Saturday 2 November 2019

वासुदेव बळवंत फडके


 (४ नोव्हेंबर १८४५ ते १७ फेब्रुवारी १८८३). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आद्य प्रवर्तक. फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्हय़ातील शिरढोण (रायगड) गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. बळवंतरावांचा मुलगा वासदेव. त्याचा जन्म शिरढोण येथेच झाला. सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५-६0 या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण वासुदेवाने इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.

चित्तरंजन दास


 (५ नोव्हेंबर १८७0 ते १६ जून १९२५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदेपंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म कोलकाता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दासांचे मूळ घराणे विक्रमपूर परगण्यातील. वडील भुवनमोहन कोलकात्यात वकिली करीत. ते ब्राह्मो समाजाचे होते. चित्तरंजनाचे शिक्षण कोलकात्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९0 मध्ये ते आयसीएस परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचार सभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुदार उद्गार काढले. तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन चित्तरंजनांनी मॅक्लिनचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करविले.

धोंडो केशव कर्वे

 (१८ एप्रिल १८५८ - ९ नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरूड व रत्नागिरी येथे. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फग्यरुसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली. पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या 'शारदा सदन' या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. महर्षी अण्णासाहेब कर्वे आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली.