजनीती निपुण, आत्मभान असलेली स्त्री आहे. जेव्हा सुग्रीवाचा वालीने पराभव करताच सुग्रीव लगेचच पुन्हा वालीला ललकारत असतो तेव्हा तारा संभाव्य धोका ओळखून वालीला युद्धभूमीवर जाण्यास परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पण वाली तिला न जुमानता युद्धासाठी जातो आणि वीरगतीस प्राप्त होतो. केवळ अंगदाला त्याचे राजगादीचे हक्क मिळावेत म्हणून ती वालीवधानंतर सुग्रीवाशी विवाह करते. सुग्रीव सीतेला शोधण्यात मदत करण्यात कुचराई करतोय हे जाणवल्यामुळे संतापलेला लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात त्याच्या अन्त:पुरात पोचतो. त्यावेळी तारा त्याची चांगलीच कानउघडणी करते आणि सुग्रीवाचे कवच बनून लक्ष्मणाच्या क्रोधापासून त्याचे रक्षण करते. आपले नाव तारा- रक्षण करणारी- असे सार्थ करते.

मंदोदरी

रामायणात मंदोदरीचे अत्यल्प वर्णन आहे. मंदोदरीने रावणाला दुष्कृत्ये न करण्याचा वारंवार सल्ला दिला. ती केवळ रावणाची सावली नव्हती तर अत्यंत रूपवती, राजनीतिज्ञ, विचारी स्त्री होती. तिने रावणाला सीतेला रामाकडे परत पाठवण्याबद्दल अनेकवार विनविले पण रावणाने तिला जुमानले नाही. पण मंदोदरीच्या धाकामुळे त्याने सीतेशी कधी गैरवर्तन केले नाही.

या पाचही स्त्री व्यक्तिरेखा स्त्रीत्वाच्या वेगळ्या अनुभूती व्यक्त करतात. या ोकाचे विेषण करता एक लक्षात येते की या पाचही जणी त्यांच्या मातृत्वासाठी किंवा पत्नीत्वासाठी ओळखल्या जात नाहीत तर त्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमता असलेल्या स्त्रिया म्हणून ओळखल्या जातात. आपण पंचकं ना असा पाठभेद घेतला तर या ोकाला आणि या पाच जणींना एक वेगळीच उंची प्राप्त होते.या पाच जणी भारतीय स्त्रीचे रूप आहेत. स्त्रीला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. तिचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमता फुलू दिली पाहिजे. ती पुरुषाच्या बरोबरीने घराचा, समाजाचा, राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. आज समाजात भारतीय स्त्रीत्वाचा -स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली, बुद्धिमता असलेली आणि घरदार (कुटुंब आणि समाज) याची सर्मथपणे धुरा वाहणारी स्त्री- हाच आदर्श असला पाहिजे हा संदेश हा ोक देत असतो. कुठल्याही पातकाचा नाश करण्याचे सार्मथ्य याोकात पर्यायाने या स्त्रीयांमध्ये आहे ही पूर्वापार चालत आलेली र्शध्दा आहे. जी आजही घरोघरी या ोकाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते.


पर्यावरण आणि महिला


तिने मनात आणले तर सारेच शक्य आहे ; तिच्याशिवाय हे जगही अशक्य आहे .. हे सर्वर्शुत आणि सर्वमान्य आहे. पर्यावरण संवर्धनात स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे, फार मोठे योगदान आहे. तिच्याबद्दल सांगायचे झाल्यास

तिच जननी तिच माती

तिच रुजविते असंख्य नाती

यावरून कदाचित माती आणि बाई यांचे अनेक गुणधर्म सारखेच,असे म्हणावे लागेल. सृष्टीचे जतन, संवर्धन करण्यासाठी ती प्रयत्नशील झाल्यास व तिला प्रोत्साहन मिळाल्यास ती निसर्गमित्र होऊन पर्यावरणाशी निगडित अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू शकते, पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करू शकते. कुटुंब ते अवकाश या व्यापक क्षेत्रात तिचे वाढते महत्त्व व वावर लक्षात घेता पर्यावरणाशी निगडित अनेक समस्यांचे निदान ती उत्कृष्टपणे करू शकते.

पर्यावरणाचे असंतुलन व वाढते प्रदूषण हे पर्यावरणाशी निगडित दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्लास्टिक बंदीची गरज, धूर- धुळीचे वाढते प्रमाण, वाढते तापमान, सागरी पाण्याची पातळी वाढणे, कचर्‍याचे ढिगारे तसेच अयोग्य व्यवस्थापन, पाण्याचे वाटप व वापराचे अयोग्य नियोजन, शहरीकरण, जगण्याच्या बदलत्या संकल्पना, स्वार्थ- हव्यास इत्यादंीमुळे पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते आहे. पर्यावरणाचा असमतोल व बदलांमुळे प्रदूषणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत.

वर्तमानकाळात पर्यावरण व त्याचे संवर्धन हा संवेदनशील मनांसाठी अत्यंत कळीचा तसेच जिव्हाळ्याचा पण व्यथित करणारा विषय आहे. निसर्ग अबाधित असेल तरच सजीव सृष्टी अस्तित्वात राहील याचे दाखल्यांसह उद्बोधन व प्रात्यक्षिकांसह कार्य गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन एक महिला या नात्याने पर्यावरण संवर्धनात आपणही खारीचा वाटा उचलू शकतो हे मनात आले आणि इच्छेचे रूपांतर संकल्पात झाले. विद्यार्थी दशेपासूनच रस्त्यांवर ,भिंतींवर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे, बस, रेल्वेत शेंगांची टरफले, बिस्किट- चॉकलेटचे कव्हर फेकणे, घरातील केर रस्त्याच्या कडेला फेकणे, केळी ची साले इतरत्र फेकणे, मुक्या प्राण्यांचा छळ ,त्यांना बेदम मारणे, कचरा जाळणे, झाडांची कत्तल करणे यासारख्या घटनांनी मन नेहमीच व्यथित व्हायचे..चरफडायचे. अनेकदा अनेकांशी वाद व्हायचे. पण, वाद घालून काहीच उपयोग होत नाही हे लक्षात आले. बालमनावरील सकारात्मक संस्कार आणि तरुणाईला अनुकरणातून योग्य वळण लावले तर पर्यावरणाचे संवर्धन अधिक चांगले करता येईल याची जाणीव हळूहळू झाली. वैचारिक परिवर्तन पर्यावरण संवर्धनासाठी गरजेचे आहे हे प्रकर्षाने विचारात घेतले पाहिजे.

मुलींना पर्यावरणाच्या सुरक्षेची गरज व महत्त्व याची जाणीव करून दिली तर बर्‍याच प्रमाणात वागणूक आणि विचारात बदल करता येईल असे मनात आले, त्यासाठी मी लेखणीचा आधार घेतला. पर्यावरणीय समस्यांशी निगडित अनेक लेख कागदांवर उतरु लागले. वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके, दिवाळी अंक यातून पर्यावरणीय जागृती करणारे लेख प्रकाशित होऊ लागले, त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, फोन येऊ लागले. आपण पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा का होईना वाटा उचलल्याचे समाधान मलाही होऊ लागले. इतरांमध्ये जागरूकता व परिवर्तन होत असल्याचा आनंद होऊ लागला ,तो कायम टिकविण्याचे प्रयत्न सुरू झाले. सातत्याने पर्यावरणावर लिहिण्याची प्रेरणा मिळाली. बी ए च्या अभ्यासक्रमावरील पर्यारणशास्त्रहे पुस्तक लिहिण्याची ऑफर आली,ती मी लगेच स्वीकारली आणि तयारीला लागली. बघता- बघता जून २0२0 साली पुस्तक प्रकाशीत झाले. लोकसंख्या व पर्यावरण,कचर्‍याचे व्यवस्थापन व विल्हेवाट, पर्यावरण चैन आणि धोके, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदुषण, हरीत हाका, सागरपक्षी वाचवा, कृत्रिम वणवे, ग्रीन हाऊस इफेक्ट, दुष्काळाचे व्यवस्थापन, जैवविविधता यासारखे अनेक लेख लिहिले आणि कृतीतदेखील आणले.

पर्यावरणाविषयी जेवढी जागरूकता करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला. विद्यार्थी-विद्यार्थिनींना हाताशी घेऊन नगरपंचायती अंतर्गत लावलेल्या झाडांना पाणी घालणे, कचरा गोळा करणे, परिसर स्वच्छ करणे, वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे ही कामे केली. एक पाऊल पर्यावरणासाठी हा उपक्रम सुरू झाला.

वरील कार्यातून एक अनुभव विशेषत्वाने जाणवला तो म्हणजे मुली पर्यावरणाशी निगडित सर्व कामे मनापासून करतात. वेळोवेळी हे करा ,हे करू नका असे संदेश घोषवाक्य, निबंध, कविता यातून दिले जाऊ लागले. मूक प्राण्यांना आर्शय मिळाला,पाखरांना दाणे पाणी ची सोय झाली. प्रत्येक घरापुढे छोटी २ मडकी टांगलेली दिसू लागली. थोडक्यात निसर्गाला होणारी इजा कमी झाली. परिसर स्वच्छ सुंदर झाला.

महिलांनी मनात आणलं तर कळत नकळत त्या पर्यावरण संवर्धन करू शकतात ते याप्रमाणे- हे करावेच -

रोजच्या घरातील कचर्‍याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे.

ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करून ते बागेत, कुंड्यात वापरावे.

कचरा गाडीवाल्याला नियमितपणे कचरा द्यावा,तो इतरत्र टाकू नये.

