Sunday 13 March 2022

लोहासारखा मजबूत लोहगड


मजबूत,बलशाली,बुलंद किल्ला म्हणजे लोहगड. स्वराज्यातील महत्त्वपूर्ण आणि बळकट. लोहाप्रमाणेच मजबूत  असलेला हा किल्ला पुण्यापासून 40-45 किलोमीटर अंतरावर आहे. इथे झाडांची खूप दाटी आहे. गडावर जायला मजबूत पायऱ्या आहेत. गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वतःची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. लोहगडाचा अद्वितीय असा प्रवेशमार्ग यापैकी एक आहे. सर्पाकार मजबूत तटबंदीला हा प्रवेशमार्ग चार दरवाजांमधून जातो. गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा या अनुक्रमे येणाऱ्या चार दरवाजांपैकी 'हनुमान' तेवढा मूळचा आहे. बाकी सर्व नाना फडणवीस यांनी इसवी सन 1790 ते 1794 या कालावधीत बांधलेले आहेत. या आशयाचा एक शिलालेख इथे आढळतो. नारायण आणि हनुमान दरवाजांमध्ये दोन भुयारे आहेत.मराठेशाहीत त्यांचा उपयोग धान्य साठवणुकीसाठी केला जात असे. नारायण दरवाज्याच्या दोन्ही बाजूस 'शरभ' या काल्पनिक पशूचे शिल्प आहे. 

एकाच्या माथ्यावर दुसरा अशा रीतीने हे चार दरवाजे रचले आहेत. प्रत्येकाला तटबुरुजांनी जोडलेले आहे. या तटबुरुजांवर फिरण्यासाठी स्वतंत्र वाट तसेच शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या आणि खिडक्या ठेवल्या आहेत. महादरवाजातून आत शिरताच समोर एक मुस्लिम धाटणीची इमारत दिसते. ती औरंगजेबच्या मुलीची कबर असल्याचे सांगितले जाते. या इमारतीला लागूनच गडाची सदर आणि लोहारखान्याच्या इमारतीचे अवशेष आहेत. याच्यामागे टेकडीवर चारचौकी मोठी सदर, किल्लेदाराचा उदवस्त वाडा आहे. यामागे खडकाच्या पोटात तीन -चार गुहा आणि पाण्याची टाकी आहेत. याच्या आणखी उजव्या बाजूला एका पाठोपाठ दोन विस्तीर्ण लेणीवजा गुहा आहेत. यातली पहिली गुहा खजिनदाराची तर दुसरी लोमेशऋषीची म्हणून ओळखली जाते. या गुहांसमोरच दोन तोफा ठेवल्या आहेत. याच्या पुढे वर गेल्यावर एक कबर लागते.

पुढे मुख्य वाटेवर एक विस्तीर्ण बारव दिसते.ती नाना फडणावीसांनी बांधली आहे. तळ्यालगत छोटीशी विहीर आणि त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर आहे. गडाच्या या भागातूनच आणखी पुढे गेल्यावर पश्चिमेकडे गेलेली डोंगराची लांबसडक सोंड आपल्या पुढ्यात येते. लोहगडाच्या भूरचनेतील हा आगळावेगळा भाग. नाव विंचूकाटा.इथून समोर बोरघाट दिसतो. आजचा हा बोरघाट कधी सातवाहनांपासून व्यापारासाठी खुला आहे. त्याच्या संरक्षणासाठी लोहगड-विसापूर जोडींची निर्मिती झाली असे म्हणतात. लोहगडावरील गुहा व अन्य खोदकामे त्यावेळचीच. 

या गडाच्या वाटचालीला आता दोन हजार वर्षे उलटून गेली. यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या राजवटीही गडाने अनुभवल्या. आणि त्यानंतरचा यवनांचा गुलामीचा काळही सोसला. 1648 मध्ये शिवरायांनी इथल्या आदिलशहाला हुसकावून लावून लोहगड स्वराज्यात आणला. दुरुस्त करून बुलंद केला. 1664 मध्ये सुरतेहून आणलेली लूट याच किल्ल्यात ठेवली होती. लोहगडचे महत्त्व जाणूनच मिर्झाराजे जयसिंह यांनी हा गड तहांतून मोगलांकडे आणला.पण पुढे पाच वर्षांत म्हणजे 13 मे 1670 रोजी मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला. पेशवाईत या गडाचे आणखी महत्त्व वाढले. नाना फडणवीसांनी गडावर नवनवीन बांधकामे केली. मात्र आज किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

सातपुडा प्रदेशातील भिल्ल समाजाची खाद्यसंस्कृती


सातपुडा प्रदेश प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो. सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये हा प्रदेश विखुरला गेलेला आहे. या पर्वतरांगा महाराष्ट्रात अमरावती, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या दिसतात. रामायणातील एका प्रसंगात राम जेव्हा दंडकारण्यात आले होते,तेव्हा त्यांना शबरी नावाच्या एका महिलेने तिची उष्टी बोरे खायला घातली होती. ती शबरी नावाची भिल्ल महिला होती. त्या काळात या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना शबर, किरायी, इशाद या नावानेही ओळखले जाते. 

सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आणि नर्मदा,तापी नदीच्या किनारी हा भिल्ल समाज वसला आहे. एकलव्याचा हा भिल्ल समाज. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक  आदी राज्यांमध्ये भिल्ल आदिवासी आढळून येतात. प्राचीन शिलालेख आणि साहित्यातही याचा उल्लेख सापडतो. नंदूबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शोभानगर येथे या समाजाची वस्ती आहे. नर्मदा खोऱ्यातील विस्थापित समाज इथे आला आहे. शोभानगर हे गाव वसलेले असल्याने ते आखीव आणि एका रांगेत घरे बांधलेली दिसतात. मातीची आणि लाकडाची असलेल्या घरांमध्ये कुठेही भिंत दिसत नाही. खोल्या दिसत नाहीत. एका घरात एक कुटुंब राहात असले तरी या एका कुटुंबात 20 ते 25 माणसं राहतात. म्हणजे 20-25 जणांचं एक कुटुंब. इतर आदिवासी जमातीप्रमाणे इथेही एकत्र कुटुंब पद्धती नांदते. गडद तपकिरी वर्ण, सुदृढ कमावलेली शरीरयष्टी ही त्यांची वैशिष्ट्ये. पुरुष धोतर नेसतात. ते कानांत बाळ्या व हातात चांदीची कडी आणि अंगठी घालतात. स्त्रिया कमरेभोवती जुनेर गुंडाळतात. अंगात चोळी घालतात. कानात चांदीच्या बाळ्या, दंडात बुल्या, हातात कंगना,बाला, कानांत नथनी व इतर प्रकारचे दागिने घालून नटताना दिसतात. घरात एका कोपऱ्यात मातीची चूल दिसून येते. त्यावर संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक केला जातो. या समाजाची खाद्यसंस्कृती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आहारात भात, कोद्री ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये यांचा आहारात प्रामुख्याने समावेश असतो. मांस, मासेही खातात. ज्वारी-बाजरीची भाकरी आणि उडीद डाळीची भाजी हे यांचं प्रमुख अन्न आहे. याला 'दाल-भाजी' म्हणतात. 

दाल-भाजीची कृती अगदी सोपी आहे.

महुआची फुलं उखडून घेतात. ज्वारी-बाजरीच्या पिठात मिसळून मळतात. पळसाच्या पानांच्या साहाय्याने हातावरच भाकरी बनवली जाते. अशा भाकऱ्या बनवून ती चुलीवर पातेल्यात किंवा हंड्यात पळसाच्या पानाने झाकून ठेवतात. हंड्यात थोडे पाणी आणि गवताचा पाला असतो. भाकऱ्या उखडून घेतल्या जातात. भाजीसाठी लसूण आणि मिरच्या एकत्र कुटून घेतल्या जातात. भांड्यात पहिल्यांदा उडीदडाळ उखडून घेतली जाते. त्यात वाळलेली अंबाडी भाजी बारीक करून टाकली जाते. चवीला मीठ टाकले जाते. तेलाचा अजिबात वापर केला जात नाही. भाजी शिजल्यानंतर पळसाच्या पानावर डाळ आणि भाजी वाढली जाते. भाकरी थोडी गोड लागते. 

अलिकडे या समाजात शिक्षणाचा प्रसार चांगला झाला आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुण अन्यत्र नोकरी किंवा अन्य कामे करतात. मात्र त्यांनी आपली लोकसंस्कृती जोपासली आहे. पाड्यावर तरुण-तरुणी सायंकाळी निवांत वेळी अंगणात  ढोलाच्या तालावर ठेका धरून नाचतात.गाणी गातात. लग्नाची पारंपरिक पद्धत विलक्षण वेगळी आहे. नवरा मुलगा मुलीला यात्रेत किंवा बाजारात पाहून मागणी घालतो. लग्न जमले नाहीतर मुलगा मुलीच्या संमतीने तिला पळवून नेतो. मुलीकडून हुंडा घेतला जातो. लग्न लावताना मुहूर्त वगैरे पाहिला जात नाही,पण शनिवार व अमावस्या दिवशी लग्ने लावली जात नाहीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली