Tuesday 30 June 2020

चार्टर्ड अकाउंटंट दिवस

१ जुलै हा राष्ट्रीय CA दिवस म्हणून साजरा केला
जातो. कारण, हा दिवस इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड
अकाउंटंट्स ऑफ इंडियाची स्थापना दिवस आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स हा पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित अभ्यासक्रम आहे. भारतीय घटनेने पारीत केलेल्या कायद्यान्वये
ही संस्था अस्तित्वात आली आणि सलग ७२ वर्षे
भारतात हिशेब तपासणे, कर सल्ला, व्यावसायिक
व्यवस्थापन या क्षेत्रांसाठी उत्तमोत्तम व्यावसायिक
समाजाला दिले आणि देत राहिले. चार्टर्ड अकाउंटेंट हा
भारतातील आर्थिकदृष्ट्या सगळ्यात स्वस्त; पण यशस्वी झाल्यावर सन्मान व कामाचे समाधान मिळवून देणारा व्यवसाय आहे.

राष्ट्रीय डाॅक्टर दिवस

आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो. सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं.

Sunday 28 June 2020

डाॅ. कमला माधव सोहोनी

भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ
(स्मृतिदिन - २८ जुन १९९८)
 डॉ.कमला माधव सोहोनी यांचा जन्म बंगळुरूला झाला. योगायोग म्हणजे याच वर्षी त्यांचे वडील नारायण भागवत यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्र घेऊन एम. एस्सी. केली होती.  नुकत्याच सुरू झालेल्या या इन्स्टिट्यूटमधील पहिल्याच तुकडीत नारायणरावांनी प्रवेश मिळवला होता आणि एम. एस्सी. मिळवली. १९१९ साली पत्नीच्या निधनानंतर मुलांसह ते मुंबईत आले. त्यांच्या कन्या दुर्गाबाई भागवत या प्रसिद्ध मराठी लेखिका म्हणून नावाजल्या, तर कमला सोहोनी यांनी रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले.

Saturday 27 June 2020

जगातील पहिले ए.टी.एम. सुरू झाले इंग्लडमध्ये

लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. २७ जून १९६७ रोजी सुरू झाले. बँकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम (अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन). लोक या यंत्राला 'एनी टाईम मनी' यंत्र म्हणतात. ग्राहकाच्या बँक खात्याला हे एटीएम दूरध्वनीच्या तारांनी किंवा अन्य मार्गाने जोडलेले असते. ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता, एटएम कार्ड देताना बँकेकडून ग्राहकाला एक सांकेतिक गुप्त क्रमांक दिला जातो.

Friday 26 June 2020

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहु महाराज हे लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकर्‍यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आज, २६ जून रोजी त्यांची जयंती आहे.
आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २0 वर्षांचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. महात्मा जोतीबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले.

1983 च्या विश्व चषकाच्या आठवणी

25 जून 1983 या दिवशी क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणार्‍या लॉडर्सच्या मैदानावर भारतीय संघाने बलाढय वेस्ट इंडिजला नमवण्याचा पराक्रम करुन दाखवला. या एका विजयामुळे पूर्ण भारतीय क्रिकेटचाच चेहरा-मोहरा बदलून गेला.37 वर्षांपूर्वी लॉडर्सच्या मैदानावर कपिलदेव यांच्या संघाने इतिहास घडवला होता. अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करुन दाखवली होती. त्यावेळी भारतीय संघ अशी कामगिरी करुन दाखवेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. पण कपिलदेव यांच्या संघाने सर्वांनाच धक्का देत पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.  भारतीय क्रिकेट संघ 1983 साली विश्वचषक खेळायला इंग्लंडला गेला. त्यावेळी आपण विश्वविजेते बनू असे त्या संघालाही वाटले नव्हते.

Thursday 25 June 2020

देशातील आणीबाणीचा काळ

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. त्या १९६६मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वांतंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३0 साली वानर सेना नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या.

Tuesday 23 June 2020

सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ:स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र विश्वनाथबाबू दत्त ऊर्फ नरेन यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरीदेवी यांच्या पोटी कोलकाता इथं सिमुलीया भागात झाला. नरेंद्रचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात एटर्नि  होते. विश्वनाथ आणि भुवनेश्वरी देवी दोघंही कृती करणारे सुधारक होते. कालबाह्य रूढींना त्यांनी झुगारून लावलं होतं.
मोठेपणी जगाला शांततेचा संदेश देणारे नरेंद्र लहानपणी मात्र खूप खोडकर आणि रागीट होते. 1871 साली पं. ईश्वराचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत नरेंद्र जाऊ लागला. शाळेतला तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यानं एकाच वर्षात पूर्ण केला होता.

●●जागर-जागरण●●


संशोधन
प्लास्टिक कचऱ्यापासून हायड्रोजन गॅस!
'प्लास्टिक कचरा' ही एक मोठी डोकेदुखी आपल्यासह सगळ्याच देशांना भेडसावत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे मुंबई शहराची 2005 मध्ये आणि त्यानंतर दरवर्षी काय अवस्था होते आहे,हे आपण पाहात आहोतच. प्लास्टिक कचरा जाळल्यानंतर त्यातून निघणारा विषारी दूर आजूबाजूच्या रहिवाशांना आजाराने  बाधित करून टाकत आहे. आपल्या देशात खूप मोठा प्लास्टिक कचरा जमा होत असून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. आपल्या देशातल्या बहुतांश राज्यांनी प्लास्टिक पिशव्यांना वापरास बंदी घातली आहे. पण तरीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला नाही. या प्लास्टिकचे काय करायचे असा प्रश्न सर्वच देशांना पडला आहे. यातून संशोधन सुरू आहे.

●●जागर-जागरण●●


नव तंत्रज्ञान
रोबोट्सचा वाढता वावर
एक काळ असा होता की, रोबोट्स फक्त विज्ञानकांमध्ये असायचे. पण आता आपल्या आजूबाजूला हळूहळू
रोबोट्स दिसायला लागले आहेत. रेस्टॉरंट्स, काही बँका, मॉल इथे रोबोट्सना पहायला गर्दी जमते. रुग्णांची काळजी घ्यायला हॉस्पिटल्समध्ये रोबोट्सचा वावर वाढायला लागला आहे. यातले बरेच रोबोट्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतात. त्यांना काही साध्यासाध्या गोष्टींचं ट्रेनिंग अगदी सहज देता येते. ट्रेनिंग आणि मग निरीक्षण यांच्या मदतीने हे रोबोट्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात. हॉस्पिटलमध्ये निर्जतुकीकरण करणे, किंवा रुग्णांना वेळेवर औषध देणे, त्यांचं तापमान घेणं असं करत असताना त्यांच्या अनुभवात भर पडत जाते. या अनुभवावरून त्यांचा प्रतिसाद अधिकाधिक सुधारत जातो. अनुभवातून शिकत जाणं हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्त्वाचं लक्षण आहे आणि त्यासाठी योग्य ते ट्रेनिंग देणं हे तंत्रज्ञांसाठी अत्यंत कौशल्याचं काम आहे.

Monday 22 June 2020

●●जागर-जागरण●●


व्यक्तिविशेष

मृणाल गोरे
मृणाल गोरे यांचा जन्म २४ जून, इ.स. १९२८; खेडमध्ये झाला. या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या.
मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध होत्या.
पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.यांच्या नेत्रत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता. लाटणे मोर्चा-जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणार्‍या स्त्रीयांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली.समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.
ऐन दिवाळीत तेल,तूप,साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या रॉकेल महाग झाले होते.त्यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार जनतेला समजला. १७ जुलै, इ.स. २0१२ रोजी वसई येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

विश्व संचार


व्यक्तिमत्त्व

पहिली महिला फायटर पायलट
देश सर्वोपरी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून तिने स्वत:च्या आयुष्यापेक्षा देशसेवेला महत्त्व दिले आणि देशातील दहावी व राज्यातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा बहुमान मिळविला. ही गोष्ट आहे फ्लाईंग ऑफिसर अंतरा रवी मेहता यांची. भौतिक सुखसोयींचा त्याग करीत तिने आव्हानात्मक कार्याला प्राधान्य दिले, तिच्यारूपाने राज्याला पहिली महिला फायटर पायलट मिळाली. अंतरा रवी मेहता या मूळ नागपुरातील आहेत.

विश्व-संचार


निसर्ग-भ्रमंती
कक्काबेला
ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही कक्काबेला जाऊ शकता. कक्काबे हे ठिकाण बंगळूरूपासून २७0 किलोमीटर अंतरावर आहे. म्हैसूरपासून रेल्वेस्थानकावर उतरून कक्काबेला जाता येईल. म्हैसूर ते कक्काबेदरम्यान बस बर्‍याच बस धावतात. कक्काबे हे छोटंसं गाव आहे. पावसाळ्यात या गावाचं सौंदर्य खुललेलं असतं. नजर जाईल तथे फक्त हिरवळ असते. इथल्या डोंगरांवरून कुर्ग तसंच आसपासच्या परिसराचं मनोहारी दृश्य दिसतं.  कर्नाटकमधलं थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे कक्काबेमधलं वातावरण आल्हाददायक असतं. या गावाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. इथे दक्षिण-पूर्व आशियातल्या सर्वात मधुर अशा मधाची निर्मिती होते. या गावात कॉफीचे मळेही आहेत. पश्‍चिम घाटात वसलेल्या कक्काबे परिसरात विविध प्राणी आणि पक्षी पहायला मिळतात.  कक्काबेमध्ये पर्यटकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे इथला निसर्ग अजूनही टिकून आहे. या गावात भातशेतीही पहायला मिळते. भाताच्या शेतांमध्ये तुम्ही मनसोक्त हिंडू शकता. कक्काबेमध्ये काही दिवस निवांत घालवता येतील. परीक्षेची धावपळ संपली की कक्काबेची सैर करायला काहीच हरकत नाही.

सोने आणि भारत

आपला देश प्राचीन काळापासून सोन्याचा देश म्हणून ओळखला जातो. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता किंवा रावणाची लंका सोन्याची बनली होती असे संदर्भ वारंवार आपल्याला वाचायला मिळतात. मात्र आपला देश सोन्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगात सर्वांत जास्त सोनं दक्षिण आफ्रिकेत आढळतं. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. विटवॉटर्सरँड खोऱ्यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. आणि या खोऱ्याच्या 40 टक्के भागात अजूनही उत्खनन झालेलं नाही. सोन्याची जगातली दुसरी सर्वांत मोठी खाण भारतात आहे, जी दक्षिण कर्नाटकमध्ये कोलार जिल्ह्यात आहे. सध्या 2003 पासून येथील खाण बंद आहे.

नाग: महाराष्ट्रातला आणि भारतातला

गडद तपकिरी किंवा काळे नाग राजस्थान, पंजाब,हरियाणा या भागात दिसतात. या नागांच्या फण्यांच्या  मागच्या बाजूला कोणतंही चिन्ह दिसत नाही. त्याची लांबी सुमारे 1.4 मीटर एवढी असते. काळ्या नागालाच डोम्या नाग (black cobra-Naza Oxiana) असंही म्हणतात. महाराष्ट्रात नागाची एकच जात आढळते. त्याला नाग (Indian Cobra) म्हणतात. या नागाचं प्राणी शास्त्रीय नाव Naja Naja (उच्चार-नाजा नाजा) असं आहे. हे प्राणी शास्त्रीय नाव मूळ 'नाग' या संस्कृत शब्दावरून आलं आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या नागांचा रंग पिवळसर किंवा गव्हाळी असतो. नागाची मादी सुमारे 10 ते 12 अंडी घालते आणि स्वतःच्या शरीराची चुंबळ करून अंड्यावर बसते. ती अधूनमधून स्वतःच्या शरीराचे चुंबळीतील वेढे एकमेकांवर घासून काही प्रमाणात ऊब निर्माण करत असावी आणि ती ऊब अंड्यांना देत असावी.

Sunday 21 June 2020

सुभाषचंद्र बोस

'तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा', अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात अद्वितीय असे मानावे लागेल. स्वातंत्र्य मिळविण्याचे त्यांचे मार्ग वेगळे होते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याशी त्यांचा संघर्षही झाला. पण त्यांची लोकप्रियता मात्र या संघर्षानंतरही वाढतच राहिली. लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव वेगळा होता. कटक येथे बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल रायबहादूर जानकीनाथ बोस कटक येथील नगरपालिका व जिल्हा बोर्डाचे प्रमुख होते.

डॉ. सलीम अली

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षीतज्‍जञ डॉ. सलीम अली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ रोजी झाला पक्षीशास्त्राच्या इतिहासात सलीम अली यांचं मोठं योगदान आहे. पक्षीजीवनाचा चालताबोलता ज्ञानकोश असंही त्यांना म्हटलं जात असे. त्यांनी पक्षीशास्त्रात केवळ अभ्यासच केला नाही तर इतरांमध्ये पक्ष्यांबद्दल कुतूहल निर्माण केलं. दहा वर्षाचे असताना सलीम अली त्यांच्या मामासोबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मामाकडून त्यांना पक्षांच्या अनेक जाती प्रजातींबद्द्ल माहिती मिळाली.

महाकवी कुलगुरू कालिदास

आषाढ महिन्यातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो. सोमवारी २२ जूनपासून आषाढ महिन्याला सुरुवात होत आहे. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिना कालिदासांचा महिना म्हणून साजरा होतो.

Thursday 18 June 2020

डॉ. धनंजय दातार

अकोला या जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या धनंजय दातार यांना लहानपणापासून दुबईवरून येणाऱ्या लोकांबद्दल अॅट्रॅक्शन वाटत होत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवलं की आपण पण दुबईमध्ये जाऊन भरपूर पैसा कमवायचा, त्याच वेळेत त्यांच्या वडिलांनी एअर इंडिया मधून रिटायर होऊन दुबईला किराणा मालाचे दुकान चालू केल, वडिलांच्या सोबतींना धनंजयने काम चालू केलं. अपार कष्ट व त्याला प्रामाणिकपणाची जोड देत जगात  'मसाला किंग' म्हणून  जगात नाव कमावले.

भारत-चीन सीमा

भारत आणि चीन यांच्यात तीन हजार ४८८ किमी लांबीची सीमा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते. ही सीमा पश्‍चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश अशा तीन सेक्टर्समध्ये विभागलेली आहे. अनेक भागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद असल्याने अजून बर्‍याच ठिकाणी सीमेचे आरेखन झालेले नाही. पश्‍चिम सेक्टरमधल्या अक्साई चीन भागावर भारत आपला दावा सांगतो. हा भाग सध्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे. १९६२ सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान चीनने हा संपूर्ण भाग ताब्यात घेतला होता. तर पूर्व सेक्टरमध्ये चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगतो.

शिवसेनेची स्थापना

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली अनेक वर्ष आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.

Wednesday 17 June 2020

राणी लक्ष्मीबाई

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या पहिल्या म्हणजे १८५७ च्या संग्रामात अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सगळ्यामध्ये असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. चिमाजी आप्पांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागिरथीबाई यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १८३५ ला राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. मोरोपंतांनी आपल्या कन्येचे नाव मनुताई असे ठेवले. मनुताई लहानपणापासून हुशार व देखणी होती. मनू पाच वर्षांची असतानाच तिच्यावरचे मातृछत्र हरपले. हुशार असलेल्या मनुताईला दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी हेरले. ब्रह्मवर्त येथील वाड्यात नानासाहेब पेशवे व रावसाहेब यांच्यासह चिमुकल्या मनुताईने तलवार, दांडपट्टा व बंदुक चालवणे तसेच घोडदौडीचे शिक्षण घेतले.

Tuesday 16 June 2020

राजकीय वारसदार:ठाकरे,पवार, तटकरे, खडसे

शिवसेनेचे २९ वर्षांचा युवा आणि शहरी वर्गात हवा असलेला चेहरा, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि आश्चर्याचा धक्का दिला. निवडणुकीच्या राजकारणात उतरलेला ठाकरे घराण्यातील हा पहिलाच तरुण चेहरा. ते निवडून आले आणि मंत्री झालेसुद्धा! आदित्य यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढून, समाजातील अनेक घटकांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि एक प्रकारे स्वतःला मुख्यमंत्री किंवा उद्धव ठाकरे यांच्यानंतरचा शिवसेनेचा भविष्यातील मोठा नेता म्हणून प्रोजेक्ट केले.

Monday 15 June 2020

महाराष्ट्रातील पहिला विधवा पुनर्विवाह

आजचा दिवस महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या
इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील पुणे येथे गोखले बागेत १८६९ साली पहिला विधवा विवाह पार पडला. प्राचीन समाजांमध्ये (उदा., इजिप्त व जर्मनी या देशांतील) विधवेला तिच्या मृत पतीच्या थडग्यात जिवंत पुरत असत. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रे व नीतिनियम यांनुसार विधवेला पतीच्या मरणास कारणीभूत धरल्याने, ती पापी व अमंगल आहे ही समाजाची धारणा बनली. तिने कुटुंबातील मंगल प्रसंगी उपस्थित राहू नये, असा प्रघात पडला.

Sunday 14 June 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपुत

अभिनेता सुशांत सिंह राजपुत हा जन्माला आला बिहारमध्ये २१ जानेवारी १९८६ साली. आणि १४ जून २0२0 रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने मुंबईतील बांद्रा येथे गळफास लावून आत्महत्या केली. टीव्ही कलावंत म्हणून तो नावारूपास आला. डान्सरही होता आणि अभिनेताही. सुशांतने टीव्ही सीरिअल्सपासून आपल्या करीअरची सुरुवात केली. स्टार प्लसवरील किस देश मे हैं मेरा दिल या २00८ च्या सीरिअल्समधून त्याने कलावंत म्हणून प्रवेश केला. झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता (२00९-११) मध्ये त्याने अवॉर्ड विनिंग परफार्मन्स केला. त्याच्या कई पो चे (२0१३) नाटकाला मेल डेबूटचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. त्यानंतर त्याची शुद्ध देसी रोमान्समधील (२0१३) भूमिका भाव खाऊन गेली.

कवी शंकर वैद्य

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला , पालखीचे भोई अशा एकाहून एक सरस तसंच दर्जेदार काव्यरचनांची निर्मिती करणारे प्रसिध्द कवी व साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर या गावी झाला. घर गावाच्या उत्तर टोकाला. अडीच मजली, सात खणी घर. घराभोवती भरपूर झाडी! कडुनिंब. चिंच. कवठी. बोरी. फुलांनी सदैव टवटवलेला प्राजक्त. घराच्या मागल्या अंगणात बहरलेला जाईचा मांडव. घरापासून आंबराईही लांब नव्हती. झाडाफुलांच्या या सहवासात शंकर वैद्यांचं बालपण आणि किशोरपणीचा काळ गेला. मात्र, नंतरच्या काळात त्यांचं विश्व बदललं आणि विविध अनुभवांचं जग त्यांना बिलगू लागलं. बालपणी ज्या निसर्गावर त्यांनी प्रेम केलं, त्याची छाया त्यांना लाभली. हा निसर्गच त्यांच्या कवितांना पोषक ठरला.

राजगड किल्ला

राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्हय़ातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि. मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोर्‍यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगरावर हा किल्ला आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.

महर्षी कर्वे

विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पयर्ंतचे शिक्षण पूर्ण केले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली समाजसेवेची. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांचा विवाह राधाबाईंशी झाला, त्यावेळी राधाबाईंचे वय होते ८ वर्षं. पण बाळंतपणात म्हणजे १८९१ साली राधाबाईंचा वयाच्या २७ व्या वर्षीमृत्यू झाला त्याच वर्षी अण्णासाहेबांना फग्यरुसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करण्यास सुरुवात केली होती.

नेल्सन मंडेला

नेल्सन मंडेला २७ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासातून फेब्रुवारी 1990 मध्ये बाहेर आले. जून १९६४ मध्ये ते बंदिवासात गेले होते.एवढा भयानक तुरुंगवास भोगल्यानंतर एखादा सामान्य माणूस पार खचून गेला असता; परंतु मंडेला हे एक अजब रसायन होते. ताठ मानेने, दमदार पावले टाकीत, हसतमुखाने आणि खंबीर मनाने त्यांनी कारागृहाला निरोप दिला. त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर जणू काही बंदिवासात असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही त्रयीही चालत होती. मंडेलांचे प्रत्येक पाऊल हे दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याकडे, स्वयंशासनाकडे, लोकशाहीकडे नेणारे होते.

जागतिक रक्तदान दिवस

मानवाची निर्मिती ही ईश्‍वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती आहे. मानवाचे जीवन म्हणजे ईश्‍वराने दिलेली मोठी देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर नवनवीन प्रयोग केले. एका मानवानेच रक्त मानवाचे जीव वाचून शकते. दुसर्‍यावर मरण्याची पाळी अपघातात येत असते. अतिरिक्त रक्तस्त्राव, रक्तक्षय, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांमध्ये रोग्याला रक्त मिळाले नाही तर, तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते .अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍या मानवाचे प्राण वाचू शकतात. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही.

Saturday 13 June 2020

बहुआयामी व्यक्तिमत्त्व:प्र. के.अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. यांच्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे केले होते, तर त्यांच्या वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे केले होते. साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेषसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला.

Friday 12 June 2020

बालकामगार विरोधी दिवस

12 जून जागतिक कामगार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. मुले राष्ट्राची संपत्ती आहेत. उद्याचा भारत बलवान करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. बालकांना शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळणे आवश्यक आहे. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे.  मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. काम करणारी, भीक मागणारी, कौटुंबिक कलहात सापडलेली, तसेच इतर अनाथ मुलांसाठी  समाजात जागृती करताना मुलांना कामावर ठेवू नये, मुलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवू नये व त्यांच्या विकासाला चालना द्यावी, यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक पु. ल.देशपांडे

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पुल बहुरूपी होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असा अनेक भूमिका त्यांनी वठवल्या. त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी त्यांची गती या सर्व क्षेत्रात सारखी होती. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ (मुंबई) ला झाला. गुळाचा गणपती या सबकुछ पु.ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते.पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले.

आपला जिल्हा आणि त्याची वैशिष्ट्ये

आपण पाहतो, आपल्या घरात, आजूबाजूला राहत असलेल्या अनेकांचं कोणतं ना कोणतं टोपननाव असतचं. अनेकांना पाळण्यातील नाव हे तर असतातच. तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळ्या नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपणनावे ठेवली जातात. त्याचपध्दतीने भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावालाही इतिहास आहे. त्यानंतर काही शहरांच्या नावात बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची जुनी नावं बऱ्याच जणांना माहित नसतील.

Thursday 11 June 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं मुख्यालय कोठे आहे?
२) अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी एक असलेल्या तोडरमल यांच्याकडे कोणतं खातं होत?
३) गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश केला?
४) संत तुलसीदास कोणत्या शासकाच्या काळात होऊन गेले?
५) सद्भावना दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : १) न्युयॉर्क २) वित्त  ३) पाली ४) अकबर ५) २0 ऑगस्ट

सानेगुरुजी

साहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला.कला म्हणजे काय?, मानव जातीची कथा, राष्ट्रीय हिंदूधर्म, दिल्ली डायरी, ना खंत ना खेद याशिवाय भारताचा शोध, अनेक चरित्रपुस्तके, गोड गोष्टी, १४ अनुवादित ग्रंथ, भारतीय संस्कृती हा लेखसंग्रह. सुंदर पत्रे, पत्री तसेच श्यामची आई हे इतिहास घडवणारे पुस्तक, अशी त्यांची ग्रंथसंपदा.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला.

राजा अलेक्झांडर

मॅसिडोनियाचा राजा फिलिप आणि त्याची पहिली राणी ऑलिंपियस यांचा अलेक्झांडर हा पुत्र. पेला येथे जन्म. लहानपणी फिलिपने त्यास युवराजास योग्य असे सर्व लष्करी व राजकीय शिक्षण दिले होते. याशिवाय त्याचा गुरू रिस्टॉटल याने त्याच्यामध्ये काव्य, कला, राज्यशाख, तत्त्वज्ञान आदी शास्त्रांविषयी गोडी उत्पन्न केली होती. पण रिस्टॉटलचा 'नगर-राज्ये हीच संस्कृतीची उत्कृष्ट केंद्रे होऊ शकतात', हा विचार अलेक्झांडरला पटत नव्हता. होमरचा आकिलीझ हा त्याच्यापुढे आदर्श होता. म्हणून त्याने जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आणि त्यानुसार नेहमी चढाईचे घोरण स्वीकारले.

Wednesday 10 June 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी
१० जून १९९९ ला केली.पक्षाच्या वर्धापन दिनाला देश आणि राज्यातील परिस्थिती कठीण बनलेली आहे. कोरोना संकटाने देश आणि महाराष्ट्र वेढलेला आहे. औद्योगिकदृष्ट्या क्रमांक एकचे राज्य महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई. कोरोनाच्या संकटात सगळ्यात भीषण अवस्था मुंबईची झाली. मुंबईबरोबर ठाण्यापासून कोल्हापूरपर्यंत आणि नाशिकपासून नागपूरपर्यंत महाराष्ट्रभर सगळीकडे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या आरोग्य व्यवस्थेपुढे आव्हान उभे ठाकले. या आव्हानाला सामोरे जात असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणेला नेतृत्व दिले आणि जनतेसमोर सातत्याने वस्तुस्थिती ठेवत दिलासा दिला.

उद्योगपती राहुल बजाज

राहुल बजाज यांचा जन्म, सावित्री आणि कमलनयन बजाज या मातापित्यांच्या पोटी, कलकत्ता येथे १0 जून १९३८ रोजी मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती.ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना २00१ साली पदमभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रूपा घोलप या महाराष्ट्रीयन तरुणीशी १९६१ साली राहुल यांचा विवाह झाला.

कामगार नेते नारायण लोखंडे

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला होता. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालया समोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता. मुंबई सारख्या महानगरामध्ये ज्यांनी कामगारांसाठी मोठी चळवळ उभी करून त्यांच्या हक्कांसाठी पूर्ण जीवन खर्ची केले असे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे या थोर व्यक्तीची त्यांच्या मुंबई या कर्मभूमीत नाव निशाणी किंवा लक्षवेधी स्मारक सुद्धा नसावे हे कामगार चळवळीला भूषणावह नाही.

जागतिक दृष्टिदान दिवस

खर तर हे संपूर्ण जग फार सुंदर आहे. आपल्या जवळपास असलेल्या प्रत्येक वस्तुत एक विशिष्ट प्रकारची सुंदरता आहे. ते पाहण्यासाठी एका विशिष्ट नजरेची आवश्यकता असते. या जगातील प्रत्येक वस्तू पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांचा सहारा घ्यावा लागतो. परंतु आपण कधी विचार केला की, जर हे डोळे नसते तर हे जग कसे असते? सगळीकडे अंधार असते, यात तीळमात्र शंका नाही. डोळ्यांचे महत्त्व जीवन जगणारा प्रत्येक माणूस जाणतोच.

भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे मारी अॅम्पिअर

आंद्रे मारी अॅम्पिअर हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व गणितश
होते. त्यांचा जन्म फ्रान्समधील पॉलिमियालिऑन येथे झाला. विद्युतगतिकीशास्त्र (इलेक्ट्रोडायनॅमिक्स) या भौतिकी शाखेचा पाया घालणारे संशोधक म्हणून ते ओळखले जातात, अॅम्पिअर अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. लहानपणीच त्यांनी प्रगत गणिताचा अभ्यास करून त्या वेळेपर्यंत सिद्ध झालेले सर्व गणित आणि विज्ञान आत्मसात केले होते. लॅटिन भाषा व निसर्ग शास्त्रही ते शिकले होते. त्यांच्या वाचनात अनेक विषयांचा समावेश असे.

Tuesday 9 June 2020

आदिवासी समाजक्रांतिकारक बिरसा मुंडा


आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म झारखंडमधील इतिहातु या छोट्याशा खेड्यात झाला. वडील सुगना व आई करमी. जन्म गुरुवारी म्हणजे विस्युगवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव 'बिरसा' ठेवण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी
बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गायी गेले. बासरी व दुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जागे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते.

सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे

जगाच्या दृष्टीने एक मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या भारतात स्वदेशीचा नारा नवा नाही. ती ऐतिहासिक चळवळ आहे. एकोणिसाव्या शतकात देशात ब्रिटिशांच्या आगमनाने औद्योगिक पर्वाला सुरुवात झाली होती. या भूमीत पिकत असलेला कापूस, पुरेसे मनुष्यबळ यांमुळे देशात कापड गिरणी उद्योग भरभराटीस येत होता. गिरण्यांची संख्या विशेषत: मुंबईत मोठ्या संख्येने वाढत होती; मात्र भारतातील कापड उद्योग मोडून भारताची बाजारपेठ आपल्याच ताब्यात राहावी, असा कुटील डाव ब्रिटिश सरकारचा होता. त्यासाठी विलायतेतून येणाऱ्या श्रीमंतांच्या कापडाच्या जकातीवर मोठी सवलत देऊन तो भार भारतात बनविल्या जाणाऱ्या टाकला.

किरण बेदी


किरण बेदी यांचा जन्म पंजाब राज्यातील अमृतसर येथे ९ जून १९४९ रोजी ला झाला. या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८0 पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.

धुव्वाधार फलंदाज:अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे हा त्याच्या नावाप्रमाणेच धुव्वाधार फलंदाजीसाठीही ओळखला जातो. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि द वॉल म्हणून परिचित असलेल्या राहुल द्रविडला तो आदर्श मानतो. एवढेच नाही तर, माजी क्रिकेटर व्ही.व्ही.एस. लक्ष्मणप्रमाणेच तो कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो. त्यामुळे त्याची तुलना व्ही.व्ही.एस. लक्ष्मणबरोबर केली जाते. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अश्चि-केडी येथे. अजिंक्यचा अर्थ, ज्याला कुणीही हरवू शकत नाही, जो अभेद्य आहे, असा होतो.  अजिंक्य रहाणेला त्याचे मित्र-मंडळी जिंक्स असे संबोधतात.

Friday 5 June 2020

शिवराज्याभिषेक

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठानाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती.

पर्यावरण सुदृढ आणि निरोगी ठेवू

निसर्ग व पर्यावरण यांच्यातीलनाते संबंधांचा मागोवा घेण्यासाठी आणि या नातेसंबंधांतील निसटलेले दुवे शोधून ते पुन्हा जोडता येतील का याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा १९७२ मध्ये जून महिन्यात स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जागतिक परिषद आयोजित करण्यात आली.५ जून ते १६ जून असे ११ दिवस चाललेल्या या परिषदेत ११२ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा या परिषदेत सक्रिय, उल्लेखनीय सहभाग होता. या परिषदेचे सकारात्मक परिणाम लवकरच दृष्य स्वरूपात जाणवू लागले. या ऐतिहासिक परिषदेनंतर जागतिक पातळीवर निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धन करण्याच्या हेतूने भारतासारख्या राष्ट्रांनी अनेक महत्वाचे कायदे केले.

पशुपक्ष्यांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

चातक पक्षी- पावसाळा जवळ आल्याचे संकेत
आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही. चातक पक्षी 'पिऊ.. पिऊ' या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हेहमखास समजावे.

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी

चित्रपट केवळ करमणुकीसाठी नसतात असे मानणार्‍यांपैकी बासु चटर्जी यांचे नुकतेच निधन झाले. हिंदीच नव्हे, तर भारतीय चित्रसृष्टीला वेगळे वळण देणार्‍या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये बासु चटर्जी यांचा समावेश होतो. नर्म विनोद ही त्यांची खासियत होती तरीही त्यांचे चित्रपट मानवी स्वभावावर सुरेख भाष्य करत असत.  रंजन करणार्‍या चित्रपटांतूनही त्यांनी माणसाच्या मनाचा, नातेसंबंधांचा शोध घेतला. स्वतंत्र शैलीमुळे ते एक महत्त्वाचे चित्र कलावंत ठरले.
 हिंदी आणि बंगाली चित्रपट, दूरचित्रवाणी अशा भिन्न माध्यमांमध्ये त्यांनी सहज संचार केला आणि आपला ठसा उमटवला.