घर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.

टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याची कला अवगत करावी. ती इतरांना शिकवावी.

प्लास्टिकऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा.

कुटुंब तसेच बालमनांवर, विद्यार्थी, सहकारी, कर्मचारी व संपर्कात येणार्‍या लोकांवर संस्कार करावेत.स्वच्छता अभियानात महिलांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आज शेतीपासून अवकाशापयर्ंत महिलांचा वावर असल्यामुळे त्या सहज सुलभ व स्वाभाविकपणे पर्यावरणाचे संवर्धन करतात. पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न प्रदूषणाच्या तुलनेत कमी पडत आहेत त्यामुळे सामूहिक प्रयत्नांनी त्यावर उपाय योजणे ही मोठी गरज व जबाबदारी आहे.

प्रत्येकीने आपल्या आयुष्यात काही झाडांचे जतन, आवश्यक स्वच्छता, सार्वजनिक स्थळांचा नेटका वापर, सकारात्मक वागणूक, निसर्गाचा सन्मान, नियम व पर्यावरणीय कायद्यांचे पालन केल्यास,त्याचा प्रसार व प्रचार केल्यास, घरात संस्कार केल्यास ..पर्यावरण संर्वधनासाठी वेगळे, विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. पर्यावरण संवर्धन जगण्याची एक सहज सवय बनून जाईल आणि आपल्या सगळ्यांना मोकळा श्‍वास घेता येईल.

अमृता शेरगिल


विसाव्या शतकातील प्रभावी प्रतिभासंपन्न महिला चित्रकार म्हणून अमृता शेरगिल यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आयुष्याची लांबी मोजण्यापेक्षा त्या आयुष्यात काय साध्य केले याची नोंद घ्यावी हे वाक्य अमृता शेरगिल यांच्या बाबतीत अगदी खरे ठरते. अतिशय छोटेसे आयुष्यमान घेऊन जन्माला आलेली ही मनस्वी कलाकार काळावर आपल्या प्रतिभेची अमीट छाप सोडून गेली.

अमृता शेरगिल यांचा जन्म हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सन ३0 जानेवारी १९१३ ला झाला. संस्कृत-फारसी या भाषांचे गाढे तज्ज्ञ व विद्वान असणार्‍या त्यांच्या पित्याचे नाव उमरावसिंह शेरगिल मजीठिया होते. त्यांची आई अँटोनी गोटसमन ही हंगेरी येथील यहुदी ऑपेरा गायिका होती. इंदिरा शेरगिल ऊर्फ सुंदरम ही त्यांची धाकटी बहीण. अमृता यांचे बालपण बुडापेस्ट येथेच गेले. बालवयापासूनच कला, संगीत, अभिनय यांची उत्तम जाण असणार्‍या अमृता यांना अधिक पैलू पाडण्याचे काम त्यांचे मामा एर्विन बकते यांनी केले. चित्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी घरातील नोकर-चाकर, आसपासच्या वातावरणातील अनेक घटकांचा चित्रात अंर्तभाव करण्यासाठी अमृताला प्रोत्साहित केले.

सन १९२१ मध्ये शेरगिल कुटुंबीय भारतातील सिमला या भागात वास्तव्यास आले. तेथे पियानो, व्हायोलिन वादन शिकता शिकताच अमृता यांनी गॅएटी थिएटरमध्ये नाटकात अभिनय करणे सुरू केले. त्याच दरम्यान इटली या देशातील अनेक मूर्तीकारांशी तिच्या कुटुंबीयांचा परिचय झाला व अमृताला इटलीच्या कलाजगताची माहिती मिळाली. पुढे सोळाव्या वर्षी चित्रकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला अमृता आईसोबत पॅरिसला गेली. तिथे तिने प्रसिद्ध चित्रकार पिअरे व्हॅलेंट, लुसीए सायमन आणि राज संस्थानातील मान्यवर चित्रकारांकडून चित्रकलेचे धडे घेतले. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रांवर चित्रकार शिक्षक व्हॅलेंट व प्रिय मित्र बोरिस तेजलिस्कीमुळे युरोपियन शैलीचा प्रभाव होता. सन १९३२ ला त्यांनी काढलेल्या यंग गर्ल या चित्रांमुळे त्यांना सन १९३३ चा ग्रँड असोसिएट हा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान प्राप्त करणार्‍या त्या सर्वात कमी वयाच्या पहिल्या आशियायीन कलाकार होत्या. सन १९३४ मध्ये त्यांना तीव्रपणे भारतात परतण्याची ओढ लागली. भारतात परतल्यावर त्यांनी पारंपरिक कलेच्या अभ्यास व संशोधनार्थ स्वत:ला वाहून घेतले. मृत्यू येईपयर्ंत त्यांचे हे कार्य अखंड सुरू होते. सन १९३६ मध्ये काही काळ सिमला येथील स्वत:च्या घरी वास्तव्य करून त्यांनी कला शोधार्थ भ्रमंती सुरू केली. कार्ल खंडालावाला यांची त्यांना या कामी मदत झाली. मुगल व पहाडी शैली त्यांच्या मनाचा ठाव घेऊ लागली. अजिंठा येथील चित्र-शिल्पकलेने त्या भारावल्या.

सन १९३७ या वर्षी त्यांच्या चित्रकारितेत कमालीचे परिवर्तन आले. त्यादरम्यान निर्माण केलेल्या चित्रात त्यांनी युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव झुगारून अत्यंत सहजपणे सढळ हस्ते भारतीय रेखाटने व रंगांचा वापर केला. त्यावेळी त्या दक्षिण भारतात भ्रमण करीत होत्या. ब्राइड्स टॉयलेट, ब्रम्हाचारीज, साऊथ इंडियन व्हिलेर्जस गोइंग टू मार्केट या त्यावेळच्या त्यांच्या चित्रातून प्रामुख्याने भारतातील जनजीवनाविषयी सहानुभूती व संवेदना झळकतात. हा त्यांच्या जीवनातील संस्मरणीय संक्रमणाचा काळ होता. परदेशी कलासंस्कार व शैलीचे विस्मरण घडवून त्यांचे अंतरंग व त्यानुरूप तयार होणारी कलाकृती संपूर्ण भारतीय अभिव्यक्तीत साकारत होती.

१९३८ मध्ये डॉ. व्हिक्टर एगन यांच्याशी विवाह केल्यानंतर अमृता गोरखपूर येथे रहावयास गेल्या. अमृता शेरगिल यांच्या नावाचीही समकालीन चित्रकारांमध्ये गणना व्हायला लागली. व्हिलेज सीन, इन द लेडीज एंक्लोसर आणि सीएस्टा या त्यांच्या चित्रातून ग्रामीण जगणे, त्यातील बारकावे व महिलांच्या आयुष्यातील खोल धागेदोरे सापडतात. महात्मा गांधी यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांच्याही मनात गरीब, व्यथित व वंचित जनतेविषयी कळकळ निर्माण झाली. हृदयातील हे भाव त्यांच्या चित्रांतून व्यक्त होत. त्यांच्या या सहिष्णुतेमुळेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४0 मधील गोरखपूर दौर्‍यात त्यांची आठवणीने भेट घेतली. सप्टेंबर १९४१ मध्ये अमृता पतीसमवेत लाहोर येथे गेल्या असताना गंभीर आजारी पडून कोमात गेल्या व दुर्दैवाने त्यांचा ६ डिसेंबर १९४१ ला लाहोर येथेच मृत्यु झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उलगडले नाही पण काही जाणकारांच्या मते असफल गर्भपाताचा प्रयत्न हे एक कारण सांगितल्या जाते. लहानसे आयुष्य जगून ही महान कलाकार अचानक काळाच्या पडद्याआड गेली.

अमृताच्या मृत्यूनंतरही त्यांची चित्रे लोकप्रिय होत गेलीत. कालांतराने अमृता शेरगिल यांना भारतातील सर्वात महागडी महिला चित्रकार मानल्या गेले. भारतीय पुरातात्त्विक सर्वेक्षण विभागाने सन १९७६-१९७९ मध्ये केलेल्या यादीत अमृता शेरगिल यांचा नऊ सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये समावेश केला. प्रसिद्ध मेक्सिकन पेंटर फ्रिडा काहलो यांच्याशी अमृता यांची तुलना होऊ लागली. फ्रिडा यांच्या चित्रात असणारा मुक्त क्रांतिकारी भाव, देशीय जनजीवन आणि सेल्फ पोट्र्रेट निर्मिती अमृता यांच्याही चित्रात ठासून भरलेली होती. बुडापेस्ट येथे त्यांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्यात आले. जगभरातील अनेक कलाकारांसाठी त्या प्रेरणास्थान झाल्यात. १९९३ मध्ये आलेल्या तुम्हारी अमृता या नाटकाच्याही त्या प्रेरणास्थान होत. युनेस्कोने सन २0१३ ला अमृता शेरगिल आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित करून त्यांच्या शंभराव्या जयंतीचा जागतिक स्तरावर सन्मान केला.

त्यांच्या कार्याला भारतीय संस्कृतीसाठी अत्यंत मोलाचे मानत त्यांच्या चित्रांना भारतातच ठेवण्याचा मुख्य निर्णय भारत सरकारने घेतला.अवघे अठ्ठावीस वर्ष वयोमान लाभलेली ही असामान्य कलाकार शलाकेसारखी चमकून अल्प क्षणात विलीन झाली असली तरी चित्ररूपाने आजही अजरामर आहे.

महिलांना मान द्या


आठ मार्च हा जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहाने व विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. अनेक ठिकाणी या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो.फक्त याच दिवशी महिलांचा सन्मान न करता तो रोजच व्हायला पाहिजे. महिला दिवस म्हणजे महिलांचा सन्मान वर्षातून एकदाच करायचा का.? एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस महिला दिवस समजून त्यांचा मान सन्मान केला पाहिजे तर तो दिवस महिलांसाठी आनंदाचा असेल

भारतात मुंबई येथे ८ मार्च १९४३ साली पहिला महिला दिवस साजरा झाला आणि तो आज पयर्ंत चालूच आहे. पूर्वी महिला विषयी फक्त चूल आणि मूल असे म्हटले जायचे. म्हणजे महिला म्हणजे फक्त घरात स्वयंपाक व घरची इतर कामे आणि मूल बाळ सांभाळायचे एवढेच तीचे काय काम असे मानले जायचे.आज महिला या चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. पूर्वी जिथे महिला चार लोकांसमोर बोलायला घाबरत होती किंवा तसे वागल्यावर कमी पण समजले जायचे त्याच महिलेच्या हाताखाली पन्नास पन्नास लोकं काम करताना आपल्याला दिसतात. म्हणून तर आज या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व विविध पुरस्कार मिळताना आपण पाहतोय व ऐकतोय.

खरंच आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली खरंच हि एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण महिलांना संधी देतोय. प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आई वडील करताना आपल्याला दिसतात. आज महिला स्वतंत्ररित्या जगत आहे त्यांचे निर्णय त्या आज स्वत: घेऊ लागल्या आहेत. म्हणून तर आज विमानाच्या पायलटपासून तर मेट्रोच्या पायलटपर्यंत त्या आज आपल्याला पाहायला मिळतात.

पिटी उषा, भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. पीव्ही सिंधू , किरण बेदी या पण सर्व महिलाच होत्या आणि महिला असून त्या त्यांच्या ज्या त्या क्षेत्रात त्यांनी नांव कमावलं आणि त्यांच्या पासूनच प्रेरणा घेत व त्याना डोळ्यासमोर आदर्श ठेऊन आज महिला सतासामुद्रापार झेंडा फडकवत आहे. ही एक आपल्या भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण जिथं महिलेला कमी समजलं जायचं किंवा हे महिलांचे काम किंवा हे महिला करू शकत नाही असे समजले जायचे तिथे आज महिला आपल्या भारत देशाच्या सीमाचे रक्षण करताना आपण पाहतोय. त्याच महिला पूर्वी कुठे तरी घराबाहेर निघायला घाबरायच्या त्याच महिला आज परदेशात नोकरी करून आकाशाला गवसणी घालताना आपल्याला दिसत आहेत . ८ मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही.

जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा


सतराव्या शतकापर्यंत भारत जगातला सर्वात श्रीमंत देश असल्याचे म्हटले जात होते. भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग याच गोष्टी संदर्भात एकदा म्हणाले होते की, 1700 साली भारत एकटा जगातील 22.6 टक्के संपत्ती निर्माण करीत होता. पण 1952 मध्ये हेच प्रमाण घसरून 3.8 टक्क्यांवर आले होते. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला, कधीकाळी ब्रिटनच्या राजमुकुटातील हिरा असलेला भारत, दरडोई उत्पन्नाच्या निकषांवर जगातील सर्वांत गरीब देश बनला होता.'  इंग्रजांनी आपला देश भिकेकंगाल बनवला हे खरेच आहे. शिवाय भारताचा सर्वात मौल्यवान , अनमोल आणि जगप्रसिद्ध कोहिनूरही हिराही आपल्या देशात नेला. कुतुबशाही राजवटीत गोवळकोंडा हे हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीचे एक महत्त्वाचं जागतिक केंद्र होतं. पर्शियाहून आयात केलेल्या हिऱ्या-मोत्यांचाही येथे मोठ्या प्रमाणावर बाजार भरत असे.कुतुबशाही राजवटीपर्यंत गोवळकोंड्यात धनाचे पूर लोटत होते. नवलाख दिव्यांच्या द्वारकेसारख्या इथे रत्नांच्या ज्योती आणि माणिकांच्या वाती पाजळत होत्या. समृध्दी इथे वैभवात नांदत होती. विश्वविख्यात कोहिनूर हिरा याच किल्ल्यात झगमगत होता. गोवळकोंड्याच्या परिसरातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या कोल्लार येथील खाणीत इसवी सन 1656 मध्ये तो सापडला होता. टॅव्हर्नियर या फ्रेंच प्रवाशाने हा हिरा इसवी सन 1665 मध्ये औरंगजेबाच्या जमादारखान्यात पाहिला होता. सुलतान अली कुतुबशहाच्या कारकिर्दीत मीर जुमला याने हा हिरा शहेनशहा शहाजहान बादशहाला नजर केला. (त्या वेळी या हिऱ्याला पैलू पाडलेले नव्हते. त्याचे वजन 787 कॅरेट होते.) नादिरशहाच्या दिल्ली लुटीतून तो इराणला नेला. नादिरशहाच्या निधनानंतर (इसवी सन 1747) तो हिरा त्याचा नातू शाहरुख याने भेट म्हणून काबूलच्या अहमद शहाकडे दिला. त्याचा मुलगा शहा झमन व त्यानंतर सुलतान सुझा यांच्याकडे वंशपरंपरेने कोहिनूर हिरा जाऊन पोचला. इसवी सन 1812 मध्ये शहाचे कुटुंबीय लाहोरला असताना त्यांनी तो हिरा पंजाबचे महाराज रणजितसिंह यांना भेटीदाखल दिला. या विश्वविख्यात हिऱ्याचे हस्तांतराचे भ्रमण जवळजवळ पूर्ण झाले आणि तो भारत भूमीत परत आला; पण काळाने कूस बदली आणि ब्रिटिशांनी इसवी सन 1849 मध्ये पंजाब खालसा केले; तेव्हा हा कोहिनूर हिरा त्यांच्या हातात पडला. (तेव्हा त्याची किंमत दोन कोटी रुपये होती.) लॉर्ड लॉरेन्सने तो हिरा थेट व्हिक्टोरिया राणीला भेट म्हणून इंग्लंडला पाठवून दिला. आजही तो देदीप्यमान हिरा इंग्लंडच्या राजाच्या मुकूटात झगमगत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Saturday 6 March 2021

एम्प्रेस गार्डन


एम्प्रेस गार्डन हे पुण्यातील वैभव आहे. पेशवाईच्या काळापासून नैसर्गिक संपत्तीचा डौल मिरवतअसलेल्या गार्डनला पूर्वी सोल्जर्स गार्डन म्हटले जाई. याला एक स्वतःचा इतिहास आहे. सरदार महादजी शिंदे यांची वानवडीला छत्री आहे. त्यांचे सैन्य याच जागेवर असायचे पेशवाईचा पाडाव झाल्यावर ब्रिटिश सैन्य याठिकाणी थांबू लागले. अग्री सोसायटी हॉर्टीकल्चरल ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेकडे 1830 साली या उद्यानाची जबाबदारी होती. या संस्थेकडे खडकीचे उद्यान आणि मुंबईची राणीची बागही देखभालीसाठी देण्यात आली होती. तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर सर जॉन माल्मन यांनी या बागा दिल्या होत्या. संस्थेसाठी त्याकाळी डॉ. भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकरशेठ, डेव्हिड ससून, रावसाहेब मंडलिक जमशेटजी जिजीभाई ही मंडळी काम करत होती. समाजसेवेची आवड आणि वनस्पती जोपासणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उद्यानाच्या विकासाला त्याकाळी सुरुवात झाली. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या उद्यानाची जागा तत्कालीन मुंबईच्या प्रांतात गेली. त्यानंतर जागेची मालकी राज्य सरकारकडे गेली. या ठिकाणी वृक्षराजींची एक परंपरा आणि वंश विकसित झाले आहेत. निबिड आरण्यांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि पक्षी पाहायला मिळतात. उद्यानात असलेल्या कांचनवेल तर तब्बल अकरा अर्धा एकरावर विस्तारलेल्या आहेत. किनई, धावडा, कळम, सीता अशोक, कुसुम्ब, बेगर्स बाऊल, चांदन वावळ, मुचकुंद, टेमरू, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, बेहडा, मास्ट ट्री, महोगनी, मोह, बांबूचे जायंट, बुद्दास वेली, मलेशियन ऍपल, बिबा, चक्राशिया, नांद्रुक, रुद्राक्ष, रक्त रोहिडा, समुद्रशोक, उर्वशी मेढशिंगी, गोरख चिंच, जांभूळ, आंबा इत्यादी वृक्ष येथे आहेत. ययेथे700 प्रजातींचे वृक्ष पाहायला मिळतात. दीड हजारांपेक्षा अधिक वृक्ष असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी हे उद्यान महत्त्वाचे आहे.  उद्यानात ब्ल्यू मोरमॉन नावाचे दुर्मीळ फुलपाखरू, मोर, ग्रे हॉर्नबिल, पॅराडाईज फ्लाय कॅचर (स्वर्गीय नर्तक) हे पक्षी पाहायला मिळतात.
ब्रिटिशांनी125 वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या अमेझॉन जंगलामधून अमेझॉन लिलीचे रोप भारतात आणले होते. एक रोप कोलकात्याच्या उद्यानात तर दुसरे एम्प्रेस गार्डनमध्ये लावण्यात आले होते. ही वनस्पती आजही जिवंत आहे. या वनस्पतीच्या एका पानात 30-35 किलोचा भार पेलण्याची क्षमता आहे. एम्प्रेस गार्डन हे 55 एकरांमध्ये वसले होते. 1970-80 च्या दशकात त्याचे दोन भाग झाले. आता 39 एकरांमध्ये ही भाग शिल्लक आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Friday 5 March 2021

चंदेरी साडी


एकेका परंपरेतून, इतिहास आपल्याला एकेक गोष्ट सांगत असतो. 'चंदेरी' या वस्त्र-परंपरेचा जन्म मध्य प्रदेशातील 'चंदेरी' या गावातला. पौराणिक कथांमध्ये वैदिक काळात, कृष्णाचा भाऊ शिशुपाल यानं चंदेरी वस्त्राचा वापर वेशभूषेसाठी केलेला उल्लेख आढळतो. नंतर चंदेरी कापडाचा उल्लेख अकराव्या शतकातील ऐतिहासिक दस्तऐवजांमध्येसुद्धा सापडतो. पुढे १३५० च्या सुमारास कोष्टी समाजाचे विणकर झाशीतून स्थलांतरित होऊन मध्यप्रदेशातील चंदेरी गावात स्थायिक झाले आणि मोठ्या प्रमाणात चंदेरी कापड विणू लागले. तेव्हा मुघल सरदार आणि त्यांच्या राण्या मोठ्या हौशीनं चंदेरी कापडाचे अंगरखे शिवत असत. त्यामुळे या साड्यांच्या बुट्ट्यांवर सुंदर मुघल नक्षीकामाचा प्रभाव पडलेला दिसतो. सतराव्या शतकातील 'मझिर-ए-आलमगिरी'मध्ये एक संदर्भ आढळतो, आलमगीर औरंजेबानं 'खिलत'साठी, (खिलत म्हणजे शाही-अंगरखा) चंदेरी गावातून, सोन्याचांदीचे जरीकाम केलेले सुंदर चंदेरी कापड बनवून घेतल्याचा उल्लेख आहे.

पुढे १९१० मध्ये ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी चंदेरी साड्या मोठ्या प्रमाणात विणून घेतल्या आणि त्या उद्योगाला पुरुज्जीवन दिलं आणि चंदेरीला सोन्याचे दिवस आले! त्या काळात राजघराण्यातल्या स्त्रिया, सोन्या-चांदीची जर वापरून विणलेल्या उंची चंदेरी साड्या खास हातमागावर बनवून घेत असत. पुढे इंग्रजांच्या काळात पॉवरलूम आल्यावर, चंदेरी साड्यांचा उद्योग डबघाईला आला; पण काही वर्षांनी चंदेरी गावातील विणकरांनी हातमागावर नवनवीन प्रयोग केले आणि त्यामुळे चंदेरी साडीला भारतभर मागणी वाढू लागली. सुरतची खास 'जर' वापरून या साड्या कॉटनमध्ये, सिल्कमध्ये आणि कॉटन-सिल्कमध्ये बनत असल्यामुळे अगदी छोट्या कार्यक्रमांपासून ते मोठ्या कार्यक्रमांपर्यंत कुठंही नेसता येतात. शिवाय या साड्या तलम आणि हलक्या-फुलक्या असल्यामुळे कोणत्याही ऋतूत आरामात वापरता येतात. हलकी चमक असणाऱ्या या साड्या नेसल्यावर एकदम 'ग्रेसफूल' वाटतात. सध्या 'पेस्टल शेड'च्या चंदेरी साड्यांना, उच्च अभिरुचीच्या ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. चंदेरी साडीच्या खासियतीमुळे, या साडीला स्वतःची अशी एक ओळख प्राप्त झाली आहे आणि त्यामुळे या साडीला सरकारकडून 'भौगोलिक स्थानदर्शक' (जिऑग्राफिकल इंडिकेशन) हे प्रमाणपत्रही मिळालं आहे. तुम्ही हातमागावरच्या साड्यांच्या प्रेमात असाल, तर सुंदर बुट्यांची चंदेरी साडी तुमच्या संग्रहात असायलाच हवी!


महाराष्ट्राचं लेकरू :शेकरू


महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला दैनंदिन जाणारा 'शेकरू' किंवा 'इंडियन जायंट ही स्क्विरल' म्हणजेच झाडावर राहणारी मोठी  खारूताई शेकरू हे सलग, समृद्ध आणि  घनदाट जंगलाचे उत्तम निर्देशक आहे. जगभरात मोठ्या खारिच्या चार प्रजाती आहेत, त्यातील शेकरू (रातुफा  इंडिका) हे फक्त भारतात सापडतात. महाराष्ट्रात पश्चिमघाटात सह्याद्रीच्या रांगांमध्ये,  महाबळेश्वर, भीमाशंकर, फणसाड, आंबा घाट, ताम्हिणी,  वासोटा आणि इतर काही परिसराच्या सदाहरित, निम  सदाहरित व नदीकाठच्या जंगलात व मेळघाटच्या आणि गडचिरोली मधल्या चपराळा जंगलात शेकरू आढळतात. दोन ते अडीच किलो वजनाचे, सुंदर तपकिरी रंगाचे  आणि झुबकेदार लांबलचक शेपूट असणारे शेकरू  अतिशय देखणे दिसते. पण ते फारच लाजाळू असल्याने क्वचितच जमिनीवर येते. ते त्यांची हालचाल एका झाडावरून ते जवळच्या दुसऱ्या झाडावर उड्या मारून करतात. त्यांच्या ह्याच सवयी साठी त्यांना घनदाट आणि सलग जंगलाची गरज असते. निसर्गगान शेकरू नर असो किंवा मादी ते एकाकी राहणं पसंत करतात आणि त्यांचा परिसर क्षेत्र आणि हद्द जपतात. नराच्या परिसरक्षेत्र हद्दीत मादीच्या हद्द मिसळू शकते. ते त्यांच्या अन्न आणि घरट्यांसाठी हा परिसर राखून ठेवतात आणि त्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक घुसखोरे शेकरूला पळवून लावतात. शेकरू हा शाकाहारी प्राणी  आहे आणि फळ, बिया, फुल, कोवळी पानं आणि  झाडाची मऊ साल हे त्यांचे आवडीचं खाध आहे. शेकरू एक दिवाचर प्राणी आहे आणि दिवसभराच्या अन्न शोधणे, खाणे आणि आरामच्या कार्यकालापानांतर ते सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घरट्यात परततात. प्रत्येक शेकरू स्वत:च्या हद्दीत ७-८ घरटी तयार करतो. ही घरटी घुमटाकार आकाराची, काड्यांनी व पानांनी बनलेली असतात.

घरट बनवणं आणि त्याची देखरेख करणं हे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. ही घरटी शेकरूला कडक उन्हापासून, पावसापासून आणि शिकाऱ्यापासून संरक्षण देतात. अश्या काही घरट्यांमध्ये पावसाळ्या आधी शेकरू बिया साठवून ठेवतात. घरट्यात दुपारच्या वेळेला निवांत विश्रांती घेत असलेल्या शेकरूची आकाशात उडणाऱ्या गरुडाला भनक सुद्धा लागत नाही. शेकरूंची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांमध्ये मुख्यतः काळा गरुड, सर्पगरुड, साप, बिवटा आदी आहेत. शेकरुंचा वर्षातून एकदाच विणीचा हंगाम असतो, एक मादी एकाच पिल्लाला जन्म देते आणि साधारण दहा महिन्यापर्यंत त्याचे संगोपन करते. त्या नंतर हे पिल्लू स्वत:च घरटं बांधायला शिकतं आणि स्वत्रंत राहायला लागतं. आपल्या महाराष्ट्रात शेकरूच्या संवर्धनासाठी भीमाशंकर अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. आणि त्यांच्या साठी इथे परिपूर्ण अधिवास आहे, महाराष्ट्र वनविभाग शेकरू संवर्धनामध्ये उत्तम काम करत आहे आणि बऱ्याच संरक्षित क्षेत्रात त्यांचा आकडा वाढत आहे. पण इतर ठिकाणी जिकडे शेकरूचं वास्तव्य होतं किंवा काही प्रमाणात शिल्लक आहे तिकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बेसुमार जंगल तोडीने त्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. तसं शेकरू फळं आणि बिया खाऊन वनांचा आपोपाप प्रसार आणि वृद्धी करतात. त्यांना फक्त गरज आहे ते त्यांच्या अधिवास संरक्षणाची.

गंगूबाई हनगळ


गंगूबाई हनगळ या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. गंगूबाई हनगळ यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात इ.स. १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)कॉंग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता.

गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले. धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली.

वयाच्या सोळाव्या वर्षी हुबळी येथील वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांनी सहजीवनासाठी गंगूबाई यांना मागणी घातली. त्यांची पहिली पत्नी नुकतीच निधन पावली होती. ते मितभाषी आणि गाण्याची आवड असणारे होते. या विवाहामुळे त्या हुबळी येथे वास्तव्यास आल्या. गायिका कृष्णा हनगळ, बाबुराव आणि नाना ही त्यांची अपत्ये होत.

इ.स. १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वयरू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.इ.स. १९२८: मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्ताेपंत देसाई व कृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.१९३१ मुंबईतील गोरेगांव येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.१९३२ हिज मास्टर्स व्हॉइस (एचएमव्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.

भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २00 शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.

१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या गांधारी या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६0 ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या काळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती बाळाचा चाळा आणि आईचा छकुला. ही गाणी त्या काळात महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. मिस गांधारी यांची रेकॉर्ड प्रचंड लोकप्रिय झाली.